हि कॅनडाच्या एका शहरातील सत्यघटना आहे.
कुणीही सांगू शकत नाही कि डॉक्टर मनीचे हेतू काय होते. कदाचित त्याला असं वाटलंहि असेल कि ब्रूस ब्रॅण्डा बनून मुलीचे आयुष्य चांगले जगू शकेल. पण नशिबाने त्यांना चुकीचे सिद्ध केले असेल…
त्यांचे हेतू काहीही असो पण या प्रयोगांमुळे दोन निरपराध जीवांनी आपला जीव गमावला. कधी कधी विज्ञानाच्या मागे लोक माणुसकी विसरतात. विज्ञानाचा आणि आपल्या बुद्धिमत्तेचा उन्माद, काहीतरी नवीन करून प्रसिद्धीचा हव्यास यापुढे कोणाचे आयुष्य पणाला लागले तरी त्यांना कसलीही तमा नसते. डेव्हीड ऱ्हायमर अश्याच एका उन्मादाचा शिकार होता.
कुठल्याही माणसाला, जर कोणी त्याच्या मर्दानगीला लालकरलं तर ते सहन होत नाही. लहान मुलगा असो, मोठा माणूस असो नाहीतर म्हातारा माणूस असो त्याला आपल्या मर्दानगीचा अभिमान असतोच…
पण एखाद्या माणसाला जर आयुष्यातली पंधरा वर्षे त्याच्या स्वतःच्या माणूस असल्याच्या ओळखीपासूनचन अनभिज्ञ ठेवले तर? त्याचा हा अभिमान, मर्दानगीच जर त्याच्यापासून हेरावून घेतली तर?
विश्वास बसत नाही ना!!!
आज मी तुम्हाला अश्याच एका माणसाबद्दल सांगणार आहे. या माणसाने आपल्या आयुष्याची पंधरा वर्षे एका मुलीच्या रुपात जगली. खरंतर कुठेतरी त्याला जाणवायचं की तो मुलगी नाही.
पण दुर्दैवाने त्याने आपलं पूर्ण बालपण हसत खेळत नाही तर एका स्वार्थी डॉक्टरच्या प्रयोगात गिनीपिग बनून घालवलं.
ही दुःखद कहाणी आहे डेव्हिड ऱ्हायमरची…. ब्रॅण्डाची, ब्रुसची…..
एक नाही, दोन नाही तर तीन आयुष्य तो पंधरा वर्षात जगला. जगला म्हणण्यापेक्षा भोगली त्याने हि तीन वेगवेगळी आयुष्य. आणि शेवटी त्यानेच या खतरनाक प्रक्रियेला कायमचे थांबवले.
आपण भोगलेले भोग परत कोणाला भोगायला लागू नये या त्याच्या इच्छेला मात्र यश मिळाले. आणि त्यानंतर असा वैद्यकीय प्रयोग पुन्हा झाला नाही.
कॅनडातील शहर विनीपेगला राहणारे झेनेट आणि रॉन ऱ्हायमर यांनी १९६५ साली दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. या मुलांची नावं होती ब्रूस आणि ब्रायन.
मुलांच्या जन्मानंतर पहिले काही महिने त्यांचं आयुष्य एका साधारण कॅनेडियन कुटुंबासारखं होतं. झेनेट आणि ऱ्होन आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होते. मुलं सहा महिन्यांची होईपर्यंत दृष्ट लागेल असं सुंदर चौकोनी कुटुंब होतं ते…
पण नशिबाला ब्रायन कुटुंबाची ही खुशी मान्य नव्हती. १९६६ साली ब्रूस आणि ब्रायन जेव्हा सात महिन्यांचे झाले तेव्हा डॉक्टरांनी दोघांना फिमोसिस या आजाराने डायग्नोस केले.
या आजारामुळे दोघांना पण लघवी करताना खूप त्रास होत होता. मुलांच्या या आजाराचा उपचार करण्यासाठी झेनेट आणि रॉन त्यांना एका युरोलॉजिस्ट कडे घेऊन गेले.
Circumcision या वैद्यकीय इलाजासाठी पुढचे प्रयत्न चालू झाले. या प्रक्रियेत मुलांच्या लिंगावरी काही अनावश्यक त्वचा काढली जाणार होती. आणि त्यामुळे लघवी करताना त्यांचा त्रास थांबणार होता.
