बापलेक

एक कंटाळलेला बाप

च्यायला…..वाटलेच….. हा घोळ घालणार. वर्ष सुरु झाल्यापासून मागे लागलोय. दहावीचे वर्ष आहे. नीट अभ्यास कर. सोसायटीतून कर्ज काढून ह्याच्या क्लासची फी भरली. आहे थोडा अभ्यासात कमी… पण मेहनत करून भरून काढ….. असे सांगत राहिलो. हल्ली चांगल्या टक्क्यांनी पास झालेच पाहिजे. नाहीतर पुढे भविष्य बेकारच आहे. आमच्यासारखे आयुष्य जाऊ नये म्हणून प्रयत्न करतोय. पण याला काहीच नाही त्याचे.

नव्वद टक्के मार्क मिळाले. अजून थोडी मेहनत केली असती तर पंच्यांणव टक्के मिळाले असते…. आता ते काय माझे होते का…. ?? त्यालाच मिळणार होते. नशीब साहेबांच्या मुलाला कमी टक्के मिळाले. आता काही दिवस तरी पुढ्यात मान खाली घालून येतील. आम्ही मोठे झालो नाही निदान हा तरी होईल. आम्ही आमची स्वप्ने मुलांकडूनच पूर्ण करून घेणार ना ….?? काय चुकते आमचे.

ह्यावर्षी कपडे शिवलेच नाही मी. भाऊबीजेचे पॅन्टपीस ह्याच्यासाठी ठेवले. म्हटले नवीन ठिकाणी शिक्षण सुरू होईल जरा हौसेने नवीन कपडे घालून जाईल. ऑफिसातले बरेचजण अभिनंदन करतायत. खरेतर इतरांपेक्षा यालाच जास्त टक्के आहेत… तरीही अजून मिळायला हवे होते. आपलेच चुकले. यावर्षी जरा जास्तच फिरणे जाणे झाले त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. हरकत नाही पुढे पाच वर्षे आहेत. यापुढे जास्त लक्ष देऊ.

एक कंटाळलेला मुलगा

वर्षभर बैलासारखा राबलो आणि नव्वद टक्के मिळवले तरी ह्याला कमी .! म्हणे अजून पाच टक्के तरी जास्त मिळवायला हवे होतेस. आता काय दिवसाचे तीस तास अभ्यास करू. ह्याला शक्य असते तर दिवसही तीस तासांचा केला असता. वर्षभर ना टीव्ही पाहू दिला ना स्वतः पहिला…. आहो माझ्यासाठी का इतरांची मने मारत तुम्ही ..? लहान असल्यापासून तुमची मुलाला इंजिनियर बनवण्याची इच्छा ऐकतोय. तुमच्या इच्छेसाठी मी माझ्या इच्छा मारतोय. खरे तर नाही बनायचं इंजिनियर मला. नाहीं आवडत त्या तांत्रिक गोष्टी. पण हे सगळीकडे सांगत सुटलेत…. पोराला टॉपचा इंजिनियर बनवेन.

आहो …… नोकरीसाठी साहेबांकडे आतापासूनच वशिला लावून ठेवलाय त्यांनी. म्हणजे मीही यांच्यासारखा लोकलने लोकांचे धक्के खात ऑफिसला जाणार. सोसायटीतून कर्ज काढून त्यानी क्लासची फी भरली माझ्या… काय बोलणार. ती बिचारी आई कधीपासून वाढलेले मंगळसूत्र बनवायचे आहे बोलते पण तिच्याकडे लक्ष देत नाही. स्वतःकडे तरी कुठे लक्ष देतात म्हणा. रोजच्या गोळ्या घेणे परवडत नाही म्हणून वर्षभर त्या बंद केल्या हे माहीत नाही का आम्हाला. वर्षभर स्वतःसाठी कपडे शिवले नाहीत. ऑफिसमधील सेफ्टी शूज सर्व ठिकाणी वापरतात तेही माहीत आहे आम्हाला. पण… कधी विचारलेत का मला तुला काय करायचे आहे.. ?? तशी संधीही तुम्ही मला दिली नाहीत. तुमची स्वप्ने मला दिसत होती आणि ती पूर्ण करण्यासाठी मीही मेहनत केली. करेन मी तुमची स्वप्ने पूर्ण…. कारण हे सर्व तुम्ही माझ्या सुखी आणि उज्ज्वल भविष्यासाठी करतयात हे ठाऊक आहे मला. पण एक नक्की मी माझ्या मुलांच्याबाबतीत असे वागणार नाही. मी स्वप्ने पाहणार नाही पण त्यांना वेगवेगळी स्वप्ने दाखवीन. त्यांनाच सांगेन त्यांची स्वप्ने निवडायला आणि ती पूर्ण करण्यासाठी पाठीशी राहीन. निसर्गाशी ओळख करून देईन. तर साहित्यातली रुची वाढवीन. या जगात खूप काही बघण्यासारखे आहे. शिकण्यासारखे आहे, आयुष्य कसे जगायचे हे त्याला शिकविन.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।