हार्ट ऍटॅक येऊन गेल्यानंतर आहारात कोणते बदल करावेत ते वाचा या लेखात

आजकाल आपली लाइफस्टाइल बरीच धावपळीची आणि व्यग्र झालेली आहे.

कामाचा स्ट्रेस, वेळी अवेळी जेवणखाण, फास्ट फूड या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो.

या सगळ्या गोष्टींमुळे काही आजार हे तरुणपणीच मागे लागायला लागले आहेत.

हृदयविकाराचा त्रास सुद्धा हल्ली बऱ्याच लोकांना फार लवकर होतो.

वाढलेले ब्लड प्रेशर, वजन, कोलेस्टेरॉल यामुळे ह्र्दय विकार होतात आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.

ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल आणि वजन आटोक्यात ठेवण्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहार हे तर अत्यंत आवश्यक आहेतच.

या बद्दल आजकाल सगळे विशेष आग्रही सुद्धा असतात.

कामाच्या व्यापातून वेळ काढून व्यायाम करणे, शक्य तितके जंक फूड पासून लांब राहणे या गोष्टी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी करतो सुद्धा.

पण तरीही काहींना वयोमाना परत्वे, अनुवंशिकतेमुळे, स्ट्रेसमुळे किंवा इतर काही कारणामुळे ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

एकदा आपल्याला ह्र्दयविकाराचा झटका येऊन गेला की आपले हृदय कमकुवत होते.

म्हणून दुसरा झटका येऊ न देण्यासाठी आपण जास्तीतजास्त प्रयत्न केले पाहिजेत कारण जर पुन्हा एखादा झटका आला तर त्यातून बऱ्याच गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे, त्यांनी सांगितलेले व्यायाम करणे हे आपल्या हातात असते.

पण याच बरोबर आपणही आपल्या बाजूने प्रयत्न करू शकतो.. कसे?

सोपे आहे.. आपल्या आहारात योग्य बदल करून.

हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर असे कोणते बदल आपल्या आहारात केले पाहिजेत?

एकूणच ह्रदयाच्या आरोग्यासाठी आणि विशेषतः जर हार्ट अटॅक येऊन गेला असेल तर आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढेल अशा पदार्थांचा आपल्या आहारात समावेश टाळावा.

आपण अन्नातून जी फॅट खातो त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते.

पण मित्रांनो, या बाबत एक महत्वाची, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की सरसकट सगळे फॅट हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक नसतात.

फॅटचे तीन प्रकार असतात, सॅचुरेटेड फॅट, अनसॅचुरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट.

या पैकी सॅचुरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असून कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी कारणीभूत असतात.

म्हणूनच आपल्या आहारात बदल करून सॅचुरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण कमी करून अनसॅचुरेटेड फॅटचे प्रमाण वाढवायला हवे.

जेणेकरून आपल्या शरीरातील गुड कोलेस्टेरॉल वाढेल व बॅड कोलेस्टेरॉल कमी होईल.

लोणी (बटर), मार्गारीन, साय, खोबरेल तेल, पाम तेल, तूप, मटण यामध्ये सॅचुरेटेड फॅट जास्त प्रमाणात असतात.

म्हणून ह्रदयाच्या आरोग्यासाठी या पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे.

हवाबंद खाण्याचे पदार्थ जसे की वेफर्सची पाकिटे, डीप फ्राय केलेले पदार्थ या मध्ये ट्रान्स फॅट जास्त प्रमाणात असतात.

म्हणूनच तेलकट आणि तुपकट पदार्थ हे ह्रदयाच्या आरोग्यासाठी हानीकारक असतात.

अनसॅचुरेटेड फॅट, जे आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात ते बदाम, अक्रोड, आवाकाडो, ओलिव्ह ऑईल, राईस ब्रॅन ऑईल, लो फॅट दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, चिकन, मासे यामधून मिळतात.

याचबरोबर ह्रदयाच्या आरोग्यासाठी मिठाच्या आणि साखरेच्या प्रमाणावर पण नियंत्रण ठेवले पाहिजे.

यासाठी मिठाई, सोडा असलेली शीतपेये, केक, ब्रेड या सारख्या मैद्याच्या पदार्थांचे सेवन सुद्धा कमीतकमी केले पाहिजे आणि त्याच्या ऐवजी ताज्या भाज्या, फळे, ताज्या भाज्यांची सूप, मोड आलेली कडधान्ये, मासे ज्या मधून ओमेगा 3 फॅटी एसीड मिळते, चिकन याचे प्रमाण आहारात वाढवले पाहिजे.

मित्रांनो, हे झाले आहारात करायचे सर्वसाधारण बदल.

हे वाचून आपल्याला आपल्या रोजच्या आहारात कोणते पदार्थ टाळायचे आणि कोणते वाढवायचे याची कल्पना आली असेल.

