आपल्या जागृत आणि सुप्त मनाच्या मध्ये एक ‘पॉझ बटण’ आहे. म्हणून इथूनपुढे मनात कोणताही विचार आला तरी त्या पॉझपाशी जरा वेळ थांबायचे आहे. मनात येणारा विचार मला मदत करतो आहे की माझी मनस्थिती आणखी बिघडवतो आहे, हे तपासण्यासाठी हा क्षणभराचा पॉझ पुरे आहे.
अनेकवेळा आपण स्वतःशीच मनातल्या मनात बोलत असतो. सकाळी डोळे उघडल्या उघडल्या मन बोलायला सुरवात करते. त्यात भूतकाळातल्या काही गोष्टी असू शकतात, काही वर्तमानकाळातल्या तर काही भविष्यातल्या. या विचारांना कोणताही नियम नसतो ना कुठला निर्बंध.
उलट-सुलट, सुसूत्र – विस्कळित, उपयोगी – निरुपयोगी, हवेसे – नकोसे विचार कोणत्याही क्रमाने मनात सतत एकापाठोपाठ येत असतात. असे सतत बडबडणारे मन सोबत घेऊनच आपण दिवसांचा प्रवास करत असतो.
हे नुसतेच विचार असले असते तर ठीक आहे, पण मनात येणाऱ्या या विचारांच्या पाठोपाठ मनात त्याप्रमाणे भावना तयार होतात आणि त्या भावनांच्या प्रमाणे आपली मानसिकता बदलत जाते.
जोपर्यंत याचा त्रास होत नाही तोपर्यंत त्यात काही बदल करावा, हे आपल्या लक्षातही येत नाही. बरं ‘त्रास’ कशाला म्हणायचं, हे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळं असू शकतं. कारण प्रत्येकाची त्रास सहन करण्याची सीमा वेगवेगळी असू शकते. म्हणून अनेक व्यक्तींना आपल्या मनात येणारे असे विचार अनावश्यक आहेत, हे लक्षातही येत नाही.
जर या मनातल्या विचारांचा आपल्या दैनंदिन वागण्या-बोलण्यावर विपरित परिणाम होत असेल तर अशा लोकांचे बदललेले वागणे आणि बोलणे त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या सहज लक्षात येते.
या लोकांना मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मदतीची गरज असते. वस्तुस्थिती अशी आहे की आपल्यापैकी अनेकजण आज या मानसिक अतिविचारांच्या चौकटींमध्ये कमीजास्त प्रमाणात अडकलेले आहेत.
मनावर आलेला ताण प्रत्यक्ष व्यवहारात बाजूला ठेवणे ज्यांना शक्य होते, त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळितपणे पार पडतांना दिसतात पण काहींना यासाठी वेगळी एनर्जी द्यावी लागते, हेदेखील खरे आहे. म्हणजे प्रत्यक्ष मनोविकारांपासून आपण लांब असलो तरी मनावर सतत असणारा ताण आपल्याही जगण्याची गुणवत्ता कमीअधिक प्रमाणात हिरावून घेतोच आहे.
मन म्हटलं की विचार येणारच, सगळ्यांच्याच येतात. पण येणारे विचार आपल्याला उपयुक्त आहेत की नाहीत हे कसे ओळखायचे?
नुकताच घडलेला एक प्रसंग सांगते, दुसऱ्या दिवशी बारावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर म्हणून सगळी तयारी करून संज्ञा आधीच्या रात्री नेहमीपेक्षा लवकर झोपली. त्यांच्या घरापासून परीक्षेचे सेंटर जवळ असल्यामुळे सकाळी 9 वाजता घरून निघाले तरी चालणार होते. ती आठ वाजताच तयार होऊन बसली.
पेपरचा सगळा अभ्यास व्यवस्थित झाला होता. सहज बसल्या बसल्या तिच्या मनात विचार आला, “सगळा अभ्यास तर झालाय माझा, पण नक्की हेच पुस्तक होते ना अभ्यासाला? की नेमके यावर्षी ते बदलले आणि मला समजलेच नाही?”
