कुठलाही संवाद सुरु करताना आधी रिलॅक्स व्हा. हे सगळे बदल घडवून आनणे हे एका वेळात शक्य होणारे नाही.
या छोट्या छोट्या गोष्टी सरावाने आपल्या वागण्या-बोलण्यातल्या सवयींसारख्या होतील तेव्हा आपोआपच तुमची बॉडी लँग्वेज तुमच्या व्यक्तिमत्त्वातला प्लस पॉईंट होईल.
तुम्ही लोकांशी संवाद साधताना जे काही बोलता ते म्हणजे एखाद्या मोठ्या हिमनगाचे वरती दिसणारे टोक आहे असं समजा, बाकी खूप मोठा हिमनग जसा समुद्रात पाण्याखाली असतो तसा संवाद साधण्याच्या कलेतला मोठा हिमनग म्हणजे आपली ‘शारिरीक परिभाषा’ (बॉडी लँग्वेज– Body Language )
शारीरिक परिभाषा हा शब्द आपल्या बोली भाषेत वापरायला जरा जड जातोय ना? समजायला पण अवघड वाटतोय जरा, पण बॉडी लँग्वेज म्हटलं की कसं लगेच समजतं.
आता ‘वसुधैव कुटुंबकम्’ इतक्या मोठ्या संकल्पनेला साकार करायचं असेल तर ‘बॉडी लँग्वेज’ हा इंग्रजी शब्द सुद्धा आपल्याच भाषेतून लिहायला कोणाची हरकत असणार? अडाण्याला पण समाजतोय आजकाल.
तर संवाद कलेतला हा हिमनग म्हणजे आपली ‘बॉडी लँग्वेज’. डोक्यापासून तळ पायापर्यंत आपल्या शरीराला बॉडी म्हटलं जातं, डोक्याच्या होकारार्थी, किंवा नकारार्थी हालचाली, कपाळ आणि त्याचा प्रसंगा प्रमाणे वापर, म्हणजे कपाळावर आठ्या, डोळ्यांची हालचाल, त्यांच्या भाव मुद्रा, म्हणजे नजरेतल्या अनेक छटा, चेहेरा, त्याचे हावभाव, हातांच्या हालचाली, म्हणजे हातवारे, पायांच्या हालचाली, आपली उभं राहण्याची पद्धत, बसण्याच्या तऱ्हा, आणि संपूर्ण शरीरातल्या लकबी, वेगवेगळे ढंग ह्या सगळ्यांचा समावेश बॉडी लँग्वेज मध्ये होतो.
म्हणजे नुसतं बोलणं हे टोक आणि बॉडी लँग्वेज हा खरंच किती मोठा हिमनग आहे हे आपल्याला आता कळलं, मग एवढ्या मोठ्या हिमनगाला ‘शरीराची परिभाषा’ हा मराठी शब्द काही जड वाटायला नको. खरं की नाही?
बरं आता आपण विषयाकडे येऊ…
तुमच्या मनाची जागृत अवस्था आणि सुप्त अवस्था :
जेंव्हा आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला संवाद साधण्या साठी भेटायला जातो, त्यावेळी आपण त्या व्यक्तीला आपल्या सुप्त मनाने म्हणजे नकळत न्याहाळत असतो.
त्या भेटीमध्ये पहिल्या दोन मिनिटातच आपण आपले नाव त्या व्यक्तीला सांगतो. पण ती व्यक्ती सुद्धा सुप्त मनाने आपल्याला न्याहाळत असते.
त्यामुळे आपण सांगितलेलं आपलं नाव त्या व्यक्तीच्या लक्षात राहण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून आपले नाव दोन मिनिटानंतर परत एकदा त्या व्यक्तीला सांगितले पाहिजे ज्या वेळी त्या व्यक्तीचे जागृत मन आपल्याशी संवाद साधणार असते.
त्यावेळीच आपले नाव त्या व्यक्तीच्या लक्षात राहील आणि पुढच्या बोलण्या नंतर सुद्धा आपले नाव त्या व्यक्तीच्या चांगले लक्षात राहील आणि पुढच्या गोष्टी सहज सुलभ होतील.
