सध्या मराठा मूक मोर्चा आणि मराठ्यांची आरक्षणाची मागणी हे विषय सध्या पुन्हा ऐरणीवर आले आहेत. अपेक्षेप्रमाणे वृत्तवाहिन्यांना ऐरणीवर घेऊन ठोकत बसायला एक विषय मिळाला. (पूर्वी हि ऐरण, लोहार लोक त्यांच्या गरम लोखंडी वस्तू ठोकायला वापरायचे म्हणे. आता लोहार फारसे राहिले नसल्यामुळे मिडिया वाले उठसुठ कुठले हि प्रश्न ह्या आताशा बेकार झालेल्या ऐरणीवर घेऊन ठोकत बसतात. पण ते एक असो…) ह्या साधक(?) बाधक(!) चर्चा ऐकताना मला मागे आमच्या एका फेसबुक मित्राशी झालेला वाद आठवला म्हणून त्यावेळी त्यांना दिलेला प्रतिसाद जरा modify करून, त्यात भर टाकून परत एकदा इथे टाकत आहे. माझी अशी कळकळीची विनंती आहे कि ज्यांना प्रामाणिकपणे “मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.” असे वाटते त्यांनी ह्या लेखातील मुद्द्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करावा. हा लेख मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध करणारा नाही पण तो त्या मागणीला समर्थन करण्यासाठी लिहिला आहे असेही नाही. आपल्या संविधानात आरक्षणाची तरतूद नक्की का आहे? ह्याचे माझ्या अल्पमतीला झालेले आकलन मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते सर्वथैव बरोबरच आहे असा माझा दावा नाही. तरी वाचणाऱ्यांनी स्वत:च्या विवेकाचा वापर करावा.
आरक्षण!
आरक्षण ह्या विषयावर काहीही बोलायचं किंवा लिहायचं म्हणजे हल्ली जरा अवघडच झालं आहे. यामधून आरक्षण विरोधी किंवा आरक्षण समर्थक अशा दोन्हीकडच्या लोकांच्या शिव्या खायला मिळण्याचाच संभव अधिक कारण मी आरक्षण समर्थक नाही तसाच सरसकट आरक्षण विरोधकही नाही पण मी यावर बरंच वाचलं आहे. (चर्चा करण्या पेक्षा का कोण जाणे मला हा मार्ग जास्त भरवशाचा वाटतो) आणि आरक्षणाची गरज मला पटलीही आहे. सर्वसाधारणपणे आरक्षण समर्थनाची भूमिका घेणे तुम्हाला पुरोगामी म्हणून सादर करते आणि बऱ्याच लोकांना स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणे आवडते. पण एखादी भूमिका घेण्यापूर्वी आपण पुरेसा अभ्यास, विचार, चिंतन केलेलं असावं लागतं. तसं बरेच लोक करत नसल्याने आरक्षण समर्थन करताना ते बऱ्याच वेळा हास्यास्पद विधानं करतात यातून त्याची अक्कल तर दिसून येतेच पण एकूण पुरोगामित्वाला हि बाध येते. ( हे फक्त आरक्षणच नाही तर इतर सर्वच महत्वाच्या, गंभीर विषयांबाबत खरे आहे )
फेसबुक वर एक असेच तथाकथित पुरोगामी विचारवंत हल्लीच माझ्या वाचनात आले. आता हे पहिल्यांदाच स्पष्ट करतो कि मी यांना व्यक्तीशः ओळखत नाही आणि माझा यांचा काही परिचय नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणतीही अढी किंवा वैरभाव माझ्या मनात असण्याचे कारण नाही शिवाय हा लेख केवळ त्यांच्या विचारांना प्रत्युत्तर म्हणून लिहिलेला नाही फक्त त्यांचे आरक्षण या सारख्या गंभीर विषयावरचे विचार (पक्षी मुक्ताफळे ) वाचून ते आणि त्यांच्या सारख्या स्वयंघोषित नवपुरोगाम्यांना उद्देशून हा लेखन प्रपंच करण्याला चालना मिळाली. तर खाली त्यांचे आरक्षणासंदर्भातले विचार धन दिलेले आहे.
