सध्याच्या काळात आपल्या मनात सर्वात जास्त धास्ती असणारा आजार म्हणजेच कोविड-१९, अर्थातच करोना.
२०२० हे संपूर्ण वर्ष आपण सर्वांनी लॉक डाऊन मध्ये काढलं. सर्व जण अक्षरशः जीव मुठीत धरून होते. काही जणांना ह्या आजाराची गंभीर लागण होऊन त्यांचा मृत्यू देखील झाला.
परंतु अशा परिस्थितीतही भारतातील शास्त्रज्ञ आणि लस बनवणाऱ्या कंपन्यांनी धीर सोडला नव्हता.
अथक प्रयत्न करून ह्या लॅब मध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी कोविड १९ वरची लस तयार केली.
सीरम इंस्टीट्यूट आणि भारत बायोटेक ह्या त्या दोन कंपन्या.
सीरम इंस्टीट्यूटनी कोविशिल्ड तर भारत बायोटेकने कोवॅक्सिन ह्या नावाने लस तयार केली. दोन्हीही लस सारख्याच इफेक्टिव आणि चांगल्या आहेत.
भारतात पहिल्या टप्प्यात सर्व कोविड पेशंटससाठी अथक काम करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी ह्यांच्याकरता यशस्वी लसीकरण झाले.
आता भारतात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण जोरात सुरू झाले आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर आता कोविडचा सर्वाधिक धोका असणारे जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षे वयाच्या वरील, असे लोक ज्यांना मधुमेह वा तत्सम इतर आजार असल्यामुळे कोविडचा धोका आहे अशांसाठी लसीकरण सुरू झाले आहे.
परंतु मुळात ह्या लसीकरणाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. कोविशिल्ड असो वा कोवॅक्सिन आताच्या घडीला ह्या आजारपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लस घेणे सर्वात महत्वाचे आहे.
परंतु ह्या लसी बद्दल असणाऱ्या गैरसमजांमुळे लस घेण्यास पात्र असलेले लोक देखील ही लस घेण्यास पुढे येत नाहीत.
खरंतर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ह्या दोन्ही लशी पूर्णपणे सुरक्षित आहेत हे सिद्ध झाले आहे.
परंतु तरीही काही लोकांच्या स्वतःच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे त्यांना ह्या लशींचे साइड इफेक्टस होऊ शकतात. म्हणूनच आपण आज ह्या लेखात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन बद्दल तसेच त्यांच्या फायदे आणि साइड इफेक्ट बद्दल अधिक जाणून घेऊया.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन वेगवेगळ्या आहेत का?
खरंतर कोविशिल्ड असो वा कोवॅक्सिन दोन्हीही सारख्याच पद्धतीने विकसित झाल्या आहेत.
जर फरक असेलच तर तो हा की कोविशिल्डने टेस्टिंग चे तिन्ही टप्पे पार केले आहेत, कोवॅक्सिन जी भारत बायोटेक ने बनवली आहे तिचा अजून टेस्टिंग (चाचणी) चा तिसरा टप्पा पार व्हायचा आहे. परंतु दोन्ही लसी सारख्याच प्रमाणात सुरक्षित आहेत.
दोन्ही लसी विकसित करताना लसिकरणाचे पारंपारिक परिमाणच वापरले गेले आहे, जे आधीपासून वापरुन सुरक्षित मानले गेले आहे त्यामुळे ह्या दोन्ही लसी तुलनेने सुरक्षित असून त्यांचे साइड इफेक्टस होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
दोन्ही लसी आपल्या शरीरात कोविड विरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार करतात जेणेकरून आपण जर कोविड वायरस च्या संपर्कात आलो तर ह्या अँटीबॉडीज ताबडतोब कार्यरत होऊन प्रतिहल्ला करून कोविड वायरसला पळवून लावतील.
ह्या दोन्ही भारतीय लसींना सुरक्षित आणि इफेक्टिव म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे.
परंतु तरीही अगदी अल्प प्रमाणात का होईना दोन्ही लसींचे काही साइड इफेक्ट आहेत. कोणते ते आपण जाणून घेऊया.