बॉडी लँग्वेज चांगली होण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे ते बघू :
१: जागरूक रहा
बॉडी लँग्वेज आकर्षक होण्यासाठी पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आपण कोणत्याही व्यक्तीशी बोलायला जाणार असू किंवा अनेक लोकांसमोर एखादे छोटे भाषण देणार असू त्यावेळी आपण स्वतः जागरूक असलं पाहिजे.
म्हणजे भाषण देऊन झाल्यावर आपण सुरुवाती पासून शेवटपर्यंत ते भाषण कसे केले हे संपूर्ण आठवून बघावं. म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर मिळेल.
मी भाषण देताना सतत माझ्या डोळ्याला बोट लावत होतो हे तुमचे तुम्हाला लक्षात येईल. मग सारखा डोळ्याला हात का लावत होतो?
त्याचं कारण लक्षात येईल. कदाचित पुढचं वाक्य आठवण्यासाठी डोळ्यांकडे हात जात असेल तर ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून प्रयत्न केला जाईल.
काही लोक माईक ला सारखा हात लावतात, तर काही लोक डोक्यावर केसातून हात फिरवतात. काही लोक वाक्य सुरू करायच्या आधी अssssss करून नंतर सुरुवात करतात, ह्या गोष्टी साठी तुम्ही जागरूक रहायला पाहिजे.
२: लोकांना अभ्यासा
जे लोक फेमस असतात, त्यांचे भाषण लोक चुकवत नाहीत अशा लोकांचा अभ्यास करा. म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांनी स्वतःला कसं घडवलं, त्यांच्या बोलण्याची पद्धत, ते लोकांशी निकटता कशी साधतात? त्यांची भाषा, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या, आणि त्यांच्याकडून काय शिकायला मिळेल त्याकडे लक्ष द्या.
३: लोकांना आरसा मानून आपल्यात योग्य बदल करा
नवीन व्यक्तीला भेटायला जाताना त्या व्यक्तीची काहीच माहिती आपल्याला नसते. म्हणजे ती व्यक्ती खूप शांत, हळू बोलणारी, गरीब स्वभावाची असेल आणि त्या व्यक्तीला तुम्ही समजून न घेता एकदम मोठ्या आवाजात बोलून, जोरात हात ओढून हस्तांदोलन केलं तर ते चुकीचं ठरेल.
ती व्यक्ती बारीक आवाजात बोलणारी असेल आणि तुम्ही खूप मोठ्या आवाजात बोलायला लागलात तर ते सुद्धा योग्य नाही.
त्या व्यक्तीच्या आवाजाला जुळेल अशा आवाजात, त्या व्यक्तीप्रमाणेच नम्र पणे शांत बोलायला पाहिजे.
म्हणजे आपला स्वर आणि त्या व्यक्तीचा स्वर एक झाला पाहिजे. जर तसं झालं नाही तर तुम्हाला ती व्यक्ती टाळायला सुरुवात करेल.
४: बसण्याचे शिष्टाचार पाळा
कोणत्याही नवीन व्यक्तीबरोबर आपली नाळ जुळायला पाहिजे, असें शिष्टाचार आपण पाळून त्या व्यक्तीला आपलं करायला पाहिजे.
म्हणजे त्या व्यक्तीसमोर तुम्ही पाय पसरून बसलात, किंवा टेबलवर आपले दोन्ही हात टेकवून डोक्याला हात लावून बोलायला लागलात किंवा एक पाय तुमच्या गुडघ्यावर ठेऊ बसलात तर ती व्यक्ती तुमच्याशी पुढे व्यवहार करू शकणार नाही.
म्हणून शिष्टाचार पाळले गेले पाहिजेत.
५: समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहून बोला
कोणत्याही व्यक्तीशी बोलताना त्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून बोलायला पाहिजे. ती व्यक्ती आपल्याकडे बघते आहे आणि आपण जर तिसरीकडे बघून बोललो तर ते बोलणे आत्मविश्वास नसलेले बोलणे ठरू शकेल.
