भरपूर पैसे कमावणे हे आपल्या आयुष्याचे सर्वात मोठे ध्येय असते. अगदी एकमेव ध्येय नसले तरी साधारणपणे भरपूर पैसा कमावणे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचे असतेच.
रोजच्या जगण्याला पैसा लागतो हे तर आहेच पण केवळ गरजेपूरता पैसा न मिळवता भरपूर श्रीमंत व्हावे, असे आपल्याला वाटणे अगदी सहाजिक आहे.
आता बरेच लोक पैसा हेच सर्व काही नाही… असं म्हणून स्वतःचं काहीसं समाधान करून घेऊन पुढे चालत राहतात.
पण मित्रांनो, जेव्हा आयुष्यात मुबलक पैसा उपलब्ध होऊ लागतो, समृद्धी येते तेव्हा कुठल्याही अडचणींना माणूस आत्मविश्वासाने सामोरा जातो, स्वतः वर प्रेम करू लागतो…
पैसा कमावण्याकरता जास्त वेळ काम करणे, काही ना काही नवीन व्यवसाय करणे असे प्रयत्न आपण करत असतो. पण तेवढेच पुरेसे असते का?
पैसा सगळ्यांसाठीच महत्वाचा असला तरी सगळ्यांना सारखे पैसे मिळत नाहीत. काहीना भरपूर पैसे मिळतात तर काहीना अगदी कमी.
काय आहेत ह्याची कारणे? भरपूर पैसे मिळवण्याचे महत्वाचे साधन म्हणजे उत्तम शिक्षण हे तर आहेच. पण उत्तम शिक्षण घेणे, उत्तम महाविद्यालयातून पदवी घेणे एवढ्याने आपल्याला उत्तम पैसा मिळू शकेल ह्याची खात्री आहे का?
तर नाही, अशी खात्री देता येणार नाही.
मग कसे कमवायचे भरपूर पैसे? कोण सांगू शकेल आपल्याला?
अशी व्यक्ती जिने स्वतः भरपूर पैसे कमावले आहेत. आज भारतात रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा असणारे श्री.मुकेश अंबानी ह्यांच्याशिवाय ह्या विषयावर अधिकाराने बोलू शकणारे दुसरे कोण असू शकतात?
त्यांनीच आज रिलायन्स इंडस्ट्रीजला यशाच्या शिखरावर पोचवले आहे. चला, तर मग भरपूर पैसे मिळवण्यासाठीच्या टिप्स आपण थेट श्री. मुकेश अंबानींकडून जाणून घेऊया.
१. पैसा हे सर्वस्व नाही परंतु तो खूप महत्वाचा आहे.
मुकेश अंबानी ह्यांचे वडील श्री. धिरूभाई अंबानी ज्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची मूहर्तमेढ रोवली त्यांचे हे लाडके वाक्य आहे. मुकेश ह्यांचा ह्या वाक्यावर खूप विश्वास आहे.
त्यांची उत्तम पैसे कमवण्यासाठीची पहिली टीप हीच आहे की सतत पैश्याच्या मागे धावू नका. पण तो महत्वाचा आहे हे मात्र विसरू नका.
२. स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्लान बनवा.
सतत पैश्यामागे धावू नका परंतु भरपूर पैसे कमवण्याचे स्वप्न मात्र जरूर बघा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करून ते अमलात आणा असे मुकेश सांगतात.
३. उगाच हिरोगिरी न करता आपले काम व्यवस्थित करा.
मुकेश अंबानी हे इतक्या मोठ्या उद्योगसमूहाचे मालक आहेत परंतु ते फारसे कधी मिडियासमोर येत नाहीत.
त्यांचे हेच म्हणणे आहे की उगाच काहीतरी करून प्रसिद्धीच्या मागे लागण्यापेक्षा तुमचे काम व्यवस्थितपणे करा ज्यामुळे तुम्ही आपोआप इतरांसाठी आदर्श बनाल. आपले काम हीच आपली ओळख बनवा.
४. मनाचे ऐकून निर्णय घ्या.
मुकेश सांगतात की कोणताही निर्णय घेताना आपल्या मनाचे ऐका. जे आपल्या मनाला पटेल, योग्य वाटेल तेच करा. अशा निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ सहसा येत नाही.
५. आजूबाजूच्या सर्वांवर विश्वास ठेवा परंतु त्यांच्यावर अवलंबून राहू नका.
मुकेश अंबानी ह्यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक उतारचढाव पाहिले आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
ते सांगतात की अशा वेळी आपल्या बरोबर काम करणाऱ्या सर्व लोकांवर विश्वास ठेवा परंतु त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. मुख्य निर्णय आपल्या मनानेच घ्या. सतत जागरूक रहा.
६. आयुष्यात थोडी तरी जोखीम पत्करलीच पाहिजे.
काहीतरी अचिव्ह करायचे असेल तर थोडी तरी रिस्क घेणे भाग आहे. आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायलाच हवे.
जो व्यक्ति रिस्क घेत नाही त्याला उत्तम यश मिळू शकत नाही. आणि मुख्य म्हणजे काही चुकलेच तर त्या चुकांमधून शिकायची संधीही मिळत नाही.
७. काम करण्यासाठी सतत उत्साह वाटला पाहिजे.
मुकेश अंबानी असे सांगतात की प्रत्येकाला आपले काम करताना प्रचंड उत्साह वाटला पाहिजे. काम करण्याचा एक वेग असला पाहिजे. ह्यासाठी आपण जे काम निवडतो ते आपल्या आवडीचे असले पाहिजे. म्हणजे ते करताना कंटाळा येत नाही. आपोआप उत्साह येतो.
८. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना प्रोत्साहन द्या.
आपल्या बरोबर काम करणाऱ्या, आपल्या टीममध्ये असणाऱ्या लोकांना सतत नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी, काही नवीन करून दाखवण्यासाठी प्रोत्साहन द्या.
त्यामुळे आपल्यासह त्यांचाही उत्कर्ष होतो आणि काम करण्याची उर्मी वाढते. संपूर्ण टीमला फायदा होतो.
९. बदलत्या परिस्थितीचे भान ठेवा.
मुकेश म्हणतात की कोणतेही काम करताना आजूबाजूच्या परिस्थितीचे, मार्केटचे बदलणारे स्वरूप लक्षात घ्या.
रोज बदलणाऱ्या मार्केटमध्ये आपल्याला शिखरावर पोचायचे असेल तर आपल्याला त्यातील चढउतार माहीत असलेच पाहिजेत.
१०. भविष्याचा विचार करत रहा.
मुकेश म्हणतात की अपेक्षित यश मिळाले की न थांबता ते यश टिकवण्याचा आणि भविष्यात आणखी यश मिळवण्याचा प्रयत्न करा. थांबून राहू नका. नवनवीन कल्पना लढवून स्वतःची प्रगती करत रहा.
तर ह्या आहेत मुकेश अंबानी ह्यांनी दिलेल्या १० टिप्स ज्यांचा वापर करून आपण आपल्या कामात यश मिळवून भरपूर पैसे कमवू शकतो. तर मित्रांनो, तुम्हीही ह्यावर विचार करा आणि भरपूर पैसे कमवण्याचा प्रयत्न करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very good…