विश्वाचा पहिला हुंकार म्हणजे ध्वनी. आमच्या सर्वच संगीत कलेचा आद्य निर्माता. मग त्याला सोबत केली ती वारा, पाणी, आकाश व निसर्गातल्या इतर घटकांनी. हे घटकही नैसर्गिकच. आता हेच बघाना बांबू हे खरे तर अतिशय जलद गतीने वाढणारे गवत आहे. पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळ्या हवामानांशी व पर्यावरणांशी जुळवून वाढणार्या या बांबूच्या जवळ जवळ १४०० जाती आहेत. बांबूच्या काही जातींची दिवसाला दोन ते तीन फुटांपर्यंतही वाढ होऊ शकते. याचे महत्व ज्या क्षणी मानवाला समजले तेव्हा पासून आमच्या जीवनात बांबूने असे स्थान पटकावले की आम्हाला शेवटच्या प्रवासातही याचीच साथ लागते. असे म्हणतात की बांबूच्या बनात भूग्यांनी पोखरून छिद्र केलेल्या बांबूत जेव्हा वारा प्रवेश करायचा तेव्हा एक वेगळाच ध्वनी त्या ठिकाणाहून ऐकू यायचा. हा ध्वनी ऐकून मग कुणा वेड्या माणसाला सर्वप्रथम एक कल्पना सुचली असावी आणि मग तयार झाले बासरी हे वाद्य.
पावा, बाँसुरी, वेळू, फ्लूट वगैरे वगैरे नावाने मग हे वाद्य जगभर प्रचलित झाले. एक साधा पोकळ बांबू पण त्यावर पारखी नजर पडताच ते आद्य वाद्यापैकी हे एक प्रमूख वाद्य म्हणून मान्यता पावले. लहानपणी आमच्यापैकी बहूतेकांनी बासरी वाजविण्याचा प्रयत्न नक्कीच केला असेल. पूराणादी ग्रंथातही हा वेळू देवाच्या हातात विसावला. अगदी प्राचीन काळा पासून हे वाद्य गुराखी वाजवत आले आहेत. आजही सर्व सामान्य लोक छंद म्हणून बासरी वाजवतात. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात गायन हे सर्वात वर मानले जाते मग वाद्यांचा क्रमांक. वाद्ये नेहमी संगतीसाठीच वापरली जात. त्यातही गायकाची संगत फक्त तबला, मृदूंग, हार्मोनियम व सारंगी किंवा व्हायोलिन या पलिकडे नव्हतीच. तर स्वतंत्र वाद्य वादनात पहिला मान तंतू वाद्यानां त्यातही सतार सर्वात आघाडीवर. या सर्वात बासरी तशी मागेच होती. तेव्हा ती होती पण इटुकलीच. एक लहानसे लोकवाद्य……..
या लहानशा बासरीला खरा आकार तर दिला तो पंडित पन्नालाल घोष या संगीत प्रज्ञावंताने. बासरी शास्त्रीय अंगाने वाजवायची तर ती भारदस्त असायला हवी हाही त्यांचाच विचार. त्यांनी मग सर्वप्रथम ३२ इंच लांबीची व सात छिद्र असणारी शास्त्रीय वादन शक्य होईल अशी बासरी तयार केली. काय गंमत बघा अत्यंत वेगाने वाढणाऱ्या बांबूची बासरी मात्र कित्येक वर्ष लहानच होती. तिला ३२ इंच लांब व्हायला १८ वे शतक उजडावे लागले. क्रिएटीव्हिटीची प्रक्रिया अशी प्रदीर्घच असते. पं. पन्नालालजी यांनी मग हा रानावनातला गुराखी बांधवाचा वेणू थेट शास्त्रीय संगीताच्या व्यासपिठावर आणून तर ठेवलाच पण त्याला मानमरातबही मिळवून दिला. त्यावेळी त्यांनाही कदाचित माहित नसेल की त्यांच्या जन्मानंतर २७ वर्षांनी जन्म घेतलेल्या एका मिठाईवाल्या पहीलवानाचा मुलगा याच बासरीचा जगभर डंका वाजविणार आहे.
