लेखन: सचिन अनिल मणेरीकर
अंबरनाथला पोहोचायला संध्याकाळचे ७ वाजलेच. असे संध्याकाळी काम आले की खूप चिडचिड होते. स्टेशनच्या बाहेरच असलेल्या बँक ऑफ बडोदा च्या ए.टी.एम.मध्ये आलो आणि बघतो तर सॉफ्टवेअर गेलेलं. कायतरी लहानसं काम असेल आणि १५ मिनिटात करून निघेन अशा विचाराने मी आलेलो आणि ते बघून अजूनच डोकं फिरलं.
ए.टी.एम. उघडण्यासाठी बरोबर जो बँकचा माणूस लागतो तो अजून आला नव्हता. ऑफिस मधून आलेल्या मेसेज मध्ये बघितल तर सावंत येणार हे कळल. मी कपाळावर हात मारला. सावंत म्हणजे शुध्द टाइमपास. त्यांना फोन केला तर त्यांनी आत्ताच कल्याणला ट्रेन पकडली असं सांगितलं पण मागून गाड्यांचे हॉर्न ऐकू येतच होते. त्यांना पोहोचायला ८-८:३० होतीलच असा अंदाज लाऊन मी एक पेपर घेऊन त्यावर मांडी घालून बसलो आणि येणाऱ्या प्रत्येकाला “ए.टी.एम. बंद है|” सांगण्याची नवीन ड्यूटी मला लागली.
माझा अंदाज चुकवत सावंत ९ वाजता पोहोचले आणि आल्याआल्या जेवण करून घेऊ म्हणाले. “अहो काम करू ना आधी मग आरामात जेवता येईल” मला काम संपउन लवकर जायचे होते.
“नको! तू एकदा काम करायला लागलास की स्वतः पण जेवत नाहीस मला पण उपाशी मारतोस, त्यापेक्षा आधी जेऊन घेऊ” सावंतना याआधी माझ्यामुळे बऱ्याचदा उपास घडलेला होता त्यामुळे ते ऐकायला तयारच नव्हते.
मग आम्ही जेऊन आलो. आता साडेनऊ वाजलेले. मग सावंतानी आपला पासवर्ड विसरण्याचा नेहमीचा लोकप्रिय कार्यक्रम सुरु केला. ३-४ वेगवेगळे पासवर्ड टाकून शेवटी एकदा ते लॉक उघडले आणि मी कामाला सुरवात केली. आजचा दिवसच खराब होता, काही ना काही प्रोब्लेम येताच होते.
एक तासाच्या कामाला अडीज तास लागले. ए.टी.एम.आता सुरु झाल आणि आम्ही दोघे धावत सुटलो. जिने चढताना आम्हाला शेवटची १२:०५ ठाणे लोकल जाताना दिसली. आता एक तर अंबरनाथ मध्ये राहणे किंवा रिक्षावाल्यांच्या पाया पडून कोण डोंबिवलीला येतो का ते पाहणे हे दोन पर्याय होते.
रिक्षाने घरी जाणे त्यातल्यात्यात मला कमी खर्चिक वाटलं. तसंही कल्याण पर्यंत सावंत बरोबर असणारच होते. बाहेर पडून रिक्षा शोधली आणि अपेक्षेप्रमाणे फक्त कल्याण पर्यंत यायला रिक्षावाला तयार झाला. कल्याण ही रिक्षावाल्यांसाठी भारत पाकिस्तान सीमा असते हे तसं मला माहित होत.
त्यामुळे सावंत सोबत कल्याण पर्यंत आलो. तिकडे त्यांना सोडून डोंबिवलीसाठी रिक्षा पकडली आणि कानात हेडफोन टाकून डोळे बंद करून बसलो. कधी एकदा घरी जातो आणि झोपतो असं मला झालं होतं. मधेच डोळे उघडून बघितल तर रिक्षा आता टाटापावर कडून हायवे सोडून डोंबिवली रस्त्याला लागली होती. थंडीचे दिवस असल्याने थंडीही खूप लागत होती. अंगावरचं जॅकेट व्यवस्थित करून मी डोळे बंद करून गाणी ऐकत बसलो होतो.
थोड्याच वेळात मला रिक्षावाल्याची अस्पष्ट हाक ऐकू आली. मी डोळे उघडले तर तो कायतरी सांगत होता. खरंतर आता त्याची बडबड ऐकायची माझी अजिबात इच्छा नव्हती तरीही मी कानातले हेडफोन काढले. “साहेब ती बघा बाई” त्याने हात दाखवलेल्या दिशेकडे बघितलं तर खरंच एक पन्नाशीच्या आसपासची बाई हातात एक कापडाची पिशवी घेऊन रस्त्याच्या बाजूने चालली होती.
“हे बघ मी ही रिक्षा डायरेक्ट केलीय त्यामुळे तू आता उगाच सिट घेत बसू नकोस हा!!” मी त्याला दम देत म्हटले.
