मानसी हरली नाही ती आपलं स्वप्न जगली. दुःख्खात रडत बसायचं कि ह्याच वळणाला आपल्या स्वप्नांच मुर्त स्वरूप द्यायचं हे आपलं आपणच ठरवायचं असतं.
फुलाची आणि तिची मैत्री तशी जुनीच. वयाच्या ६ व्या वर्षी तिने हातात रॅकेट पकडली. रॅकेट च्या उंचीपेक्षा लहान असणाऱ्या तिला हे फुल आपलं आयुष्य बदलवुन टाकेल ह्याची पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती.
वडील भाभा अणुसंशोधन केंद्रात वैज्ञानिक. अणुशक्तीनगर मधल्या बॅडमिंटन कोर्टवर तिने पहिल्यांदा त्या फुलाशी मैत्री केली.
पहिल्यांदा एक आवड म्हणुन सुरु झालेला प्रवास आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल ह्याचा विचार न तिने कधी केला होता न तिच्या कुटुंबियांनी.
इलेक्ट्रॉनिक्स शाखेतुन अभियांत्रिकीची पदवी घेतल्यावर तिने सॉफ्टवेअर च्या क्षेत्रात प्रवेश केला. एटॉस सारख्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील नामांकित कंपनी मधुन आपलं सर्व सामान्य आयुष्य जगत असताना अचानक आयुष्याच्या प्रवासात एक काळंकुट्ट वळण आलं.
२ डिसेंबर २०११ ला ऑफिस ला जाताना तिच्या स्कुटर ला एका वेगाने येणाऱ्या ट्रक ने धडक दिली. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागला नाही.
हॉस्पिटल मध्ये नेईपर्यंत पायातुन खूप रक्तस्त्राव झाला होता. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण मानसी चा पाय वाचवू शकले नाहीत.
मानसी ला वाचवण्यासाठी तिचा एक पाय शरीरापासुन वेगळा करावा लागला. जवळपास ४५ दिवस हॉस्पिटल मध्ये घालवल्या नंतर मानसीची हॉस्पिटल मधुन सुटका झाली पण आयुष्य बदललेलं होतं.
आयुष्याचे सगळे संदर्भ आता मानसी साठी बदलून गेले होते. पण ती हार मानणारी नव्हती. जखम भरल्यावर तिला कृत्रिम पाय बसवण्यात आला.
आपलं शरीर बदल लगेच स्वीकारत नाही. त्यामुळे ह्या बदलांना स्वीकारणं मानसी आणि तिचं शरीर दोघांनाही जड गेलं. पण हे बदल स्विकारण्याशिवाय कोणताच पर्याय तिच्यासमोर नव्हता.
एक पाय जरी तिने गमावला तरी ती मनातुन हरली नव्हती. नवीन पाय बसवून ८ महिने उलटुन गेल्यावर तिने आधाराशिवाय चालायला आणि आपलं फुलाशी असलेलं नातं खुलवायला सुरवात केली.
आपण पुन्हा बॅडमिंटन खेळु शकु असा आत्मविश्वास तिला मिळाला तो २०१२ साली. एटॉस मधल्या अंतर्गत स्पर्धेत ती सहभागी झाली.
एका पायाची कमी आपल्याला फुलराणी बनण्यापासून रोखू शकत नाही हे तिला उमगलं. त्या स्पर्धेत तिने आपल्या खेळाची छाप पाडली.
अगदी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते आपले सहकारी सगळ्यांनी तिला प्रोत्साहन दिलं. हा क्षण तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
ह्या नंतर तिने मागे वळुन बघितलं नाही. सुरु झाला एक नवीन खडतर प्रवास जिद्द, मेहनत ह्याच्या जोडीला रोज व्यायाम, सरावं करत आपलं बॅडमिंटन मधील कसब तिने अधिक उंचीवर नेलं.
अनेक स्पर्धांमधुन भाग घेताना एका बॅडमिंटन खेळाडूने तिला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची सूचना केली.
स्वतःला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार करताना तिने हैद्राबाद च्या प्रतिष्ठित अश्या पुलेला गोपीचंद बॅडमिंटन एकेडमी मध्ये प्रवेश घेतला.
मानसी जोशी ने डिसेंबर २०१४ ला पहिलं राष्ट्रीय रौप्य पदक मिळवलं. ह्या स्पर्धेत ती अर्जुन पुरस्कार विजेती पारुल परमार सोबत खेळली होती.
सप्टेंबर २०१५ मध्ये इंग्लंडला झालेल्या मिक्स डबल वर्ल्ड बॅडमिंटन स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकावलं. २०१८ साली तिने इंडोनेशियाला झालेल्या बॅडमिंटनच्या एशियन पॅरा गेम्स मध्ये कांस्य पदकाची कमाई केली.
ह्या यशाने हुरळून न जाता फुलराणी मानसी जोशी ने आपल्या खेळात सतत सुधारणा केल्या. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर,
This sport is really close to me. It has made me what I am today. I will love to give it more time and push myself to the next level. My goal is to be world number one.
हे स्वप्न तिने नुसतं बघितलं नाही तर ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आठवड्यात रोज दोन तास तर आठवड्याच्या शेवटी रोज चार तास सराव, योगा ह्या सगळ्यांसोबत आपलं करियर ही तिने पुढे चालू ठेवलं.
नुकत्याच झालेल्या पॅरा बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत तिने सुवर्ण पदकाची कमाई केली. आपल्या स्वप्नाला मुर्त स्वरूप देताना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
आपल्या अपंगत्वाला आपली अडचण न बनवता भारताच्या ह्या फुलराणीने सगळ्याच भारतीयांपुढे आपला आदर्श ठेवला आहे. तिचं कौतुक करताना पंतप्रधानांनी ट्विट केलं होतं.
130 crore Indians are extremely proud of the Indian Para-Badminton contingent, which has brought home 12 medals at BWF World Championship 2019.Congratulations to the entire team,whose success is extremely gladdening and motivating. Each of these players is remarkable!
फुलराणी मानसी जोशी चा हा पराक्रम अनेकांना प्रोत्साहन देणारा आहे. आयुष्यात कधी काय होईल हे कोणीच सांगु शकत नाही. आयुष्यातलं एखादं वळण काय वेळ आपल्यावर आणेल ह्याचा विचार पण आपण करू शकत नाही.
ह्या सगळ्यात आपण काय करायचं हा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य मात्र त्याने आपल्याला दिलं आहे. दुःख्खात रडत बसायचं कि ह्याच वळणाला आपल्या स्वप्नांच मुर्त स्वरूप द्यायचं हे आपलं आपणच ठरवायचं असतं.
फुलराणी मानसी जोशी हरली नाही ती आपलं स्वप्न जगली त्यामुळेच आज पॅरा बॅडमिंटन विश्वातली जगातील एक नामवंत खेळाडू बनली आहे. हे करताना आपल्यासोबत आपल्या देशाचं नावं ही तिने उज्ज्वल केलं आहे. तिच्या ह्या पराक्रमाला माझा कुर्निसात.
मनाचेTalks च्या वाचकांचे अभिप्राय:
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.