सध्या ताप आला की पहिल्यांदा सर्वांच्या मनात करोनाची शंका येते
परंतु त्याशिवाय देखील एक आजार आहे जो आधीपासून आपणा सर्वांना माहीत आहे तसेच गंभीर देखील आहे. अर्थातच त्यावर योग्य ते उपचार केले तर रुग्ण हमखास बरा होतो. तो आजार म्हणजे डेंग्यू.
डेंग्यू ‘एडिस इजिप्ती’ नावाच्या डासामुळे फैलावतो. डेंग्यू झालेल्या एखाद्या रुग्णाला चावलेला ‘एडिस इजिप्ती’ डास जेव्हा निरोगी माणसाला चावतो तेव्हा त्या निरोगी माणसाला सुद्धा डेंग्यू होतो. डेंग्यूचा डास फक्त एकदा जरी चावला तरी डेंग्यूची लागण होऊ शकते. असा हा भरभर फैलावणारा संसर्गजन्य आजार आहे. डेंग्यू झालेल्या माणसाला ताप येतो.
परंतु तुंम्हाला हे माहीत आहे का की डेंग्यूच्या तापावर घरगुती उपाय शक्य आहेत आणि ते खूप उपयुक्त देखील आहेत. आज आपण असेच घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
डेंग्यू म्हणजे नक्की काय?
डेंग्यूचा ताप डेंग्यू वायरसमुळे येतो. एखाद्या व्यक्तीला ह्या वायरसची लागण झाली की त्या व्यक्तीला खूप जास्त प्रमाणात अंगदुखी आणि ताप येण्याचा त्रास सुरु होतो. डेंग्यूच्या वायरसला संक्रमित होण्यासाठी माध्यमाची गरज असते. ‘एडिस इजिप्ती’ नावाचा डास ते माध्यम बनतो. तो डास डेंग्यू बाधित व्यक्तीला चावून नंतर निरोगी व्यक्तीला चावतो आणि डेंग्यूचा फैलाव वाढतो. ताप आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसताच डेंग्यूची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
डेंग्यूचे प्रकार
डेंग्यूचे ४ प्रकारचे वायरस आहेत. त्यापैकी कोणत्याही वायरसमुळे डेंग्यू होऊ शकतो. असा डेंग्यू झालेला रुग्ण बरा झाला की त्याच्या शरीरात प्रतिजैविके तयार होतात आणि त्या रुग्णाला डेंग्यूच्या ४ ही वायरसपासून काही काळ संरक्षण मिळते.
डेंग्यूची लक्षणे
डेंग्यूची लागण झाल्यापासून साधारण ३ ते १४ दिवसात रुग्णाला लक्षणे आढळून येतात. ४ थ्या किंवा ७ व्या दिवशी लक्षणे दिसण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.
डेंग्यूच्या रुग्णामध्ये खालील लक्षणे कमी अधिक प्रमाणात दिसून येतात.
१. सांधेदुखी
२. तीव्र ताप अगदी १०४ पर्यन्त
३. ब्लड प्रेशर कमी होणे तसेच हृदयगती कमी होणे
४. डोळे लाल होणे व दुखणे
५. चेहऱ्यावर बारीक पुरळ येणे.
६. थंडी वाजून येणे, डोकेदुखी, भूक न लागणे, ताप येणे ही डेंग्यूची सुरुवातीची लक्षणे आहेत.
७. डेंग्यूवर वेळीच उपचार केले नाहीत तर ताप आणखी जास्त वाढणे, संपूर्ण शरीरावर बारीक पुरळ येणे अशी लक्षणे दिसतात.
८. तरीही उपचार न केल्यास रुग्णाची स्थिती गंभीर होऊ शकते.
डेंग्यू वरील घरगुती उपाय
आयुर्वेदात डेंग्यूवर अनेक घरगुती उपाय करणे सांगितले आहेत. ते उपयुक्त देखील आहेत. परंतु संपूर्णपणे ह्या उपायांवर अवलंबून राहणे योग्य नाही. डेंग्यूचे निदान झाले की तज्ञ वैद्य अथवा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. डॉक्टरी औषधोपचार घेऊन बरोबरीने डॉक्टरांच्या सल्ल्याने हे घरगुती उपाय करावे.
डेंग्यूवर खालीलप्रमाणे घरगुती उपाय करता येतात.
१. कडूलिंबाचा रस
डेंग्यूचा ताप आला असता कडूलिंबाचा रस घेणे फायदेशीर ठरते. कडूलिंबाचा रस घेतल्यात पांढऱ्या पेशी तसेच प्लेटलेट्सच्या संख्येत वाढ होऊन प्रतिकारशक्ती वाढते आणि डेंग्यू लवकर बरा होण्यास मदत होते.
