बॅंगलोर डायरीज… श्री श्रींच्या सान्निध्यात (भाग- १)

दिनांक १ जुन ….

लातुर सोडुन जवळपास चोवीस तास झाले आहेत, आणि बस-रेल्वे-बसच्या प्रवासाचा आनंद घेत आपण एकदाचे २१ किलोमीटर, कनकपुरा रोड, उदयपुरा, बेंगलोर ह्या आगळ्यावेगळ्या पत्त्यावर पोहचतो, कमानीवर ‘श्री श्रीं’ चे भव्य हसतमुख कट-आऊट आपले स्वागत करते, आणि आपली आश्रमात एंट्री होते.

सर्वात पहीले लक्ष वेधुन घेते ती इथली हिरवाई, हा संपुर्ण कनकपुरा रोड समृद्ध निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे, पण गुरुदेवांनी त्याला अक्षरशः स्वर्ग बनवलयं, प्रवेश केल्यावर रिसेप्शनवर तिथले स्वयंसेवक प्रसन्नमुखाने ‘जय गुरुदेव’ करतात, बसमधुन पहीले पाऊल खाली टाकताच, सारा प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळुन जातो, मनात आणि शरीरात अचानक सकारात्मक कंपने जाणवायला लागतात,

पांढर्‍याशुभ्र दगडात बनवलेल्या, कोरलेल्या नक्षीदार लेजर कटींग भिंती चटकन लक्ष वेधुन घेतात, प्रथमदर्शनीच तिथल्या छोट्या कौलारु रिसेप्शन हॉलच्या आपण प्रेमात पडतो, पाच मिनिटात रुम अलॉट होते, गळ्यात घालायचा टॅग मिळतो, आणि आपण शटल बस मध्ये बसुन रुमकडे निघतो, अंदाजे एक किलोमीटरवर रहायचे आणि जेवायचे ठिकाण असते.

बस हलते, आणि आश्रमाचा पट हळुहळु एखाद्या चित्रपटासारखा आपल्या डोळ्यासमोर उलगडत जातो, चकचकीत स्वच्छ रस्ते, दुतर्फा आकाशाशी स्पर्धा करणारी उंचच उंच झाडे, रंगबेरंगी फुले, चिवचिवणारे रंगबेरंगी पक्षी, जिकडेतिकडे इंग्लीश आणि कन्नड भाषेत लिहलेले अर्थपुर्ण सुविचार!….

आणि अवतीभवती इतकी सारी माणसे असुनही नीरव शांतता!..

आपोआपच मन सुगंधाने आणि अजुनच प्रसन्नतेने कठोकाठ भरुन जाते, मन शांत शांत होते!..

‘आश्रम’ म्हणजे काय? चौकशी केंद्रावर एका मोठ्या सुबक पाटीवर गुरुंजीची व्याख्या लिहुन ठेवलीये, जिथे आल्यावर श्रम नाहीशे होतात, तो आश्रम, इथलं वातावरण ती व्याख्या एकदम सार्थ ठरवते, आश्रमात प्रत्येक इमारतीला नावे दिलेली आहेत, रहायच्या जागांना अपर्णा, वासुकी, बसवा, पद्मा अशी नावे आहेत, प्रत्येक इमारतीत फाईव्हस्टार हॉटेल्स सारख्या चकचकीत शेकडो रुम्स आहेत, नाममात्र दरात अकोमोडेशन प्राप्त होते. अचानक जाणीव होते, की पोटात कावळे ओरडत आहेत, आणि फ्रेश होवुन आपण भोजनकक्षाकडे पळत सुटतो,

‘अन्नपुर्णा’ नावाप्रमाणेच इथे अन्नपुर्णा मातेचे वास्तव्य आहे, दररोज इथे हजारो-लाखो लोक प्रसाद ग्रहण करतात, तृप्त होतात, जेवणाच्या रांगेत उभा राहील्यावर लक्षात येते की इथे बरेच लोक मौन पाळत आहेत, त्यांच्या टॅगवर ‘आय एम इन सायलेन्स’ असे लिहलेले आहे.

