सगळ्याच गोष्टी आपल्याच मनाप्रमाणे नाही तर इतरांच्या मनाप्रमाणे पण होऊ देणं म्हणजे “शिष्टाचार” म्हणजेच “तमीज.”…. पालन करणं सुरुवातीला जरा अवघड वाटेल पण त्यातला आनंद मिळायला लागला की दुसऱ्यांनाही म्हणाल ‘तमीज से बोलो’…. ‘शिष्टाचार पाळा’…. अशाच शिष्टाचाराच्या आठ सवयी वाचा या लेखात.
“तमीज से बोलो” असा धमकी वजा आदेश आपण कायम ऐकतो.
टी व्ही, सिनेमात तर हा डायलॉग असल्याशिवाय जमतच नाही. दुसऱ्याशी बोलताना आपण कसं बोलतो त्यावरून आपली वागण्या बोलण्यातली प्रतिमा समोरचे लोक ठरवतात.
थोडक्यात सांगायचं तर जसं लोकांशी आपण बोलतो तसे आपले संस्कार आहेत असं लोक समजतात.
घरात हे वागण्या बोलण्यातले संस्कार आपल्या वडीलधाऱ्या मंडळींकडून अनुकरणातून येतात. प्रत्येक घरात ते वेग-वेगळे असू शकतात.
हे चांगले शिष्टाचार लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात. तुमची प्रतिमा उंचावतात.
आता हे चांगले शिष्टाचार तुम्हाला माहिती आहेत का?…. असतील, तर तुम्ही ते पाळता का?
त्यात विशेष असं काय असतं???? ज्यामुळे आपली प्रतिमा चांगली होते.
हे जरा डीटेल मध्ये जाणून घेऊ आज ह्या लेखातून. अशा छोट्या छोट्या ८ गोष्टी आहेत ज्यातून तुम्हाला तो सगळा उलगडा होईल.
१: सॉरी म्हणण्याची पद्धत
समजा तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल, आणि त्या चुकी बद्दल दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला सॉरी म्हणायची वेळ येते तेंव्हा सॉरी तुम्ही कसं म्हणता?
नुसतं सॉरी म्हणून तिथून निघून जाता का?… तर मग ते चूक आहे.
हे सॉरी म्हणताना तुम्ही काय चूक केली असेल त्या बद्दल तुमच्या मनात जरा सुद्धा खेद नसेल तर त्या सॉरी ला काहीही अर्थ नाही.
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला चालता चालता घाई घाईत धडक दिली असेल, तर तुमच्या सॉरी मध्ये चूक तुमची आहे आणि त्रास दुसऱ्याला झालाय, हे मनातून कबूल करायचं आहे. म्हणून तुम्ही सॉरी म्हणताय, हे जाणवलं तर योग्य, नाहीतर तुम्ही वेळ मारून नेण्यासाठी सॉरी म्हणालात असा अर्थ होतो.
अशा वेळी तुमची जी चूक झाली ती पण तुम्ही त्या बरोबर व्यक्त केली तर आणखी योग्य होईल.
म्हणजे “सॉरी सर, तुम्हाला माझा जोरात धक्का लागला”. असं म्हणणं जास्त बरोबर असेल.
म्हणजे जी चूक झाली ती पण कबुल केली गेली तुमच्याकडून. समोरचा माणूस परत तुमच्याशी वाद घालणार नाही. तुम्ही तुमची चूक कबुल केली म्हणजे तुम्हाला सुद्धा त्याचं वाईट वाटलं ही भावना व्यक्त झाली. अशी असली पाहिजे सॉरी म्हणण्याची पद्धत.
उदाहरण घेऊन बघायचं का?
समजा तुमचा कोणाला धक्का लागला…
तुम्ही त्याला पटकन सॉरी म्हणून पुढे जायला लागले.
तो म्हणतो, “सॉरी काय? हि काय पद्धत झाली? बघून नाही का चालत येत”
तेच जर तुम्ही सूर थोडा बदलला आणि म्हंटल, “सॉरी, चुकून घाईमुळे धक्का लागला.”
