॥कोंड॥ (एक घुसमट)
वरच्या माडीवर आभाळ न्याहाळत रुख्माक्का ऊभ्या होत्या. आषाढ सरला तरी पावसाचे नामोनिशाण कुठे नव्हते. आभाळ तर काठोकाठ भरून होतं. रोजचा दिवस पावसाची वाट बघत उगवायचा आणि आभाळाचा डोंब बघत मावळायचा. सारी सृष्टी स्तब्ध होती, झाडं, पानफुलं, माती आणि मातीत रूजलेल्या माणसांना आता एकच ओढ होती कोंड फुटण्याची.