काळ्या मनुकांचे नियमित सेवन करण्यामुळे होणारे फायदे आणि तोटे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
सध्या द्राक्षांचा सिझन चालू आहे. बाजारात सगळीकडे हिरव्या आणि काळ्या रंगाची द्राक्षे मुबलक प्रमाणात मिळत आहेत.
यापैकी हिरवी द्राक्षे सुकवून बेदाणे तर काळी द्राक्षे सुकवून काळ्या मनुका तयार केल्या जातात. या काळ्या मनुका अत्यंत चविष्ट असून आरोग्यासाठी अतिशय गुणकारी देखील असतात.
काळ्या मनुकांचे नियमितपणे सेवन केल्यास शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदा होतो परंतु त्याच बरोबर हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शरीराला हानिकारक ठरतो. काळ्या मनुकांचे अति सेवन केल्यास त्याचे काही तोटे देखील होतात.
काळ्या मनुका नियमितपणे खाण्याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.
काळ्या मनुका नुसत्या खाव्यात अथवा पाण्यात भिजवून त्यांचे सेवन करावे. दररोज किमान ७ ते ८ मनुका खाव्यात. एका वेळी १२ ते १५ मनुकांपेक्षा जास्त मनुका खाऊ नयेत.
काळ्या मनुकांचे आरोग्याला होणारे फायदे खालील प्रमाणे
१. या मनुकांमध्ये विटामिन ए, विटामिन बी वन, विटामिन बी फाईव्ह, विटामिन बी सिक्स, विटामिन ई आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे मनुकांचे नियमित सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढून आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
मनुकांमध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मनुका अँटी एजिंगसाठी महत्त्वाचे काम करतात. शरीराचा चयापचयाचा वेग वाढवण्यासाठी देखील मनुकांचे नियमित सेवन उपयोगी ठरते.
२. या मनुकांमध्ये anti-inflammatory आणि अँटिबायोटिक गुणधर्म असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती भरपूर प्रमाणात वाढते. तसेच घशाचे खवखवणे, सर्दी-पडसे यासारख्या आजारांवर देखील मनुकांचे नियमित सेवन गुणकारी ठरते.
३. काळ्या मनुकांमध्ये असणाऱ्या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे शरीरातील स्नायू मजबूत राहण्यास मदत होते. तसेच शरीरात कुठेही सूज येत असल्यास त्यावर नियमितपणे केलेले काळ्या मनुकांचे सेवन गुणकारी ठरते. संधिवात, सांधे आखडणे आणि स्नायूंना सूज येऊन होणारी वेदना या सर्वांवर मनुकांचे नियमित सेवन गुणकारी ठरते असे आढळून आले आहे.
४. काळ्या मनुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम सुद्धा असते. त्याच्या प्रभावामुळे शरीरातील रक्त वाहिन्यांमधून होणारा रक्तप्रवाह सुरळीत राहतो तसेच रक्तात गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते. रक्तदाब नियंत्रणात राहण्यास काळ्या मनुकांचे नियमित सेवन अतिशय गुणकारी ठरते.
५. काळ्या मनुकांच्या नियमित सेवनामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. काळ्या मनुकांपासून तयार होणारे तेल लावल्यास सोरायसिस सारखे त्वचाविकार बरे होण्यास मदत होते. तसेच कोरडी पडलेली त्वचा मऊ होण्यास मदत होते. त्वचेचा पोत सुधारतो.
६. काळ्या मनुकांच्या नियमित सेवनामुळे डोळ्यांना होणारा रक्तपुरवठा चांगल्या रीतीने होतो आणि त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ज्या लोकांना दिवसातील जास्तीत जास्त वेळ कॉम्प्युटर समोर काम करावे लागते त्यांच्यासाठी डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळ्या मनुकांचे नियमित सेवन अतिशय गुणकारी आहे. यामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होते तसेच दृष्टी सुधारते.
७. काळ्या मनुका रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्यापोटी त्यांचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होऊन पोट साफ होण्यास मदत होते.
तर हे आहेत काळ्या मनुकांच्या नियमित सेवनाचे आरोग्याला होणारे फायदे.
परंतु काही विशिष्ट शारीरिक परिस्थिती अथवा काही विशिष्ट आजार झालेले असताना मनुकांचे नियमित सेवन हानिकारक ठरू शकते. त्याचप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे वाईट असते, म्हणूनच मनुकांचे सेवन प्रमाणात करणे शरीराच्या आरोग्याला फायदेशीर असून जास्त प्रमाणात मनुकांचे सेवन केल्यास त्याचा त्रास होऊ शकतो.
काळ्या मनुकांच्या सेवनाचे नेमके काय तोटे आहेत ते आपण आता पाहणार आहोत.
१. गर्भवती स्त्रिया अथवा बाळांना अंगावर दूध पाजणाऱ्या स्त्रिया यांच्यासाठी काळ्या मनुकांचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते. म्हणून अशा स्त्रियांनी काळ्या मनुकांचे सेवन करण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
२. काळ्या मनुकांच्या नियमित सेवनामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास तसेच उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. परंतु ज्या लोकांना रक्तदाब मुळातच कमी असण्याची समस्या आहे अशा लोकांनी जर या मनुकांचे सेवन केले तर त्यांचा रक्तदाब आणखी कमी होण्याची शक्यता असते, म्हणून अशा लोकांनी देखील काळ्या मनुकांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
३. काळ्या मनुकांच्या नियमित सेवनामुळे रक्तातील गुठळी होण्याचे प्रमाण कमी होत असले तरी त्यामुळे रक्त जास्त प्रमाणात पातळ देखील राहते. त्यामुळे कोणतीही शस्त्रक्रिया अथवा अपघात होऊन रक्तस्त्राव होत असेल तर काळ्या मनुकांचे सेवन करणे घातक ठरू शकते.
निष्कर्ष
यावरून आपल्या असे लक्षात येते की काळ्या मनुकांचे नियमित सेवन आरोग्यासाठी फायदेशीरच आहे परंतु अर्थातच त्याचा अतिरेक करता कामा नये आणि आपली शारीरिक स्थिती ओळखून आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच काळ्या मनुकांचे सेवन करावे.
गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा माता तसेच रक्तदाब कमी असणारे लोक ह्यांनी याबाबत विशेष खबरदारी घ्यावी.
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की कधीतरी थोड्या प्रमाणात मनुका खाल्ल्या तर त्याचा त्रास होत नाही, परंतु नियमित सेवन करताना जर ते खूप जास्त प्रमाणात केले तरच त्रास होऊ शकतो. त्यामुळेच कोणतीही गोष्ट प्रमाणात खावी असे आपल्याला सांगितले जाते.
मित्र-मैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख नक्की शेअर करा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.