अरेच्चा!…आपल्याही टॅगवर असेच लिहलेले आहे की! इतकी माणसे असुनही गोंगाट नसण्याचे रहस्य कळते, आणि हे काय!, सर्व्हिंग काऊंटरवर अन्न वाढणे, भांडी धुणे, स्वच्छता अशी सगळी कामं स्वयंसेवकच करत आहेत!

जेवण अगदी साधं, सात्विक पण तितकचं रुचकर आहे, फुलके, एकच भाजी, खास दक्षिण भारतीय शैलीत बनवलेला भात आहे, आणि ताक!

वेस्ट टाकण्यासाठी एक ड्र्म आहे पण ताटात काही शिल्लक ठेवु नये अशी गळ घालणारा एक स्वयंसेवक बाजुला उभा आहे. त्याच्या भितीने आपण ताट चाटुन पुसुन स्वच्छ करतो.

मनसोक्त जेवण करुन, आपण आश्रमाचा फेरफटका मारायला निघतो, कमळाच्या आकारात बांधलेला भव्य, पांढराशुभ्र, विशालाक्षी मंडप ह्या आश्रमाचे मुख्य आकर्षण आहे, विशालक्षी हे गुरुजींच्या आईचे नाव आहे, १९९९ मध्ये त्यांचे देहावसन झाले आणि ध्यान करण्यासाठीचा हा हॉल तयार झाला, तेव्हा गुरुजी म्हणाले होते, इथे आल्यावर आपल्या सर्वांना आईच्या कुशीत आल्याचा अनुभव आहे, म्हणुन त्याचे नाव विशालाक्षी मंडप आहे. ह्या सुरेख गोलाकार वास्तुला चोहोबाजुना दरवाजे आहेत, ते पाहुन लातुरच्या गोलाईची आठवण येते, एका छोट्या टेकडीवर हा नैसर्गीक स्लोप आणि कंटुरचा वापर करुन, हा हॉल बनवला गेलाय, आश्चर्य म्हणजे ह्या हॉलचे आर्किटेक्ट स्वतः गुरुजीच आहेत, हे डिझाईन त्यांनीच तयार केले आहे.

गुरुजींची अदभुत कल्पनाशक्ती पाहुन नकळत हात जोडले जातात, हॉलच्या दोन बाजुला भव्य पायर्‍या पाहुन कधी दिल्लीच्या लोटस टेंपल ची आठवण होते, कधी ताजमहालची! इथे भव्यता आणि सुंदरतेसोबत दिव्यता आहे, असाही विचार मनात येतो.

तास, दोन तास इमारतीच्या घिरट्या घालुनही मन भरत नाही, एखाद्या लहान मुलाला अख्ख्ये चॉकलेट आणि खेळण्याचे दुकान दिले आणि एंज्यॉय केल्यावर तो जसा आनंदाने वेडा होईल, तसे काहीसे मन गोंधळुन जाते, बेंगलोर मध्ये मी २००६ ते २०११ वास्तव्यास होतो, मित्रांना मी येतोय असे फोन केलेले असतात, त्यांचे फोनवर फोन येत आहेत पण आता आश्रमाच्या बाहेर पडायला मन धजावत नाही,

मग वेगवेगळी कारणे सांगुन मित्रांना मी ‘येत नाही’ असे पटवले जाते. विशालाक्षी मंडपावरुन दुरवर एक तलाव दिसत आहे, पाण्याचं आकर्षण असल्यामुळे मी दोन सोबत्यांना घेऊन जवळजवळ धावतच तिथे पोहचतो, इतकी ती जागा सुंदर आहे.

दिडतास मी फक्त तलावाचं सोंदर्य डोळ्यात साठवतोय, समाधान होत नाही, पण सोबतच्या मित्रांच्या आग्रहाखातर आम्ही जवळच्या बागेकडे निघतो, तिथे तलावातुन आलेल्या पाण्याचा एक झरा आहे, पाथवेज, वॉकवेज, सुरेख लॅंडस्केप आहे, झाडखाली बसायला कट्टे बांधलेले आहेत. झर्‍यामध्ये कालियामर्दन करणारी कृष्णाची मुर्ती आहे.

