बसंती १२ वर्षांची असतानाच एका प्राथमिक शिक्षक असलेल्या व्यक्तीशी तिचा विवाह लावून देण्यात आला.
अवघ्या तीन वर्षाच्या संसारानंतर तिच्या पतीचे एका अपघातात निधन झाले. वयाच्या १५ व्या वर्षीच वैधव्याचा शिक्का तिच्या कपाळी बसला.
तीन वर्षात नवऱ्याला खाऊन टाकले असे म्हणत, तिच्या सासूने तिला पांढऱ्या पायाची ठरवत घरातून हकलून लावले.
अगदी नावाला… शिकलेली आहे म्हणता येईल एवढी शिकलेली, बाल वयातच वैधव्य आलेले असताना, स्वतःच्या आयुष्यातील अनेक खडतर प्रसंगांना खंबीरपणे तोंड देत तिने स्वतःचे आयुष्य तर सावरलेच पण, अगदी मरणासन्न झालेल्या नदीलाही तिने जीवनदान दिले.
खेड्यापाड्यातील स्त्रियांना पर्यावरण आणि त्यांच्या रोजच्या आयुष्यातील संघर्ष यांचा सहसंबंध समजावून सांगितला.
फक्त पर्यावरणाचेच लढे नाही तर, वैयक्तिक आयुष्यातील लढे लढण्यासाठी देखील त्या स्त्रियांच्यात एक चेतना निर्माण केली. अगदी घरापासून ग्रामसभेपर्यंत त्यांचा आवाज कुठेही दाबला जाणार नाही यासाठी त्यांच्याठायी एक लढाऊ बाणा निर्माण करणाऱ्या बसंती सामंत या लढवय्या बाईची ही एक प्रेरणादायी कहाणी!
तिच्या संघर्षात तिने तिच्यासारख्याच अनेकींचे सहाय्य मिळवले आणि मृतवत कोसी नदीला पुनर्जीवन देण्याची चळवळ यशस्वी करून दाखवली!
बसंती १२ वर्षांची असतानाच एका प्राथमिक शिक्षक असलेल्या व्यक्तीशी तिचा विवाह लावून देण्यात आला. अवघ्या तीन वर्षाच्या संसारानंतर तिच्या पतीचे एका अपघातात निधन झाले.
वयाच्या १५ व्या वर्षीच वैधव्याचा शिक्का तिच्या कपाळी बसला. तीन वर्षात नवऱ्याला खाऊन टाकले असे म्हणत, तिच्या सासूने तिला पांढऱ्या पायाची ठरवत घरातून हकलून लावले.
मग, बसंती आपल्या माहेरी परत आली. इतर स्त्रियांप्रमाणेच ती देखील आपल्या आईला शेण गोळा करायला आणि गवत कापायला मदत करायची.
तिचे वडील बिहारच्या पोलीस विभागात नोकरीला होते. त्यांची इच्छा होती की, बसंतीने पुढचे शिक्षण घ्यावे आणि शिक्षिका बनावे. पण, बसंतीच्या शिक्षणाला तिच्या आईचा विरोध होता.
नंतर तिला उत्तराखंड राज्यातल्या कौसनीतील लक्ष्मी आश्रमाची माहिती मिळाली. या अश्रामात महिलांना विविध व्यावासायोपयोगी प्रशिक्षण दिले जात असे.
या आश्रमाच्या अध्यक्षा राधा भट्ट यांनी तिला या आश्रमात राहण्याची परवानगी दिली. या आश्रमातील बालवाडीमध्ये ती शिकवण्याचे काम करू लागली.
यातून एक प्रकारे तिने आपल्या वडिलांचेच स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर वयाच्या ३१व्या वर्षी तिने बहिस्थ विद्यार्थी म्हणून दहावीची परीक्षा दिली.
या परीक्षेत पास झाल्यावर आपल्या भावाने कसे गावभर पेढे वाटले होते याची आठवण ती अगदी रंगवून सांगते. जणू काही ती कालचीच घटना असावी.
यादरम्यान ती आश्रमाच्या कामात पूर्णत: झोकून देऊन काम करत होती. बालवाडी उभारण्यास आणि महिलांचे स्वयं सहाय्यता गट उभारण्यास मदत करणे हेच तिचे काम होते.
या गटाच्या माध्यमातून ती महिलांना कपडे शिवणे, हस्तकलेच्या वस्तू बनवणे आणि इतर व्यवसायोपयोगी कौशल्ये शिकवीत असे. परंतु तिला कौसनी ला परत जायचे होते. (यावेळी ती आश्रमाच्या डेहराडून शाखेचे काम सांभाळत होती) आपल्या गावतील महिलांना देखील अशा प्रकारचे आत्मनिर्भर बनवणारे प्रशिक्षण गरजचे असल्याचे तिला जाणवले.
२००२ मध्ये ती कौसनीला परत आली. कौसनीला परत आल्यावर तिला जाणवले की, तिथली परिस्थिती किती गंभीर बनली आहे.
कोसी नदी, ज्या नदीतून १९९२ मध्ये दिवसाला ८०० लिटर पाण्याचा विसार्ग होत होता तिथे २००२ पर्यंत फक्त ८० लिटर विसर्ग होऊ लागला. प्रचंड हलाखीची परिस्थिती निर्माण झाली.
