आज १ मे… महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकत्रितपणे साजरा करत आहोत आपण….
बऱ्याच जणांना या मागील पार्श्वभूमी माहिती नाहीय… विशेषतः तरुण वर्गाला….
पण ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र हा संघर्ष बघितलाय त्यांना हे सगळे अगदी ठळकपणे आठवत असेल आणि डोळ्यांसमोर येत असेल…
मी १९५८ मध्ये जन्मलेय त्यामुळे या चळवळीशी माझा काही संबंध आला नाही पण लहानपणापासून या गोष्टी ऐकत आलेय…
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
माझ्या आईचे मामा श्री. काकासाहेब तांबे यांचे मुंबईत आरोग्यभुवन हे हॉटेल त्याकाळी खूप फेमस होते. मराठी माणसांचे आवडते हॉटेल!!
स्वतः काका तांबे सामाजिक भान बाळगून मराठी माणसांसाठी काम करणारे. (याच काकांनी जेष्ठ अभिनेत्री मुमताज हिला देखील आश्रय देऊन शिक्षणास मदत व खाण्यापिण्याची सोय केली होती.
ती नेहमी या गोष्टीचा आदरपूर्वक उल्लेख करायची) तर यांचा देखील या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग होता.
आणि पुढे १ मे १९६० मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. ज्याच्या मागे सामान्य माणूस ते चळवळीतील नेते या सर्वांचा सहभाग आणि १०६ जणांचे बलिदान असलेला असा धगधगता इतिहास आणि संघर्ष आहे. (या बाबतीत हुतात्म्यांचा उल्लेख होताना काही ठिकाणी १०५ तर काही ठिकाणी १०६ केला गेलेला आहे.)
आणि हा इतिहास मी, ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितला आणि भोगला अशा काका तांबे आणि माझा मामा वासुदेव पुरोहित यांच्याकडून ऐकलाय.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पण बरीचशी संस्थाने नंतर भारतात विलीन झाली. जसे हैद्राबाद, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशचा यांचाही त्यात समावेश होता.
स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचनेची मागणी होऊ लागली कारण स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन होण्यापूर्वी संस्थानांचा कारभार अस्तित्वात होता आणि त्यांच्या अधिपत्याखाली त्यांनी जिंकलेले किंवा बळकवलेले असे विविधभाषी भाग होते.
त्यामुळेच भाषावर प्रांतरचनेची मागणी होऊ लागली. महाराष्ट्रात देखील या चळवळीने जोर धरला.
कोकण, मुंबई, देश म्हणजेच सह्याद्रीचा पठारीभाग, विदर्भ, मराठवाडा, खान्देश, बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, डांग हा मराठी भाषिक भाग एकत्र आला पाहिजे ही प्रमुख मागणी जोर धरू लागली. या साठी सरकारने दार कमिशनची स्थापना केली. परंतु दार कमिशनने विविध आक्षेप घेत या मागणीस विरोध दर्शविला…
मग चळवळीतील नेत्यांनी पुन्हा नवीन कमिशनची मागणी केली.. जे वि. पी. कमिटी आली व त्यांनी मुंबई महाराष्ट्राला देण्याची मागणी नाकारली… पुन्हा नवीन फाजलअली आयोगाची स्थापना झाली.. या आयोगाने तर विचित्र विभाजनाची शिफारस केली.
मुंबई सौराष्ट्रसह गुजरातला जोडायचे… बेळगाव आर्थिक दृष्ट्या कर्नाटकाशी जोडलेला असल्याने बेळगाव व निपाणी, बिदर, कारवार कर्नाटकला जोडायचे…
विदर्भ बाजूलाच ठेवायचा कारण तो महाराष्ट्रात आल्यास नागपूरचे महत्व कमी होईल. त्या वेळेस तो भाग ‘सी. पी. अँड वेरार’ म्हणून ओळखला जात होता.. ‘सी. पी.’ म्हणजे ‘सेंट्रल प्रॉव्हिन्स’…यात मध्यप्रदेश चा काही भाग होता. आणि ‘वेरार’ म्हणजे ‘वऱ्हाड प्रांत’.
फजलअली आयोगास मोठा विरोध झाला. लोक रस्त्यांवर उतरले. पोलिसांनी लाठी चार्ज केला पण आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम होते.