हा विचार मनात आला आणि तिला काही सुचेना. तिचे हातपाय कापायला लागले. अंग घामाने भरून गेलं. चेहरा पांढराफटक पडला आणि ओठ थरथरायला लागले. आई जवळच होती.
तिच्या ते लक्षात आले. तिला परीक्षेचे टेन्शन आलेय, हे आईला समजले. आईने तिला धीर दिला. आपल्या मनात आलेल्या विचारांवर ती आणखी विचार करायला लागली.
“कसं शक्य आहे? मला काय वर्षभर ते समजणार नाही?” दुसरं मन लगेच म्हणालं, “का शक्य नाही? तुझं सगळं लक्ष तर ‘नीट’ परीक्षेची तयारी करण्याकडे, कॉलेजला गेलीस कधी तू?” या सगळ्यात नऊ कधी वाजले आणि आई-बाबा तयार होऊन कधी आले तिला समजलं सुद्धा नाही.
सगळे खाली उतरले तर नेमकं गाडीचं चाक पंक्चर. तिला तो अपशकून वाटला. बाबांनी ‘ओला’ बोलावली आणि तिघे सेंटरकडे निघाले, तिचं मन अस्वस्थच होते. रस्त्यात दोनवेळा ट्रॅफिक जाम लागला तरी ते वेळेवर सेंटरपाशी पोहोचले आणि ती घाईघाईत क्लासरूमकडे निघाली.
आई-बाबा काही म्हणतायेत हे पण तिच्या लक्षात आलं नाही. रायटिंग पॅड मागेच राहिला होता. पेपर मिळाला आणि तिच्या लक्षात आले की तिने जो अभ्यास केलाय त्याचेच प्रश्न आहेत. मग कुठे तिला एकदम हायसं वाटलं. पेपर तिच्यासाठी अवघड नव्हता पण तिला अक्षर काही चांगलं काढता आलं नाही. तिला अपेक्षित होता तसा, तिच्या मनासारखा पेपर लिहिता आला नाही.
हे सगळं घडलं ते केवळ मनात आलेल्या त्या एका विचारामुळे. तिला प्रिलीम देता आलेली नव्हती. म्हणून तिच्या मनात या विचाराने घर केले. आपल्या मनातले विचार जवळच्या कोणालाही वेळेवर सांगणे तिला जमले नाही आणि साध्या अडचणी तिला अपशकून वाटल्या. यातल्या कोणत्याही विचारांची तिला प्रत्यक्षात मदत न होता त्रासच झाला.
मनात विचार येणे, आपल्या हातात नसते. पण त्या विचाराचे काय करायचे हे मात्र प्रत्येकवेळी आपल्याच हातात असते. आपला वेळ, दिवस, उर्जा आणि उत्पादकता यावर प्रभाव टाकणारे आणि ती वाया घालवणारे कोणतेही विचार आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त असू शकत नाहीत.
अशा विचारांमुळे आपली मानसिकता बिघडत असेल तर ते विचार पुढे चालू ठेवण्यापेक्षा ताबडतोब ते मनातून काढून टाकणे जमायला हवे. हे म्हणणे सोपे आहे पण प्रत्यक्षात जमवायचे कसे? हे समजून घेण्याआधी हे लक्षात घ्यायला हवे की मनात येणारा कोणताही ‘विचार’ नेमका कसा असतो.
“हिरव्यागार कुरणातून तो अनवाणी पायांनी चालला होता, थंडगार गवताचा तो स्पर्श त्याच्या अंगावर शहारा उमटवून गेला. भर दुपारची वेळ असूनही जंगल इतके दाट होते, की प्रकाशाचे किरण जमिनीपर्यंत पोहोचूच शकत नव्हते.
वेगवेगळ्या पक्षांचे आवाज आणि हिरव्यागार जंगलाचा वास.. जवळून कुठूनतरी उंचावरून धों धों आवाज करत खाली झेपावणारा धबधब्याचा आवाज येत होता. त्या दिशेने त्याने हळूहळू सरकायला सुरवात केली. आपल्याच हृदयाचे ठोके त्याला स्पष्ट ऐकू येत होते, घसा कोरडा पडला होता..”