“मागासवर्गियांना मिळणाऱ्या सवलतीबद्दल बोलताना अनेक लोक म्हणतात की कबूल की आमच्या पूर्वजांनी यांच्यावर अन्याय केला असेल. परंतु आता तर तो होत नाही ना? (वास्तवात हे विधानसुद्धा बरोबर नाही. पण कल्पना करू की हे विधान बरोबर आहे.) मग आता सर्वाना समान वागणूक का देण्यात येऊ नये? आम्ही चांगले गुण मिळवले तरी आम्हाला प्रवेश का नाकारला जावा? (सर्वांना समान वागणूक आज मिळते हे विधानसुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करते.) परंतु हेही गृहीत धरले तरी एका प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. वाडवडिलांतर्फे वारसाहक्कात जशी संपत्ती मिळते तशीच त्यांची पापेही स्वीकारावी लागत असतात. संपत्ती घेऊ पण पापात भागीदार होणार नाही अशी भूमिका चालू शकत नाही.”
हा एक मूर्खासारखा युक्तिवाद आहे. वारसाहक्काने जमीन जुमला, संपत्ती, कर्ज, दावे, भांडण मिळतात पाप, पुण्य नाही. जर का पूर्वजांनी केलेल्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून आजच्या पिढीतील खुल्या प्रवर्गातील गुणवान विद्यार्थ्याला डावलले गेल्याचं समर्थन होणार असेल तर मग धर्म, पाप, पुण्य, प्रारब्ध, प्राक्तन, गतजन्मीचे सुकर्म किंवा कुकर्म ह्या खोट्या भ्रामक आणि आपल्या संविधानाने निग्रहाने नाकारलेल्या संकल्पना स्वीकाराव्या लागतील आणि कुठल्याही गोष्टीचे, विशेषतः अन्यायाचे समर्थन म्हणून मग पूर्वजन्मीची पातकं , पापं ह्यांचा दाखला दिला जाऊ लागेल, आरक्षणामागील भारतीय संविधानाची भूमिका इतकी तकलादू, भंपक नाहीये. ती समजत नसेल तर आपल्या तोकड्या अकलेद्वारे अन् त्याहून तोकड्या आकलनाद्वारे ती इतरांना समजावून सांगण्याचा अव्यापारेषु व्यापार करू नये ….
दारिद्र्य, विपन्नावस्था, गुलामी, मागासलेपणा हि तितकी भयानक गोष्ट नाही जितकी ‘आपण दारिद्र्यात, गुलामीत आहोत आणि आपल्याला यातून हरप्रयत्नाने बाहेर पडलेच पाहिजे हि जाणीवच नसणे’ हि आहे. आपल्या समाजातला एक फार मोठा वर्ग पिढ्यानुपिढ्या सामाजिक, धार्मिक गुलामीत, दारिद्र्यात, अज्ञानात खितपत पडला आहे. हि गुलामी त्या समाजाच्या हाडीमाशी इतकी भिनली आहे कि आपण माणूस आहोत आणि आपल्याला माणसाप्रमाणे जगायचा आणि माणसाच्या वाटेला येणारी सुख दु:ख भोगायचा तसेच पशुतुल्यजीवन आणि पशूंच्याच वाट्याला येणाच्या लायकीच्या यातना, भोग नाकारायचा अधिकार आहे हि जाणीवच त्यांच्या मधून नाहीशी झालेली आहे. ह्या वर्गामध्ये फक्त महार मांग चांभार अशा जातीचं नसून संख्येने जवळपास ५०% असणारा स्त्री समाजहि आहे. एक काही प्रमाणात ब्राह्मण स्त्रियांचा थोडा