आनंदी राहिल्यामुळे आयुर्मान वाढते का? नेहमी हसतमुख राहणे हे उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याचे रहस्य आहे का?
असे असेल तर नेहमी आनंदी राहण्यासाठी काय करावे? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
असं म्हणतात की आपण हसलो की जग हसतं आणि जग हसलं की ते जिंकणं सोपं होतं.
नेहमी हसतमुख आणि आनंदी असणे ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
आता तुम्ही म्हणाल की सारखं हसायला पाहिजे, ते आरोग्यासाठी चांगलं आहे हे खरं, पण कारणाशिवाय हसू येणार कसं?
त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला योगाभ्यासातील
एक महत्त्वाचा भाग ‘लाफ्टर योगा’ बद्दल सांगणार आहोत.
लाफ्टर योगा किंवा हास्ययोग ही एक नैसर्गिक उपचार पद्धतीच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
योगासने आणि प्राणायाम करणे हा एक सर्वांगसुंदर व्यायाम आहे आणि त्यामुळे शरीर आणि मन दोन्हीही निरोगी बनते हे आपणा सर्वांना माहीत आहे.
परंतु याच योगाभ्यासातील एक भाग असणारा लाफ्टर योगा म्हणजेच हास्ययोग हे मात्र आधी तितके प्रचलित नव्हते.
परंतु याचे वेगवेगळे फायदे लक्षात घेऊन काही योगशिक्षकांनी सकाळच्या वेळी हास्य क्लब इत्यादीच्या माध्यमातून लाफ्टर योगाचे प्रशिक्षण देणे आणि प्रसार करणे सुरू केले.
लाफ्टर योगा कसा करायचा?
लाफ्टर योगा करताना ज्या लोकांना यामध्ये सामील होण्याची इच्छा आहे अशा सर्वांनी सकाळच्या वेळी एकत्र एखाद्या हवेशीर ठिकाणी जमावे. सोसायटीचा हॉल, गार्डन एरिया, जवळपासच्या एखाद्या झाडाखाली असे कुठेही सर्वजण एकत्र जमून लाफ्टर योगा करू शकतात.
सर्वानी एका ठिकाणी जमून काही वॉर्म अपचे व्यायाम करायचे आणि त्यानंतर मोठमोठ्याने हसायचे अशा पद्धतीने लाफ्टर योगा केला जातो. सुरुवातीला हे कृत्रिम वाटू शकेल, उगाच विनाकारण कसे हसणार असे वाटू शकते, परंतु सवयीने आणि एकमेकांच्या सोबतीने हे जमू शकते आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात.
आता जगभरात सगळीकडे लाफ्टर योगाचा प्रसार केला जातो आणि मे महिन्यातील पहिला रविवार लाफ्टर योग दिवस म्हणून साजरा केला जातो. लाफ्टर योगाची माहिती झाल्यामुळे तसेच त्याचे फायदे लक्षात आल्यामुळे भारतात देखील अनेक लोक हे करताना दिसतात.
सर्वांनी जमुन मनमोकळेपणाने एकत्र हसल्यास आपल्या दुःख, चिंता तर दूर होतातच परंतु आरोग्यावर अतिशय सकारात्मक परिणाम सुद्धा होतो. व्यायामाचा हा प्रकार एकट्याने करण्यापेक्षा समूहाने मिळून केला तर जास्त परिणामकारक ठरतो असे सिद्ध झाले आहे.
लाफ्टर योगा करण्याचे नेमके फायदे कोणते?
१. स्ट्रेस बस्टर (ताण-तणावाचा निचरा करणे)
आपल्याला हसू आले की आपल्या मनातील नकारात्मक भावनांचा, वाईट विचारांचा निचरा होऊन जातो. मन उत्साही, आनंदी आणि रिलॅक्स बनते.
मग आपण जर दररोज सकाळी लाफ्टर योगा करून हसण्याचा आनंद घेत असू तर आपण कायमच उत्साही आणि आनंदी राहू शकू हे निश्चित. म्हणूनच नियमित लाफ्टर योगा करण्यामुळे ताणतणावांचा निचरा करणे शक्य होते.
२. हेल्दी लाइफ (आरोग्यपूर्ण आयुष्य मिळते)
नेहमी हसत राहिल्यामुळे आपल्या अवतीभवती सकारात्मक स्पंदने निर्माण होतात ज्याचा आपल्या आयुष्यावर आणि आरोग्यावर अतिशय चांगला परिणाम होतो.
असे सिद्ध झाले आहे की सकारात्मक वातावरणात राहणारे लोक कमी प्रमाणात आजारी पडतात, त्यांचे एकूण आरोग्य चांगले असते कारण आनंदी राहण्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. म्हणजेच दररोज सकाळी जर आपण लाफ्टर योगा करणार असू तर त्यामुळे आपण कमी आजारी पडू, एक हेल्दी लाइफ मिळवू शकू.
३. ओल्ड एज (वृद्धापकाळ सुसह्य होतो)
लाफ्टर योगाचा अतिशय सकारात्मक परिणाम वृद्ध लोकांच्या आयुष्यावर होतो. एकाकी पडलेले, जीवनाला कंटाळलेले, आजारी असणारे वृद्ध लोक जर एकत्र आले आणि त्यांनी लाफ्टर योगाचा फायदा करून घेतला तर त्यांचे आयुष्य नक्कीच सुधारू शकते.
आयुष्यातील एकटेपणावर आणि निराशेवर मात करून आनंदी राहण्यासाठी वृद्ध लोकांना लाफ्टर योगाचा खूप फायदा होताना दिसतो. तसेच त्यांची प्रकृती उत्तम राहण्यासाठी ह्याचा उपयोग होताना दिसतो.
हसताना शरीरातील बरेच स्नायू वापरले जातात तसेच रक्ताभिसरणाचा वेग देखील वाढतो. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. याचाच अर्थ असा की सर्व वयोगटातील लोकांना हसण्यामुळे नवसंजीवनी मिळू शकते.
लाफ्टर योगा हा योगाभ्यासाचा एक नवा पैलू आहे. योगासने आणि प्राणायाम यांच्या बरोबरीने लाफ्टर योगा देखील तितकेच परिणामकारक आहे असे आढळून आले आहे.
तर मित्र मैत्रिणींनो, तुम्ही देखील तुमच्या घराजवळच्या परिसरात लाफ्टर योगा सुरू करा आणि लाफ्टर योगाचे आरोग्याला होणारे सकारात्मक फायदे मिळवा.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून हा लेख शेअर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.