हे वाचलं की आपल्या मनात काहीतरी संवेदना निर्माण होतात. आपल्या पूर्वानुभवातून किंवा कल्पनेने डोळ्यासमोर प्रतिमा उभ्या राहतात.
आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाटायला लागते. हे सगळे तर आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभवत नसतो तरी त्या जंगलाचा दाटपणा आपल्याला जाणवतो, त्याची प्रतिमा मनात तयार होते कारण केवळ शब्द वाचून मनात जे विचार आले ते प्रत्येकाच्या आपापल्या पूर्वअनुभवातून किंवा कल्पनेतून आलेले असतात.
कोणाला त्याला जोडून आणखी काहीदेखील आठवू शकतं. विचार म्हणजे मनात नुसतेच शब्द येत नाहीत तर काही दृश्य प्रतिमा आणि आवाज, स्पर्श, वास यांचाही अनुभव येतो. म्हणजेच विचारांना एक ‘रचना’ असते.
मनाला त्रास देणारे विचार येत असतील तर ते नुसतेच नाहीत, त्याबरोबरीने आणखी काय काय आहे, हे बघायला हवे. भीतीच्या आजाराने ग्रासलेल्या माझ्या एका पेशंटला स्वतःच्याच मृत्यूची चित्रं डोळ्यासमोर दिसत असत.
स्वतःच्या मरणाचा हा संपूर्ण मूव्ही अचानक मनात सुरु झाला की त्याची भीतीने गाळण उडत असे. कोणी कितीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी भीती काही कमी होत नसे.
नेमकं होतं काय, हे त्याचे त्यालाही समजत नसे. या भीतीतून बाहेर पडण्यासाठी त्याला मदत करतांना त्याच्या मनातल्या या सगळ्या घडामोडींची दखल घ्यावी लागली. त्या विचारांचे नेमके करायचे काय हे त्याला समजल्यावर त्याचा आजार आटोक्यात यायला वेळ लागला नाही.
मनातल्या विचारांमधून संवेदना, भावना निर्माण होतात आणि एक अनुभव तयार होतो, त्यातून मनाची सध्या आहे ती अवस्था बदलते. विचारांच्या, अनुभवांच्या तीव्रतेनुसार ती त्रासदायक असू शकते किंवा आनंददायक ठरते.
आपल्या प्रत्येकाच्या विचारांचा एक स्वयंचलित मोड असतो, सततच्या सरावाने, सवयीने विचार त्याच ठराविक दिशेने किंवा पद्धतीने केले जातात.
आपल्या सगळ्यांकडेच एक जागृत मन असते आणि एक (किंवा एकापेक्षा जास्तदेखील) सुप्त मन असते. जागृत मन आपल्यासोबत वर्तमानातल्या अनुभवात असते. परंतु सुप्त मन हे संपूर्णपणे स्वयंचलित असल्यामुळे ते आलेल्या अनुभवांचा लगेच अर्थ लावायला सुरवात करते.
अनुभवाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचायची त्याला घाई असते. अनुभवांना, त्यातल्या व्यक्तींना लेबल लावायची घाई असते. त्याने जोपासलेल्या, वाढवलेल्या धारणांपैकी एका साच्यात एकदाचा तो अनुभव बसवण्याची घाई असते. यातून आपल्या मनाचे विचारांचे पॅटर्न, सवयी ठरतात.
आपल्या जागृत आणि सुप्त मनाच्या मध्ये एक ‘पॉझ बटण’ आहे. म्हणून इथूनपुढे मनात कोणताही विचार आला तरी त्या पॉझपाशी जरा वेळ थांबायचे आहे. मनात येणारा विचार मला मदत करतो आहे की माझी मनस्थिती आणखी बिघडवतो आहे, हे तपासण्यासाठी हा क्षणभराचा पॉझ पुरे आहे. तुम्हीदेखील या पॉझपाशी जरावेळ थांबून वेध घ्या, आत्ता या क्षणी तुमचे मन नेमका कोणता विचार करते आहे?
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खुप छान लेख आहे मला यामुळे खुप फायदा झाला इतराना नक्कीच होईल