अशा वेळी समोरून जास्तीत जास्त शक्यता असते “इट’स ऑल राईट” म्हणण्याची…
२: माफी मागणाऱ्याला माफ करण्याची पद्धत…
एखाद्याने मोठी चूक करून, म्हणजे तुमचं काहीतरी नुकसान करून नुसतं सॉरी म्हणून निघून जायला लागला तर तुम्ही त्याला असं सहज जाऊ द्याल?????
आपल्याकडे तशी पद्धत नाही. त्याला सोडणार नाही, असं तुम्ही म्हणाल.
जर तुमचा एखादा मित्रच असेल आणि त्याला तुम्ही तुमच्याकडचं एखादं चांगलं पुस्तक वाचायला दिलंत. चार दिवसानंतर तो तुमच्याकडे आला आणि म्हणाला, “सॉरी” अरे तू मला वाचायला दिलेलं ते पुस्तक माझ्या कुत्र्याने अर्ध फाडलं☹️.
मला माफ कर बाबा. मी पुन्हा त्याबद्दल तुझी माफी मागतो. तो कळकळीने तुम्हाला हे सांगतोय तर तुम्ही काय म्हणाल?
त्याची अक्कल काढाल? का तुम्ही त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल.. जाऊदे, काही हरकत नाही.
ओके…. तुमचा तो मित्र आहे, झालेली गोष्ट त्याने कबूल केली. तुम्ही सुद्धा त्याला बाकी काहीही न बोलता माफ केलं तर ती माफ करण्याची योग्य पद्धत ठरेल.
त्यावर तुम्ही असं सुद्धा नंतर बोलू नका की आता झालं ते परत होऊ देऊ नको किंवा तू ते पुस्तक कुत्रा फाडेल अशा ठिकाणी ठेवलंसच कसं??
तू काळजी घ्यायला पाहिजे होतीस. असं म्हणणं चुकीचं होईल बरं का. “जंटलमन” ला ते शोभणार नाही.
तुमच्या सुद्धा हातून अशी एखादी घटना घडू शकते. रस्त्याने जाणाऱ्या स्कुटर ला तुमच्या बाईकची धडक लागली आणि त्या स्कुटरचा इंडिकेटर तुटला.
तर माफी मागताना जर तुम्ही त्याला म्हणालात की “सॉरी” माझी चूक होती. तुमचं जे काही नुकसान झालंय त्याचा दुरुस्तीचा खर्च मी देतो.
ह्या तुमच्या नुसत्या चांगल्या बोलण्याने कदाचित समोरचा माणूस तुमच्याकडून तो खर्च घेणारही नाही. कारण तुमच्याकडून चुकीची कबुली दिली गेली. मग माफी सुद्धा तशीच असायला हवी ना?
३: समोरच्या व्यक्तीशी बोलताना त्याचा आदर ठेवण्याची पद्धत…..
आपल्याकडे घरातल्या वडीलधाऱ्या लोकांशी आदराने बोलण्याची पद्धत असते. म्हणजे ते लहानपणा पासून आपल्यावर केले गेलेले संस्कार असतात.
पण इंग्लंड, अमेरिकेत, वयाने मोठ्या व्यक्तींना नावानेच म्हणजे मिस्टर जॉन, किंवा मिसेस फर्नांडिस, किंवा टीचरना मिस, किंवा मिस्टर म्हणायची पद्धत आहे.
हा दोन वेगवेगळ्या देशात आदराने बोलण्यातला फरक आहे. त्या त्या पद्धतीने आपण लोकांशी बोलायला लागतं.
आपण त्या लोकांशी बोलताना येस सर, किंवा थँक यू सर, प्लिज सर, असं आदरार्थी शब्द आपण वापरले तर त्यांना मान दिला जाईल.
आपल्या आणि त्यांच्या चाली रितीतला हा फरक आहे. तो समजून घेतला पाहिजे. प्रत्येकाशी आदराने बोललं तर त्या व्यक्तीला पण आपल्याशी बोलायला बरं वाटतं.
लोक चांगले असतात. त्यांची पद्धत वेगळी असू शकते. कोणालाही आपण हलकं समजायचं काहीच कारण नाही. त्यांना मान द्या, तुम्हालाही मान मिळेल.
४: तुमचं तोंड बंद कधी ठेवायचं ते जाणून घ्या..
