आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त जपण्यासारखी गोष्ट असते ती म्हणजे, आपले आरोग्य….
पैसा, संपत्ती, मान-मरातब हे सगळे जरी आपण गमावले तरी ते परत मिळवता येते. मात्र आरोग्य ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा गमावली तर परत मिळवणे फार कठीण असते.
साधारणपणे सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी अशा समस्या अधूनमधून सगळ्यांनाच येतात आणि त्यात काही काळजी करण्यासारखे कारण सुद्धा नाही.
पण जर आपण नेहमीच आजारी पडत असू तर मात्र त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असते.
आज आपण अशाच काही कारणांचा शोध घेऊ.
त्यासाठी खाली काही प्रश्न दिलेले आहेत जे तुम्ही स्वतःला विचारून आपल्या आजारपणाचे कारण शोधू शकता.
१) तुमचा आहार योग्य आहे का ?
आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार.
आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते.
आपण जे अन्न खातो त्यापासूनच आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि आपण सगळी कामे करू शकतो.
त्यामुळे जर आपण पौष्टिक जेवण जेवलो नाही तर आपल्या शरीरासाठी लागणारी ऊर्जा पुरेशी तयार होणार नाही आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाईल, आपण सारखे आजारी पडू.
सतत तेलकट – तिखट खाणे, अवेळी जेवणे, गरजेपेक्षा कमी किंवा जास्त खाणे अशा गोष्टींमुळे आपले पोट बिघडते आणि आपण सतत आजारी पडायला लागतो.
आहार कसा असावा? याचे उत्तर प्रत्येक माणसासाठी वेगळे असू शकते, तरी काही गोष्टी सगळ्यांना लागू होतात.
फळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये ह्या सगळ्याचा आपल्या आहारात समावेश असावा. साखर, तेल आणि मीठ ह्याचा समावेश आपल्या जेवणात शक्य तेवढा कमी असावा.
ह्या सगळ्या गोष्टी जर आपण नीट पाळल्या तर आपले शरीर सुदृढ राहते, त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आपण फार आजारी पडत नाही.
२) आपल्याला व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता आहे का?
आपल्या सतत आजारी पडण्यामागे अजून एक कारण असू शकते ते म्हणजे व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता असणे.
हल्लीच काही चाचण्यांमधून असे सिद्ध झाले आहे की जर शरीरात व्हिटॅमिन ‘डी’ कमी असेल तर आपल्याला श्वसनाचे आजा होऊ शकतात आणि आपल्या पचन संस्थेवर सुद्धा ह्याचा वाईट परिणाम होतो.
त्यामुळे व्हिटॅमिन ‘डी’ नैसर्गिकरित्या मिळवण्याचे साधन मासे, अंडी आणि मशरूम हे पदार्थ होय.
ह्या घटकांचे प्रमाण आपल्या आहारात पुरेसे असायला हवे.
त्याचबरोबर व्हिटॅमिन ‘डी’ हे सुर्यप्रकाशातून सुद्धा आपल्या शरीराला मिळते त्यामुळे रोज किमान १५ मिनिटे सूर्यप्रकाशात राहणे गरजेचे असते.
३) तुम्ही पुरेसे पाणी पिताय ना ?
आपल्या शरीरात ६० टक्के पाणी असते त्यामुळे शरीराच्या सगळ्याच क्रिया पूर्ण होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.
आपण घाम, लघवी ह्या द्वारे सतत शरीरातील पाणी बाहेर टाकत असतो. त्यामुळे आपल्याला रोज पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते मात्र जर आपण पाणी प्यायलो नाही तर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते.
अशावेळी डोकेदुखी, चक्कर, खूप तहान लागणे, डोळे लाल होणे असे त्रास सुरू होतात.
ह्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पुरेसे पाणी पिणे.
त्याच बरोबर पाण्याचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ जसे की फळे, भाज्या ह्यांचे सेवन सुद्धा जास्त करणे गरजेचे आहे.
४) तुमचे हात स्वच्छ असतात का ?
आपल्या शरीरात कोणत्याही रोगाचे रोगजंतू गेल्यावरच आपण आजारी पडतो.
आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या रोगांचे जंतू असतात.
हे जंतू आपल्या शरीरात जाण्याचा मुख्य मार्ग म्हणजे आपले तोंड होय. आपण जेवत असताना तोंडावाटे हे रोगजंतू आपल्या शरीरात प्रवेश करतात.
पण हे जंतू तोंडपर्यंत पोहचवण्याचे काम मात्र आपले हात करतात. आपण कुठल्याही गोष्टीला, वस्तूला हात लावला की त्यावरचे रोगजंतू आपल्या हाताला लागतात आणि जर आपण तेच हात तोंडात घातले तर ते जंतू आपल्या तोंडात जातात.