बासरी या वाद्याचे नाव घेताच अगदीच बोटावर मोजता येतील अशी नावे समोर येतात. यातील जेष्ठय बासरी वादकात सर्वात पहिले नाव पं.पन्नालाल घोष, दुसरे त्यांचे शिष्य अरविंद गजेंद्रगडकर व तिसरे पं. हरीप्रसाद चौरसिया. पैकी आज हयात असलेले पं.हरीप्रसाद चौरसिया यांचा आज जन्म दिवस. कलेच्या प्रांतात अनेकदा गंमतीशीर प्रसंग घडतात. गंगाघाट अर्थात अलहाबादला जन्मलेल्या “हरी”चे नाव वडिलांनी तो पूढे बासरी वाजवेन म्हणून नव्हते ठेवले. त्यांना तर आपल्या मुलाला कुस्तीगिर करायचे होते. एक शक्तीशाली शरीर असलेला रेस्लर बनवायचे होते. पाच वर्षाचा हरी तसा वडीला सोबत आखाड्यात तर जायचा पण त्यला खुणवायचे ते त्याच्या शेजारच्याच पं. राजाराम यांच्या घरातुन येणारे संगीताचे सूर. कुस्तीच्या आखाड्यात तो वडीलांच्या इच्छेने जात असे कारण तो काळ वडीलांच्या धाकात रहाणाऱ्या मुलांचा होता. हा मुलगा मातीत न घुमता पावा घुमवत अख्ख्या जगाला डोलायला लावेल असं जर कुणी त्याच्या वडीलानं सांगितलं असतं तर त्यानी त्या व्यक्तीला धोबीपछाड मारून घरचा रस्ता दाखवला असता. पण असच घडलं. त्या शेजारच्या घरातील त्या सुरांनी त्याच्यावर असा काही डाव टाकला की आज पर्यंत त्यानां सोडवता आला नाही. आईची लोरी मन लावून ऐकणाऱ्या हातात बासरी देखिल त्याच्या आईनेच दिली. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी हरीची आई कायमची दुरावली. पण पूढच्या संघर्षमय आयुष्यात त्यांना आणखी एक आई मिळणार होती व ती त्यांची गुरूही होणार होती.
लपून चोरून संगीत शिकण्याची मुशाफिरी करत हरी पोहचला तो थेट वाराणशीच्या पं. भोलानाथ प्रसन्ना यांच्याकडे आणि येथून हरीच्या बासरीचा सूरमयी प्रवास सुरू झाला तो आजतागयत सुरूच आहे. पं. भोलानाथ यांच्याकडे त्यांनी आठ वर्षे बासरी शिकली. याच काळात ओरिसाच्या कटक आकाशवाणी केंद्रात त्यानां नोकरीही मिळाली. १९५२ मध्ये त्यांनी आपला स्वतंत्रपणे सोलो बासरी कार्यक्रम देण्यास सुरूवात केली. हल्लीचा विचार केला तर सर्व साधारणत: तरूण तरूणींचे ग्रॅजुऐशन-पोस्ट ग्रॅजुऐशनचे एकूणात शिक्षण वयाच्या २१-२३ वयात पूर्ण होते आणि नंतर करीयरच्या वाटा सुरू होतात. कलावंताना मात्र अगदी कमी वयातच संघर्षाची सुरूवात करावी लागते. विशेष म्हणजे आयुष्याच्या शेवटा पर्यंत त्यांचा संघर्ष संपतही नाही. एका मुलाखतीत त्यानां जेव्हा विचारले गेले की- “मागे वळून पाहताना नेमके काय आठवते?” त्यावेळी ते म्हणाले – की “मला आठवतो तो संघर्ष… सहजासहजी काही मिळाले तर त्यांची किमत फारशी राहात नाही. वडीलांनी तालमीत जायला सांगितले त्याचा फायदा पूढील आयुष्यात झाला. बासरी वादनासाठी आवश्यक शक्ती मला मिळाली. मी अगदी १०० व्या वर्षांपर्यंतही बासरी वाजवेन… माझा संघर्ष तर आजही सुरूच आहे.”
