तुमच्यातला आत्मविश्वासच ठरवतो की तुम्ही करारी, कर्तबगार म्हणून ओळखले जाता की नुसतंच गर्दीचा भाग म्हणून जगता. या लेखात आत्मविश्वास कमी असलेल्या लोकांच्या वागण्यातल्या काही साध्या सवयींबद्दल बोलू. पुढे कधीतरी आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्यात काय बदल करायचे याबद्दल.
दृढनिश्चय, इच्छाशक्ती, कॉन्फिडन्स म्हणजे नक्की काय आहे? आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं म्हणजे कॉन्फिडन्स? की एखाद्या बरोबर हँड शेक करताना न संकोचता तितक्याच रुबाबात हात हातात घेणं….. म्हणजे कॉन्फिडन्स?
की आपण घातलेले कपडे आपलं राहणीमान आपलं असणं दिसणं हे जसं आहे तसं स्वतःला स्वीकारून कॅरी करता येणं, म्हणजे कॉन्फिडन्स…
आपल्या असण्यावर, दिसण्यावर, जगण्यावर सर्वात मोठा प्रभाव जर कशाचा पडत असेल तर तो आपल्यात असलेल्या आत्मविश्वासाचा.
हा आत्मविश्वासच ठरवतो की तुम्ही करारी, कर्तबगार म्हणून ओळखले जाता की नुसतंच गर्दीचा भाग म्हणून जगता.
अपयशाला आणि प्रतिकुलतेला सकारात्मकतेने सामोरं जाण्यासाठी अंगी आत्मविश्वास असणं गरजेचं असतं. आणि आत्मविश्वास खच्चून भरलेला असणं हे यशस्वी असण्याचं खरं गमक आहे.
आता तुमच्या मनात प्रश्न हा पण येईल की दृढनिश्चयी असणं हे जन्मजात असतं की आपल्यातली आत्मविश्वासू असण्याची प्रवृत्ती ही प्रयत्नातून वाढवता येते? आत्मविश्वास वाढवण्यासाठी मुळात आपण आत्मविश्वासाने वागतो की नाही हे आपण स्वतः ओळखणं गरजेचं आहे.
आपल्यात आत्मविश्वास आहे की नाही हे आपण स्वतः कशावरून ओळखायचं, आत्मविश्वास कमी असलेल्या लोकांच्या रोजच्या जीवनातल्या चार अगदी साध्या सवयींबद्दल आपण या लेखात बोलू.
आत्मविश्वासाची कमतरता असलेल्या लोकांच्या चार सवयी
१) हे लोक कॉम्प्लिमेंटला (दाद) हँडल करू शकत नाहीत:
हा अनुभव तुम्ही घेतलाय का कधी? दुसऱ्याच्या बाबतीत म्हणा किंवा अगदी स्वतःच्या बाबतीत.
एकदा संध्याकाळच्या वेळी फिरायला निघालं असताना बाजूच्या बिल्डिंग मधल्या एक थोड्याफार ओळखीच्या बाई दिसल्या. त्यांनी एक सुंदर लाल रंगाची साडी नेसली होती. आणि मी त्यांना म्हंटल की ही साडी तुमच्यावर छान शोभून दिसतेय?
तेव्हा त्या काहीशा संकोचून म्हणता की, ‘काही नाही गं, जुनीच साडी आहे. दिसली म्हणून घातली. एवढी काही भारी नाहीये’
आता आशा वेळी साडी खरंच जुनी असली तरी, ती दिसते सुंदर! ही आपल्याला मिळालेली दाद तेवढ्याच चार्मने स्वीकारता येणं पण खूप महत्त्वाचं आहे.
तर आता स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा अशा वेळी तुम्ही काय करता? असं कोणी कॉम्प्लिमेंट दिलं तर थँक यु म्हणता? स्मितहास्य देता? की संकोचून जाता? हे आठवून बघा.
हि एक सवय तर अशी आहे कि जी अगदी लक्षात आली तरी तुम्हाला ती जाणीवपूर्वक बदलता येईलच.
२) हे लोक आपल्यात एखादी कमतरता असेल तर झाकण्याचा प्रयत्न करतात.
प्रत्येकाला कधी ना कधी काही अडचणींचा सामना करावाच लागतो. कुठे तरी काही कमतरता प्रत्येकामध्ये असतेच.
ती दिलदारपणे, तोच स्वीकारू शकतो ज्याच्यात पुरेसा आत्मविश्वास आहे.
उदाहरणार्थ, एखादा माणूस तुम्हाला भेटतो. आणि त्याच्या एकंदरीत वागण्यातून तो काहीतरी अडचणीत असल्याचं तुम्ही नोटीस करता. आणि आस्थेने चौकशी करता की ‘काही अडचण आहे का जरा नर्व्हस दिसतोस’ तेव्हा ती व्यक्ती आपली अडचण लपवण्याचा काहीसा केविलवाणा प्रयत्न करते. आणि म्हणते, ‘नाही मला कसली आली अडचण मी अगदी ओके आहे’
अशा वेळी हो थोडी अडचण आहे. पण ठीक ये त्यातून सुद्धा लवकरच सोल्युशन काढता येईल, हा अप्रोच असतो कॉन्फिडन्ट माणसाचा.
याउलट कमी आत्मविश्वास असलेले लोक हे स्वतःमधील कमतरता झाकण्याचे केविलवाणे प्रयत्न करतात.
३) बॉडिलँग्वेज
तुमची बॉडिलँग्वेज ही तुमच्यातल्या आत्मविश्वासाचा आरसा असते. ग्रुपमध्ये बसलेलं असताना उगाचंच दाताने नखं चावणं, अडखळत बोलणं, हातापायांची सारखी काहीतरी असंबद्ध हालचाल चालू ठेवणं ही बॉडिलँग्वेज जर तुमच्यात असेल तर वेळीच त्यावर लक्ष देऊन ती सुधारण्यासाठी प्रयत्न करा.
४) नकारात्मकता
आत्मविश्वासाची कमतरता असलेले लोक हे आपली स्वतःची क्षमता काहीही नसल्याचा समज बाळगून असतात.
रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा सांगीतलं, तर नाही हे माझ्याच्याने होणारच नाही मी खूप प्रयत्न करून पाहिले हे काही मला जमतच नाही.
याउलट आत्मविश्वास असलेले लोक हे मला कुठलीही गोष्ट अशक्य नाही यावर ठाम असतात. ती गोष्ट एकदा होत नसेल दुसऱ्यांदा होत नसेल तरीही अशक्यप्राय आहे असं म्हणणं त्यांना माहीतच नसतं.
या सगळ्या पाहायला गेलं तर खूप छोट्या छोट्या सवयी आहेत. पण याच सवयी आपल्या जीवनावर, व्यक्तिमत्त्वावर खोल प्रभाव टाकतात.
स्वतःच निरीक्षण करून या सवयी आपल्यात आहेत का हे एकदा तपास. आपण जेव्हा स्वतःला ओळखतो, नक्की प्रॉब्लेम काय आहे हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा त्यावर उपाय करायला आपण तयार होतो.
तर या लेखात आत्मविश्वास कमी असलेल्या लोकांच्या वागण्यातल्या काही साध्या सवयी आपण पहिल्या. पुढे कधीतरी आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्यात काय बदल करायचे याबद्दल आपण बोलू.
तूर्तास धन्यवाद….
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक कराmarathi
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.