आज खूप दिवसांनी घर भरलं आपलं…. लगबगीत गेला पूर्ण दिवस आणि संध्याकाळची आवराआवर, आत्ता कुठे बोलायला वेळ होतोय.
“हं…. त्याचं असं झालं…..” हे म्हणायची तुझीच ना गं सवय?
आपल्या लग्नानंतर काहीच दिवसांनी एकदा तुला संध्याकाळी मी यायच्या वेळेला काहीतरी कारण काढून खोलीत थांब म्हणून सांगून गेलो होतो. खूप गोड लाजली होतीस तू. काहीच न बोलता निघून गेली होतीस.
दिवसभर तुझं ते लाजणं स्मरणात होतं, त्याच ओढीने बकुळीचा गजरा घेऊन परतलो. नेहमी मी यायच्या वेळेला बरोबर तू अंगणात असायचीस, कधी अंगण झाडत, कधी आमटीसाठी कढीपत्ता खुडत, कधी अशीच रेंगाळत आणि कधी उशीरच झाला तर तुळशीपाशी दिवा लावत.
फाटकाचा आवाज झाला की कशी कोण जाणे पण मला बघायच्या आतच तुला माझी चाहूल लागत असे आणि मग तू पटकन स्वयंपाकघरात जाऊन पाण्याचा तांब्या घेऊन येई. मी विहिरीवर पाय धुवत असायचो, तेवढ्यात तांब्या घेऊन झोपाळ्याशी उभी राहायचीस, रोज…..
मी मग जास्तच वेळ लावायचो पाय धुवायला. तू थकून मग हळूच झोपाळ्याच्या एका कडेला बसायचीस. मात्र मी शेजारी येऊन बसलो की लागलीच उठायचीस. पण ही तुझी सगळी खुटखुट ते दोन क्षण माझ्या शेजारी बसण्यासाठी असायची हे काय मला कळत नव्हतं ग?
सगळं माहित होतं, अग म्हणून तर कधी तू कामात अडकून असायचीस, अंगणात थांबायला जमायचं नाही तेंव्हा मी फाटकाचा आवाज जरा जास्त करायचो किंवा मोठ्याने दामूला हाक मारायचो. तुझ्या दामोदर भाऊजींचं निमित्त करीत मग तू लगबगीने यायचीस ती हात पदराला पुसतच, मग विहिरीवर माझ्या शेजारी उभी राहून तू ही हात धुवायचीस.
पण त्या दिवशी बकुळीचा गजरा घेऊन आलो आणि तू दिसली नाहीस. फाटकाचा जोरात आवाज केला तरी तू बाहेर आली नाहीस. मला वाटलं माझी वाट बघत आपल्या खोलीत थांबली असशील. कोटाच्या खिशात गजरा लपवून मी सरळ आत गेलो.
इतके दिवस सगळं शब्दांविण चालू होतं, आज पहिल्यांदा तुझ्याकडे काहीतरी मागितलं होतं. पण खोलीत तू नव्हतीस. काय सांगू, जरा नाराज झालो होतो मी. नाईलाजाने गजरा काढून मेजावर ठेवला, थोडं इकडे तिकडे केलं, तोवर तू आलीस.
वळून तुझ्याकडे पाहिलं तर साडी ओली दिसली तुझी. जरासा नाराजच होतो. तू हळूच जवळ येऊन, गजरा उचलून माझ्या हातात देऊन, माझ्याकडे पाठ करीत म्हटलीस, “त्याचं असं झालं, दिवेलागणीच्या आधीच मी येणार होते पण सासूबाईंनी नेमकं फराळाचं काढलं.”
माझी नाराजी काही जात नव्हती आणि तू मात्र माझ्याकडे पाठ करून मी तुझ्या वेणीत गजरा माळायची वाट बघत उभी होतीस. माझी काहीच हालचाल झाली नाही, म्हणून मागे वळून पाहिलंस. माझा खिन्न चेहरा पाहून तुझा ही चेहरा पडला.
“झाला वाटतं फराळ करून?” माझं तिरकस बोलणं पण पहिल्यांदाच ऐकत होतीस तू तेंव्हा.
“नाही.”
“मग कसं येणं झालं?”
“त्याचं असं झालं, साडीवर पाणी सांडायचं निमित्त करावं लागलं.”
राग तर क्षणात विरघळलाच ग माझा पण तुझ्या गोड, निरागस चेहऱ्यामागे किती उचापती दडल्या आहेत हे रोज नव्याने कळत होतं मला.
हळूच मग नाजूक हाताने तुझ्या लांबसडक वेणीत गजरा माळला होता. काहीच न बोलता, तशीच लगबगीने अगदी पळतच गेली होतीस स्वयंकपाकघरात तू, साडी न बदलताच.
नंतर मग कितीतरी वर्षे गेली. माझं घरी येणं आणि तुझं अंगणात असणं नित्याचंच होऊन बसलं, कारणं मात्र वेगवेगळी…..
बाळाला जोजवायचं निमित्त करायचीस सुरुवातीला, मग रांगायला लागल्यावरही नेमकं संध्याकाळीच ते अंगणात येत असे, त्याच्या मागे मागे तू, माझं आपलं तेच फाटक उघडून आत येणं, झोपाळ्यावर बसणं.
तुला पाणी आणायला आताशा उशीर होत असे पण मी आलोय बघून रांगत्या बाळाची काळजी सोडून जायचीस तांब्या आणायला.
आता दोन क्षण ही माझ्या शेजारी बसायला वेळ व्हायचा नाही पण तांब्या हातात देऊन तिथेच रेंगाळत बसायचीस तेंव्हा सगळ्या दिवसाचा शीण लगेच विरायचा तुझ्या चेहऱ्यावरचा.
हा आपला वेळ असायचा. चार घटका फक्त आपण तिघे असं जगून घ्यायचीस तू आणि परत पदर खोचून रात्रीच्या स्वयंपाकाला जायचीस.
नंतर मग चिंतामणी शाळेतून यायची वेळ आणि माझी यायची वेळ एकंच झाली. हळूहळू घरात कोणी थोरलं राहिलं नाही, चिंतामणी शिकायला तालुक्याला गेला तो तिथेच नोकरीला लागला पण घरात दामोदर आणि वत्सला.
धाकट्यांसमोर ही कधी आली नाहीस हक्काने बसायला शेजारी. तेंव्हा वेगळी कारणं, तांदूळ निवडायला म्हणे तुला बाहेर बसावं लागायचं, स्वयंपाकघरात दिसायचं नाही.
वय सरत होतं तरी तुझ्यातली लहान मुलगी हरवली नव्हती, काहीतरी कारण काढून माझ्या अवतीभोवती घुटमळत राहायचीस वेंधळ्यासारखी.
बघ हे असं होतंय…..
त्याचं असं झालं मला फक्त सांगायचं होतं की जाताना ही युक्त्या लढवून गेलीस ना? आज संध्याकाळी तुझ्या सामानाची आवराआवर करत होतो, जुन्या विरलेल्या एका साडीतून बकुळीचा सुकलेला गजरा सापडला.
खूप दिवसांनी ऐन दिवेलागणीला रितं घर भरलं आपलं.
याही कथा तुम्हाला खूप आवडतील ….
भेटली ती पुन्हा……
प्रेम
कौल
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
अनुबंध –गोड मनाचा हळुवार स्पर्श ..!!
Chan katha