आजकाल शिक्षण संस्थांचे खूपच पेव फुटलेले आहे, शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे , तो एक धंदा झाला आहे वगैरे वगैरे ऐकून हा विषय तसा आता शिळाचं झालाय म्हणावा लागेल!! पण हा शिळा विषय काहीसा फोडणी देऊन , चाट मसाला घालून एकदा माझ्यासमोर आला. आणि आमची हसता हसता पुरेवाट झाली.
मी माझ्या छोट्याश्या आयुष्यात बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रांत मुशाफिरी केलेली आहे. त्यातलेच एक म्हणजे एका नावाजलेल्या शिक्षण संस्थेचे कॉलेज. सध्या आपण बघतोच कि सगळ्याच शहरांत कितीतरी मॅनेजमेन्ट, इंजिअनीरिंग कॉलेजेस उघडले गेलेले आहेत. आता यात तर काही वादच नाही कि या अशा कॉलेजेस ची गरज आहेच. यातूनच भावी पिढी घडणार… उच्चशिक्षित तरुण तरुणी उद्योग, सेवा क्षेत्रांत आपली चुणूक दाखवणार आणि देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करणार 🙂
पण एखाद्या कॉलेजच्या माननीय मुख्याद्यापकांनाच जर विमा कंपनी च्या प्रतिनिधीसारखे एका एका विद्यार्थ्यासाठीचे सीट विकावे लागत असेल तर 😯 आणि तो किस्सा तुमच्या समोरच घडला तर!!!
मी आणि माझी एक मैत्रीण असेच एकदा काही कामानिमित्त एका कॉलेजच्या मुख्याद्यापकांच्या अतिभव्य दालनात सरांच्या समोरच्या दोन खुर्च्यांमध्ये बसलो होतो. खूपच सुंदर इंटिरिअर डिझाईन असलेले ते दालन सरांचा त्या संस्थेतील मान मरातब कथन करीत होते.
काही प्रारंभिक बोलणे झाल्यानंतर आणि आमचे सरांकडचे काम संपल्यानंतर माझ्या मैत्रिणीने सरांना सहजच विचारले कि त्यांच्या संस्थेतील मॅनेजमेंट कॉलेजच्या ऍडमिशनसाठीची फीज् साधारण कशी आहे, इतर अटी काय आहेत वगैरे वगैरे……. कारण बारावी होऊन पुढच्या प्रवेशासाठी शोध घेत असलेला एक मुलगा आमच्या संपर्कात होता आणि ऍडमिशन बद्दलची माहिती त्याला हवी होती…… यावरून चाणाक्ष सरांनी हे हेरले कि यांच्याकडून एक सीट मिळू शकते. एक प्रोस्पेक्टिव्ह कस्टमर सरांच्या समोर बसलेला होता ना 😉
त्यानंतर मात्र सर चक्क मागेच लागले कि शक्यतोवर त्याच्या पालकांबरोबर कॉलेजमध्ये बोलावूनच घ्या त्या विद्यार्थ्याला एक फोन करून !! त्यांच्या अतिविषाल आणि सुसज्ज टेबलावरचा फोन त्यांनी लगेचच आमच्याकडे सरकवला.खरेतर आम्हाला असा लगेचच फोन वगैरे काही करायचा नव्हता कारण त्या संबंधित मुलाच्या पालकांना त्या संस्थेची लाखाच्या घरातली फी क्वचितच परवडली असती.आम्ही फोन करायचे टाळत होतो आणि सर त्यांचे विक्रेत्याचे कौशल्य पणाला लावत होते.मग आम्हाला दालनात खिळवून ठेवण्यासाठी कॉफी मागवली गेली. सर आमच्याबरोबर बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहिले. आणि त्याचबरोबर त्यांचे प्रशासकीय काम सुद्धा करत राहिले.आम्ही मात्र आमचे हसू मोठ्या मुश्किलीने दाबत होतो आणि बरोबरच सर त्यांच्या कामात लागले कि लगेचच एकमेकींना व्हाट्स अँप वर मेसेज पाठवुन हसण्याला वाट करून देत होतो आणि येथून निघण्यासाठी वाट कशी काढायची याचे प्लांनिंग करत होतो :lol:? .एक दीड तास सावज हेरण्याचा प्रयत्न सरांनी करून पहिला पण आम्ही काही बधलो नाही. आणि सरांनी त्यांचे बिसनेस कार्ड देऊन आमची सुटका केली 😆
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.