मेहर घराण्याचे संस्थापक बाबा अल्लाऊद्दीन खाँ म्हणजे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे विद्यापिठच. सरोद वादनातील तर ते उस्ताद होतेच पण अनेक भारतीय वाद्यातही पारंगतही होते. संगीत शास्त्रातील सर्वोत्तम शिक्षक व संगीतातील आदर्श गुरू. पं. रवी शंकर(सतार वादक), अली अकबर खान(सरोद वादक व त्यांचे पूत्र), निखील बॅनर्जी(सतार वादक), वसंत राय(सरोद वादक),पन्नालाल घोष(बासरी वादक),राबिन घोष(व्हायोलिन वादक), व्ही.जी.जोग(व्हायोलिन वादक)वगैरे सारखे एकापेक्षा एक सरस शिष्योत्तम त्यांनी तयार केले. रोशनआरा खान ही बाबा अल्लाऊद्दीन खाँ यांची कन्या. पूर्वीच्या मेहर (म.प्र.) संस्थानाचे राजे महाराज ब्रजनाथ सिंघ हे रोशनआरा खान यानां प्रेमाने अन्नपूर्णा देवी असे म्हणत. पूढे तेच नाव रूढ झाले. त्या सूर बहार या वाद्यात पारंगत आहेत…..१९४१ मध्ये पं. रवी शंकर यांच्या बरोबर त्यांचे लग्न झाले.१९४२ मध्ये त्यानां मुलगा झाला. शुभेंद्र शंकर हे त्याचे नाव. तो ग्राफिक आर्टीस्ट व म्युझिक कंपोजर होता….. अन्नपूर्णा देवी आणि पं.रवी शंकर १९६२ मध्ये वेगळे झाले. वेगळे झाल्या नंतर अन्नपूर्णा देवीने सूरबहारचे कार्यक्रम देणे कायमचे बंद केले..हरीप्रसाद यांची दुसरी आई म्हणजे याच अन्नपूर्णा देवी होत.
त्यांचे शिष्यत्व पत्करताना अनेक अटी हरीप्रसाद याना मान्य कराव्या लागल्या…..उदा: यापूर्वी जे काही शिकले ते सर्व विसरून नव्याने सुरू करायचे…..तसेच बासरी वादन पूर्वीसारखे उजव्या बाजूने न करता डाव्या बाजुने करायचे…हरीप्रसाद यानी सर्व मान्य केले.खरं तर दुसरी अट अवघडच होती. कारण आज पर्यंतचा सर्व सराव मोडून नव्याने सुरू करायचे होते. पण जिद्दीपूढे सर्व काही ठेंगणे असते…शिष्य सर्व परीक्षेत पास झाला….गुरूआई जन्मदात्या आईपेक्षाही सरस ठरली. आजही ही ९१ वर्षांची गुरूआई आपल्या ८० वर्षाच्या लहान मुलाला अनेकदा बिनधास्त फटकारते आणि या मुलालाही याचा प्रचंड अभिमान वाटतो…सर्व धर्मजाती पलिकडे जाऊन निर्माण झालेले हे नाते आजही दर क्षणाला अधिकाधिक घट्ट होत जातना दिसते. तर त्यांच्याच म्हणण्यानुसार संगीतातल्या आत्म्याचा शोध हरीप्रसादजीना अन्नपूर्णा देवी यांच्या सहवासात लागला व हे ऋण ते आजही मान्य करतात.