कधी कधी असं होतं की आपण न बोलणं काही बाबतीत योग्य असतं, आपण जर बोललो तर एखादी गोष्ट आपल्याच अंगाशी येते.
नाहीतर दुसऱ्याला कोणालातरी त्याचा फटका बसतो. तुम्ही पण असं अनुभवलं असेल ना कधीतरी?
चुकून आपण एखादी गोष्ट ज्या माणसासमोर बोलायची नसते ती आपण बोलून जातो. आणि नंतर डोक्याला हात लावून बसतो.
वेळ गेलेली असते, पण त्याचे परिणाम आपल्यालाच नंतर भोगायला लागतात.
असं समजा की तुमच्या एका जवळच्या मित्राने तुम्हाला पार्टीला बोलावले असेल. आणि तुमच्याच जवळचा तिसरा मित्र जर तुम्हाला कुठे वाटेत भेटला, तर त्या पार्टीचा विषय तुम्ही त्याच्यासमोर काढला तर गडबड होईल.
कारण त्याला त्या पार्टीचं निमंत्रण दिलं गेलं नसेल तर ही तुमची नसती उठाठेव होईल की नाही?? म्हणजे त्या दोन मित्रांमध्ये गैरसमज तुमच्यामुळे निर्माण होईल. म्हणून तोंड बंद ठेवणं कधी कधी योग्य असतं.
५: तुम्हाला जर कोणी “गिफ्ट” दिली तर ती तुम्ही कशी स्वीकारली पाहिजे…
तुमच्या काही खास कार्यक्रमात, किंवा तुमच्या वाढदिवसाच्या वेळी कोणी गिफ्ट दिली, तर त्या गिफ्ट चा स्वीकार तुम्ही अगदी आनंदाने केला पाहिजे.
तर एखादा तुमचा सहकारी किंवा नातेवाईक किंवा मित्र तुम्हाला एखादी गिफ्ट देतो. त्यासाठी तो लांबून येतो, त्याचा वेळ तुमच्यासाठी खर्च करतो, आणि एक आठवण म्हणून चांगली गिफ्ट आणतो. गिफ्टची किंमत कितीही असली तरी त्या मागची चांगली इच्छा, आपण लक्षात घेतली पाहिजे.
समजा ती गिफ्ट दिलेली वस्तू तशीच तुम्हाला पूर्वी कुणी दिलेली असेल तर दोन वस्तू होतील. अरे तू ही गिफ्ट कशाला आणली, हीच माझ्याकडे आधी पासून आहे की. आता दोन दोन झाल्या.
असं तुम्ही चुकूनही म्हणू नका. त्या व्यक्तीला वाईट वाटेल. तो नाराज होईल. भलेही तुमच्याकडे तशा चार वस्तू झाल्या असल्या तरी त्याने दिलेली गिफ्ट ही विशेष आहे अशी समजून स्वीकार करा. त्यालाही खूप आनंद होईल. कुठलीही नकारात्मक प्रतिक्रिया देऊ नका.
गिफ्ट देणाऱ्या व्यक्तीला चुकून असं ही म्हणू नका की ‘अरे गिफ्टची काही आवश्यकता नव्हती. कशाला आणलीस?’
किंवा ती गिफ्ट कमी किमतीची असली किंवा ती तुम्हाला अजिबात आवडली नसली तरी तसं त्याला जाणवू देऊ नका. त्यामागे त्याच्या भावना लक्षात घ्या.
त्या भावनांची कदर केली गेली पाहिजे त्याने त्यासाठी पैसे खर्च केले आहेत, प्रेमाने ती गिफ्ट तुमच्यासाठी आणली आहे ह्या गोष्टी लक्षात असुद्या.
६: तुमच्या अतिशय आवडीची भेट वस्तू जर तुम्हाला कोणी दिली तर ती कशी स्वीकाराल….
अनेक लोक तुमच्या वाढदिवसाला भेटवस्तू देतात. त्यात कोणत्या गिफ्ट्स तुम्हाला द्यायच्या हे, जो तो आपल्या डोक्याने ठरवतो. त्याच्या कुवती प्रमाणे तो ठरवतो आणि मोठ्या प्रेमाने ती गिफ्ट तुम्हाला त्या समारंभात देतो.