अपवाद सोडला तर (तो सुद्धा २० व्या शतकाच्या उत्तरार्धातला, त्याआधी ब्राह्मण समाजातल्या स्त्रियांची स्थिती सुद्धा इतर जातीतल्या स्त्रियांसारखीच, कदाचित त्यांच्या पेक्षा जास्त दयनीय होती. सती, केशवपन, विधवेला पुनर्विवाह बंदी, जरठ-कुमारी विवाह (केवळ बाल विवाह नव्हे ) अशा अन्याय कारक प्रथांच्या चरकातून ब्राह्मण स्त्रियांना पिढ्यानुपिढ्या जावं लागलेलं आहे) बहुसंख्य स्त्रिया आजही पुरुषी मानसिकता, धर्म, समाज, दुष्ट-अनिष्ट रूढी ह्यांच्या जोखडात बंदिस्त झालेल्या दिसतात आणि त्यातून बाहेर पाडण्याकरता त्यांना प्रेरणा, मदत मिळत नाही. गरिबी, दारिद्र्य, आर्थिक- शैक्षणिक मागासलेपण हा काही फक्त मागास जातींचा मक्ता नाही. माझ्या स्वतःच्या परिचयाची असंख्य ब्राह्मण, ckp, मराठा कुटुंब अशी गरीब आहेत पण त्यांना आपल्या गरिबीची, मागासलेपणाची जाणीव आहे, आपली हि अवस्था आपल्या पूर्व जन्माच्या पापाने किंवा नशिबाने नाही याची प्रकट नाही पण स्पष्ट जाणीव त्यांना आहे आणि यातून बाहेर पडण्याची गरज आणि मार्ग त्यांना माहिती आहे. त्यांचे प्रयत्न तसे चालू आहेत. मी काय म्हणतो हे तुम्हाला एका उदाहरणावरून कळेल.
माझ्या बायकोच्या- वसूच्या लहानपणी, नगरला पुष्पाताई म्हणून एक बाई स्वयपाक करायला यायच्या त्या जातीने ब्राह्मण, घरची गरिबी, नवरा भिक्षुकी चालत नाही म्हणून एका कापड दुकानांत नोकरी करायचा आणि ह्या चार घरी पोळ्या लाटत. त्यांचा मुलगा कृष्णा कधी कधी माझ्या सासऱ्यांच्याकडे येई. पण तो कधीही आईला कामात मदत करायला येत नसे कि त्याला घरातलं इतर काम पुष्पाताई करू देत नसत, हा मुलगा हुशार होताच पण त्याला आपल्या आई वडलांच्या परिस्थितीची, ते उचलत असलेल्या कष्टांची जाणीवही होती. तो पुढे इंजिनियर झाला ते पण मद्रास I.I.T. मधून आणि आता पुण्यात एका नामांकित कंपनीत नोकरी करतो. त्याची बायको सुद्धा इंजिनियर आहे आणि लग्नानंतर तिने M.Tech.केले तिला ह्या पुष्पाताईंनी, कृष्णाने कधीही विरोध केला नाही तर उलट प्रोत्साहनच दिले आज हि आमचे त्यांचे चांगले घरोब्याचे संबंध आहेत आणि आज ते समाजात चांगला मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून आहेत. त्याचं आणि माझ्या सासुरवाडीतलं मालक नोकर हे नातं केव्हाच इतिहासजमा झालं.. मला हे काही माहित नव्हतं, लग्नानंतर भेट झाली तेव्हा मला ते सासऱ्यांच्या प्रतिष्ठित मित्रपरीवारातले एक वाटले. जेव्हा वसूने त्यांचा इतिहास सांगितला तेव्हा मला कौतुक वाटलं (आश्चर्य नाही). पुष्पाताई आणि कृष्णा ह्याचं उदाहरण प्रातिनिधिक आहे अपवादात्मक नाही.