“इथल्या बायका अगदी पहाटे सूर्य उगवण्याआधीच घरातून बाहेर पडायच्या, जंगलातील लाकडे गोळा करण्यासाठी. दुपारी सोबत आणलेली मीठ भाकरी खाल्ली की पुन्हा संध्याकाळ पर्यंत त्या लाकडे गोळा करत राहायच्या.
याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील व्हायचा, परंतु घरातील लोकांचे बोलणे ऐकून घेण्यापेक्षा दिवसभर जंगलात फिरून लाकडे गोळा कारणे सुखाचे वाटायचे त्यांना…”
बसंती दीदी सांगतात, “यांच्याशी बोलून पर्यावरणाच्या गंभीर स्थितीची माहिती देणं गरजेचं होतं. पण, या बायका बोलायलाही तयार नसत. त्यांच्या घरातून त्यांना तशी ताकीद दिलेली असायची कोणत्याही चळवळीत सहभाग घ्यायचा नाही.”
सुरुवातीला यांच्याशी बोलण्यासाठीच खूप प्रयत्न करावे लागले. एके दिवशी कौसनीच्या बस स्टँडवर बसंती दीदींना काही महिलांचा घोळका दिसला.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कोसी नदीचे पाणी फक्त पिण्यासाठीच वापरता येईल असा नियम जाहीर केला होता. परंतु, त्या बायकांच्या मते, त्यांना शेतीसाठी देखील पाणी हवे होते.
सरकारने याभागात अजून कालवे किंवा धरण बांधले नव्हते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा होता.
बसंती दिदींनी त्या महिलांना अमर उजाला मध्ये आलेला एक लेख वाचून दाखवला.
ज्यामध्ये लिहीले होते की, अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या १० वर्षात कोसी नदी नजरेसही पडणार नाही. मग त्यांच्या शेतीचं काय होणारं, प्यायला पाणी कोठून आणणार असे प्रश्न त्या महिलांसमोर उपस्थित केल्यानंतर त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले.
सोबत बसंती दीदीने त्यांना चिपको चळवळीचे देखील उदाहरण दिले.
या महिलांनी एकत्र येऊन कमिटी बनवायची ठरवली, या कमिटीचा अध्यक्ष निवडण्यात आला. गावातील किंवा जंगलातील झाडे न तोडण्याचा ठराव करण्यात आला.
मग या महिलांनी जंगल वाचवणे आणि मोठ्या पानांच्या झाडांची लागवड करण्याची चळवळ हातात घेण्याचे ठरवले.
सुरुवातीला त्यांच्या घरातून त्यांना विरोध झाला पण, नंतर गावातील पुरुषांनी देखील या चळवळीत सहभाग घेतला. गावकऱ्यानी वनखात्याशी एक करार केला.
जंगलातील लाकडावर गावकऱ्यांचा हक्क असला तरी, वन खाते असेल किंवा गावकरी असतील कोणीही झाडांची तोड करायची नाही.
आजही या बायका भल्या पहाटे घरातून बाहेर पडतात पण, त्या झाडांच्या फांद्यांना हात लावत नाहीत. जंगलात वळून पडलेली लाकडे वेचून आणतात. अशाच प्रकारच्या कमिटीज आजूबाजूच्या गावात देखील तयार झाल्या.
महिलांच्या या गटांनी आत्ता जंगल वाचवण्यासोबतचं गावातील दारू अड्ड्याविरोधात देखील आवाज उठवायला सुरुवात केली. घरगुती हिंसाचारावर त्यांचे समुपदेशन करण्यात आले.
“कोणतीही समस्या उद्भवल्यास आता चर्चा करून मार्ग काढायला आम्हाला एक व्यासपीठ मिळाले आहे” ३० वर्षाच्या ममता थापा सांगत होत्या.
२०१६ साली तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या नारी शक्ती पुरस्काराने बसंती सामंत यांचा गौरव करण्यात आला.
बसंती दीदीच्या प्रयत्नाने कौसनीपासून लोद पर्यंत संपूर्ण खोऱ्यात महिलांचे असे २०० गट तयार झाले होते.
जिथे महिला सरपंच असतानाही पुरुष कारभार पाहत असतील तिथे महिलांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली. पंचायतीशी संपर्क साधून या महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम बसंती दिदींनी केले.
त्यामुळे आता महिला पुरुषांच्या सहाय्याने नाही तर स्वतःच्या हिमतीवर निवडणुका लढवतात.
महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसेविरोधात देखील समाजात जागृती करण्याचे काम सुरु असून याचे परिणाम देखील दिसत आहेत. पुढील चार वर्षे तरी अजून बसंती दीदींना हेच काम सुरु ठेवायचे आहे.
स्त्री शिक्षण आणि लैंगिक समानतेच्या मुद्द्यावर काम करायचे आहे. भविष्यात जशा समस्या निर्माण होतील आणि समाजाच्या विकासासाठी काळानुरूप जे बदल होणे आवश्यक असेल अशा प्रश्नांवर काम करत राहीन, असे बसंती दीदी सांगतात.
शासन आणि प्रशासनाच्या स्तरावर देखील त्यांच्या या कामाची दाखल घेतली जात आहे.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Nice Katha aghat phar chhan lekh thanks
🙏