एवढ्या लोकांनी तुम्हाला भेट वस्तू देताना तुम्हाला एखादी तुमच्या आवडीची, भेट वस्तू जर कोणी दिली तर ती तुम्ही स्वीकारताना वेगळी प्रतिक्रिया दिलीत म्हणजे ती वस्तू तुम्हाला खूपच आवडली असं मोठ्याने बोलून अगदी चेहेऱ्यावर खूप आवडल्याचे दाखवले तर तीच वस्तू चांगली आणि इतर लोकांनी दिलेल्या भेट वस्तू तुम्हाला तितक्या आवडल्या नसल्याची भावना निर्माण होईल.
आणि बाकीचे सगळे लोक नाराज होतील. म्हणून ती भेटवस्तू तुम्ही इतर लोकांच्या गिफ्ट प्रमाणेच आनंदाने स्वीकारली पाहिजे हे लक्षात ठेवा.
७: मोबाईल वापरण्याचे शिष्टाचार….
मोबाईल ही गोष्ट आज आवश्यक गोष्ट म्हणून अगदी सगळ्यांकडे मोबाईल असतोच. लहान मुलं सुद्धा आजकाल अगदी सफाईदारपणे मोबाईलचा वापर करतात. आपण सतत मोबाईल वापरतो पण आपल्या मोबाईल वापरण्याचा दुसऱ्याला काही त्रास होत असेल हे आपल्या लक्षात येत नाही.
जसं आपण कोणाशी बोलताना “तमीजसे” बोलना चाहीये। तसाच आपल्या मोबाईलचा वापर सुद्धा “तमीजसे” करना चाहीये।
म्हणजे मोबाईल वापरायचा कसा? ह्याचे शिष्टाचार पाळायला पाहिजेत. तो वापरायचा कसा ह्याचे अजून कुठे क्लासेस निघाले नाहीत.
शिष्टाचार पाळणे म्हणजे कुठल्यातरी बंधनात राहायचं, असं वाटू देऊ नका बरं का….
शिष्टाचार पाळायचे म्हणजे जे चांगलं आहे ते घेऊन, नको ते सोडून द्यायचं असं वाटू द्या. म्हणजे मी काय सांगतो ते तुम्हाला नक्की आवडेल.
तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये बसला असाल, किंवा एखाद्या क्लासमध्ये काहीतरी शिकत असाल आणि तिथं जोर जोरात कुणाच्या तरी मोबाईलची रिंग अचानक वाजायला लागली तर? सगळ्यांचे डोळे मोबाईल च्या दिशेनं वळतील.
मिटिंग, किंवा क्लासचं सगळं काम एकदम लाल सिग्नल लागल्यासारखं थांबेल. बोलणाऱ्याचं बोलणं बंद होईल. जो पर्यंत तो माणूस आपला मोबाईल खिशातून बाहेर काढून ते रिंगचं बटन बंद करत नाही तो पर्यंत सगळं काम ठप्प होईल.
त्यासाठी आपण हे डोक्यात ठेवायला पाहिजे की कुठेही जास्त लोकांमध्ये जाऊन आपल्याला बसायचंय त्यावेळी आपला मोबाईल सायलेंट मोडवर ठेवलाच पाहिजे. किंवा बंद करून ठेवा.
आपल्या पेक्षा त्या सगळ्या लोकांना त्याचा त्रास होणार आहे हे तुम्हाला कळणं म्हणजे शिष्टाचार. तुम्ही ते नाही पाळले तर लोक तुम्हाला मनातून लाखभर शिव्या देतील ती गोष्ट वेगळीच.
तसंच एखाद्या सार्वजनिक ठिकाणी, हॉस्पिटल, नाटकाचं थिएटर, रेस्टोरन्ट, अशा ठिकाणी मोबाईल रिंग वाजणार नाही ह्याची काळजी घ्यायची म्हणजे शिष्टाचार पाळणं.
तुम्ही लग्न समारंभात गेलात तर फोन करणाऱ्याला ते थोडीच माहिती असतं? तुम्ही सगळ्या लोकांबरोबर लग्नाचं जेवण घेत असताना तुमचा फोन वाजला तर?