याउलट मी लक्ष्मिनगरला राहत असताना आमच्याकडे कांबळे बाई म्हणून एक बाई घरकामाला यायच्या, नंतर त्यांची मुलगी शारदा त्यांच्या बरोबर येऊ लागली पुढे ती शारदा आमच्या कडे कामाला येई आणि कांबळे बाई इतरत्र जात. पुढे शारदा मोठी (म्हणजे १४ -१५ वर्षांची) झाल्यावर तीचं लग्न झालं आणि कांबळे बाईची दुसरी मुलगी संगीता येऊ लागली. हि ७-८ वर्षांची गोड मुलगी होती. तिचं सगळ शिक्षण आम्ही करतो, पण तिला या वयात काम करायला पाठवू नका असं वडलांनी सांगून पाहिलं पण झालं इतकच कि कांबळे बाई आमच्याकडे येऊ लागल्या आणि संगीता कामाला इतरत्र जाऊ लागली. ती आजही पोरवडा सांभाळत घरकामं करते आणि बहुधा तिच्या मुली तिचाच कित्ता गिरवतात. तिचे भाऊ हि तसेच, एक बागकाम करतो तर दुसरा मजुरीची कामं करतो, बिगारीची काम करतो. हेही उदाहरण प्रातिनिधिकच आहे अपवादात्मक नाही. मी सध्या जिथे राहतो तिथे कामाला येणाऱ्या लक्ष्मीबाई आणि अनुसया ह्या माय लेकींची कहाणी फार वेगळी नाही. विचार करा पुणे, अहमदनगर या सारख्या शहरात जिथे शिक्षणाचे फायदे उघड उघड डोळ्यांना दिसतात तिथे या मागास जातीमध्ये एव्हढा अंधार आहे तर गाव खेड्यात काय अवस्था असेल.
तुम्ही नीट आठवून पहा पूर्वी अनेकांना घरी स्वयापाककामाला ब्राह्मण बायका लागत (हि एक फालतू मानसिकता आहे पण इथे तो मुद्दा नाही …) आणि साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी त्या सहजगत्या मिळतही पण आज घरकामाला ब्राह्मण स्त्री सहजगत्या मिळत नाही. (इथे मी चूक असू शकतो कारण आम्ही कामाला बाई जात बघून ठेवत नाही पण आम्हाला घरकामाला जेव्हा बाई हवी असते तेव्हा काम मागायला येणाऱ्या बायकात ब्राह्मण एकही नसते )
असो तर सांगायचा मुद्दा एव्हढाच कि गरिबी, दारिद्र्य, शिक्षणाची कमतरता हे मागासलेपणाच मूळ कारण नाही. गतानुगतिकता आणि स्वतःच्या पशुतुल्य जिन्दगिच्या जाणीवेचा अभाव हे आहे. मूल मग ते मुलगा असो वा मुलगी, जरा ७-८ वर्षांची झाली कि तिला पैसे कमावायच्या मागे लावले जाते. बालपण, शिक्षणाचा हक्क ह्यागोष्टी फक्त सरकारी योजनात, कागदावर राहतात.दिवस भर अंगमेहनतीच काम करून रात्री शाळेत जाणारी ह्यांच्यातली काही मुलं डोळ्यात झोप, कष्ट करून दुखणारे लहानगे हातपाय आणि एव्हढे कष्ट करून हि अर्धवटच भरलेली पोटाची खळगी घेऊन काय कपाळ शिकणार? पुष्पाताईंचा कृष्णा हा भाग्यवान, त्याला गरीब का होईना पण डोळस आणि समजूतदार आई बाप मिळाले. ज्यांना मुल म्हणजे ७व्या ८व्या वर्षापासून काम करून चार दिडक्या कमावणारं यंत्र वाटतं त्यांनी आणि त्यांच्या पोरांनी उज्ज्वल भवितव्याची स्वप्न बघायला लागणारे दिव्य चक्षु कुठून उसनवारी आणायचे! मुलांना दुपारचं खायला मिळेल म्हणून मुलांना शाळेत पाठवले जाते आणि मुलांनी शाळेत यावे म्हणून शासनाला दुपारची खिचडी एक प्रलोभन म्हणून द्यावी लागते.यात सगळ आलं. एवढ्या सगळ्यातून कसंबसं कोणी १०वी १२वी झालं तर पुढे उच्च शिक्षण साठी प्रवेश घेताना त्याला थोड झुकतं माप दिलं तर बिघडलं कुठे? इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून मिळालेले ५०-५५% आणि कोचिंग क्लास लावून मिळालेले ८५% यांचा सामना बरोबरीचा आहे असं निर्लज्ज पणे कस काय म्हणणार?
