अमेरिकेचे पहिले स्पेस स्टेशन “स्काय लॅब”
स्काय ल्याब हे नाव कदाचित आजच्या पिढीला माहित नसल तरी मागच्या पिढीतील अनेकांनी ह्या नावचा धसका जगभर घेतला होता. स्काय लॅब हे अमेरिकेचं पाहिल स्पेस स्टेशन १४ मे १९७३ ला शक्तिशाली अश्या Saturn V Rocket मधून सोडण्यात आलं. ७७,१११ किलोग्राम इतक प्रचंड वजन असणारी हि प्रयोगशाळा म्हणजे अमेरिकेच्या अवकाश तंत्रज्ञानाचा एक मैलाचा दगड होता. १९७३ ते १९७९ अशी सेवा दिल्यानंतर स्काय लॅब आपली कक्षा सांभाळू शकली नाही. हळू हळू तिने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करायला सुरवात केली. १९७९ च्या काळात तंत्रज्ञान इतक प्रगत नसल्याने स्काय ल्याब पृथ्वीवर कोसळणार ह्या बातमीने जगभर प्रचंड भीतीच असं वातावरण तयार झालं होतं. पृथ्वीच्या वातावरणात ते कधी शिरणार, ते पृथ्वीवर कुठे पडेल ह्यावर काहीच नियंत्रण नसल्याने एकूणच प्रचंड गोंधळाची स्थिती झाली होती. शेवटी स्काय ल्याब ११ जुलै १९७९ रोजी पर्थ ऑस्ट्रेलिया च्या परिसरात कोसळली. वातावरणाच्या घर्षणाने अनेक गोष्टी जाळून गेल्या असल्या तरी स्काय ल्याब चे २४ तुकडे जमिनीवर पडले. ह्यामुळे अश्या नियंत्रण नसलेल्या अवकाशातील गोष्टींचा प्रश्न जगाला भेडसवायला लागला.
१९७९ ते २०१८ बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं. तंत्रज्ञानाची प्रगती प्रचंड झाली. प्रत्येक देश ह्यात सामील होऊ लागला. २०१६ पर्यंत अवकाशात १७,८५२ इतक्या मानवाने बनवलेल्या गोष्टी विहार करत आहेत. त्यात १४१९ उपग्रह आहेत. १७० मिलियन वस्तू ह्या १ सेंटीमीटर पेक्षा लहान तर ६७०,००० ह्या १ ते १० सेंटीमीटर आणि २९,००० जास्त वस्तू ह्या १० सेंटीमीटर जास्त आकाराच्या अवकाशातील कचरा बनून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत आहेत. ह्यातील बहुतांश वस्तूंवर मानवाचं कोणतच नियंत्रण नाही. त्यामुळे त्याची कक्षा किंवा त्याचा पृथ्वीच्या वातावरणात शिरतानाचा अंदाज बांधण अतिशय कठीण काम आहे. ह्या वस्तू आकाराने लहान असल्याने वातावरणात नष्ट होतील असं असल तरी काही मोठ्या वस्तू मात्र पृथ्वीवर आदळून मोठी हानी करू शकतात. सध्या अश्याच एका प्रयोगशाळेने पृथ्वीकडे प्रवास सुरु केला असून मार्च २०१८ च्या आसपास ती पृथ्वीवर धडकेल असा अंदाज वैज्ञानिक लावत आहेत.