त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने हात साबण लावून स्वच्छ धुणे फार गरजेचे असते. ह्याद्वारे आपण अनेक रोगजंतूंना आपल्या शरीरात प्रवेश करण्यापासून रोखू शकतो.
तसा, हा धडा या कोरोना काळात आपण लक्षपूर्वक गिरवलेला आहेच!!
५) तुम्हाला पुरेशी झोप मिळते आहे का ?
आपले शरीर हे कोणत्याही रोगविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असते. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले शरीर रोग, सूज, जखम ह्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी काही प्रथिने सोडते.
ह्यामुळे आपले आजारापासून रक्षण होते. मात्र जर आपली झोप पुरेशी होत नसेल तर आपले शरीर ही प्रथिने तयार करू शकत नाही त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि आपण सतत आजारी पडतो.
एका मोठ्या माणसाला दिवसाला सहा ते आठ तास झोप आवश्यक असते तर लहान मुलांना दहा तास झोपेची गरज असते.
दीर्घकालीन कमी झोप डायबिटीस, हृदयविकार, स्थूलता अशा अनेक आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे आपल्याला पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे.
६) तुम्ही तोंडाची नीट स्वच्छता करता ना ?
आपले तोंड हा अनेक बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. अनेक चांगले वाईट बॅक्टेरिया आपल्या तोंडात वाढतात आणि नंतर आपल्याला ते आजारी पाडतात.
आपल्या तोंडाचे आरोग्य सुद्धा त्यामुळे फार महत्वाचे आहे. आपले दात आपण दिवसातून किमान दोनवेळा घासणे आवश्यक आहे.
ह्यामुळे तोंडात असणारे बॅक्टेरिया प्रमाणापेक्षा जास्त वाढत नाहीत आणि आपले आरोग्य चांगले राहते.
दीर्घकालीन तोंडाचे वाईट आरोग्य आपल्याला अर्धांग, हृदयविकार ह्यासारख्या रोगांचा तावडीत देते. त्यामुळे तोंडाचे आरोग्य राखणे महत्वाचे आहे.
रोज दिवसातून दोन वेळा लिस्टरीन किंवा हळद, मीठ घालून उकळलेल्या पाण्याच्या गुळण्या करणं हा आपल्या सवयीचा भाग करून घ्या!
कारण सध्या कोरोनाशी आणि इथून पुढे अशा येऊन धडकणाऱ्या प्रत्येक आजाराशी लढण्यासाठी आपल्याला सज्ज राहावं लागणार आहे.
७) तुमच्या कुटुंबात कुणी सतत आजारी पडते का?
अनेकवेळा असे दिसून आले आहे की रक्तातील पांढऱ्या पेशी, ज्या कोणत्याही रोगाचा सामना करतात त्यांची संख्या जर कमी असेल तर तो माणूस सतत आजारी पडतो.
ह्याउलट जर पांढऱ्या पेशींची संख्या योग्य प्रमाणात असेल तर तो माणूस रोगांचा सामना जास्त नेटाने करू शकतो.
काहीवेळा ही रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या अनुवांशिक असते त्यामुळे काही कुटुंबे ही सतत आजारी पडतात तर काही फार कमी आजारी पडतात.
८) तुम्हाला ताण आहे का ?
आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण-तणाव नसलेला माणूस मिळणे जवळपास अशक्य आहे.
पण जर आपल्याला अतिरिक्त ताण असेल तर त्यामुळे आपल्या शरीराची खूप हानी होते.
ताण जास्त असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, आपल्या शरीराची झालेली झीज भरून यायला जास्त वेळ लागतो.
ह्यामुळे आपण सतत आजारी पडू शकतो. ताण कमी करण्यासाठी काहीवेळ आपले काम, आपला फोन ह्यापासून लांब राहून आपल्या आवडीचे काम करणे गरजेचे असते.
गाणी ऐकणे, व्यायाम करणे, चालणे, एखादा छंद जोपासणे ह्या सगळ्यामुळे आपल्यावर असलेला ताण कमी होतो.
जर आपण सतत आजारी पडत असू तर वर दिलेले प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवेत ज्यामुळे आपल्या सतत आजारी पडण्याचे कारण आपल्यालाच सापडेल.
ह्यापैकी जे काही कारण आपल्याला सापडेल ते दूर करून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करणारे लेख मनाचेTalks वर तुम्हाला वाचायला मिळतीलच…
मात्र ह्या कशातूनही आपल्याला आपल्या आजारपणाचे कारण सापडले नाही तर मात्र आपण डॉक्टर कडे जाणे फार गरजेचे असते. अशावेळी योग्य तपासणी करून आपण आपल्या आजारपणाचे कारण शोधून काढू शकतो आणि त्यावर उपाय करून निरोगी आयुष्य जगू शकतो.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.