अंगाला निळा रंग फासून…. गळ्यात रबराचा नाग गुंडाळून ….डोक्यावर जटांचा टोप आणि हातात त्रिशूल घेऊन तो दारोदारी फिरत होता. नेहमीचे होते ते त्याचे. कोणाचा दिवस असेल तर त्याचे वेषांतर करायचे. शनिवार मारुती… तर मंगळवारी गणपती.. हीच तर कला होती त्याच्या अंगात. हातातल्या त्रिशूळाने अंगावर येणाऱ्या कुत्र्यांना हाकलत तो घरोघरी जात होता. आज भरपूर भिक्षा मिळेल याची खात्री होती त्याला. पण पहिल्या चार घरातच भ्रमनिरास झाला.
“अरे… आज उपवास… आज खाना नही बनाया.. अशी उत्तरे ऐकू आली.म्हणजे आज काही खरे नाही तर… डोळ्यासमोर बायको आणि हात हलवून टाटा करणारी पोर आठवली.
“आज रस्त्यावर भीक मागावी लागणार नाही ना …?? असा विचार मनात येताच तो शहारला.. तो भिकारी नव्हता तर बहुरूपी होता. आपली कला वेगवेगळ्या रुपात सादर करून त्याचे बक्षीस घेणे हेच त्यांचे काम.फिरत फिरत तो रस्त्यावर आला तसेही मोठमोठ्या सोसायटीत त्याला बंदी होती आता रस्त्यावरील माणसेच त्याचा सहारा. येणारी जाणारी माणसे त्याच्याकडे बघत पुढे जात होती .काहींनी खिश्यात हात घालून एक दोन रुपये त्याच्या हातावर ठेवले . न रहावून त्याने तांडव करायला सुरुवात केली . रिकामटेकडे उभे राहून ते पाहू लागले तर घाईघाईने जाणाऱ्यांच्या कपाळावर आठ्या आल्या . शेवटी ट्रॅफिक हवालदार आला आणि त्याने हुसकावून लावले . कंटाळून शेवटी तो देवळाजवळ आला.
आज महाशिवरात्र होती.देवळात गडबड दिसत होती . तो पायऱ्यांवर थबकला. एकाने दिलेला प्रसाद तोंडात टाकून कट्ट्यावर बसला.
“अरे वा एकदम महादेवच दिसतोस….”शेजारून आवाज आला तसे त्याने वळून बघितले .एक सहा फुटी राकट चेहऱ्याचा माणूस त्याच्याकडे पाहून म्हणाला . बोलता बोलता तोंडातली सिगारेट काढून त्याच्यासमोर धरली.
” नको मला …” तो म्हणाला.
” मग काय चिलीम देऊ ..?? तो खवचटपणे म्हणाला.
“मी नाही ओढत … त्याने कसेनुसे हसत सांगितले.
” अरे सोंग घेतोस ते पूर्ण घे .. चिलीम इथे मिळत नाही नाहीतर तीच दिली असती तुला …”असे म्हणून तो मोठ्याने हसला. “भूक लागली ….””?? त्याने मान हलवली.
“तिथे बघ… किती खायला आहे. पण ज्याला गरज आहे त्याला काहीच नाही.. गाभाऱ्यात बोट दाखवून तो म्हणाला.घे….. असे बोलून एक दुधाची पिशवी चार भाकऱ्या त्याच्या हाती दिल्या.
“पण तुम्हाला …?? त्याने भाकरी हातात घेऊन विचारले.
“अरे मला आज भरपूर आहे .. इथे प्रत्येकाचा एक दिवस असतो.आजचा दिवस माझा आहे. असे बोलून तो उठला.
“आहो तुमचे नाव काय…??? राहता कुठे ….?? त्याने विचारले. तसा तो शांतपणे वळला नजर रोखून म्हणाला” रुद्र माझे नाव. पलीकडच्या स्मशानजवळ राहतो. कधी आलास तर ये भेटायला ..” आणि दमदार पावले टाकीत चालू पडला.
हातातील वस्तू पाहून त्याला भुकेची जाणीव झाली त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचीही… लगबगीने तो घराकडे वळला.
घरात शिरताच बायकोने विचारले कुठे होतात आज इतका वेळ…. चला नमाजाची वेळ झालीय. मी वाट बघतेय . काही न बोलता त्याने आपला मेकअप उतरवला आणि मुलाला घेऊन मशिदीची वाट धरली.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.