अटल पेन्शन योजना : दर महिन्याला केवळ रुपये २१०/- म्हणजे दिवसाला रु. ७/- गुंतवा आणि ५००० रुपये पेन्शन मिळवा. कसे ते जाणून घ्या या लेखात
बहुतेक सर्वजण आपल्या भविष्याची तरतूद तरुणपणीच करायला सुरुवात करतात. तसे करणे आवश्यकच असते. तरुणपणी, उमेदीच्या काळात आपण काम करत असतानाच आपण म्हातारे झालो की आपल्याला मिळू शकणाऱ्या रकमेकरता गुंतवणूक करायची असते. म्हातारपणी जेव्हा काही काम करणे शक्य नसते तेव्हा आधी गुंतवलेल्या रकमेवर मिळणारे पेन्शनच उपयोगी पडते.
भारत सरकारने अशीच एक खात्रीशीर पेन्शन योजना आणली आहे जीचे नाव आहे अटल पेन्शन योजना. ही योजना भारत सरकारच्या पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथोरिटीद्वारे चालवली जाते.
ह्या योजनेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत या योजनेत पैसे गुंतवलेल्या लोकांची एकूण संख्या ३.३० करोड इतकी आहे. चालू वर्षात आतापर्यंत जवळ जवळ २८ लाख लोकांनी या योजनेत पैसे गुंतवले आहेत. यावरूनच या योजनेची लोकप्रियता दिसून येते.
अटल पेन्शन योजनेच्या नियमानुसार १८ ते ४० वर्षे वयाची कोणतीही भारतीय व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकते. योजना सुरु केल्या पासून सदर व्यक्तीच्या वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत दर महिना गुंतवणूक करणे आवश्यक असते. त्यानंतर सदर व्यक्तीला साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर दर महिना पेन्शन मिळते.
दर महिना जितके पेन्शन मिळणे आवश्यक असेल त्या प्रमाणात योजनेचा प्रीमियम भरणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, पेन्शनची रक्कम रु. १०००/-, रु. २०००/- रु. ५०००/- अशी जितकी आवश्यक असेल त्या प्रमाणात प्रीमियमची रक्कम बदलेल.
कशी घेता येईल अटल पेन्शन योजना?
अटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी १८ ते ४० वर्षे वयाच्या भारतीय नागरिकाला त्याच्या घराजवळच्या बँकेत खाते उघडता येईल. त्यासाठी बँकेत एक फॉर्म भरून द्यावा लागतो. तसेच ऍड्रेस प्रूफ, वयाचा दाखला, ओळख पत्र आणि दोन साक्षीदार घेऊन जाणे आवश्यक असते. बँकेच्या वेबसाईटवरही याबद्दल माहिती मिळू शकेल.
अटल पेन्शन योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक केली जाईल तितक्या कमी रकमेच्या प्रीमियममध्ये जास्त पेन्शन मिळू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही जर १८ वर्षे वयाचे असताना अटल पेन्शन योजना सुरू केली तर ६० व्या वर्षानंतर रु. १०००/- मासिक पेन्शन मिळण्यासाठी तुम्हाला दरमहा केवळ रु. ४२/- इतका प्रीमियम भरावा लागेल.
याच पटीत रु. २००० /- मासिक पेन्शन मिळण्यासाठी रु. ८४/- , रु. ३०००/- मासिक पेन्शन मिळण्यासाठी रु. १२६/- , रु. ४०००/- मासिक पेन्शन मिळण्यासाठी रु. १६८/- तर रु.५०००/- मासिक पेन्शन मिळण्यासाठी केवळ रु. २१०/- का प्रीमियम भरावा लागेल. याचाच अर्थ दरमहा फक्त रु. २१०/- भरून वयाच्या साठीनंतर तुम्ही दरमहा रु. ५०००/- इतके पेन्शन मिळवू शकता.
अर्थातच इतक्या कमी प्रीमियम मध्ये एवढे पेन्शन मिळण्यासाठी योजना लवकरात लवकर सुरु करणे अतिशय आवश्यक आहे. जास्त वयाच्या व्यक्तींनी योजना सुरू केल्यास प्रीमियमची रक्कम वाढते.
ज्या प्रमाणात योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय असते त्या प्रमाणात प्रीमियमची रक्कम वाढताना दिसून येते. उदाहरणार्थ तीस वर्षे वयाच्या व्यक्तीला साठीनंतर दरमहा रु. ५०००/- पेन्शन हवे असेल तर प्रीमियमची रक्कम दरमहा रु. ५७७/- इतकी येते.
तर ही आहे अतिशय फायदेशीर अशा अटल पेन्शन योजनेची माहिती. भारत सरकारने प्रमाणित केलेली असल्यामुळे ही योजना खात्रीशीर आणि किफायतशीर आहे. वयाच्या साठीनंतर पेन्शन मिळून निश्चिंत राहण्यासाठी आजच या योजनेत गुंतवणूक करा.
जितकी लवकर गुंतवणूक कराल तितकी योजना फायदेशीर ठरते. या योजनेचा जरूर लाभ घ्या. तसेच ही माहिती आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना देण्यास विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
राजीव गांधी सरकारने NPS lite या नावाने ही स्कीम आणली होती त्यात ह्या पेक्षा जास्त फायदा होता