आपण कसे आलो? पृथ्वी कशी तयार झाली? ते ह्या विश्वाची निर्मिती आणि उत्पत्ती हे सगळे प्रश्न माणसाला नेहमीच पडत आले आहेत. त्याची उत्तरे काही प्रमाणात मिळाली असली तरी अजून बरेच प्रश्न बाकी आहेत. तंत्रज्ञान विकसित झाल्याने आणि विश्वाचा अगाध पसारा लक्षात घेता आत्ताच्या तंत्रज्ञानाने आपल्याला भूतकाळात बघण्याची संधी दिली. भारत ह्यात मागे नाही. नुकतच भारतातल्या जी.एम.आर.टी. म्हणजेच (Giant Meterwave Radio Telescope) ने विश्वातील सगळ्यात दूरवरची रेडीओ आकाशगंगा शोधली आहे.
लायडेन वेधशाळेचा संशोधक आयुष सक्सेना आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ह्या सगळ्यात दूरवरच्या आकाशगंगेचा शोध लावला आहे. टी.जी.एस.एस.१५३० असं हिचं नाव असून ही आकाशगंगा आपल्यापासून तब्बल १२ बिलियन प्रकाशवर्ष दूरवर आहे. ही आकाशगंगा ११ हजार ४०० प्रकाशवर्ष आकाराने मोठी आहे. जी.एम.आर.टी. टेलिस्कोप हे तीस वेगवेगळ्या साधारण २५ किलोमीटर च्या क्षेत्रात पसरलेल्या रेडीओ टेलिस्कोपचं जाळं पुण्याजवळ च्या खोदाड (नारायणगाव) इकडे टी.आय.एफ.आर. ( टाटा इन्स्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च ) च्या एन.सी.आर.टी. विभागाने बांधलेले आहेत. तयार झाल्यावर जी.एम.आर.टी. विश्वातील सगळ्यात मोठं टेलिस्कोपचं जाळं ठरलं.
४५ मीटर व्यासाच्या प्रचंड अश्या पॅरॅबोलिक आकारातील तीस टेलिस्कोप ऑटोमेटेड पद्धतीने पूर्णतः कोणत्याही दिशेला वळवता येतात. ह्या जी.एम.आर.टी. ने सात वर्षापूर्वी १५० mghz फ्रिक्वेन्सी ने पूर्ण आकाशाचा सर्वे केला होता. हाच सर्वे संशोधकांसाठी सोन्याची खाण किंवा अलिबाबाची गुहा ठरत आहे. ह्या टेलिस्कोप नी विश्वातील अनेक गोष्टींची नोंद आपल्या सर्वेक्षणात केली आहे.
ह्या सर्वेक्षणात सापडलेल्या गोष्टींची तपासणी आयुष सक्सेना आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जी.एम.ओ.एस. हवाई आणि एल.बी.टी. एरिझोना ( दोन्ही अमेरिकास्थित) वेधशाळेतून पुष्टी केली. त्याचं संशोधन नुकतच रॉयल एस्ट्रोनॉमीकल सोसायटी च्या अंकात प्रसिद्ध झालं आहे. रेडीओ आकाशगंगा अवकाशात सापडणं तसं दुर्मिळ मानलं जाते. रेडीओ आकाशगंगा विस्ताराने प्रचंड मोठ्या असून त्यांच्या मध्यभागी प्रचंड मोठे कृष्णविवर असते. हे कृष्णविवर मोठ्या प्रमाणात गॅस आणि धुळीचे कण आपल्याकडे खेचून घेत असते. ह्यामुळे प्रचंड मोठ्या उर्जेचे स्रोत तिथल्या कणांना गती देतात. ही गती प्रकाशाच्या वेगाएवढी असते. (साधारण ३ लाख किलोमीटर/सेकंद) हे जे स्रोत असतात ते रेडीओ फ्रिक्वेन्सी मध्ये आपण ओळखू शकतो. तब्बल १२ बिलियन प्रकाशवर्ष लांब अंतरावरून अश्या प्रकारच्या रेडीओ आकाशगंगेची नोंद होणं हेच खूप मोठी गोष्ट आहे.
जी.एम.आर.टी. ने अश्या प्रकारच्या रेडीओ लहरींची नोंद करणं हे त्याच्या कार्यकुशलतेच सर्टिफिकेट आहे. जी.एम.आर.टी. निर्मिती च्या मागचं तंत्रज्ञान आणि त्यांची निर्मिती पूर्णतः भारतीय संशोधक, भारतीय अभियंते ह्यांनी केली आहे. जी.एम.आर.टी. ची जागा निवडताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या आहेत. त्याचं भौगोलिक स्थान ते तिथलं वातावरण ते एकूणच तिथे असलेल्या रेडीओ लहरींचा संचार ह्याचा पूर्ण अभ्यास करून १० वर्षाच्या अथक मेहनती नंतर हे टेलिस्कोप भूतकाळातील विश्व बघण्यास सज्ज झाले होते. आज ७ वर्षानंतर त्यांच्या निर्मितीने विश्वाच भूतकाळातील एक दालन खोलण्यास मदत झाली आहे.
विश्वाची उत्पत्ती साधारण १३.८ बिलियन वर्षापूर्वी झाली असे मानलं जाते. म्हणजेच विश्वाच्या उत्पत्तीचं अगदी सुरवातीचं स्वरूप आपण ह्या रेडीओ आकाशगंगेच्या रूपाने बघू शकलो आहोत. विश्व निर्मितीच्या वेळी असलेल्या रुपात अश्या आकाशगंगेचं असण हेच वैज्ञानिक आणि संशोधक ह्यांच्यासाठी कुतूहल वाढवणारं आहे. कारण ह्याच्या अभ्यासातून एकूणच आकाशगंगा, कृष्णविवर ते विश्वाची निर्मिती अश्या अनेक प्रश्नांची उकल होण्यास मदत होणार आहे. आयुष सक्सेना व त्याचे सहकारी ह्या सगळ्यांच अभिनंदन.
तळटीप :- भुशी धरण आणि दारू पार्टी करून निसर्गाचा आस्वाद घेण्यापेक्षा आपल्या मुलांसोबत जी.एम.आर.टी. टेलिस्कोप ला भेट देण्यास काहीच हरकत नाही. प्रत्येक शुक्रवारी जी.एम.आर.टी. टेलिस्कोप ११ ते १ आणि ५ ते ७ ह्या वेळात सामान्य नागरिकांना बघता येतात. तसेच नॅशनल सायन्स दिवशी पूर्णवेळ हे सामान्य लोकांना बघता येते. इकडे अनेक माहिती देणारी प्रदर्शन आहेत. पुण्यापासून फक्त ८७ किलोमीटर लांब असलेल्या जगातील सगळ्यात मोठ्या असलेल्या जी.एम.आर.टी. टेलिस्कोप साठी एक शुक्रवार सगळ्यांनी काढायला हवा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.