शतकानुशतकाच्या अंध:कारातून बाहेर येऊ पाहण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या ह्या थोड्या लोकांना मिळणारा शासनाचा, समाजाचा, स्वकीयांचा प्रतिसाद किती थंड असतो हे काय मी नव्याने सांगावे? शासकीय अनस्था, भ्रष्टाचार, अनागोन्दिवर काही वेगळे लिहिण्याची गरज नाही.
भारतीय लोकशाही हि काही एकमेव किंवा पहिलीच लोकशाही नाही. आधुनिक लोकशाही ची जन्मभूमी जी युरोप तिथेही लोकशाही रुजायला काही शतकं जावी लागली आणि सुरुवातीला त्यांच्या समाजातल्या बुद्धिवादी, विचारवंत अशा ज्यांना एलिट क्लास म्हटले जाते त्यांच्या हातात मतदानाचा अधिकार आणि पर्यायाने सत्तेची धुरा होती अगदी इंग्लंड मध्ये स्त्रियांना मताधिकारासाठी मोठा लढा उभारावा लागला जी सफ्फ्रागेट चळवळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि स्त्रियांना मताधिकार २ रया महायुद्ध वेळी मिळाला, २०० वर्षांच्या परिपक्व लोकशाही नंतर. तीच गोष्ट अमेरिकेची, २०व्य शतकाच्या उत्तरार्धात सुद्धा तेथील काळ्या लोकांना समान अधिकार आणि स्वातंत्त्र्यासाठी किती संघर्ष करावा लागला याचा इतिहास जेव्हढा उर्जस्वल आणि रोमांचक आहे तितकाच तो रक्तरंजीतही आहे. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण सर्वाना जाती, धर्म, पंथ, भाषा, लिंग निरपेक्ष मतदानाचा अधिकार देऊन लोकशाहीच्या मूळ प्रवाहात आणले आहे. पण मताधिकार म्हणजे काय?, लोकशाही म्हणजे नक्की काय? सरकार स्थापनेपासून ते सरकार बदलण्यामध्ये निर्णायक भूमिका गाजवण्याचा अधिकार म्हणजे काय? आपल्या हातात दिलेल्या या शक्तीचा वापर कसा करायचा आणि का करायचा? हे समजायला इथल्या बहुसंख्य मागास समाजाला वेळ लागणार आहे. सर्वांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेऊन आपण रक्तरंजित संघर्ष जो एरव्ही अटळ ठरला असता तो टाळला आहे, देश एकसंध ठेवण्यात यश मिळवले आहे, हि एक मोठी उपलब्धी आहे. हजारो वर्ष धर्म रूढी परंपरा ह्यांच्या नावाखाली गुलामीत काढल्यामुळे दुर्बल आणि अज्ञ राहिलेल्या ह्या आपल्या बांधवांना आपल्याला सुरुवातीला थोड झुकतं माप द्यावच लागेल. त्यांना स्पर्धा करण्याची किमान अर्हता मिळवायाची संधी आणि त्याकरता लागणारा वेळ द्यावा लागेल.