किंवा जर काही गोष्टीचं ज्ञान कमी असेल तर लोक असं भलतीकडे बघून बोलतात.
याशिवाय समोरच्या व्यक्तीकडे पाहून बोलले नाही तर तुम्हाला बोलण्यात स्वारस्य नाही असे वाटेल. आणि समोरच्या व्यक्तीशी तुमची फ्रिक्वेन्सी जुळूच शकणार नाही.
६: तुमचे खांदे वर म्हणजे कानाच्या दिशेला ठेऊन संवाद साधू नाका
तुम्ही संवाद साधताना आपले खांदे वरच्या बाजूला म्हणजे कानाच्या दिशेला ठेऊन जर समोरच्या व्यक्तीशी बोलायला लागलात तर तुम्ही कुठल्यातरी चिंतेत (tension) आहात, अशी समजूत समोरच्या व्यक्तीची होईल, आणि तुमचं टेन्शन समोरची व्यक्ती कशाला घेईल?
तुमचं बोलणं यशस्वी होणार नाही. तुम्ही अशा संवादासाठी शांत आणि आरामात बसून बोलायला पाहिजे.
७: गोंधळून जाऊ नका
आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीशी किंवा एखाद्या उच्च शिक्षित व्यक्तीशी बोलताना काही वेळा आपण गोंधळून जाण्याची शक्यता असते.
आणि त्यामुळे आपण एखाद्या लोखंडाच्या सळई सारखं ताठ होऊन समोरच्या व्यक्तीशी बोलतो. त्यामुळे संवाद साधताना समोरच्या व्यक्तीचा रिस्पेक्ट ठेवा पण स्वतःला कमी समजून समोरच्या व्यक्तीसमोर दबून जाऊ नका.
८: बोलण्यात नम्रता हवी
एखाद्या व्यक्तीला आपल्या बोलण्याने आकर्षित करायचं असेल तर त्या व्यक्तीशी नम्रपणे बोलल्याने एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो. आणि नंतर ती व्यक्ती सुद्धा नम्रतेने आणि विश्वासाने आकर्षित होऊन आपलं बोलणं यशस्वी व्हायला मदत होते.
९: आपली मानसिक अस्वस्थता दिसू देऊ नका.
कोणत्या तरी गोष्टीने आपण जेव्हा अस्वस्थ होतो, त्यावेळी आपण बोलताना एखाद्या गोष्टीशी खेळत असतो. म्हणजे टेबलवरची एखादी वस्तू गोल फिरवणे, एखाद्या गोष्टीला सतत हातात घेऊन पुन्हा खाली ठेवणे.
अशा गोष्टी आपली मानसिक अस्वस्थता दाखवतात. ही अस्वस्थता जर अनोळखी व्यक्तीला दिसली तर आपल्याशी पुढे व्यवहार करणं ती व्यक्ती टाळू शकते.
१०: जोरजोरात मान हलवून होकार देऊ नये
एखाद्या गोष्टी बद्दल होकार द्यायचा असेल तर कमी मान हलवून होकार दिलात तर त्यातून तुम्हालाही ते आवडलं आहे, म्हणजे तुमची आवड व्यक्त होते, पण जोर जोरात मान हलवून होकार देणे म्हणजे त्या गोष्टींच्या आधीन होणं.
थोडक्यात सांगायचं तर समोरच्या व्यक्तीचं वर्चस्व स्वीकारून आपण तो होकार देतो आहे असा अर्थ या ‘जोरजोरात मान हलवण्यातून निघू शकतो’
११: बोलताना आपल्या वाक्याचा शेवट वरच्या पट्टीतला नसावा, म्हणजे प्रश्नार्थक नसावा
वाक्याचा शेवट सतत वरच्या पट्टीत झाला तर तो प्रश्नार्थक होतो. सारखे प्रश्न विचारल्या सारखे होते, ते समोरच्या व्यक्तीला आवडेलच नक्कीच आवडत नाही, शिवाय त्यामुळे तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास नाही असा सुद्धा अर्थ होतो.