२. गुळवेल
गुळवेलीच्या पानांचा काढा किंवा गुळवेलीच्या देठांचा वाटून रस काढून तो नियमित पिण्यामुळे डेंग्यू कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील इन्फेक्शन कमी होऊन ताप उतरण्यास मदत होते.
३. तुळस
तुळशीच्या पानांचा काढा डेंग्यूवर गुणकारी आहे. ५,६ तुळशीची पाने पाण्यात उकळून त्यात थोडी काळी मिरी मिसळून पिण्यामुळे ताप कमी होतो.
४. पपई
पपईची पाने डेंग्यूवर अतिशय गुणकारी आहेत. पपईच्या पानांचा रस नियमित पिण्यामुळे प्लेटलेट्सच्या संख्येत वाढ होते तसेच प्रतिकारशक्ती वाढते. शिवाय पपई खाण्याचा देखील फायदा होतो.
५. मेथी
मेथीच्या पानांची भाजी खाणे डेंग्यूच्या तापावर गुणकारी आहे. तसेच मेथी खाल्ल्यामुळे डेंग्यूमुळे होणारी सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.
६. संत्रे
संत्रे खाणे किंवा संत्र्याचा रस पिणे डेंग्यूमध्ये गुणकारी आहे. संत्र्यामध्ये विटामीन सी आणि अॅंटीऑक्सिडंट्स असल्यामुळे इन्फेक्शन कमी होते तसेच प्रतिकारशक्ती वाढते.
७. जवस
जवस चटणी किंवा पूड करून खाणे किंवा त्याचा काढा करून पिणे डेंग्यूच्या तापावर गुणकारी आहे. जवसाचे तुरे वापरुन केलेल्या काढयाचा अधिक उपयोग होतो. प्लेटलेट्स आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
८. नारळपाणी
नारळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात मिनरल आणि अॅंटी ऑक्सिडंट्स असतात त्यामुळे डेंग्यूमुळे येणारा अशक्तपणा भरून येण्यास तसेच शरीर मजबूत होण्यास मदत होते.
९. दुधी भोपळा
शिजवलेल्या दुधी भोपळ्यामध्ये मध घालून त्याचे सेवन केले असता डेंग्यूचा ताप व इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
१०. बीट
बिटाचा आणि गाजराचा रस एकत्र करून पिण्यामुळे रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण खूप वाढते. तसेच बिटातील अँटिबायोटिक्समुळे शरीराची प्रतिकरशक्ती वाढते.
११. कोरफड
कोरफडीचा गर २, ३ चमचे पाण्यात मिसळून नियमितपणे प्यावा. ह्यामुळे डेंग्यूसहित अनेक आजारांवर गुण येतो. तसेच ताप कमी होतो.
डेंग्यू झालेल्या रुग्णाचा आहार व दिनचर्या कशी असावी?
डेंग्यू झालेल्या रुग्णाने खालील प्रकारे आहार घ्यावा.
१. भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
२. हलका व सुपाच्य आहार घ्यावा. त्यामुळे अपचन होणार नाही.
३. डेंग्यूमध्ये घसा दुखणे, कोरडा पडणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सूप, जूस, नारळपाणी असा द्रव आहार भरपूर घ्यावा.
४. लिंबू पाणी, ग्रीन टी असे पदार्थ प्यावे. त्यामुळे शरीरातील टोक्सीन्स कमी होतात.
५. भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असणारा आहार घ्यावा.
६. पुरेशी झोप घ्यावी.
डेंग्यू झालेल्या व्यक्तीने काय काळजी घ्यावी?
१. शारीरिक श्रम मुळीच करू नयेत.
२. संपूर्ण आराम करावा.
३. गरम, उबदार कपडे घालावे.
डेंग्यू झालेल्या रुग्णाला कोणती पथ्ये पाळणे आवश्यक आहे?
१. तेलकट मसालेदार भोजन न करणे.
२. पचण्यास जड वस्तूंचे सेवन न करणे.
३. मांसाहार, मद्यपान न करणे.
४. अतिरिक्त प्रमाणात चहा, कॉफी न पिणे.
डेंग्यूची तपासणी रुग्णाचे रक्त प्रयोगशाळेत तपासून करता येते. जर रुग्णाला सतत ताप येत असेल तर ही तपासणी अवश्य करावी. तसेच खूप जास्त ताप येत असल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे.
तर हे आहेत डेंग्यूच्या तापावर करायचे घरगुती उपाय. त्यांचा वापर अवश्य करा. डासांपासून स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.