साडे अकरा बाराची दुपारची वेळ. एसटीचा लाल डबा. बस उन्हात तापलेली.
रस्त्यामध्ये चालतांना तिचा होणारा ‘खडब. .खडबड’ कर्णकर्कश आवाज.
खिडकी मधून येणारी उष्ण वाफ. अंगातून घामाच्या धारांचे पुर वाहत होते.
रुमाल प्रत्येकाने हातात काढून ठेवलेला. रुमालाचा उपयोग कधी घाम पुसायला होई तर कधी उन्हाची उष्ण झळ नाकात जाऊ नये म्हणून नाक बांधायला होई….
प्रवासी उतरवण्यासाठी बस थांबली. तसे जास्त उकडायला लागले….
सहज खिडकीतून बघीतले तर एक लहान मुलगा पाहिला. गलिच्छ कपडे, अंग काळपट पायात चप्पल नव्हती. वय पाच वर्षाच्या आसपास. पण केस व्यवस्थित कापलेले. चेहरा घामाने भिजून स्वच्छ झालेला. चेहरा पाहिला तर तो रंगाने गोरा होता….
दिसायला खूपच सुंदर, डोळे तरतरीत, चमकदार वाटले. खूपच गोंडस वाटत होता तो. त्याचा घामामुळे स्वच्छ झालेला चेहरा. इतर शरीराला मिळताजुळता नव्हता. चेहरा सोडून इतर शरीर अस्वच्छ काळेकळपट वाटत होते…
माझ्याच मुलाच्या वयाचा पण आज काय त्याच्यावर ही वेळ आहे… मी मनोमन त्याच्या जन्मदात्यांना शिव्यांची लाखोली पण वाहिली…. कसे जन्म देऊन मुलांना सोडून देतात भिक मागायला. शी… कश्याला जन्म द्यायचा.. लोकांकडं भिक मागायला.
वासनेचा किडा वळवळतो म्हणून त्याला शांत करायचा आणि त्याचे फळीत म्हणजे ही मुलं…. किती किती विचार येऊन गेले त्या मुला बद्दल, त्याच्या जन्मदात्यांनबद्दल….
मानवी मनाचा स्वाभावच असा असतो. विचार करायला लागला कि नको नको ते विचार करत बसतो….
आता तो रस्ता ओलांडणार होता. माझे कुतूहल जागे झाले. एव्हढासा हा आता कसा रस्ता ओलांडणार….
मी पाहतच राहिलो. इकडे बस पण थोडा जास्त वेळच थांबली होती….
ह्या मुलाने रस्ता ओलांडायला सुरवात केली. डावी मुठ त्याची बंद होती. त्याने उजवा हात पुढे केला. अंगठा हाताच्या तळव्याकडे वळवला.
पुढच्या चार बोटांनी तो रस्त्यातील गाड्यांना इशारा करत एकएक गाडी पास करत होता.
रस्ता सिग्नलचा नव्हता झेब्रा क्राॅसिंग पण नव्हती. साठफुटाचा रस्ता तो ओलांडत होता….
ट्रक, टेम्पो, बस, फोरव्हिलर, मोटार बाईक अशी अनेक वाहने खूपच लिलया तो ओलांडून गेला….
त्याचे उजवा हात पुढे करून व तोंडाने काहीतरी पुटपुटत त्याने रस्ता पार केला होता. खूपच काैतुक वाटले मला त्याचे. अशी रस्ता ओलांडायची वेळ माझ्यावर येते त्यावेळेस मी खूप दक्षता घेत असतो…..
मी हे पण मान्य करतो की ह्या मुला सारखा सहजपणे रस्ता ओलांडणे मला अजूनतरी शक्य झाले नाही. पण हा एव्हढासा मुलगा रस्ता कसा ओलांडायचा हे मला शिकवून गेला….
मी त्याच्या वयाच्या माझ्या मुलांची एव्हढी काळजी घेत असतो तरी ती कुठेतरी धडपडत असतात. मनात सहज विचार आला ह्या मुलाला चांगले शिक्षण मिळाले तर हा खूप पुढे जाऊ शकतो….
कारण त्याचा रस्ता ओलांडायचा आत्मविश्वास, त्याची निडर वृत्ती मनाला खूप भावली. त्या मुलाची किव पण वाटली ती त्याच्या भवितव्याबद्दल.
आज देशाचे भवितव्य कुठे आहे…. रस्त्यावर का?….
त्याला आता मी नजरे आड होई पर्यंत सोडणार नव्हतो…. माझी बस पण अजून ऊभी होती. प्रवाश्यांचा वैताग त्यांच्या चालक व वाहकास चिडून बोलण्यावरून समजत होता…. मी स्थिर होतो. कारण माझे लक्ष ह्या छोट्याकडे होते….
आता रस्ता ओलांडून तो पुढे निघाला होता. याच्या समोरून एक साडीतील स्त्री येत होती. तिच्या डोक्यावर घमेलं होतं. ह्या मुलाने तिला थांबवलं… तसे तिने डोक्यावरील घमेलं खाली उतरवून ठेवलं. डोक्यावरील चुंबळीच्या कपड्याने याचे तोंड पुसले नंतर स्वत:चे तोंड पुसले…
आता ती स्री खाली बसली होती…. याने डाव्या बंद मुठीतील काही वस्तू तिच्या तोंडात भरवली…. याच्या भरवण्याने तिला खूपच आनंद झाला…. तिने याला दोन्ही गालावर चुंबन घेतले. याच्या डोक्यावरून हात फिरवला व पोटाशी घेतले. हे चाळिस अंश तापमानाच्या उन्हात ह्या मायलेकांचे प्रेम बघून बसमध्ये मी बसलोय आणि मला उकडतय हे मी विसरून गेलो….
मघाशी मी ह्या छोट्याला भिकारी समजत होतो.. आता मलाच कुणीतरी कानाखाली जोरात मारल्या सारखे वाटले…
कारण तो भिकारी नव्हता तर माझ्यातील नको असणारा दानशूर कर्ण जागा झालेला होता….
एका सह प्रवाश्याचा आवाज कानावर आला.
“मास्तर किती उकडतंय जाऊदे गाडी.”
इकडे पण ह्या मायलेकाचे प्रेम कंत्राटदाराला पाहवलं नसणार. कारण लगबगीनं तिने याला एका टपरीच्या आडोशाला लोटून, कपड्याची चुंबळ करून हातात घमेलं घेऊन निघून गेली….
आता बस पण निघाली पुढे. बसने गती घेतली. मी त्या मुलाला नजरे आड होई पर्यंत एकटक पाहत होतो….
आता बसची रस्त्या बरोबर बर्यापैकी जुगलबंदी जमली होती. मी घाम पुसला आणि बॅग मधून पाण्याची बाॅटल काढून पाणी प्यायला घेतले….
माझ्या बाजूच्या सीटवरचे प्रवासी आंतरराष्ट्रीय राजकारणावर चर्चा करत होते. तर बाॅटल वर करून पाणी पित असता…. मला समोर डिजिटल इंडियाचा बॅनर दिसला….
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.