जेवतानाच मोठ्यानं फोनवर बोलू नका. त्या व्यक्तीला थोड्या वेळाने फोन करतो म्हणून सांगा आणि लोकांना लग्नाच्या जेवणाचा आस्वाद घेऊ द्या.
अगदीच महत्वाचा फोन असेल तर तुम्ही उठा आणि हॉल च्या बाहेर जाऊन फोनवर बोला. लोकांना त्रास होईल असं लग्नाच्या जेवणाच्या पंगतीतच फोनवर बोलू नका.
तुमच्या सोसायटी ची मिटिंग चालू आहे असं समजा. लोक सोसायटीचे प्रश्न सोडवण्याची चर्चा करताना तुम्ही फेसबुक, किंवा मोबाईलवर गेम खेळत बसलात तर तुम्हाला त्या मीटिंगमध्ये काहीच रस नाही असा अर्थ होतो. मोबाईलचा वापर असा करणे टाळायला पाहिजे.
बसमधे, रेल्वेने प्रवास करताना आपल्या आजूबाजूचे लोक शांत बसलेले असतात. तुम्ही कोणालातरी फोन करून जोरात बोलून सगळ्यांनाच डिस्टर्ब करणं टाळा.
तुमच्या एकट्याच्या आवाजाने किती लोकांना त्रास होणार आहे ह्याचा विचार म्हणजे “तमीज”.
तुमच्याकडे महागडा मोबाईल असेल तर तो लोकांना दाखवून त्यांच्या कडे कमी किमतीचा फोन असल्यास आपला फोन कसा चांगला ते सांगून त्यांना कमी लेखू नका.
८: तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी गेलात आणि तिथल्या कार्यक्रमात तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही काय कराल?
जर एखादं सेमिनार, एखादा खेळ,किंवा एखादा म्युझिक प्रोग्रॅम तुम्ही बघायला गेलात आणि काही वेळातच त्या कार्यक्रमाचा तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही बसल्या बसल्या दोन्ही हात वर करून ऑई, ऑई, ऑई, करून जांभई देऊन तुम्हाला कंटाळा आल्याचं इतर लोकांना दाखवू नका.
किंवा हाताची बोटं मोडून किंवा समोरचा टेबल, किंवा खुर्ची वाजवून लोकांना विचलित करू नका.
तुम्ही बोअर झालात हे तुमच्या कोणत्याही हलचालीवरून इतर शेजारी बसलेल्या लोकांना दिसू देऊ नका, कारण तुम्ही बोअर झाला असला तरी बाकीचे लोक त्या कार्यक्रमाचा चांगला आस्वाद घेत असतील. तर त्याचं लक्ष तुमच्याकडे जाईल असं काही करू नका.
तुम्ही तुमची नजर त्या कार्यक्रमावर ठेवा. मनाने तुम्ही तिथे नसला तरी चालेल पण इतर लोकांचं लक्ष विचलित होणार नाही ह्याची काळजी घ्या. त्या कार्यक्रमाचा तुम्हाला कंटाळा आला असेल पण बाकीच्यांना त्या कार्यक्रमाची मजा घेऊ द्या.
स्टेजवर चे लोक तुमच्या एकट्यासाठी तो कार्यक्रम करत नाहीत तर तिथे आलेल्या सगळ्यांसाठी ते तो करतायत हे लक्षात घ्या. आणि निदान कार्यक्रम संपेपर्यंत फक्त तुम्ही तो कार्यक्रम एन्जॉय करताय असं किमान दाखवा. आणि इतरांना त्याचा आनंद घेऊ द्या.
सगळ्याच गोष्टी आपल्याच मनाप्रमाणे नाही तर इतरांच्या मनाप्रमाणे पण होऊ देणं म्हणजे “शिष्टाचार” म्हणजेच “तमीज.”
पालन करणं सुरुवातीला जरा अवघड वाटेल पण त्यातला आनंद मिळायला लागला की दुसऱ्यांनाही म्हणाल ‘तमीज से बोलो’…. ‘शिष्टाचार पाळा’.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
अश्या लेखांची आणि नियमांची गरज होती ….सुंदर लेख… खूप खूप धन्यवाद