काल संध्याकाळी मी अंगणात जाऊन बसले होते. काल खास दिवस होता ना? तुला आठवतोय का? नसेलच आठवत. सगळंच विसरायची वाईट सवय, हो ना?
“ए आज खास दिवस आहे. काय ते ओळख पाहू.” खूपदा सकाळी उठल्यावर तुला चिडवायला मी म्हणायचे.
“तुझा वाढदिवस नाही, माझा नाही, आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही. नाही, मला नाही आठवत, एवढेच दिवस खास आहेत माझ्यासाठी” तू असा हुशारीने स्वतःला सुरक्षित करून घ्यायचास.
मी मग काहीतरी थातुरमातुर कारण द्यायचे आणि सांगायचे तो दिवस किती खास आहे ते. आणि मग एवढा खास दिवस तू विसरलासच कसा असं म्हणून मी रुसायचे. लाड करून घ्यायची इच्छा झाली की मी असे दिवस शोधून काढायचे आणि तू ही लाड करायचास.
तर, सांगत काय होते? काल मी अंगणात जाऊन बसले होते. अंगणाला ‘अंगण’ न म्हणता तू ‘गार्डन’ म्हणायचास. माझ्या अंगणातल्या कमळाच्या छोट्या तलावाची हौस मी तुझ्या गार्डनमधल्या ‘स्विमिंग पूल’मध्ये भागवली होती. त्याबाजूला तू दोन खुर्च्या ठेवल्या होत्यास, झोपून बसल्यासारखं बसायला. तुला तिथे बसून राहायला आवडायचं आणि मला पूलमध्ये पाय टाकून. बऱ्याचदा सकाळी जातानाच तू मला सांगून जायचास “आज संध्याकाळी गार्डनमध्ये बसू.” मग मी मुद्दामच पायात पैंजण घालून यायचे. थोड्यावेळ तुझ्या शेजारी बसून मग हळूच उठून मी पाण्यात पाय सोडून बसायचे. न बोलावता तू ही यायचास मागे. सलवार वर करून माझे पाय आत असायचे, मुद्दामच, पैंजण दिसण्यासाठी.
तर सांगत असं होते की पैंजण घातले होतेच मी. तुझ्या त्या खुर्चीवर बसण्यासाठी गेले होते खरंतर, पण त्यावर बुरशी आली होती रे. नाईलाजाने मग मी पाण्यापाशी गेले, बरीच वाळकी पानं होती तिकडे. तुला अजिबात आवडायचा नाही हा कचरा.
“किती ग कचरा झालाय बाहेर! झाडणारी बाई आली नाही का?” एरवी तुझं घरात अजिबात लक्ष नसायचं. काम करणारे आलेत, नाही आलेत, तुला काही पत्ता नसायचा. मी कधीच ती पानं झाडायचे नाही, आणि माझ्या मर्जीतले इतर नोकर सुद्धा कधी तिकडे जायचे नाहीत तर तू एक खास बाईच ठेवली होतीस! तिचं काम फक्त तेच. येऊन ती पानं झाडून भरून ठेवायची. पण खरं सांगू मला नाही आवडायची ती वाळकी पानं झाडून टाकलेली. अंगणात पडलेली वाळकी पानं मला फार आकर्षक वाटायची रे आणि ती झाडणारी बाई आली नाही ना की तर मी मुद्दाम जाऊन चालायचे त्यांच्यावरून, चपला न घालता. आणि मग अजूनच कचरा व्हायचा सगळा. तू अजून वैतागायचास ते बघून.
“असू दे रे, वाळक्या पानांचं वेगळं सौन्दर्य असतं. सगळंच कसं नेहमी हिरवंगार, आखीव रेखीव असेल? अंगणात पानांचा कचरा हवाच.”
मी वेडीच आहे, अशा अविर्भावात मग तू मला टपली मारत ओरडायचास, “गार्डन ग, गार्डन आहे ते.”
तर मला काल काय वाटलं ते सांगायचं होतं. मी असं म्हणायचे म्हणूनच आता ह्या खुर्च्यांवर बुरशी धरली होती का? खूप हिरवं झालं होतं बहुतेक माझं आयुष्य.
जाऊदे. मला खरं जे सांगायचंय त्यावर येते. संध्याकाळ होती, मी गार्डनमधे होते, खुर्चीवर बुरशी आली होती, पूलच्या जवळ बसावं म्हटलं तर खूप पानांचा कचरा झाला होता. मी ती वाळकी पानं जरा बाजूला करून खाली बसले आणि तुझ्या त्या पूलमध्ये पाय सोडले. आत पाणीच नव्हतं. मी कधी लक्षच दिलं नाही कशाकडे तू असताना. तू गेल्यावर मात्र ह्याची जाणीव झाली, आणि अजून ही सतत होतच आहे. पहिल्यांदा ही जाणीव आपल्याच नातेवाईकांनी करून दिली. त्याची वेगळीच गंमत आहे. तुझ्या तिरसट स्वभावाला घाबरून कोणी कधीच आपल्याकडे फिरकायचे नाहीत ना, तू गेल्यावर अचानक सगळ्यांचं येणं-जाणं वाढलं. तुझ्या काही काकवा मला सोबत म्हणून राहायला ही आल्या. त्यांच्यासाठी ती एक ‘वेकेशन’च होती. आणि मग हळू हळू ह्या वेकेशनसाठी आलेल्या लोकांचं रूपांतर सल्लेगारांत व्हायला लागलं. कोणते शेयर्स, कुठे इन्व्हेस्टमेंट, कुठल्या एफडी. बापरे मला काहीच माहीत नव्हतं रे. तुझ्या नसण्याचं दुःख करू की माझ्या ह्या अवस्थेचं?