त्या काळात या कामासाठी एका सर्जिकल नाईफचा उपयोग केला जायचा. पण झेनेट आणि रॉन ज्या डॉक्टरकडे मुलांना घेऊन गेले होते त्याने एका नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग केला.
सर्जिकल नाईफ ऐवजी त्याने electro colorization चा वापर केला. आणि यात साहजिकच विजेचा वापर केला जायचा. हे तंत्रज्ञान नवीन असल्याने लोकांचा यावर विश्वास नव्हता. आणि म्हणून डॉक्टरांनी झेनेट आणि रॉनला न सांगता या तंत्राचा वापर केला.
डॉक्टरांनी सर्वात आधी मोठा मुलगा ब्रूसचं ओपेशन केलं. आणि ऱ्हायमर कुटुंबाचं आयुष्यच बदलून गेलं. आता मुलांचा त्रास थांबेल आणि ते पुन्हा हसत खेळत राहू लागतील या आनंदात असलेल्या झेनेटला दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला की ऑपरेशन करताना ब्रूसच्या लिंगाला मोठी दुखापत झाली.
ऑपरेशन मध्ये ब्रूसच्या शरीरातला तो हिस्सा भयंकर जळाला होता आणि त्याचं लिंग पूर्ववत होणं जवळजवळ अशक्य होतं. यानंतर झेनेट आणि रॉन ब्रायनचं ऑपरेशन न करताच त्याला तिथून घेऊन गेले.
मुलांसाठी सुंदर भविष्य त्यांनी पाहिलं होतं. पण ब्रूसचे लिंग कधीही पूर्ववत होणार नाही हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. डॉक्टरकडून झालेली हि चूक काही इलाज करून सावरता येऊ शकेल असं या दाम्पत्याला वाटलं. याच दरम्यान झेनेट आणि रॉनने टीव्हीवर जॉन मनी नावाच्या एका प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट चा कार्यक्रम पाहिला.
जॉन ट्रान्सजेंडर पेशंट साठी काम करत. त्यांचं म्हणणं होतं की ‘जेंडर’ हे फक्त शरिरावर अवलंबून नसतं. एका व्यक्तीला मुलगा किंवा मुलगी म्हणून ओळखलं जातं ते त्याला समाजात कसं वाढवलं गेलं आहे त्यावरून.
जॉन मनी या परिस्थितून मार्ग काढू शकतील याची आशा होती दोघांना. त्यांना यावेळी किंचितही जाणीव नव्हती कि डॉक्टर जॉन कडे मुलांना नेऊन एका भयानक अध्यायाची सुरुवात होणार आहे. तब्ब्ल पंधरा वर्ष ब्रुस आणि ब्रायन एका दुष्टचक्रात अडणार होते…
पहिल्याच भेटीत डॉक्टर जॉन मनीने ब्रायन आणि ब्रूसच्या आई वडिलांना समजावलं कि कसं ब्रुसला एका मुलीसारखं वाढवता येईल.
शिवाय डॉक्टर मनीने मुलांना याबद्दल काही समजू न देण्याबद्दलही झेनेट आणि रॉन यांना सांगितले. या विचाराशी सहमत होऊन झेनेट आणि रॉनने ठरवलं की ब्रूस मुलासारखं आयुष्य नाही जगू शकत तर ते त्याला मुलगी म्हणूनच मोठं करतील. आणि मग सुरु झाला ब्रूसला ब्रॅण्डा बनवण्याचा प्रवास.
या मोठ्या प्रक्रियेत ब्रूसचे हॉर्मोन्स अश्या पद्धतीने मॅन्युप्युलेट केले गेले कि त्याचे शरीर टेस्टोस्टेरॉन हे मेल हॉर्मोन्स निर्माण करण्याची प्रक्रिया कमी करत जाऊन एका वेळी टेस्टोस्टेरॉन त्याच्या शरीरात पैदाच होणार नाही. आणि मोठे होऊन त्याचे शरीर एका मुलीसारखे विकसित होईल.