एकापेक्षा एक अदभुत जागा पाहुन मनात एक आगळावेगळा उत्साह संचारतो, एरवी शांत शांत असणारे, अनोळखी व्यक्तींसोबत जेवढ्यास तेवढं आपण भरभरुन बोलते होतो, पावसाचे थेंब पडत आहेत, म्हणूण नाईलाजाने रुमकडे निघावे लागते.

गप्पा टप्पात बघता बघता दिवस मावळतो, आणि बाहेर धोधो पाऊस बरसतोय, बेंगलोरचा पाऊस अनेकदा अनुभवला पण ही तर जणु ढगफुटी आहे, बाल्कनीत उभा राहुन पावसाचा थेंबनथेम्ब मी डोळ्यात आणि कानात साठवुन घेतो. अचानक आठवते, की दुपारी अशी पुसटशी सुचना कानावर पडली होती की संध्याकाळी सहा वाजता सत्संग आहे, सत्संग म्हणजे नेमकी काय भानगड आहे माहीत नाही, उत्सुकता लागुन राहते, सात वाजत आलेत, पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत.

मग ‘राहवत नाही’ ह्या आपल्या मुळ स्वभावानुसार मी मुख्य रस्त्याकडे पावसात भिजत निघतो आणि सत्संगाचे ठिकाण दॄष्टीस पडते, ‘यज्ञशाळा’!..

एकावेळी दहा हजार हुन अधिक लोक बसतील असे गोलाकार पत्र्याचे शेड आहे. पाऊस असेल तेव्हा रोजचा सत्संग इथे होतो. हॉलमध्ये टकाटक, अद्यावयत म्युझीक सिस्टीम आहे, भजन गाणारे सिंगर तर एकाहुन एक सरस आहेत, सगळीकडुन यज्ञाशाळेत येणारी गर्दी वाढते आहे, थोड्याच वेळात गुरुदेव येणार आहेत, सगळीकडे एक जल्लोषाचे वातावरण आहे, साधकमंडळी उस्फुर्तपणे बेभान होवुन टाळ्या वाजवत आहे, “डमडम डमरु बजे, शिव शंभो महादेवा” मधुनच कोणी उठुन तल्लीन होवुन नाचताना दिसतोय, पाहुन मनात आश्चर्यमिश्रीत आनंदाच्या लहरी उमटतात, सत्संगात एकरुप व्हायला अजिबात वेळ लागत नाही.

आकंठ भगवदप्रेमात बुडवुन टाकणारी एकसे एक ही मधुर, रसाळ, जोशपुर्ण भजने एखाद्या महागड्या कॉन्सर्टलाही मागे टाकतील!…

मधुनच “जय जय विठ्ठले, हरी नारायण”, भजन सुरु होते, अरे! आपण महाराष्ट्रात आहोत की कर्नाटकात!..हे भजन आधी कधीच ऐकले नाही, पण ‘लई भारी’ आहे!..

जोशपुर्ण आणि भावपुर्ण वातावरणात प्रवेशद्वाराजवळची लगबग वाढते, शेकडो लोक हातात रंगीत गुलाबाची फुले घेऊन गुरुजींच्या स्वागतासाठी त्यांच्या येणाच्या पाथवेला चिटकुन उभे आहेत, बघावे ते नवलच!..का आहे इतके वेड? इतके आकर्षण? की नुसतीच एकाचं बघुन एक अशी झुंबडगर्दी?

आणि तो सोन्याचा क्षण येतो, आयुष्यात पहील्यांदा ‘याचि देहि याची डोळा’ गुरुदेवांच दर्शन होते, आतापर्यंत फोटोत पाहीलेले गुरुदेव, प्रत्यक्षात अजुनच छान दिसत आहेत, वयाच्या साठीतही तुरुतुरु चालत, प्रत्येकाचे अभिवादन स्वीकारत आहेत, आल्याबरोबर सगळे उभे होतात, टाळ्या, आरोळ्यांचा पाऊस पडतो, गुरुजी एखाद्या लहान मुलासारखं हातातली गुलाबाची फुले हालवुन आपल्याला ‘हाय’ करतात,

साधु नेसतात तसा अंगभर पांढराशुभ्र पंचा, आणि गडद लाल रंगाची किनार असलेली शाल! काही क्षणात गुरुजी आसनस्थ होतात आणि लगेच ध्यानमग्नही होतात, भजने सुरुच राहतात, पण फक्त गुरुजीच्या येण्याने हॉलमध्ये शंभरपटीने चैतन्य वाढलेले असते. मुंग्यासारखी पटापट माणसं जागा मिळेल तिथे घुसत आहेत, बसत आहेत! समोरच्या भागात तर कणभरही जागा शिल्लक राहत नाही, कोणी मनसोक्त फोटो काढतेय, कोनी व्हिडीओ बनवत्येय.

