१९८० च दशक होतं. भारतात अजूनही आधुनिकीकरणाचे वारे पोहचले नव्हते. मुलीचं अस्तित्व अजूनही चूल आणि मुल ह्यापुरतं मर्यादित होतं.
अश्याच एका २८ जणांच्या एकत्रित कुटुंबात श्वेता अग्रवाल चा जन्म भाद्रेश्वर, पश्चिम बंगाल राज्यात झाला. जुन्या पिढीतील श्वेताच्या आजी आजोबांची अशी धारणा होती की “घराचं नाव हा मुलगाचं काढू शकतो. आपला वंश पुढे नेण्याचं काम हे फक्त मुलगाच करू शकतो. आपल्या घराचा व्यवसाय पुढल्या पिढीत फक्त आणि फक्त मुलगाच नेण्यास सक्षम आहे”.
त्यासाठी श्वेताच्या आई वडिलांवर मुलगा होण्यासाठी खूप दबाव टाकला जात होता. त्यामुळे जेव्हा श्वेताचा जन्म झाला तेव्हा कोणीच आनंदी झालं नाही. उलट श्वेताला जन्म देणाच्या आई वडिलांच्या निर्णयामुळे त्यांना त्या एकत्र कुटुंबात अनेक पद्धतीने दूषणं ऐकावी लागत होती.
श्वेताचे वडील बारावी तर आई दहावी पर्यंत शिकलेली होती.
कमी वयात लग्न करणाच्या पद्धतीमुळे आईचं शिक्षण सोडून लग्न लावून देण्यात आलं होतं. जे आपलं झालं ते आपल्या मुलीचं होऊ नये म्हणून लहानपणापासून तिच्या आई वडिलांनी आपल्या मुलीला शिकवायचं ठरवलं.
आपल्या १५ भावंडात श्वेता सगळ्यात लहान होती. पुढे जाऊन आपल्या कुटुंबातील पदवी शिक्षण घेणारी ती पहिली मुलगी ठरली. श्वेताच्या बहिणींची लग्न वयात येताच लावली गेली.
पण आपल्या मुलीला शिक्षण द्यायचा बांधलेला चंग तिच्या आई वडिलांनी सोडला नाही.
श्वेताच्या घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. त्याकाळी शाळेची महिन्याची फी १६५ रुपये भरणे पण श्वेताच्या आई वडिलांना कठीण जात होते.
श्वेताचे वडील रोजणदारीवर काम करत होते. त्याशिवाय किराणा दुकानातून उत्पन्नही बेताचंच होतं.
श्वेताचे वडील अनेकदा तिच्या आईला म्हणत की, “आपण रोज १० रुपये वाचवले तरी तिचं शिक्षण करू शकु”.
श्वेताही नातेवाईकांकडे गेल्यावर त्यांनी दिलेले अगदी ५ रुपये सुद्धा जपून ठेवत असे. त्यातून शाळेची फी भरण्याचा आपला खारीचा वाटा उचलत असे.
श्वेताला कळून चुकलं होतं की आपल्या आई वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचं फळ आपण अभ्यास करूनच परतफेड करू शकतो.
कॉलेजला जायला लागल्यावर तिच्या काकांनी तिच्या पुढल्या शिक्षणाला विरोध केला. मुलगी कॉलेज करून काय करणार आहे?
श्वेताने तिच्या आई वडिलांना निक्षून सांगितल की आपल्या घराण्यातून पदवी शिक्षण घेणारी मी पहिली मुलगी बनेल.
तिचे हे शब्द तिने खरे करून दाखवले. पण श्वेता तिथेच थांबली नाही. सरकारी कार्यालयातील ढिसाळ कामाचा एकदा अनुभव आल्यावर मी ह्या ऑफिसची ऑफिसर बनवून दाखवेन हे बोल तिने तिथे असलेल्या अधिकाऱ्याला बोलून दाखवले होते.
