यूँ ही नहीं मिलती राहि को मंज़िल,
एक जुनूँ सा दिल में जगाना होता है|
भरनी पड़ती है चिड़िया को उड़ान बार बार,
तिनके तिनके से आशियाना बनाना होता है|
मित्रांनो… न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधीना कधी नशीब सुद्धा पायघड्या टाकतं. आज मी तुम्हाला एका अश्या माणसाची गोष्ट सांगणार आहे. जे म्हणतात, मी नेहमी काहीतरी शिकत राहतो कारण मी काहीहि शिक्षण घेतलेलं नाही….
हो चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या सावजीभाई ढोलकीयांची ही कहाणी.
तेच सावजीभाई ढोलकीया ज्यांच्या कर्मचाऱ्यांना कार, फ्लॅट बोनसमध्ये दिल्याच्या बातम्या आपण वर्ष दोन वर्षांपूर्वीच्या दिवाळीमध्ये ऐकल्या होत्या.
चौथीपर्यंतचं शिक्षण झालेल्या सावजीभाईंनी नऊ हजार कर्मचारी, सहा हजार करोड टर्न ओव्हर असलेली कम्पनी नावारुपाला आणली.
एवढंच नाही तर आपल्या कर्मचाऱ्यांना दागिने, कार, 2BHK फ्लॅट असे घसघशीत बोनस देणारी ‘हरे कृष्णा एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ ही त्यांची कम्पनी त्यांच्या व्यवसायात देशातली पाचवी मोठी कम्पनी म्हणून ओळखली जाते. पण काही विशेष शालेय शिक्षणाशिवाय त्यांनी हा चमत्कार कसा केला असेल?
१२ एप्रिल १९६२ साली गुजरातच्या अमरेली या छोट्याश्या गावात गावात जन्मलेले सावजी धनजी ढोलकीया. अभ्यासात मात्र त्यांना कधीच रस नव्हता.
चौथीपर्यंतचं शिक्षण फक्त त्यांनी घेतलं. शिक्षणात आवड नसली तरी जिद्द, चिकाटी आणि स्वप्न एवढं भांडवल घेऊन हा बारा वर्षांचा मुलगा सुरतमध्ये आला आणि इथे एका छोट्या फॅक्ट्रीत हिरे घासण्याचं काम करू लागला.
इथे सुरुवातीला त्यांना केवळ १८० रुपये मिळायचे. इथे त्यांनी मन लावून काम करायला सुरुवात केली. आणि काही महिन्यातच चांगल्या कामामुळे त्यांचा पगार कित्येक पटींनी वाढून १२०० रुपये झाला.
साधारण दहा वर्षांपर्यंत त्यांनी हिरा घासायचं काम केलं. इथे त्यांना हिऱ्याच्या कामातली बारीकी चांगली अनुभवायला मिळाली.
त्यानंतर त्यांनी आपल्या घरातच आपले दोन भाऊ तुलसी, हिम्मत आणि काही मित्रांबरोबर स्वतःचं हिरे घासण्याचं म्हणजेच हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम सुरु केलं.
हळूहळू सुरु झालेल्या या कामाने सात वर्षातच चांगला जम बसवला. आणि १९९१ सालापर्यंत त्यांचा टर्न ओव्हर १ करोड रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला.
आता ते व्यवसाय आणखी वाढवण्याचा विचार करू लागले. स्वतः मॅनेजमेंट, मार्केटिंगचं शिक्षण घेतलं नसलं तरी सावजीभाईंची दूरदृष्टी व्यवसायाचा परीघ वाढवण्यासाठी प्रयत्न करत होती.
१९९२ साली मुंबईच्या एका बिजनेस कन्सल्टन्ट ची सर्व्हिस घेऊन मुंबईमध्ये ऑफिस घेऊन ‘हरे कृष्णा एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ हि कंपनी सुरु केल
इथून त्यांनी मार्केटिंगचे काम सुरु केले. याच काळात त्यांचे भाऊ घनश्याम सुद्धा आपल्या भावांच्या टीममध्ये सामील झाले. जास्त शिक्षण नसणं हे सावजीभाईंच्या मार्गातली बाधा कधीच ठरू शकलं नाही, कारण इतक्या वर्षांच्या अथक परिश्रमांतून ते आपल्या व्यवसायातले ‘खिलाडी’ बनले होते.
