“आपलं माणूस” हा चित्रपट बघितला. अनेकांनी चित्रपटावर तर लिहिलं आहे. त्यामुळे मी त्यावर काही लिहणार नाही. पण ह्या चित्रपटाने एक प्रश्न मनात निर्माण केला तो म्हणजे नक्की आपलं माणूस कोण? कोणाला आपलं म्हणायचं आणि ते आपलं माणूस नेहमीच आपलं राहील का? किंवा ते कधी बदलल तर मग काय? अश्या अनेक प्रश्नांनी मनात घर केलं.
आपलं माणूस म्हणजे आपलं कुटुंब का? कुटुंबातील सगळीच माणसं आपली असतात का? रक्ताची नाती असलेले खरंच नेहमीच आपला विचार करतात का? उत्तरं दोन्हीकडून आली. हो आणि नाही पण. एकीकडे काही घटना घडलीे तर आस्थेने चौकशी करणार. बर / वाईट सगळंच विचारत रहाणार. पण त्याच वेळी एकीकडे चांगली संधी मिळू नये. किंवा कोणी आपली बरोबरी पैसा, मान – सन्मान किंवा इतर गोष्टीत करू नये म्हणून मिळेल तेव्हा तोंडावर गोड बोलून पाठीत खंजीर घुसावणरी आपली माणस. नक्की आपलं कोण?
आपलं माणूस आपला जोडीदार/प्रेमी/प्रेयसी का? जिवाला जीव देऊन सगळ्या काळात आपल्याला साथ देणारे एकीकडे तर त्याच वेळी अर्ध्या रस्त्यात सोडून जाणारे दुसरीकडे. काही जोडीदार बनून कळ्या कुस्करून टाकणारे तर काही जोडीदार बनून आयुष्याला अर्थ देणारे. नक्की आपलं माणूस कोण? ज्याच्याशी सगळं बोलाव वाटणारे एकीकडे तर ज्याच्यापासून सगळच लपवावस वाटणारे एकीकडे. ज्याचा स्पर्श काय नुसत असणच म्हणजे संपूर्णतेची जाणीव तर ज्याच असणं म्हणजे कारावास. अखंड न सांगता भोगलेली शिक्षा. नक्की आपला माणूस कोण?
आपला माणूस आपला मित्र का? एकीकडे खांद्याला खांदा देऊन साथ करणारा / करणारी तर एकीकडे आपलंच घर खाणारे. ज्याच्यावर विश्वास ठेवून मन मोकळे करावेसे वाटणारे तर एकीकडे मन मोकळ केलं म्हणून पश्चात्ताप वाटणारे. एकीकडे संधी साधू तर एकीकडे संधी निर्माण करणारे. नक्की आपली माणसं कोण?
ज्याने निर्मिती केली त्याला परफेक्शन नाही जमलं तर त्यांच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा करणारे आपण कोण? हाच प्रश्न जेव्हा मला पडला तेव्हा अनेक प्रश्नांची उत्तरं मला मिळाली.
आपली माणसं कोण? ह्या प्रश्नाचा विचार केला तेव्हा अनेक चेहरे समोर आले. काही रक्ताचे तर काही बिनरक्ताचे. काही घनिष्ठ संबंध असणारे तर काही काहीच संबंध नसणारे. काही माझ्यासाठी स्वतःची जागा देणारे तर काही जागा माझ्यासाठी निर्माण करणारे. हेच चेहरे जे कधी माझ्यासाठी आपली माणसं होती तेच कधी परके झाले. तर कधी परके होऊन पुन्हा आपले झाले. पण आपल्या माणसांची माझी व्याख्या मात्र व्यावहारिक गोष्टीतून कधीच ठरली नाही.
आज गोष्टी घेणारा उद्या नेणारा असू शकतो आणि आज सिंहासनावर बसलेला उद्या भिकेला लागू शकतो ह्यावर माझा विश्वास नक्कीच आहे. ह्या सगळ्यात रहाते तर काय आपलेपणाची अनुभूती जी सिंहासनावर असताना पण जाणवते आणि भिकेला लागल्यावर पण तितकीच जाणवते. फक्त आपल्याकडे ते बघणारे डोळे हवेत आणि ते समजणारं मन हवं. बाकी आपली माणसं तरी कोण असतात. हाडा मासांचे गोळेच ना आपल्यासारखे. ज्याने निर्मिती केली त्याला परफेक्शन नाही जमलं तर त्यांच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा करणारे आपण कोण? हाच प्रश्न जेव्हा मला पडला तेव्हा अनेक प्रश्नांची उत्तरं मला मिळाली.
आपलं माणूस असायला कोणतं सर्टिफिकेट किंवा रक्ताच्या नात्यांची गरज नसते. गरज असते ती जाणिवेची आणि अनुभूतीची. ती तेव्हाच जाणवते जेव्हा आपलं होणारा आणि आपलं म्हणणारा जेव्हा चांगल्या जाणीवेने आपला होतो. कधी परिस्थिती बदलते आणि माणूस पण बदलतो. पण ते आपलेपण त्याने नाही लक्षात ठेवल तरी आपण विसरायचं नसत. हेच प्रगल्भतेचं लक्षण आहे नाही का? म्हणून आपली माणसं जपणं आपल्याचं हातात. त्यांनी आपल्याला जपणं हे त्यांच्या हातात. जेव्हा दोन्ही गोष्टी होतील तेव्हा आपली माणसं कोण ह्याचा विचार येत नाही. कारण तेव्हा ती अनुभूतीतून आणि जाणीवेतून आपली कधीचं झालेली असतात.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
मस्त !