ब्रूस दोन वर्षाचा असतानाच ऑपरेशन करून त्याच्या शरीरातील लिंग पूर्णपणे काढून टाकून त्याठिकाणी सर्जरी करून आर्टिफिशिअल योनी बसवण्यात आली.
या सर्व प्रक्रिया केल्यानंतर दोन वर्षांचा ब्रूस ऱ्हायमर आता ब्रॅण्डा बनला होता. पण हि तर दुर्दैवाची फक्त सुरुवातच होती.
जॉन मनीने दोन्ही मुलांना फक्त आपलं पेशन्ट म्हणूनच नाही पाहिलं तर हा सगळा त्यांच्यासाठी एक प्रयोग होता. ज्यातून त्यांना काही निरीक्षणं काढायची होती आणि झालंच तर इतका मोठा प्रयोग जगात सर्वात आधी यशस्वी केल्याबद्दल प्रसिद्धी मिळवायची होती.
ब्रॅण्डा आणि ब्रायन जुळे होते आणि त्यामुळे त्यांचे जीन्स एकसारखे होते. जर ब्रॅण्डा ब्रूस असती तर तिच्या बऱ्याचशा सवयी या ब्रायनसारख्या राहिल्या असत्या.
आणि डॉक्टर मानीना याच गोष्टीचे त्यांच्या प्रयोगाचा भाग म्हणून निरिक्षण करायचे होते. डॉक्टर मनीने दर वर्षी मुलांना आपल्याकडे चेकअप साठी बोलवून त्यांच्यावर एक केसस्टडी तयार केली.
जेव्हा मुलं त्यांच्याकडे चेकअप साठी जात तेव्हा झेनेट आणि रॉन च्या अपरोक्ष ते मुलांचे कपडे उतरवून त्यांना काही अनैसर्गिक लैंगिक प्रक्रिया शिकवत आणि करवत सुद्धा असत.
आणि याचवेळेस त्यांचे फोटोसुद्धा काढत असत. डॉक्टर मनीच्या म्हणण्याप्रमाणे मुलं जर लहानपणीच हे शिकतील तर त्यांचे पुढचे जीवन सामान्य होऊ शकेल.
हा कार्यक्रम तब्ब्ल नऊ वर्षे चालू राहिला यानंतर डॉक्टर मनीने घोषित केले कि ब्रॅण्डा आता पूर्णपणे मुलगी झालेली आहे. आपल्या रिसर्चपेपर्स मध्ये त्यांनी आवर्जून लिहिले कि ब्रॅण्डाची वर्तणूक आपला भाऊ ब्रायन हुन खूप भिन्न होती. तिची वागणूक चपखल एक मुलगी म्हणून झाली म्हणून विकसित झाली आहे.
पण या रिसर्च पेपर्स मध्ये जाणून बुजून त्यांनी या गोष्टी अधोरेखित नाही केल्या कि ब्रॅण्डाचं मुलींपेक्षा मुलांबरोबरच जास्त जमायचं. आणि तीचं वागणं हे बऱ्याच अंशी मुलांसारखं होतं.
ती टॉमबॉय सारखी होती. ती जेव्हा किशोरावस्थेत आली तेव्हा तिची अवस्था अगदीच दयनीय होऊन गेली. एकंदर गोष्टींच्या परिणामामुळे ब्रॅण्डा पूर्णपणे एकटी पडली.
हळूहळू ती डिप्रेशन मध्ये जाऊ लागली. शाळेत कोणीही तिच्याबरोबर मैत्री करायलाच काय पण तिच्या सहवासात राहायला सुद्धा तयार नव्हते. आणि सगळे तिला ‘केव्ह वूमन’ म्हणूनच चिडवू लागले.
ब्रॅण्डाचं वागणं मुलांसारखं असल्याने मुली तिला जंगली समजून आपल्यात घेत नसत आणि पूर्णपणे मुलगाही नसल्याने मुलंही तिच्यापासून दूर राहत आणि स्वतः ब्रॅण्डाला सुद्धा आपली ओळख नक्की काय हा प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हता.
एवढंच नाही तर आता ब्रॅण्डा आणि ब्रायनला डॉक्टर मनी बद्दल तिरस्कार वाटू लागला होता.