हमखास अशा ठिकाणी असणारी, “मोबाईल नको, फोटो काढु नका” अशी दटावणी इथे नाहीये. सगळे हवं ते करायला मोकळे आहेत. भजने संपतात, आणि स्टेजवरच्या लाईट लावल्या जातात, आता रोजच्याप्रमाणे गुरुजींना प्रश्न विचारले जातात.

गुरुदेव, ब्रह्मांडातल्या सात सुरांचा आणि शरीरातल्या सात चक्रांचा संबंध आहे का?

उत्तर – नाही, सुर म्हणजे स्पंदने आहेत, वातावरणात कणाकणात ती भरुन राहीलेली आहेत, पण म्हणुन प्रत्येक सप्तक असणार्‍या गोष्टींचा संबंध लावायचा का?……सात दिवस आहेत, म्हणुन एकेक दिवस एकेक चक्राला वाटून देऊयात का? रविवार सहस्त्रार चक्राचा! (प्रचंड हशा)

सात तर खुप गोष्टी आहेत, सात रंग आहेत, सात ऋषी आहेत, हं! असं म्हणता येईल, सुरांचा निसर्गाशी संबंध आहे, कोकिळा ‘पंचम’ स्वरात गाते, कोणी पक्षी ‘निषाद’ स्वरात चिवचिवतो!

गुरुजींचं संगींताचं ज्ञान पाहुन आपण थक्क होतो!..प्रचंड टाळ्याच्या कडकडाटासोबत उत्तर संपते!..

गुरुजी, तुमच्या सानिध्यात आल्यापासुन माझं आयुष्य बदलुन गेलयं, पण माझी सासु मला खुप त्रास देते, तिला मी कसं बदलु?

“तिला बदलवण्यापेक्षा तिला ‘आई’ समज, सगळे बदलुन जाईल!”, मोजक्या शब्दांत गुरुजी गोड, मायाळु आवाजात उत्तर देतात, आणि नकळत आपल्यालाही जिंकुन घेतात.

आणखी प्रश्नोत्तरे होऊन आठ वाजता सत्संग पुर्ण होतो! जेवण करुन भजनांच्या नशेतच हवेत तरंगत तरंगत आपण झोपण्यासाठी रुमवर पोहचतो, उद्या सकाळी सहा वाजता साधना करण्यासाठी यज्ञशालेत पोहचायचे आहे!

मित्रांनो, आज आयुष्यात पहील्यांदा असे वाटत आहे की वर्णन करायला लेखणी कमी पडत आहे, आजवर शेकडो लेख लिहणारा मी, मला माझ्यावरच शंका येत आहे, मन धजावत नाहीये,

ह्या विषयावर लिहु का नको, अशी मनस्थिती का होत आहे?

कारण…… कितीही श्रेष्ट चित्रकार असला तरी त्याने जीव ओतुन काढलेल्या सुंदर निसर्गचित्राला खर्‍याखुर्‍या निसर्गाची सर येईल का?

अगदी तसंच, मनात अनुभवलेल्या दिव्यतेला शब्दांत मांडता येईल का?

आरशात दिसणाऱ्या चंद्राला पाहुन खऱ्या चंद्राच्या आकाराची कल्पना येईल का?

शक्यच नाही! तेव्हा पुढच्या लिखाणासाठी गुरुंकडेच मनापासुन अशिर्वाद मागुया!

माझं हे तोडक्यामोडक्या शब्दातुंन व्यक्त होणं, तुम्हाला काही अंशी उमजेल, अशी अशा करतो, आणि इथेच थांबतो!..

मनपुर्वक आभार आणि नम्र ‘जय गुरुदेव’!..


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।