कोवॅक्सिन चे साइड इफेक्ट
हैदराबाद च्या भारत बायोटेक ह्या कंपनीने विकसित केलेली कोवॅक्सिन ही लस कोविड-१९ वायरस चे इनॅक्टिव्ह स्वरूप वापरुन बनवली गेली आहे.
ही लस घेतल्यावर सौम्य स्वरूपाची रिएक्शन येऊ शकते. ह्यामध्ये इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी दुखणे, दंडाचा तो भाग लाल होणे, सौम्य ताप, डोकेदुखी, उलटी होणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसतात.
हयाव्यतिरक्त गंभीर स्वरूपाच्या रिएक्शन किंवा साइड इफेक्ट अजून तरी शास्त्रज्ञांना आढळून आलेले नाहीत.
परंतु जर कोणाला श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाचे ठोके वाढणे, लस दिलेल्या जागेवर खूप रॅश येणे अशी काही लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता त्वरित डॉक्टरांना संपर्क करावा.
कोविशिल्ड चे साइड इफेक्ट
कोविशिल्ड ही खरंतर सुरुवातीला डेवलप केलेल्या लसींपैकी एक आहे.
ती जगभर तुलनेने सेफ म्हणून मानली गेली आहे.
परंतु ताप येणे, थकवा येणे, थंडी वाजून येणे, लस दिलेल्या ठिकाणी दुखणे अथवा खाज येणे, तो भाग लाल होणे अशी सौम्य लक्षणे ही लस घेतल्यावर दिसून येतात.
काही गंभीर स्वरूपाची लक्षणे म्हणजेच १०२ डिग्री फॅरेनहाइट पेक्षा जास्त ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हृदय किंवा मेंदूवर परिणाम होणे आढळली तर घाबरून न जाता त्वरित डॉक्टरांना संपर्क करावा.
कोविड ची लस कोणी घेऊ नये
जरी कोविड-१९ ची लस ही पूर्णपणे सुरक्षित असली तरीही काही लोकांना तिचा त्रास होऊ शकतो. तब्येतीच्या काही विशिष्ठ तक्रारी असणाऱ्या लोकांना ही लस सूट होणार नाही. ही लस कोणी घेऊ नये ते आपण जाणून घेऊया…
१. जर अंगात ताप असेल तर त्या वेळी कोविड ची लस घेऊ नये.
२. तुम्ही जर रक्त पातळ राहण्यासाठीच्या गोळ्यांचे सेवन करत असाल तर कोविडची लस घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
३. तुमच्या अंगात प्रतिकरशक्ती कमी असेल (ईम्युन डिसऑर्डर) तर कोविड ची लस घेऊ नका.
४. जर तुम्हाला अतिरक्तस्त्राव होण्याचा त्रास असेल तर कोविडची लस घेऊ नका.
५. जर तुम्ही गर्भवती असाल किंवा अंगावर दूध पाजत असाल तर कोविड ची लस घेऊ नका.
६. जर तुम्हाला कोणत्याही विशिष्ठ गोष्टीची एलर्जि असेल तर तुम्ही कोविड लस घेऊ नका.
७. सर्वांनीच कोविड लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरां चा सल्ला जरूर घ्यावा.
जर गंभीर स्वरूपाचे साइड इफेक्ट उद्भवले तर काय करावे
खरंतर कोविडची लस अत्यंत सुरक्षित आहे आणि ह्या लसीचे गंभीर स्वरूपाचे साइड इफेक्ट अत्यंत दुर्मिळ आहेत पण तरीही दुर्दैवाने असे साइड इफेक्ट उद्भवलेच तर ते ताबडतोब केलेल्या उपचारांनी बरे होऊ शकतात हे लक्षात ठेवा.
म्हणूनच लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला काही काळाकरिता डॉक्टरां च्या देखरेखीखाली ठेवले जाते.
त्यानंतरही काही त्रास जाणवला तर त्वरित डॉक्टरांना संपर्क करा आणि योग्य ते उपचार करून घ्या.
तर मित्रांनो कोणतेही गैरसमज न बाळगता आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविड ची लस जरूर घ्या आणि भविष्यात करोना पासून स्वतःचा बचाव करा.
आणि हो लस घेतली म्हणून सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळणे बंद करू नका. नियमित मास्क वापरा.
स्वस्थ रहा आनंदी रहा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.