ब्रॅण्डाने तेरा वर्षांची असताना आपल्या आई वडिलांना सांगितले कि आता जर ते तिला डॉक्टर मनीकडे घेऊन गेले तर ती आत्महत्या करेल. झेनेट आणि जॉन ला आता उमजलं कि दोघा मुलांना आता त्यांच्या आयुष्याचं हे कटू सत्य सांगण्याची वेळ आली आहे. सत्य सांगणं त्यांच्यासाठी इतकं सोपं नव्हतं.
शेवटी मुलं पंधरा वर्षांची झाली तेव्हा त्यांनी त्यांना सांगितले कि ब्रॅण्डा हि एक मुलगी नाही आणि लहान असताना झालेल्या एका चुकीमुळे तिला मुलगा असून पुढे मुलीचे आयुष्य जगावे लागले.
आता ब्रॅण्डाला समजले कि तिला समाजात अड्जस्ट व्हायला इतकं कठीण का जातंय. आणि तिने ठरवले कि आता मुलगा होऊनच ती आपले पुढचे आयुष्य जगेल. तिने आपले नाव बदलून डेव्हिड ठेवले.
आणि तिला मुलगी बनवणाऱ्या सर्व प्रक्रियांना रिव्हर्स करायच्या अथक प्रयत्नात तिने स्वतःला गुंतवून घेतले.
आणि १९८७ साली २२ वर्षांच्या ब्रॅण्डाने आपली डेव्हिड ऱ्हायमर म्हणून नवी ओळख बनवली. आता मात्र तिला आपल्याच शरीरात अनोळखी असल्याची भावना येत नव्हती.
एवढंच नाही तर ३ वर्षांनंतर १९९० मध्ये तिने आपल्याच वयाच्या जेन फॉंटन बरोबर लग्न सुद्धा केले. डेव्हिड स्वतःच्या मुलांचा पिता होऊ शकत नव्हता पण आपल्या तीन सावत्र मुलांचा पिता होऊन तो संतुष्ट होता.
१९९७ साली जेव्हा डेव्हिडने आपली हि दुःखद गोष्ट एका सेक्सॉलॉजिस्टला सांगितली तेव्हा ती त्या काळी एक इंटरनॅशनल न्यूज झाली. वैद्यकीय प्रयोग निरपराध माणसांच्या जीवावर कसे बेतू शकतात ते प्रकाशझोतात आले. आणि म्हणून कित्येक लोकांचं आयुष्य असं प्रयोगांच्या आधीन जाऊन वाया जाण्यापासून वाचवलं गेलं.
आता डेव्हिडला वाटत होतं कि पुढचं आयुष्य तो सुखा समाधानाने जगेल. पण लहानपणच्या या गोष्टी त्याला विसरता येत नव्हत्या. ब्रायन आणि डेव्हिड दोघांवर पण या खुणा खोलवर रूतून बसल्या होत्या.
२००१ मध्ये ब्रायन सुद्धा ड्रग्सचे व्यसन लागून ड्रग्ज ओव्हरडोसने २००२ साली त्याचा मृत्यू झाला. हा धक्का डेव्हिड सहन नाही करू शकला आणि जेव्हा २००४ मध्ये त्याची पत्नी जेनने त्याच्यापासून फारकत घेतली तेव्हा या पूर्ण दुष्टचक्रातून सुटण्यासाठी त्याने आत्महत्या केली.
कुणीही सांगू शकत नाही कि डॉक्टर मनीचे हेतू काय होते. कदाचित त्याला असं वाटलंहि असेल कि ब्रूस ब्रॅण्डा बनून मुलीचे आयुष्य चांगले जगू शकेल. पण नशिबाने त्यांना चुकीचे सिद्ध केले असेल…
त्यांचे हेतू काहीही असो पण या प्रयोगांमुळे दोन निरपराध जीवांनी आपला जीव गमावला. कधी कधी विज्ञानाच्या मागे लोक माणुसकी विसरतात.
विज्ञानाचा आणि आपल्या बुद्धिमत्तेचा उन्माद, काहीतरी नवीन करून प्रसिद्धीचा हव्यास यापुढे कोणाचे आयुष्य पणाला लागले तरी त्यांना कसलीही तमा नसते. डेव्हीड ऱ्हायमर अश्याच एका उन्मादाचा शिकार होता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.