भारतात जवळपास २.६ मिलियन दिव्यांग लोक आहेत. भारताच्या एकूण लोकसंखेच्या जवळपास २.२१% टक्के लोक दिव्यांग असताना त्यांना मिळणाऱ्या सुविधा मात्र त्या मानाने खूप अपुऱ्या आहेत. इतकंच काय तर ‘Rights of Persons with Disabilities Bill – 2016′ हा कायदा व्हायला २०१६ साल उजाडावं लागलं. पण कायदे करून प्रश्न सुटले असते किंवा समाजाची मानसिकता बदलली असती तर भारत कधीच एक प्रगल्भ देश म्हणून जगाच्या पटलावर उठून दिसला असता. आजही समाजाचा दिव्यांग व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. अशाच दृष्टीकोनाला सामोरी जात आपल्या अपंगत्वाला आपलं हत्यार बनवत आपण ही एक सामान्य माणूस म्हणून जगण्याचा हक्क तर मिळवूच शकतो आणि त्या पलीकडे जाऊन समाजासाठी एक भरीव कार्य करू शकतो. असा आदर्श निर्माण करणारी एक तरुणी महाराष्ट्राच्या विद्येच्या माहेरघरात म्हणजेच पुण्यात असं कार्य करते ज्याची दखल जागतिक पातळीवर घेतली जाते. युनायटेड नेशनशी संलग्न असलेल्या कार्यक्रमासाठी ग्लोबल युथ ऍम्बेसीडर म्हणून २०१६ ते २०२० साठी निवड झालेली ही तरुणी आहे Diksha Dinde दिक्षा दिंडे!
दिक्षाचा जन्म होताना पाठीच्या हाडाची योग्य वाढ न झाल्याने दिक्षाला जन्मापासून अपंग असल्याचा शिक्का बसला. व्यवसायाने काळी रिक्षा चालवणारे वडील आणि शिवणकाम करणारी आई अशी अगदी बेताची परिस्थिती असताना पण तिच्या आई- वडिलांनी सगळ्या समाजाकडून येणारे टक्के टोमणे आणि सहानभुतीच्या नजरांना झेलत दिक्षाला तिच्या पायावर उभं करण्यासाठी तिची साथ देण्याचा पण केला. लहानपणापासून बंडखोर आणि हट्टी असलेली दिक्षाला कळायला लागताच समाजाकडून एक अपंग म्हणून मिळणाऱ्या वेगळ्या वागणुकीचा सामना करावा लागला. पुण्यातल्या एका प्रतिष्ठित शाळेने प्रवेश नाकारण्यापासून ते अगदी घरातल्या माणसांनी अपंगांच्या वसतिगृहात ठेवण्यापर्यंत!
ह्या अनुभवांनी दिक्षाला अजून मजबूत केलं. जे मिळत नाही, ते मिळवायचा चंग तिने मनाशी बांधला. महानगरपालिकेच्या शाळेतून आपलं प्राथमिक शिक्षण घेतलं. हुजूरपागा कॉलेज मधून वाणिज्य शाखेची पदवी घेऊन ‘इतिहास’ ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण इग्नू मधून घेतलं. आपलं शिक्षण करत असताना समाजाच्या अगदी शेवटच्या साखळीत खूप काही करण्यासारखं आहे आणि आजही रस्त्यावरची मुलं आणि स्त्रिया ह्यांच्यासाठी बरंच काम आपण पुण्यात करू शकतो. क्षणाचाही विलंब न करता तिने आपल्या अपंगत्वाला आपलं हत्यार बनवत समाजातल्या शेवटच्या साखळीत बदल घडवण्यास सुरवात केली. “रोशनी” ह्या सामाजिक संस्थेत काम करण्यास सुरवात केली. तब्बल ५ वर्ष काम केल्यावर दिक्षा च्या कामाची दखल आंतराष्ट्रीय पातळीवर जगातील ८५ देशात काम करणाऱ्या कार्यक्रमासाठी घेतली गेली. ‘A World At School’ ह्या कार्यक्रमासाठी भारतातून निवड झालेली ती एकमेव मुलगी होती.
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी महाराष्ट्र सरकारने तिचा स्टेट युथ पुरस्कार देऊन तिने केलेल्या कार्याचा गौरव केला आहे. भारत सरकारनेही दिक्षाच्या कामाची दखल घेत तिला सोशल आर्किटेक्ट आणि नेहरू युवा केंद्राचा पुरस्कार दिला आहे. गेल्या डिसेंबर मध्ये तिला ‘Asia Pacific Future Leaders Conference on youth leadership at Kuala Lumpur, Malaysia’ येथे येण्यासाठी निमंत्रण मिळालं होतं. मुंबई ते मलेशिया हा प्रवास एकटीने करण्याचं दिक्षा ने ठरवलं. व्हीलचेअर वरून परदेशी जाण्याचा प्रवास आपली मुलगी करू शकणार नाही असं तिच्या आईला वाटलं पण दिक्षा आपल्या निर्णयावर ठाम राहिली. विमानतळावर अधिकाऱ्यांनी तिला अडवलं आणि एकटीने प्रवास करता येणार नाही असं सांगितलं. कायद्यात असलेल्या आपल्या अधिकारांची आणि एक भारतीय म्हणून अशा मोठ्या कार्यक्रमाला जाण्याची संधी किती मोठी आहे ह्याची जाणीव जेव्हा दिक्षाने त्यांना करून दिली तेव्हा विमानतळ अधिकाऱ्यांना तिला परदेशी दौरा एकटीने करण्याची अनुमती द्यावी लागली.
वयाच्या अवघ्या २५ वर्षात दिक्षा असं आयुष्य जगली आहे. जे जगायला अनेकांची कित्येक दशके जातात. इतकं सगळं करून तिच्या कार्याचा प्रवास थांबला नाही तर तो अजून वाढत आहे. सध्या ती यू.पी.एस.सी. ची तयारी करत असून गरीब मुलाचं शिक्षण ते स्त्री ला समाजात मिळणारी दुजा वागणूक ह्यावर ती जोमाने काम करत आहे. ‘Hope under the bridge’ ह्या आपल्या प्रोग्राम मधून ८८ रस्त्यावरच्या मुलांना शिकवण्याचं काम करत आहे. अनेक अंध विद्यार्थ्यांचे परीक्षेचे पेपर लिहण्याचं काम ही ती करत आहे. आपण जसं अपंगत्वाला आपलं हत्यार बनवत समाजाच्या विचारसरणीत बदल केला तसा समाजात दिव्यान्गांच्या प्रती असलेल्या मानसिकतेला बदलण्याचा तिचा मानस आहे.
दिक्षा च्या मते अपंगत्व मानलं तर आहे. आपल्याला एक आयुष्य मिळते मग ते रडत बसून काढायचं का जगायचं हे ठरवण्याचा निर्णय आपला आहे. आपल्यातली कोणतीही कमी मग ती शारीरिक असो वा मानसिक ते आपला जगण्याचा शेवट नाही. त्याला वेगळ्या पद्धतीने बघितलं आणि आपल्यात असलेल्या सुप्त गुणांना वाव दिला तर आयुष्यात पुढे जाण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. तिचे हे शब्द अनेकांना प्रेरणादायी ठरतील ह्याची माझ्या मनात शंकाच नाही. वयाच्या अवघ्या पंचविशीत आयुष्य उमगलेल्या दिक्षा ला माझा सलाम आणि पुढच्या प्रवासासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.