नवीनच भेडसावणारी स्काय लॅबची चिंता
टायोगोंग-१ हि चीनची प्रयोगशाळा सध्या चिंतेचा विषय बनली आहे. टायोगोंग-१ (स्वर्गात वसलेली) असा अर्थ असणारी हि प्रयोगशाळा चीन ने २९ सप्टेंबर २०११ ला अवकाशात सोडली. २०१३ पर्यंत तिचा कार्यकाळ संपवून तिला नष्ट करण्याचा प्लान चीन चा होता. पण २१ मार्च २०१६ ला चीन ने जगाला सांगितलं कि त्यांचा आणि ह्या प्रयोगशाळेचा संपर्क तुटला आहे. ह्या प्रयोगशाळेच्या कक्षेवर नजर ठेवूल्यावर असं लक्षात आलं कि हळूहळू हि प्रयोगशाळा आपल्या कक्षेतून पृथ्वीकडे सरकत आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये हि प्रयोगशाळा पृथ्वीपासून २९० किमी अंतरावर असून महिन्याला १० किमी ह्या वेगाने पृथ्वीकडे सरकत आहे. ८५०० किलोग्राम वजन असलेली हि प्रयोगशाळा मार्च २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल अस वैज्ञानिकांच म्हणन आहे. कोणतेही नियंत्रण नसलेली हि प्रयोगशाळा कोणत्या क्षणी आणि कुठे प्रवेश करेल हे आत्ताच सांगता येण शक्य नसल्याने युनायटेड नेशन च्या “आउटर स्पेस अफेअर्स ऑफिस” ने चीन ला नोटीस दिली आहे.
ह्या नोटीसी प्रमाणे चीन ने त्यांच्या प्रयोगशाळेवर कडक नजर ठेवून ती कोणत्या मार्गाने पृथ्वीवर प्रवेश करेल हे पूर्ण जगाला सांगण अंगीभूत असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा मालमत्ते च नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचं चीन ला सुनावलं आहे. सध्याच्या आकडीमोडी प्रमाणे ४३ डिग्री उत्तर किंवा दक्षिण अक्षांश मध्ये प्रवेश करेल असा अंदाज आहे. पण रेखांश आत्ताच सांगण कठीण असल्याच वैज्ञानिकांचचं म्हणणं आहे. वैज्ञानिकांच असही म्हणणं आहे कि पृथ्वीवर ह्याचे राहिलेले भाग हे समुद्रात पडतील पण जर जमिनीवर पडले तर लोकांनी कोणत्याही तऱ्हेने साहस करून त्यांना हात अथवा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. ह्या प्रयोगशाळेत वापरण्यात आलेलं प्रचंड घातक असं हायड्राझाईन रसायन त्यात असू शकेल. ज्याचा स्पर्श अथवा त्याच्या वाफेचा श्वास घेण अत्यंत घातक असू शकेल.
तूर्तास भारताला ह्याचा कोणताही धोका नसला तरी भविष्यातील अश्या अनेक राहिलेल्या अनियंत्रित झालेल्या वस्तूंचा धोका भारताला आहे. तसेच गेल्या वर्षी भारताचा एक उपग्रह ४ थ्या स्टेज मध्ये हिट शिल्ड विलग न झाल्याने असाच अनियंत्रित होऊन अवकाशात फिरत पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात शिरला होता. त्याही वेळेस समुद्रात त्याचं पृथ्वीवर आदळण अपेक्षित असल्याने कोणताही धोका नव्हता. छोटे उपग्रह आणि वस्तू ह्या बहुतांश वेळा पृथ्वीच्या वातावरणात शिरून जाळून नष्ट होतात. पण जेव्हा गोष्ट ८००० किलोग्राम वजनाच्या वस्तूची असते तेव्हा अनेक गोष्टी नष्ट न होता पृथ्वीवर आदळू शकतात. त्याने मोठी हानी जरी वाचवली तरी त्यातून होणारा किरणोत्सर्गचा धोका प्रचंड असतो. त्यामुळे अश्या कोणत्याही गोष्टीस स्पर्श अथवा सेल्फी काढून लोकांशी शेअर करण्याचा मोह टाळला तरी खूप झाल. हे आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून नक्कीच करू शकतो. आता वाट बघूया पुन्हा एका स्काय लॅब च्या कोसळण्याची.
Skylab: America’s Space Station (Springer Praxis Books)
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.