मला माहिती आहे कि ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना संधी नाकारली गेली आहे त्यांना हे पटणार नाही मला हि पटलं नव्हतं. मला १०वि ला ८५% मार्क होते पण मला पुण्यातल्या चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही महणून मी असाच चरफडलो होतो, त्याच सुमारास माझे वडील पक्षाघाताचा झटका येऊन अंथरुणाला खिळले, नोकरी सोडावीच लागली, पेन्शन मिळाली ४५०० रु. आई आधीच संधीवाताने आजारी असल्यामुळे चांगली भारतीय वायुसेनेतली नोकरी सोडून घरी बसली होती तिला १८०० रु पेन्शन होती. मोठी बहिण मतीमंद आणि अर्धांगवायुने आजारी. महिन्याच्या घरखर्चात आणि त्यांच्या औषधं पाण्याच्या खर्चातच पेन्शन संपून जात असे. माझ्या शिक्षणाचा खर्च कोण उचलणार? अशावेळी आमच्या सारख्या मध्यमवर्गीय कुटुंबावर अचानक दारिद्र्यात ढकलले जाण्याची वेळ आली. अगदी अन्नान्नदशा झाली नाही एव्हढच. अशावेळी मी टाटा मोटर्स मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून लागलो ते केवळ त्यांच्याकडून ४५० रु विद्यावेतन, फुकट जेवण, वसतिगृहात राहायाला मिळे, शिवाय ४ वर्ष पूर्ण केल्यानंतर कामगाराची नोकरी मिळे म्हणून. पण त्याही परिस्थितीतही मला आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीची आणि त्यातून बाहेर पाडण्यासाठी काय कराव लागणार आहे याची स्पष्ट कल्पना होती. त्यामुळे मी नोकरी सांभाळून शिक्षण पूर्ण केले आणि टाटा मोटर्स मध्येच पदोन्नत्या घेतल्या. याला कष्ट आणि बराच वेळ जाऊ द्यावा लागला. मी अगदी मानभावी पणे वरचे विचार मांडतो आहे असे वाटू नये म्हणून आत्मस्तुतीचा दोष पत्करून स्वतःबद्दल हे लिहिलेलं आहे.
कष्ट मी केले तसे हे मागास राहिलेले लोक हि करतात पण कष्ट आणि हमाली यात फरक असतो आणि तो त्यांना कळायला काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. आरक्षण देऊन क्वचित प्रसंगी लायकी किंवा योग्यतेशी तडजोड करून आपण गुणवत्तेशी फारकत घेतो हे मला कळते पण भारतीय समाज / लोकशाही फक्त गुणवानासाठी नाही ती सर्वांना अधिकाधिक गुणवान करण्यासाठी आहे.तशी संधी देण्यासाठीआहे भारताला स्वतंत्र करण्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात लोकांनी सर्वस्वाचा त्याग केला तो या ५००० पेक्षा अधिक वर्षे जुन्या असलेल्या आपल्या समाजासाठी, संस्कृतीसाठी. आज तशी सर्वस्वाचा होम करण्याची वेळ आपल्यावर आलेली नाहीपण थोडा त्याग करायला काय हरकत आहे. इथे त्याग म्हटला कि उपकाराची भावना येते पण मला तसं म्हणायचं नाही , माझ्या आजारी आई बाबांसाठी आणि बहिणीसाठी मला अनेकदा तडजोडी कराव्या लागल्या, (अनेक जण तसा तो करतात) पण तो त्याग नव्हता, ते माझं कर्तव्य होते आणि त्यांचाही तो अधिकारच होता योग्यतेच्या प्रमाणात संधी नाही मिळाली म्हणून ज्याला खरच काही करायची , पुढे जायची इच्छा आहे तो थांबतो थोडाच! तो पुढे जातोच फक्त पुढे जाताना त्याने मनात ह्या देशाबादल, समाजाबद्दल विशेषता: मागासवर्गीयान्बद्दल द्वेष किंवा असूया ठेवू नये एव्हढीच अपेक्षा……. अधिक काय लिहिणार …
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.