पोलिसांनी गोळीबार केला यात पंधरा जणांचा बळी गेला. चळवळ या हुतात्म्यांच्या बलिदानानाने आणखी तीव्र झाली. एस. एम. जोशी, श्रीपाद डांगे, प्रबोनधकार ठाकरे, सेनापती बापट, बाबासाहेब आंबेडकर असे खंदे नेतृत्व उभे ठाकले. प्र. के. अत्रे आपल्या “मराठा”या वृत्तपत्रातून जोरदार टीका करू लागले.
शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे आपल्या शाहिरीतून, पोवाड्यांतून मराठी बाणा अधिकाधिक तीव्र करू लागले..
त्यामुळेच मुंबईचे मूळ रहिवाशी आगरी कोळी मंडळी, कोकणातून पोटार्थी म्हणून आलेला मराठी तरुण वर्ग, तळागाळातील मराठी माणूस अस्तित्वाची लढाई लढू लागला.
तेव्हाचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई पक्के गुजराती. त्यांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध. तिकडे विदर्भात देखील विदर्भ स्वतंत्र झाला पाहिजे म्हणणारा गट अस्तित्वात होता.
विदर्भ महाराष्ट्राला जोडला गेला तर नागपूरचे महत्व कमी होईल अशी त्यांची मांडणी होती. बेळगाव महाराष्ट्राला देणार नाही. तो कर्नाटकचा भाग आहे असे कर्नाटक ठामपणे सांगत होता तर बेळगावच्या मराठी भाषक जनतेला महाराष्ट्रात यायचे होते.
सर्व बाजूंनी गुंता वाढत होता. अखेर नेहरू मध्यस्थीस आले. पण हटवादी मोरारजींसमोर त्यांचे काही चालेना. एक तर मोरारजी हे काँग्रेसचे जेष्ठ नेते, गांधीजींच्या सहवासातील शिवाय स्वातंत्र्य संग्रामात सहभागी असलेले!! त्यांना दुखवणे जड झाले होते.
कर्नाटक सरकारचाही दबाव वाढला होता म्हणून नेहरूंनी त्रिभाजनाचा प्रस्ताव ठेवला. या नुसार विदर्भासह कोकण, देश मराठवाडा, खान्देश हा भाग महाराष्ट्रास जोडणे आणि निपाणी कारवार बिदर व बेळगाव सह कर्नाटक आणि मुंबई हा इलाखा स्वतंत्र. ही घटना फेब्रुवारी १९५६ ची…
त्या आधी मोरारजीभाई देसाई आणि स. का. पाटील यांनी २० नोव्हेंबर १९५५ ला चौपाटीवर जाहीर सभा घेऊन मुंबईसह महाराष्ट्र या कल्पनेला जोरदार विरोध केला होता.
स. का. पाटील यांनी तर “आजच काय पुढील ५००० वर्षे मुंबई महाराष्ट्राला देणार नाही” असे विधान केले होते.
महाभारतातील दुर्योधनाने जसे सुईच्या अग्रावर राहील एवढी सुद्धा जमीन पांडवांना देणार नाही असे तुच्छतेने म्हटले होते तसेच मोरारजीभाईंनी “मुंबईत काँग्रेस जिवंत आहे तोवर मुंबई महाराष्ट्राला देणार नाही.
मुंबई फक्त गुजरातची” असे आगीत तेल ओतणारे वक्तव्य केले होते. आणि शेवटी आग पेटलीच… त्यांची सभा उधळली गेली.
फेब्रुवारी १९५६ ला मुंबई इलाखा स्वतंत्र घोषित झाल्यावर तर आंदोलनाने आणखी उचल खाल्ली. नेते मंडळींनी बैठका घेऊन आंदोलन तीव्र करायचे ठरवले.
२१ नोव्हेंबर १९५६ ला फ्लोरा फाऊंटन इथे मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले. बोरिबंदर व चर्चगेटकडून मोठ्या संख्येने आंदोलक जमा होऊ लागले.
परिस्थिती काबूत येत नाही हे बघितल्यावर पोलिस आले आणि लाठीचार्ज सुरू झाला. लाठ्या खाऊनही आंदोलक हटेनात उलट बातमी कळल्यावर आणखी जास्त संख्येने लोकांचे लोंढे येऊ लागले.
मोरराजींनी गोळीबाराचा आदेश दिला आणि मुंबई आमचीच म्हणणाऱ्या मुंबईच्या मूळ मराठी जनतेने या गोळ्या झेलल्या. तब्बल ८० जणांनी प्राणाची आहुती दिली. कित्येक शेकड्यांनी जखमी झाले. तरी यज्ञकुंड धगधगतेच राहिले…
तब्बल १०६ हुतात्म्यांच्या रक्ताने लिहिलेला हा इतिहास….