“आमच्या बाळूला दाखव सगळी कागदपत्र तो सांगेल तुला सगळं. कुठले पैसे काढायचे, कुठे गुंतवायचे. सगळं सग्गळ! आता त्याच्या हाती दे, तुला काही कळत नाहीये ना त्यातलं?” तुझ्या जाण्याचं दुःख सरलं ही नव्हतं रे आणि तुझ्या जानकी काकू हे सांगत होत्या मला. त्यांचं सगळं बोलणं मला ऐकू येत होतं, समजत ही होतं पण मला काहीच बोलता येत नव्हतं. काही बोलायला तोंड उघडलं की फक्त रडू यायचं. ते रडू कसलं होतं नाही सांगता येणार, तू नसल्याचं, मी कशातच लक्ष न घातल्याचं की मला काहीच बोलता येत नव्हतं त्याचं? असं वाटायचं तासंतास झोपून राहावं. अशात माझ्या मागे कोण होतं माहीत आहे? पार्वती अक्का. कमाल आहे ना? तुला तर लहानपणापासून सांभाळलंच त्यांनी आणि माझ्यावर ही माया केली.
“वहिनीबाईंची तब्येत ठीक नाही. अशावेळी त्यांना ह्या गोष्टींचा अजून त्रास नको. त्यांना बरं वाटलं की बघतील त्या काय ते. काही शंका असेल तर तुम्हालाच विचारतील.” पार्वती अक्का म्हटल्या होत्या. कामावर ठेवलेल्या बाईला जरा बरी वागणूक दिली तर आमच्याच डोक्यावर बसली असा कांगावा करत जानकी काकू गेल्या ते गेल्याच, माझ्याबद्दलची वाटणारी सगळी काळजी घेऊन. ह्यानंतर मात्र पार्वती आक्कांनी मला खंबीर केलं, बँकांचे व्यवहार शिकायला लावले, कुठे गुंतवणूक आहे, कुठे काय करायचं आहे हे सगळं मी शिकले रे.
बघ पार्वती अक्कांबद्दल बोलतेय ना?
आजचा दिवस त्यांच्या लक्षात होता. दुपारी त्यांनी ड्रेसिंग टेबलवर माझे पैंजण काढून ठेवले. मी बसले होते ना ते सुद्धा आतून पाहिलं बघ त्यांनी आणि पुलात पाणी सोडलं. नकळत माझी सलवार मी वर घेतली. वर येणाऱ्या पाण्याने पैंजण हलवले, पायाला गुदगुल्या झाल्या, तुझ्या पायाने व्हायच्या ना तसंच झालं अगदी. गोंधळून एक क्षणभर मी बाजूला पाहिलं, मला व्हरांड्याच्या खिडकीतून बघताना अक्का दिसल्या. माझ्या डोळ्यातून झराझरा पाणी यायला लागलं. तुझा भास झाला. तशीच वर आले, पळत पळत. अक्का माझ्या मागे आल्या काळजीने पण मी खोलीचं दार लावून घेतलं. खिडकीतून परत खाली बघितलं, अर्धा भरलेला पूल आणि इकडे तिकडे विखुरलेली पानं. मला कसंतरीच झालं. मी तशीच झोपले.
जे सांगण्यासाठी इतकं लिहिलं तो मूळ मुद्दा असा की आज सकाळी उठले. काल नक्की काय घडलं आठवत होते.
तुझा भास झाला का? मी एकदम उठले पण माझा हात कशाततरी अडकला तशी परत दिवाणावर बसले.
तुझ्याबरोबर अंगणात जायचे तेंव्हा बांगड्या ही घालायचे हातात, तू हातात हात घेतलास की मला उगीच तो सोडवायला आवडायचा. तेंव्हा त्या बांगड्यांची किणकिण माझी मलाच खूप गोड वाटायची. कधी कधी मुद्दाम एखादी सोन्याची बांगडी घालायचे, तुझ्या शर्टच्या बाहीत ती नेमकी अडकायची आणि तू पटकन असा हात धरायचास की मला सोडवताच यायचा नाही.
काल आक्कांनी बहुतेक बांगड्या पण काढून ठेवल्या होत्या वाटतं, घातलेल्या काही आठवत नाहीत पण आत्ता एक बांगडी तुझ्या उशीच्या अभ्र्याला अडकली आहे. हो, बरोबर काल मला तुझा भासच झाला होता.
खरं सांगू? सोडवावीशी वाटतंच नाहीये पण आज ना मला एक काम करायचंय.
आज मी जाऊन सगळं गार्डन झाडणार आहे. जाऊदे ना मला?
लेखन : मुग्धा शेवाळकर
आणखी काही कथा…
माझा संशय आहे, घातपात झाला असेल त्यांच्या घरात….
वळण (कथा- प्रेम, धोका आणि पुन्हा निखळ प्रेम)
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.