जमलीच तर स्वतःची नाहीतर बिनधास्त चोरलेली एखादी सुंदर कविता किंवा चारोळी लिहावी आणि एखाद्या सुरेख पाकिटात अत्तर शिंपडावं आणि बंद करून पाठवून द्यावं, खरंच प्रत्येकाने एकदातरी एखादेतरी प्रेमपत्र लिहावं.👩❤️👩
मग अगदी स्वतःच्या नवऱ्याला किंवा नवऱ्याने बायकोला! कदाचित वेडेपणा वाटेल हे सगळं करण्याचा!! पण हा वेडेपणा आनंद देणारा असेल एवढं नक्की.
वयात आल्यावर प्रत्येकजण कुणाच्या न कुणाच्या प्रेमात पडतोच…….
कधी ते व्यक्त होतं किंवा कधी ते आयुष्यभर अव्यक्त राहतं!!! व्यक्त झालेल्याला प्रेम मिळालं आणि अबोल राहिलेल्या ते मिळालं नाही असं काही नसतं. प्रेम व्यक्त करो अथवा न करो ते कायम मनात असतंच.
टपोऱ्या थेंबानी पडणारा पाऊस, चहूकडे पसरलेला हिरवागार निसर्ग, समोर तुडूंब भरलेला “मोती’ तलाव, आणि त्या तलावाच्या काठावरून एकाच छत्रीतून जाणारे ते दोघे.. त्याचा हात नकळत तिच्या कमरेकडे सरकत होता आणि ती ड्रेस भिजू नये म्हणून त्याला अजूनच बिलगत होती.
त्यांचं निरागस प्रेम त्या अलवार रिमझिम कोसळणाऱ्या सरींमध्ये अधिकच बहरलं होतं. कसं जमलं असेल त्यांचं? मला उगाचच प्रश्न पडला.
कॉलेजमध्ये एकत्र असतील, की एकाच वाड्यात शेजारीशेजारी राहत असतील? की अजून काही? कशी ओळख झाली असेल? आणि कसे जुळले असतील रेशमी धागे?
आणि कसा बरं असेल तो क्षण, जेव्हा त्याने तिला किंवा तिने त्याला पहिल्यांदा सांगितलं असेल, की तू मला आवडतेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे किंवा ती त्याला कसं म्हणाली असेल, तू मला आवडतोस, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. तो प्रेमाचा रुकार??? कसा बरं पोचला असेल, एकमेकांचा एकमेकांपासून.
पटकन वाटलं कदाचित मोबाईलवरून एसएमएसने मग वाटलं त्यांनी एकमेकांना प्रेमपत्रं लिहिली असतील?
मधे एक-दोन दिवस तसेच गेले आणि पुन्हा कशावरून तरी “प्रेमपत्र” आठवलं… काहीतरी आठवलं की, विचारांची भाऊगर्दी होतेच मनामध्ये.
पण खरंच किती सुंदर कल्पना आहे नाही का प्रेमपत्र लिहिण्याची. आपल्या मनातलं काही सुंदर शब्दांनी सजवून आपल्या प्रिय व्यक्तीसाठी लिहायचं.
पहिलं वहिलं प्रेमपत्र असेल तर मग ती व्यक्ती, मग तो किंवा ती कोणीही असो, ती आपल्याला का आवडते? कशी आवडते, तिच्यात चांगले गुण काय आहेत, तिचं सौंदर्य, दिसणं, वागणं, बोलणं, हसणं, सोबत असणं सगळ्या सगळ्याचं अगदी भरभरून वर्णन करायचं.
जमलंच तर एखादी कविता, मग चोरलेली असली तरी चालेल किंवा मग एखादी चंद्रशेखर गोखल्यांची चारोळी वगैरे, नाहीतर मग एखादा प्रेमरसपूर्ण शेर वगैरे….
असा सगळा साज झाल्यावर ते कच्चं लिखाण पक्कं करण्यासाठी गुलाबी रंगाचा कागद; मग त्यावर लिहायला लाल रंगाची शाई, मग बाजूला थोडीशी फुलं…
थोडंसं डिझाईन आणि सगळं झाल्यानंतर शेवटी फक्त तुझाच किंवा फक्त तुझीच असं म्हणून सांकेतिक खूण किंवा तसंच काहीतरी आणि मग या पत्रासाठी गुलाबी पाकीट त्यावर शिंपडण्यासाठी सुवासिक अत्तर हे सगळं करायचं ते घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना चुकवून, अभ्यासाच्या नाहीतर नोट्स कंप्लीट करण्याच्या नावाखाली…
एवढ्यापर्यंत सारं ठीक व्हायचं, पण पुढे मात्र जाम पंचाईत असायची. हे असं नाजूक पत्र तिच्यापर्यंत किंवा त्याच्यापर्यंत पोचवायचं कसं?
