१५ जुलै २०१९ ला ‘चान्द्रयान २’ च्या उड्डाणाची उलट गिणती सुरु असताना अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे निर्णय घेण्याची पाळी इसरो डायरेक्टर ‘के. सिवन’ ह्यांच्या खांद्यावर आली. देशाचे राष्ट्रपती हे उड्डाण बघण्यासाठी आपल्या कुटुंबासह श्रीहरीकोट्टामध्ये उपस्थित होते. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेणं हे भावनिक दृष्टीने कच खाण्यासारखं होतं पण त्याचवेळेस उड्डाणाचे घड्याळ सुरु ठेवणं तंत्रज्ञानाच्या दृष्टीतून योग्य नव्हतं.
जागतिक मिडिया, भारतीय मिडिया, पंतप्रधान, राष्ट्रपती हे सगळेच जातीने पूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे मनाचा कौल घ्यायचा की तंत्रज्ञानाचा असा मोठा प्रश्न के. सिवन ह्यांच्यापुढे होता. कारण दोन्ही बाजूने येणाऱ्या परिणामांची जबाबदारी पूर्णतः त्यांच्या अंगावर होती. इसरो च्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच पहिल्याच मोहिमेत दोन दशकानंतर (२४ वर्षांनी) इसरो ला हिट शिल्ड विलग न झाल्याने पी.एस.एल.व्ही च्या अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. ह्या अपयशाची पूर्ण जबाबदारी के. सिवन ह्यांनी स्वीकारली होती. कुठेतरी मनावर दगड ठेवून इसरो डायरेक्टर के.सिवन ह्यांनी उड्डाण रद्द केल्याचं घोषित केलं. राष्ट्रपतींना ह्या गोष्टीची कल्पना देताना आलेल्या दडपणाची, अपयशाची टोचणी कुठेतरी त्यांच्या मनात सलत होती.
मनापेक्षा तंत्रज्ञान महत्त्वाचं होतं. जोवर १००% खात्री होत नाही तोवर १००० कोटी रुपयांची मोहीम पुढे नेणं परवडणार नव्हतं. उड्डाण तर रद्द झालं पण आता संकटांचा डोंगर पुढे उभा होता. पूर्ण रात्रभर के.सिवन ह्यांच्यासह इसरो चे सर्व वैज्ञानिक, संशोधक नक्की काय चुकलं ह्याची उजळणी करत होते. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती सकाळची न्याहारी आटपून पुन्हा दिल्लीकडे निघण्याअगोदर इसरो ने नक्की काय चुकलं ह्याचा शोध घेतला होता.
तर पुढल्या ४८ तासात ती चूक सुधारून रॉकेट पुन्हा उड्डाणासाठी सज्ज झालं होतं. इतक्या कमी वेळात रॉकेट तंत्रज्ञाना सारख्या किचकट तंत्रज्ञानात चूक शोधून त्यावर योग्य तो उपाय केला गेला ह्यासाठी खुद्द पंतप्रधानांनी इसरो चं कौतुक केलं. २२ जुलै ला उड्डाण करून अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी उड्डाण साध्य करणाऱ्या इसरोवर आनंदाचा वर्षाव झाला. ह्या सगळ्या प्रसंगात अपयशाची जबाबदारी स्वतःवर तर यशाचं श्रेय सर्वाना देणार नावं म्हणजेच इसरो डायरेक्टर के.सिवन.
इसरो चा ‘रॉकेट मॅन’ ते ‘फ्रुगल इंजिनिअरिंग चॅम्पियन’ म्हणून ज्यांना गौरवलं जाते त्या ‘के.सिवन’ ह्यांचा प्रवास सगळ्यांसाठी आदर्शवत असाच आहे. अतिशय सध्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या ‘के.सिवन’ ह्यांचं शिक्षण सरकारी शाळेत झालं. कोणत्याही क्लास आणि कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय त्यांनी घरात वीज नसताना दिव्याखाली अभ्यास केला. आपल्या पूर्ण घरात पदवीपर्यंत शिक्षण घेणारे के.सिवन पहिलेच होते.
शेतीच्या कामात मदत व्हावी म्हणून त्यांच्या वडिलांनी घराजवळच्या कॉलेजमध्ये त्यांचा प्रवेश घेतला होता. १९८२ साली त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर इसरो मध्ये प्रवेश केला. त्यांची नियुक्ती पी.एस.एल.व्ही.रॉकेट च्या प्रोजेक्टमध्ये झाली होती. ह्या रॉकेट च्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. आज हेच रॉकेट जगातील सगळ्यात यशस्वी रॉकेट आणि इसरो चा वर्कहॉर्स म्हणून ओळखलं जाते. एकाच रॉकेट मधून १०४ उपग्रह नेण्याच्या जागतिक विक्रमात हे सगळे उपग्रह रॉकेटमध्ये बसवण्याची यंत्रणा आणि एकमेकांना टक्कर न देता अवकाशात विलग करण्याची यंत्रणा ही ‘के.सिवन’ ह्यांनी बनवलेली होती. ह्याच साठी त्यांना इसरो मध्ये ‘रॉकेट मॅन’ ते ‘फ्रुगल इंजिनिअरिंग चॅम्पियन’ म्हणून ओळखले जाते.
जगाच्या पटलावर इसरोचा दबदबा वाढवण्यात कारणीभूत असलेल्या भारताच्या ‘मॉम मिशन’ मध्येही त्यांचा सहभाग लक्षणीय होता. इसरो च्या सगळ्याच रॉकेट तंत्रज्ञानावर त्यांनी काम केलं आहे. क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान नाकारल्यावर आणि २०१० साली इसरो ला आलेल्या अपयशानंतर इसरो च्या ‘नॉटी बॉय” म्हणजेच जी.एस.एल.व्ही. रॉकेटला आज भारताचं ‘बाहुबली’ रॉकेट बनवण्यामागे के.सिवन ह्यांची भूमिका मोठी पण त्याचवेळेस पडद्यामागची राहिली आहे.
जिद्द, मेहनत आणि स्वतःवर असलेला विश्वास अडचणीच्या काळात पण टिकवून ठेवताना आपल्या कर्तृत्वाची छाप त्यांनी इसरो च्या प्रवासात सोडलेली आहे. त्यामुळेच एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा ते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष हा सर्वच प्रवास थक्क करणारा आहे. २२ जुलैला चंद्रयान-२ ने यशस्वी उड्डाण केल्यावर रात्रंदिवस काम करून हे उड्डाण यशस्वी करणाऱ्या सर्वांचेच आभार मानताना आत्ता सुरवात झालेली आहे अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे नमूद केलं. जेव्हा चंद्रावर लॅन्डर उतरेल आणि रोव्हर च्या चाकांवर असलेली अक्षरं चंद्राच्या मातीत उमटतील तेव्हा के.सिवन ह्यांच्या शिरपेचात एक मनाचा तुरा खोवलेला असेल. साधं राहून असाधारण काम करणाऱ्या के.सिवन ह्यांच्या मुळेच आज भारताचं आणि इसरोचं नाव जागतिक पटलावर आदराने घेतलं जातं. त्यांच्या ह्या कार्यास माझा सलाम!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.