जगभरातुन अनेक कलेच्याच नव्हे तर विविध क्षेत्रातल्या असंख्य कलंदर व बुद्धीमान लोकांच्या विप्क्षितपणाचे किस्से प्रसिद्ध आहेत. त्यांचे व्यक्तीमत्वही अनेकदा दुहेरी असते. खाजगी आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य याचा बऱ्याचदा मेळही बसत नाही. पण तरीही त्यानां लोकाश्रय मात्र उदंड मिळतो.मात्र काही मोजकेच व्यक्तीत्व यानां अपवाद असते.हरीप्रसादजी यापैकी एक आहेत. फार पूर्वी पासून लोककला कलावंत व अभिजात(व्यक्तीश: मला अनेकदा हे अभिजात सोकॉल्ड वाटतात) कलावंत यांच्यात कायम एक दरी राहिली आहे. एकीकडे “लोककला” पासूनच अभिजात व व्यावसायिक कलेची सुरूवात झाली असे म्हणायचे व दुसरीकडे अनेक कला प्रकारानां हिणवायचे..हा दुट्टप्पीपणा आजही सुरू आहे. सिनेमा संगीत तसे खूपच अलिकडचे. विशेषत: ५०-६० वर्षापूर्वीचे अनेक दिग्गज शास्त्रीय कलावंत सिने संगीत व पाश्चात्य संगीत या पासून स्वत:ला निग्राहाने लांब ठेवत असत. अर्थात इथेही जे अपवाद होते व आहेत त्यात पंडित हरीप्रसादजी यांचे नाव आग्रहाने घ्यावे लागेल.
‘’सिने संगीताची आपल्याला आवड सुरूवाती पासून होती व आहे’’ हे ते प्राजंळपणे मान्य करतात. इतकेच नाही तर संगीत कुठलेही असो कोणत्याही भाषेतील वा देशातील असो जे कानाला मोहवते ते सुंदरच..ही त्यांचा धारणा असल्यामुळे ते सिनेमा संगीत दिग्दर्शनाकडेही वळू शकले. भारतीय चित्रपट प्रेक्षकानां शिव-हरी हे नाव माहित झाले ते यशराज चोप्रा यांच्या “सिलसिला’’(१९८१) या चित्रपटामुळे. मात्र या जोडीने १९६४ मध्ये आलेल्या ‘’जहाँआरा’’ या मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या चित्रपटात सर्वप्रथम काम केले. तलत मेहमूदचे ‘फिर वही शाम फिर वही गम’ या अजरामर गाण्यात पंडितजीच्या बासरीचे हळवे कातर स्वर ऐकता येतील.तर दुसरे गाणे ‘मै तेरे नजर का सुरूर हूँ…’ यात शिवकुमारजीच्या संतूरचा शिडकावा अनुभवता येईल. ६० च्या दशकातील अनेक संगीतकारांची ही आवडती जोडी होती. शास्त्रीय गायन असो की वादन दोन्हीत आलापीला खूप महत्वाचे स्थान असते. आलापी बऱ्यापैकी दीर्घकाळ चालणारी एक सांगितिक प्रक्रियाच आहे. तर शेवटी येणारी द्रुत लयकारी संगीत रसिकांना अत्युच्च आनंदाकडे घेऊन जाते. त्यामुळे गायनाच्या मैफिली रात्रभर चालत असत. नेमके याच्या उलट सिने संगीत आहे. ३ ते ५ मिनिटात सर्व गाणे आटोपते घ्यावे लागते. त्यात वादक कलांकरानां जो काही अवधी मिळतो तो तर खूप कमी….अशावेळी आपली छाप सोडणे किती अवघड असेल ना? त्यामुळे खूपच कमी शास्त्रीय गायक व वादक चित्रपट संगीताकडे वळत नसत..अर्थात् इथेही अपवाद शिवकुमार व हरीप्रसाद यांचा….