हे इतके बदल केले तरी ते ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले ठरतात आणि ह्र्दयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो.

पण या पलीकडे जाऊन सुद्धा काहींना आपल्या जेवणाबद्दलच्या सवयी बदलायच्या असतात.

ज्या लोकांना आहारात असे बदल करायचे असतील, म्हणजे आपल्या आहाराची पूर्ण पद्धतच बदलायची आहे, आपल्या खाण्या-पिण्याच्या वेळांवर नियंत्रण आणायचे आहे तर त्याबद्दल सुद्धा माहिती या लेखात पुढे दिली आहे.

पुढे दिलेले हे डायटचे प्रकार आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

यातील आपल्याला जमेल, सतत करता येईल आपल्या रुटीनमध्ये शक्य होईल तो डायटचा प्रकार आपण निवडू शकतो.

पण आहारात कोणतेही मोठे बदल आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करावेत.

१. मेडिटेरीयन डायट

हल्ली या डायटला बरीच लोकप्रियता प्राप्त होत आहे.

या डायटचा मुख्य हेतू आहे की आपल्या आहारात गुड फॅटचे प्रमाण वाढवायचे आणि त्याचबरोबर भरपूर ताज्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये, मासे याचा समावेश करायचा.

दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, नॉनव्हेज जसे की मटण हे पूर्णपणे बंद न करता आपल्या आहारात त्याचे प्रमाण कमी करायचे.

म्हणजे हे अगदी रोज न खाता कधीतरीच खायचे.

पण जर आपल्या आहारातून दूध वर्ज करणे शक्य नसेल तर ते लो फॅट असणे गरजेचे असते.

यामध्ये बटरचा वापर न करता ओलिव्ह ऑईलचा वापर केला जातो.

आपल्या आहारात सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण कमी करणे हा या डायटचा मुख्य हेतू आहे ज्यामुळे ते आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

२. DASH डायट

ह्रदयविकार होण्यामागची जी कारणे असतात त्यामध्ये हायपरटेंशन म्हणजेच हाय बिपी हे एक महत्वाचे कारण आहे.

या DASH डायटचा मुख्य हेतू हा बिपीवर नियंत्रण ठेवणे हा आहे.

Dietary Approaches to Stop Hypertension हा याचा फुलफॉर्म आहे.

या डायट मध्ये आपल्या आहारातून सोडीयमचे प्रमाण कसे कमी करता येईल यावर भर दिला जातो.

आपल्या आहारातील सोडीयम, जे आपल्याला मिठामधून मिळते हे आपले ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी कारणीभूत असते.

सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण कमी करून अनसॅचुरेटेड फॅटचे प्रमाण वाढवणे आणि त्याचबरोबर आहारात मिठाचे प्रमाण कमी करणे हा या डायटचा मुख्य हेतू आहे.

यासाठी भरपूर ताजी फळे, भाज्या, मासे, चिकन, मोड आलेली कडधान्ये या पदार्थांना या डायटमध्ये प्राधान्य दिले जाते.

३. शाकाहार

मांसाहारी पदार्थांमध्ये विशेषतः रेड मीटमध्ये सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण अधिक असते.

यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते.

शाकाहारी जेवण पद्धती स्वीकारली तर हे सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण अपोआप कमी होते आणि ताज्या भाज्या, फळे, कडधान्ये याचे प्रमाण वाढते.

मांसाहार पूर्णपणे बंद न करता, काही ठरविक दिवशी जसे की महिन्यातून दोन वेळा केला जाऊ शकतो.

हे करताना मात्र प्रमाणाबाहेर मांसाहारी पदार्थ खाल्ले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

या व्यतिरिक्त हल्ली कोणते विशिष्ट डायट न करता हेल्दी ईटिंग किंवा क्लीन ईटिंग याला प्राधान्य दिले जाते.

ह्र्दयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर आपल्या आहारात हा बदल स्वीकारला तरी त्याचे बरेच फायदे होतात.

यामुळे आपले एकूण आरोग्य सुधारते.

क्लीन ईटिंग म्हणजे नेमके काय करायचे? तर कोणतेही बाहेरचे पदार्थ ज्याला आपण प्रोसेस्ज्ड फूड म्हणतो ते टाळायचे.

यामध्ये बेकरीचे पदार्थ, वेफर्स, मिठाई, फास्ट फूड हे सगळेच आले.

थोडक्यात यामध्ये फक्त आणि फक्त भाज्या, फळे किंवा धान्ये दळून आणून त्यापासून घरी तयार केलेले पदार्थ खाण्यावर तसेच गोडाचे पदार्थ टाळण्यासाठी प्राधान्य दिले जाते.

असे केल्याने आपल्या आहारात सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण कमी होऊन अनसॅचुरेटेड फॅटचे प्रमाण वाढेल जे आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

https://manachetalks.com/12596/heart-attack-first-aid-marathi-information-prathamopchar-health-blog/

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।