सुरुवातीला ज्या कम्पनीचा टर्न ओव्हर १ करोड पर्यंत होता तोच मुंबईला ऑफिस सुरु करून मार्केटिंग सुरु केल्यापासून दिवसेंदिवस वाढत गेला.
आणि आज हाच व्यवसाय ६ हजार करोड पर्यंत गेला. आज हि कंपनी ७५ पेक्षा जास्त देशांमध्ये हिरा सप्लाय करते. एवढंच नाही तर सात देशांमध्ये त्यांचे स्वतःचे सुसज्ज असे आउटलेट्स सुरु झालेले आहेत.
शिवाय जगभरातल्या ६५०० रिटेल आउटलेट्स वर यांचे हिरे विक्रीसाठीही उपलब्ध असतात. हिरे व्यसायातल्या त्यांच्या योगदानासाठी कित्येक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
हि झाली सावजीभाईंची व्यावसायिक बाजू. यापलीकडे पाहिलं तर माणूस म्हणून सावजीभाई ‘तराशा हुवा हिरा है’ असं म्हंटल तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.
परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारे सावजीभाई हिऱ्यांचेच नाही तर माणसांचे आणि त्यांच्या कामाचे सुद्धा चांगले पारखी आहेत. ते म्हणतात त्यांची कम्पनी फक्त हिराच नाही तर चांगली माणसं घडवायचं सुद्धा काम करते.
कारण माणूस चांगला बनला तर काम आपोआपच चांगलं होऊ लागेल. सावजीभाई आपल्या कर्मचाऱ्यांना मानाची वागणूक मिळावी म्हणून नेहमी प्रयत्न करतात.
पूर्वी गुजरातमध्ये हिरा घासण्याचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘हिरा घिस्सू’ म्हंटल जायचं.
पण सावजीभाईंनी कामाची प्रतिष्ठा वाढावी म्हणून त्यांना ‘डायमंड आर्टिस्ट’ आणि ‘डायमंड इंजिनिअर’ असं नाव दिलं. कर्मचाऱ्यांना ते आपल्या कुटुंबाचा हिस्सा समजतात. हा सगळं प्रवास आहे २६ वर्षांचा.
आणि या काळात त्यांच्या कम्पनित कधीही संप झाला नाही. सावजीभाई म्हणतात कर्मचाऱ्यांना चांगलं वातावरण आणि सन्मान मिळाला तर ते का संप करतील?
शालेय शिक्षण न घेतलेल्या सावजीभाईंनी सगळं आपल्या अनुभवातून शिकलं आणि म्हणून अमेरिकेतून शिकून आलेल्या आपल्या मुलाला श्रमाची किंमत कळावी म्हणून केरळमध्ये फक्त सात हजार रुपये देऊन आपली वडील म्हणून ओळख न सांगता नोकरी करण्यासाठी पाठवलं.
इथे त्यांच्या मुलाला ना मल्याळी भाषेचा गंध ना कष्ट करायची सवय आणि म्हणून त्याने आयुष्याला एका वेगळ्या नजरेने बघायचं प्रॅक्टिकल शिक्षण घेतलं. तेव्हा सावजीभाईंनी आपल्या मुलाला आपल्या कम्पनीची जवाबदारी दिली.
२०१७ सालच्या दिवाळीत आपल्या ९ हजार कर्मचाऱ्यांमधील १७०० कर्मचाऱ्यांना त्यांनी कार, 2BHK फ्लॅट, दागिने त्यांच्या चांगल्या कामाचा मोबदला म्हणून दिले. असे बोनस सावजीभाईंच्या कम्पनित यापूर्वी सुद्धा दिले गेले आहेत.
असे हे सावजीभाई म्हणजे अजब रसायन, सर्वसाधारण घरात जन्म घेऊन असाधारण काम कसं करता येतं याचं उदाहरण म्हणजे सावजीभाई, पुस्तकी शिक्षण न घेता आयुष्याकडून शिक्षण घेणारे ते सावजीभाई…
तर मित्रांनो काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द, विचारांवर विश्वास असेल तर तुम्हाला सुद्धा काहीही अशक्य नाही या शुभेच्छांसह… टाटा.. बाय-बाय 👋👋
खरा बापमाणूस!! जगायला शिकवणारे करोडपती सावजी ढोलकिया
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.