१९६७ मध्ये दोघांनी प्रसिद्ध गिटार वादक ब्रजभूषण काबरा यांना सोबत घेऊन एक अल्बम तयार केला….Call of the Valley . हा अल्बम लाईट संगीताने नटलेला असल्यामुळे त्याकाळच्या तरूणाई आकर्षित् झाली. मी तर म्हणेन की या अल्बमने तरूणाईला शास्त्रीय संगीताकडे खेचून आणले.अल्बमची तुफान विक्री झाली. या मध्ये अहिर भैरव, नटभैरव, पिलू,भूप, देस,पहाडी, बागेश्वरी, मिश्र किरवानी अशा विविध रागाचां सुंदर गुलदस्ताच आहे. या अल्बमने परदेशातही अफाट लोकप्रियता मिळवली.जॉर्ज हॅरिसन, डेव्हीड क्रॉसबे,पॉल मॅकार्टन,बॉब डेलन आणि रॉजर मॅक्ग्युईन या सारख्या पाश्चात्य संगीत कलावंताना भूरळ पाडली. आज सर्वत्र फ्युजनची एक लाट आहे त्याचा पाया पंडित हरीप्रसाद व शिवकुमार या कलावंतानी रचला आहे. अर्थात पं. रवी शंकर यांचा मोठा वाटा आहेच. पूढे १९९६ मध्ये पुन्हा या दोघांनी The Valley Recalls या लाईव्ह अल्बमची निर्मिती केली.
बी.आर.चोपडा यांच्या चित्रपटासाठी काम करत असतानां त्यांचे लहान भाऊ यशराज चोपडा यांची या दोघावर नजर गेली. त्यांनी ‘काला पत्थर’(१९७९) या चित्रपटाची ऑफरही दिली पण त्यांनी तेव्हा नकार दिला. या नकारा मागे पं.हरीप्रसाद यांची एक प्रामाणिक भूमिका होती. या चित्रपटाचे संगीत राजेश रोशन करत होते. दोन गाण्या नंतर यशराजशी त्यांचे मतभेद झाले. त्यावेळी त्यांनी हरीप्रसाद यानां संधी देण्याचे ठरविले. पण पंडितजी राजेश रोशन यांचे वडील प्रसिद्ध संगीतकार रोशन यांचे मित्र होते. आपल्या मित्राच्या मुलाकडून हे हिसकाऊन घेतल्या सारखे होईन म्हणून त्यांनी नकार दिला. शेवटी राजेश रोशन यांनीच बाकी गाणी तयार केली मात्र पार्श्व संगीताची जबाबदारी सलील चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली. मात्र यशराज चोपडा यांच्या डोक्यात हे दोघेही घट्ट होते. १९८१ मध्ये त्यांच्या ‘सिलसिला’ या चित्रपटाची जबाबदारी शिव-हरी यांच्याकडे सोपविली. गीतकार जावेद अख्तर, शिवहरी आणि अमिताभ-रेखा-जया यांनी हा चित्रपट चांगलाच उंचीवर नेला. यातील सर्वच गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली. शास्त्रीय संगीतातील दोन दिग्गजांनी चित्रपट संगीताचे असे आव्हान पहिल्याच संधीत पेलावे हा एक अपूर्व योगच म्हणावा लागेल. या पूर्वी सतार वादक रवी शंकर यांनी निचा नगर, पथेर पंचाली,अनुराधा, गोदान या सारख्या चित्रपटातुन आपल्या संगीताचा ठसा उमटविला होता पण तो काळ त्यांनी दिलेल्या संगीतासाठी पोषकही होता. मात्र ८० च्या दशकात चित्रपट संगीत पूर्णपणे बदलेले असल्यामुळे खरी कसोटी होती. या कसोटीत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्णही झाले. बॉक्स आफिसवर ‘सिलसिला’ खूप असा प्रभाव पाडू नाही शकला मात्र या चित्रपटाने आठ फिल्फेअर पुरस्कार पटकावले ज्यात उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार शिव-हरी यांना मिळाला… ‘देखा एक ख्वाब तो….’नेदरलँडच्या स्वप्नवत पसरलेल्या टयुलिप फुलांच्या बागेतील याचे नेत्रदिपक चित्रीकरण या चित्रपटाचा प्लस पॉईट ठरला. या ठिकाणी चित्रीकरण करण्याची सूचना अमिताभ यांनीच केली होती.
