आपल्या शरीराचे योग्य पोषण होण्यासाठी निरनिराळ्या पोषक घटकांची आवश्यकता असते हे तर आपल्याला माहीत आहेच. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे निरनिराळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स.
वेगवेगळी व्हिटॅमिन्स ए, बी, सी… अशा अद्याक्षरांनी ओळखली जातात आणि त्यांचे सर्वांचेच आपल्या आहारात खूप महत्व असते.
असेच एक महत्वाचे व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन ‘ई’.
व्हिटॅमिन ‘ई’ मध्ये प्रामुख्याने अँटी ऑक्सिडंट्स असतात.
शरीराला भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स मिळाले की शरीराचे चयापचय नीट होते, स्नायूंचे रक्षण होते आणि अनेक आजार होण्यापासून सुटका होते.
अँटी ऑक्सिडंट्स मध्ये फ्री रॅडिकल्स असतात जे शरीराला कोणताही संसर्ग होण्यापासून वाचवतात त्यामुळे आपण आजारी पडण्याची शक्यता कमी होते.
आहारातील व्हिटॅमिन ‘ई’ च्या कमतरतेमुळे संसर्गजन्य आजारांची भीती तर असतेच पण त्याशिवाय धूसर दिसणे, डोळ्यांचे आरोग्य बिघडणे, स्नायू कमकुवत होणे असे आजार देखील होऊ शकतात.
व्हिटॅमिन ‘ई’ ची कमतरता असेल तर खालील आजार दिसून येतात
१. अन्नपचन नीट न होणे
२. ऍनिमिया
३. डोळ्यांचे आणि डोळ्यांच्या पडद्याचे आजार
४. अतिरिक्त रक्तस्राव
५. थकवा
शरीरातील ‘ई’ व्हिटॅमिन्सची कमतरता कशी भरून काढावी?
कोणत्याही व्हिटॅमिनच्या कमतरतेसाठी थेट औषधे, गोळ्या घेण्याची गरज नसते. आपण आपल्या आहारातून देखील असे व्हिटॅमिन्स मिळवू शकतो.
शरीरात व्हिटॅमिन ‘ई’ ची कमतरता असेल तर खालील पदार्थांचे नियमित सेवन करून आपण ती भरून काढू शकतो.
१. सूर्यफुलाच्या बिया
सूर्यफुलाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. १०० ग्रा. बियांमध्ये ३७.१७ मि. ग्रा. इतके व्हिटॅमिन ई असते.त्याशिवाय सूर्यफुलाच्या बियांमध्ये फायबर आणि इतर पौष्टिक तत्वेदेखील असतात. सूर्यफुलाच्या बिया भाजून किंवा नुसत्या खाता येतात, तसेच कोणत्याही पदार्थमध्ये मिसळून देखील त्यांचे सेवन करता येते. दही मिसळून किंवा ओट्स बरोबर सूर्यफुलाच्या बिया खाता येतात, तसेच सॅलडमध्ये मिसळून देखील त्यांचा वापर करता येतो.
२. बदाम
बदाम हा देखील व्हिटॅमिन ई चा प्रमुख स्रोत आहे. १०० ग्रा. बदामामध्ये २५.६३ मि. ग्रा. इतके व्हिटॅमिन ई असते. बदाम नुसते किंवा भिजवून तर खाता येतातच शिवाय दुधात मिसळून देखील त्यांचे सेवन करता येते. बदाम अतिशय पौष्टिक असून त्यांच्या नियमित सेवनाने प्रतिकारशक्ती वाढण्याबरोबरच प्रखर बुद्धिमत्ता येणे, स्मरणशक्ती सुधारणे हे फायदे देखील दिसून येतात.
३. ऍव्हाकॅडो
ऍव्हाकॅडो हे एक असे फळ आहे ज्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई तर असतेच शिवाय व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम देखील असते. तसेच ऍव्हाकॅडोमध्ये साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते. हे फळ नुसतेच किंवा सॅलडमध्ये मिक्स करून खाता येते आणि अतिशय गुणकारी असते.
४. पालक
सगळ्याच हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. पालकामध्ये देखील व्हिटॅमिन ई बरोबरच व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, तसेच फायबर आणि पोटॅशियम देखील मोठ्या प्रमाणात असते. पालक निरनिराळ्या प्रकारे खाता येतो. आपल्या भारतीय भोजनात पालकाची भाजी नियमितपणे केली जाते. त्याचप्रमाणे पालकाचे सूप देखील करता येते.
व्हिटॅमिन ‘ई’ चे आणखी स्रोत
वरील पदार्थांव्यतिरिक्त आणखीही पदार्थ आहेत ज्यामध्ये व्हिटॅमिन ई असते. त्यात प्रामुख्याने सुकामेवा, शेंगदाणे, अक्रोड ह्यांचा समावेश होतो. तसेच शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल ह्यामध्ये देखील व्हिटॅमिन ई असते. तसेच ब्रोकोली सारख्या हिरव्या भाज्यांमध्ये देखील व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते.
शरीरातील व्हिटॅमिन ई ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वरील सर्व पदार्थांचा आवर्जून समावेश करावा. त्यामुळे विनाकारण व्हिटॅमिन्स सप्लिमेंट्स न घेता आहारातून आपण ती कमतरता भरून काढू शकू.
ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.