१२: हस्तांदोलन करताना अगदी आत्मविश्वासपूर्वक केले जावे
बोलणी झाल्यावर किंवा सुरुवातीला हस्तांदोलन केलं जातं, ते अगदी आत्मविश्वासाने करावं. म्हणजे आपल्यातल्या त्या विषयातल्या उत्कट भावना समोरच्या व्यक्तीला जाणवतील.
म्हणजे आपली बोलणी दमदार झाली अशी सकारात्मक भावना दिसावी. मेंगळट हस्तांदोलन केल्याने तुम्ही स्वतः निरस आहे, तुमच्यात आत्मविश्वास नाही या गोष्टी समोरच्या व्यक्तीला प्रकर्षाने जाणवतील.
१३: बोलताना तुमचे हात कुठे आणि कसे ठेवायला पाहिजेत हे जाणून घ्या
बॉडी लँग्वेज मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे तुमचे हात. मोठ्या सभागृहात भरपूर लोकांच्या समोर मोठ्या मंचावर तुम्हाला जेंव्हा बोलायचं असतं त्यावेळी स्टँडवर लावलेला माईक असेल तर तुमचे दोन्ही हात रिकामे असतात.
ते कुठे ठेवायचे ही तुम्ही नवीन असताना एक अवघड वाटणारी गोष्ट आहे. तुमच्यामध्ये खूप आत्मविश्वास आहे तर तुम्ही तुमचे हात तुमच्या पाठीमागे एकात एक अडकवून बोलायला सुरुवात करा.
हे बोलणे आत्मविश्वास दाखवणारे वाटेल. जे बोललं जाईल ते ठाम असेल, समोरच्या जन समुदयावर छाप पडणारे असेल.
आवश्यक असेल त्यावेळी योग्य पद्धतीने हातवारे करणे हे सुद्धा तुम्ही अनुभवी वक्ते असल्याचे लोकांना दिसेल. जर त्यात काही अडचण असेल तर तुमच्या पॅन्ट च्या खिशात हात घालून सुद्धा तुम्ही बोलू शकता.
पण सतत तसे हात खिशात ठेऊन बोलणे हे कंटाळवाणे किंवा अति- आत्मविश्वासाचे वाटेल. योग्य वेळी हातवारे करून आपले म्हणणे लोकांना पटवून सांगताना योग्य वाटेल.
१४: आता अगदी आरामशीर बसा
आपली बॉडी लँग्वेज सुधारून आपलं व्यक्तिमत्त्व आकर्षक बनवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आता आपल्याला पूर्ण समजलं.
पण तरी प्रश्न हा असतो कि या सगळ्या गोष्टी आपल्याला कितीही माहित असल्या तरी वेळेवर तस वागणं सहज शक्य होत नाही.
अशा वेळी कुठलाही संवाद सुरु करताना आधी रिलॅक्स व्हा.
हे सगळे बदल घडवून आनणे हे एका वेळात शक्य होणारे नाही. या छोट्या छोट्या गोष्टी सरावाने आपल्या वागण्या-बोलण्यातल्या सवयींसारख्या होतील तेव्हा आपोआपच तुमची बॉडी लँग्वेज तुमच्या व्यक्तिमत्त्वातला प्लस पॉईंट होईल.
सुरुवातीला तुमच्या सवयीत बदल करताना अवघड वाटेल, पण तेही तुम्ही कराल आणि तुमच्या प्रत्येक कामात यशस्वी व्हाल.
मित्रांनो, व्यक्तिमत्त्व सुधारून यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हो कमेंट्स मध्ये बॉडी लँग्वेजचे पाहिलेले वेगवेगळे प्रकार आणि इंटरेस्टिंग अनुभव नक्की सांगा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Nice information
Great
#मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.
तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.
त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून *’Add मनाचेTalks to Favourites’* यावर क्लिक करा…
व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇
https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ
टेलिग्राम चॅनल👇
https://t.me/manachetalksdotcom