शिव हरी या जोडीने मग फासले(१९८५), विजय(१९८८), चांदनी(१९८९), लम्हे(१९९१), परंपंरा, साहिबान व डर(१९९३) असे आठ चित्रपट आठ वर्षाच्या काळात दिले. यातील चांदनी, लम्हे व डर चे संगीतही गाजले.
‘परंपंरा’ चित्रपटातील ‘फुलोंके इस शहरमे…….’या गाण्यात आधुनिक तालवाद्या सोबत शिवकुमारजीचे संतुर वेगाने थिरकावयाला लावते हे एक आश्चर्यच आहे. ‘जादू तेरी नजर….’(डर)…ओ मेरी चांदणी (चांदणी), कभी मै कहूं….(लम्हे), ये कहाँ हम आ गए…(सिलसिला) ही गाणी कायम स्मरणात राहतील यात वादच नाही. चित्रपट संगीतातील त्यांचे करीअर त्यांच्या ४३ ते ५६ या वयातील होते हे विशेष. शास्त्रीय संगीतात जगभर प्रसिद्धी असताना चित्रपटा सारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात ते आले याचे कारण सर्वकष संगीतावर त्यांचे असलेले प्रेम. आपल्या सांगितिक घराण्याची पत सांभाळून सर्वसामान्या वर्ग ज्या संगीताच्या सहाय्याने आपले जीवन आनंदी करत असतो त्या रसिक समुहाला ते विसरले नाहीत, हे मला अधिक भावतं. आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर असलेले पंडित हरीप्रसाद आपले मातीतले पाय जमिनीवर घट्ट् रोवून आजही उभे आहेत. नव्या तरूणाई बद्दलही ते आत्मियतेने बोलतात. कल आज और कल या सृष्टीचा नियम…प्रत्येक कालखंडात अभूतपूर्व काम करणारी माणसं असतात यावर त्यांचा विश्वास आहे.
बासरी बद्दल बोलताना एकदा ते म्हणाले होते- ‘हे ऐकमेव असे वाद्य आहे जे टयून करता येत नाही तर स्वत: वादकालाच टयून व्हावे लागते.’ हा मूलमंत्र बहूदा प्रत्यक्ष जीवनातही ते आमलात आणताहेत हे त्याचं माणूस म्हणून मोठेपण नाही का? भारतीय संगीतातील सर्वच अंगाचे अध्ययन करून त्यांनी ही बासरी जगातल्या कान्याकोपऱ्यात पोहचविली. चित्रपट संगीत असो की परदेशी कलावंता सोबतचे फ्युजन, विविध वाद्या बरोबरची जुगलबंदी असो की तरूण कलवंता सोबत सहज केलेल्या सांगितीक गप्पा… हा संगीतमेरू नवीन तरूणाई सोबत संवाद साधतानां आज कुठेही आपलं मोठेपण आडवं येऊ देत नाहीत…….या वयातही ते आपले बासरी वादन सादर करतात व आपण शंभर वर्षाचे झालो तरीही अशीच बासरी वाजवू असा आत्मविश्वासही बाळगतात. काल १ जुलै रोजी त्यांनी वयाची ८० वर्षे पार केली. त्यांना दिर्घायुष्य मिळो आणि त्यांच्या बासरीचे सूर आमच्या जीवनात असेच मिसळत राहो……… मन:पूर्वक शुभेच्छा……..
तुझे मुरली की जान एहले नजर युंही नही कहते
तेरी मुरली के दिलका हमसफर युंही नही कहते
सुनी सबने मोहब्बत की जुबान आवाज मे उनकी
धडकता है दिल ए हिंदुस्तान आवाजमे उनकी
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.