मग नोट्सची वही किंवा अभ्यासाचं पुस्तक हा गहन प्रश्न सोडवायचं. अगदी गुपचूप कुणालाही न कळू देता ही वह्या पुस्तकांची देवाण घेवाण व्हायची. एवढ्यावरच सारं संपायचं नाही, तर मग पुढे कोणाच्याही नजरेला न कळू देता ते पत्र वाचण्याची हुरहूर असायची.
त्यातही जर का मोठ्या भाऊ-बहिणीला किंवा कोणालाही थोडीजरी या प्रकरणाची कल्पना आली असेल तर मग जाम टेन्शन. पण तरीही पत्र वाचायची घाई.
असा सगळा मनाला भुरळ पाडणारा, हुरहूर लावणारा, उत्सुकता वाढवणारा, कधी थोडंसं घाबरवणारा पत्र वाचता वाचता गुलाबीसं लाजवणारा माहोल, पण तो काळ आता उरलाच नाही असं वाटतं.
आजकालचं प्रेमसुद्धा तांत्रिक झालंय, प्रेमपत्रांची जागा ई-मेलनं घेतलीय, तर प्रेम संदेशांची जागा एसएमएसने.
पण खरोखरच यात पूर्वी एवढीच गंमत आहे? निखळ आनंद आहे? जो त्याच्या किंवा तिच्या हस्ताक्षरात त्याने किंवा तिने फक्त तिच्या किंवा त्याच्यासाठी अगदी खासगीत व्यक्त केलेल्या भावना वाचताना असायचा.
नवीन तंत्रज्ञानाला माझा अजिबात विरोध नाही. उलट त्यामुळंच तर जग फार जवळ आलय, फार सोपं झालंय पण कधीतरी याच साधनांमुळे पूर्वीचा निखळ आनंद हरवलाय असंही वाटतं. साधं उदाहरण घ्या, एखादी व्यक्ती आपल्याला भेटणं अतिशय आवश्यक असेल, तेव्हा तिची भेट घ्यावी म्हणून आपण तिला फोन लावतो आणि नेमका त्याचवेळी फोन लागत नाही आणि चिडचिड होते.
या साधनांचा फायदा घेऊन थापा मारण्याचं जे प्रमाण वाढलंय त्याबद्दल तर बोलायलाच नको. “प्रेम’ या सारख्या नाजूक भावनेचंही कित्येक वेळा या साधनांच्या साहाय्याने खेळणं केलं जातं किंवा निव्वळ साधनांमुळे झालेल्या गैरसमजातून भावनांचा चुराडाही होतो.
फोन का केला नाहीस? किंवा एसएमएस का पाठवला नाहीस? किंवा तुझा फोनच लागत नव्हता. किती वेळ “एंगेज’ असतो तुझा फोन? कोणाचा फोन आला होता? अशा एक ना अनेक क्षुल्लक कारणांवरून नुकतंच उमलणारं प्रेमाचं नातं मी कोमेजून जाताना माझ्या समोर पाहिलंय;
तेव्हा मात्र खरंच वाटतं, ही साधनंच या दुःखाचं कारण आहेत. अशा वेळी, समजूत काढण्यासाठी त्याने किंवा तिने छानपैकी पत्र लिहावं.
जमलीच तर स्वतःची नाहीतर बिनधास्त चोरलेली एखादी सुंदर कविता किंवा चारोळी लिहावी आणि एखाद्या सुरेख पाकिटात अत्तर शिंपडावं आणि बंद करून पाठवून द्यावं, खरंच प्रत्येकाने एकदातरी एखादेतरी प्रेमपत्र लिहावं…
मग अगदी स्वतःच्या नवऱ्याला किंवा नवऱ्याने बायकोला ! कदाचित वेडेपणा वाटेल हे सगळं करण्याचा. पण हा वेडेपणा आनंद देणारा असेल एवढं नक्की.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
छान लिखाण आहे , मला जुने दिवस आठवले , तिच्यासाठी लिहिलेले ते पत्र आणि कालांतराने आलेलं उत्तर ,त्यानंतर सुरू झालेली आमची स्टोरी ; जरी आम्ही आता दुर – दुर असलो तरी ‘तू सुखी रहा’ ही
दोघांची एकमेकांसाठी काळजी !