“साहेब रात्रीच्या दीड वाजता या सुनसान रस्त्यावर ही बाई काय करत असेल, मलातर कायतरी गडबड वाटतेय” त्याच्या बोलण्याने मला लक्षात आलं कि रात्रीचे दीड वाजले होते आणि तो रस्ता शहराच्या बाहेर असल्यामुळे रस्त्यात वाहतूकही जास्त नव्हतीच आणि वस्तीही.
तिकडे फक्त काही बंद पडलेल्या जुन्या कंपन्या होत्या. आता मलाही थोडी भीती वाटायला लागली. मी त्याला रिक्षा जोरात घे असं सांगितलं. आता त्यानेही रिक्षाचा वेग वाढवला. ती बाई आणि रिक्षा यामधल अंतर कमी व्हायला लागलं. माझं पूर्ण लक्ष त्या बाईकडेच होतं.
ती निळसर रंगाची साडी नेसली होती, अंगाने चांगली धष्टपुष्ट होती, आपल्याच नादात रमतगमत हातातली पिशवी झुलवत चालली होती. पाठमोरी असल्यामुळे चेहेरा दिसत नव्हता मात्र एकूणच तिच्या राहणीमानावरून चांगल्या घरातली बाई वाटत होती. आमची रिक्षा आता तिच्या अगदी जवळ आली, ती रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत होती,
मी हळूच रिक्षात उजवीकडे सरकलो आणि समोर बघितले तर रिक्षावाला सुद्धा होईल तेवढा उजवीकडे सरकला. ती बाई आता अगदी रिक्षाच्या पुढच्या टायरच्या बाजूला पोहोचली होती. रिक्षाने तिला पार केले की मागे अजिबात बघायचे नाही असे ठरवून मी रिक्षातली समोरची दांडी घट्ट धरून बसलो आणि तेवढ्यात एक चमत्कार झाला.
रिक्षाचा वेग आणि त्या बाईच्या चालण्याचा वेग बघता रिक्षाने तिला पार करायला हवे होते मात्र ती बाई अजूनही तेवढ्याच अंतरावर होती. एकही वाहन नसलेल्या त्या रस्त्यावर ती बाई रमतगमत रिक्षाच्या वेगाने चालत होती.
माझा चेहेरा घामाने डबडबला, रिक्षावाला तोंडाने काहीतरी पुटपुटत होता. नकळत माझं लक्ष त्या बाईच्या पायाकडे गेलं, पण साडी असल्यामुळे मला तिचे पाय उलट आहेत की नाही दिसलं नाही.
रिक्षा पूर्ण वेगात चालली होती तरीही ती बाई रीक्षापासून तेवढंच अंतर राखून होती. असा किती वेळ गेला सांगू शकत नाही. नंतर परत त्या रस्त्याने आलो तेव्हा मला कळलं की जवळपास ३ कि.मी.रस्ता त्या बाईसोबत आम्ही पार केला. त्यावेळी मात्र वेळ, अंतर काही समजण्याच्या आम्ही पलीकडे गेलो होतो. त्या बाईने जर का मागे वळून बघितले आणि काहीतरी भयानक दिसले तर काय करायचे हाच विचार मनात सुरु होता.
प्रत्येक मिनिट तासासारखे वाटत होते. तेवढ्यात समोर डावीकडे वळणारा एक रस्ता आला. तो रस्ता एका बंद अवस्थेत असणाऱ्या कंपनीकडे जाणारा होता. ती बाई मागे न बघता त्या रस्तावर वळली आणि आपल्याच नादात चालत राहिली.
पुढची ५ मिनिटे आम्ही दोघेही पूर्ण शांत होतो. रिक्षा आता डोंबिवली शहरात शिरली. आम्ही स्टेशन वर पोहोचलो. रिक्षावाल्याने इतर रिक्षावाल्यांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी रिक्षा लावली. त्याच्याकडचं पाणी तो प्याला मीही प्यालो.
घडलेल्या घटनेवर काहीही न बोलता त्याचे पैसे देऊन मी खाली उतरलो. त्यानेही आपली रिक्षा बाजूला उभी केली आणि तो इतर रीक्षवाल्यात जाऊन बसला. आता परत एकट्याने त्या रस्त्याने जाण्याची त्याची हिम्मत नसावी. आता खोलीवर जाऊन एकटं राहण्याची माझ्यातही हिम्मत नव्हती.
मी जवळच पेटलेल्या एका शेकोटीजवळ जाऊन उभा राहिलो, मी जे पाहिलं ते काय होतं हाच विचार माझ्या मनात सुरु होता. भास म्हणावा तर दोन माणसांना सारखाच भास कसा होईल. आजही जेव्हा ती रात्र आठवतो तेव्हा अंगावर काटा येतो. त्यानंतर कधीच मी रात्री त्या रस्त्याने गेलो नाही, न जाणो परत ती बाई दिसायची आणि यावेळी मागे वळून आपलं भयानक तोंड दाखवायची.
दोन प्रश्न अजूनही माझ्या मनात रेंगाळतात. ती जर डावीकडे वळली नसती तर? आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे ती कोण होती? तुम्ही कधी त्या रस्त्याने रात्री गेलात (शक्यतो जाऊच नका) आणि ती दिसली तर ती कोण होती ते मात्र मला नक्की सांगा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.