अखेर अविरत लढ्यानंतर १ मे रोजी मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला…
विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, देश ज्याला आता पश्चिम महाराष्ट्र म्हणतात तो… असा मराठीभाषक भाग मिळून स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली…पण बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर हातातून गेले.. आजही बेळगावचा सीमावर्ती भाग महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहे…
तर असा हा १ मे महाराष्ट्रदिनाचा ज्वलंत इतिहास. आता थोडक्यात कामगारदिनाचा इतिहास देखील नजरेखालून घालूया…
१ मे जागतिक कामगार दिन
हा इतिहास देखील रक्तरंजितच आहे….
१८५० च्या आसपास कामगार चळवळींना आस्ट्रेलियात सुरवात झाली. कामगार वर्गाची तेव्हा प्रचंड पिळवणूक व्हायची. असमान वेतन, साप्ताहिक सुट्टी नाही, वेतन वस्तू मोबदल्यात असल्याने आर्थिक पिळवणूक व्हायची.
खाण कामगारांना कोणतीच सुरक्षा नव्हती, बाल मजुरी सर्रास चालायची, औषधोपचार मिळायचे नाहीत. कामगार संघटना अस्तित्वात नसल्याने त्यांना कोणतीच नुकसानभरपाई मिळायची नाही.
तेव्हा ४ एप्रिल १८५६ ला कामगारांच्या आंदोलनापुढे झुकत ऑस्ट्रेलियन सरकारने हा दिवस सुट्टी म्हणून जाहीर केला. तरी मागण्या पूर्णपणे मान्य झाल्या नव्हत्या. दरम्यान अमेरिका आणि कॅनडाच्या कामगारांनी देखील आंदोलनास सुरवात केली.
हळूहळू जगभरात व्याप्ती वाढत चालली होती. १ मे १८८६ ला शिकागो मध्ये धरणे व मोर्चे आंदोलन सुरू झाले.. ४ मे १८८६ ला शिकागोत पोलिसांनी लाठीचार्ज व गोळीबार केला यात सहा कामगार मृत्यू पावले.
कोणा अज्ञाताने केलेल्या पोलिसांवरील बॉम्ब हल्ल्यात सहा पोलीस मेले तर पन्नास जखमी झाले.
पुढे रेमंड लेविन याने १८८९ पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत १ मे हा दिवस कामगारदिन म्हणून घोषित करायची मागणी केली आणि ती मान्य झाली.
१८९१ मध्ये इतर देशांमधूनही मान्यता देण्यात आली तसेच साप्ताहिक सुट्टी, बालमजुरीवर बंदी, समान वेतन, रोख वेतन, कामावर असताना सुरक्षा, कामावर असताना अपघात झाल्यास नुकसान भरपाई ह्या मागण्या देखील मान्य झाल्या.
भारतात ब्रिटिशांनी भारतीय कामगारांना कोणत्याच सवलती दिल्या नाही.. तेव्हा नारायण मेघाजी लोखंडे या मराठी तरुणाने बॉम्बे हॅन्ड मिल्स असोसिएशनची स्थापना करून कामगारांसाठी लढा उभारला.
मात्र त्यांनी थोडा वेगळा मार्ग अवलंबला. त्यांनी इंग्रज मालकांना सांगितले की आम्ही आठवड्यातील सहा दिवस स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी राबतो आम्हाला समाजसेवा व देशसेवेसाठी साप्ताहिक सुट्टी हवी. तसेच कामगारांना समान वेतन, सुरक्षा, अपघाताची नुकसानभरपाई हवी.
सात वर्षांच्या अविरत लढ्यानंतर साप्ताहिक सुट्टी इंग्रजांनी मान्य केली तो दिवस होता १० जून १८९०.
इंग्रजांनी रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस म्हणून मान्यता दिली. आजही रविवार हाच सुट्टीचा दिवस चालू आहे. इतर मागण्या देखील त्यांना मान्य कराव्याच लागल्या. जागतिक मान्यता मिळालेला १मे हा कामगार दिन म्हणून भारतात देखील मान्य झाला.
नारायण मेघाजी लोखंडे याना ट्रेड युनियनचे जनक मानले जाते. एक मराठी तरुणाने कामगारविश्वाला दिलेली ही मोठी देणगीच.
विसरू नये असा हा १ मे चा इतिहास आज मी तुमच्यासाठी घेऊन आले… तुमच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.