त्यासाठी तिने मिळालेला जॉब सोडला. जॉब सोडताना तिच्या बॉसने तिला सांगितल की “ज्या परीक्षेला ५ लाख विद्यार्थी बसतात आणि त्यातून फक्त ९० लोकं निवडली जातात. त्यासाठी आपलं पूर्ण करियर तू धोक्यात घालते आहेस असं वाटत नाही का तुला? त्यावर श्वेताने एक सेकंद वेळ न दवडता उत्तर दिल होतं…. “त्या ९० मध्ये मी एक असेन”.
२०१३ ला श्वेता ने पूर्ण मेहनत करत यु.पी.एस.सी. ची परीक्षा दिली. त्यात तिचं रँकिंग होतं AIR 497. तिचं आय.पी.एस. व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं.
पण तिला आय.आर.एस. बनता येणार होतं. ह्या नंतर घरून लग्नाबद्दल बोलणी सुरु झाली.
पण श्वेताच्या मनातलं तीचं स्वप्न तिला स्वस्थ बसून देतं नव्हतं. लग्न काय ३२ वर्षानंतर पण होईल पण ३२ वर्षानंतर मी यु.पी.एस.सी. देऊ शकणार नाही हे तिने आपल्या आई वडिलांना निक्षून सांगितलं.
पुन्हा एकदा २०१५ ला तिने परीक्षा दिली. अवघ्या १० मार्कांनी तीचं स्वप्न भंगलं.
तिचं रँकिंग होतं AIR 141. आता ती आय.पी.एस. साठी पात्र ठरली होती. पण अजूनही तीचं स्वप्न अपूर्ण होतं.
पुन्हा एकदा त्यासाठी तिने २०१६ ला परीक्षा दिली. आय.पी.एस. च तीचं ट्रेनिंग सुरु असताना एक दिवस तिचा फोन वाजला.
समोरून सांगितलं ‘श्वेता AIR 19’. हे ऐकताच श्वेताच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
श्वेता पश्चिम बंगाल राज्यातून पहिली आली आणि पहिल्या २० नंबर मध्ये तब्बल दशकानंतर कोणीतरी मुलीने पश्चिम बंगाल मधून मजल मारली होती.
हा आनंदाचा क्षण इतके वर्ष तिच्या आई वडील आणि तिने पाहिलेल्या स्वप्नपुर्तिचा क्षण होता.
अभ्यास करताना श्वेताने दोन वाक्य आपल्या अभ्यासाच्या टेबलवर मोठ्या अक्षरात लिहून ठेवली होती. ती होती,
The Alchemist, “When you want something, all the universe conspires in helping you to achieve it.”
Eleanor Roosevelt’s words, “The future belongs to those who believe in the beauty of their dreams.”
श्वेता ने ही वाक्य लक्षात ठेवून आपलं ध्येय मिळवलं होतं.
ज्या कुटुंबात मुलगी झाली म्हणून तिच्या आई वडिलांना हिणवलं गेलं. मुलगाच आपल्या कुटुंबाचं नाव मोठ करतो हा समज तिने आपल्या कर्तुत्वाने खोडून काढला आणि आपल्या कुटुंबाच्या आणि एकूणच भारतीय स्त्रियांबद्दल असलेला गैरसमज दूर केला.
प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आणि मनापासून इच्छा असेल तर ‘स्काय इज द लिमिट’ हे तिने भारतीय स्त्रियांना दाखवून दिलं. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर…
They had nourished and nurtured my dream just as strongly. It was a fruit of their hard work too. From now onwards, no one would ever walk up to my parents, especially my mother and say, ‘आपने बेटेके लिये try नहीं किया?’ (Why didn’t you plan a son?) To aspirants, I say, dream big. Don’t forget to back your dreams with hard work and determination.
अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधून आपलं शिक्षण पूर्ण करून स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आणि ती आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचं नाव पण वर नेऊ शकते हे श्वेता ने आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिलं आहे. अश्या ह्या दुर्गेस माझा नमस्कार आणि पुढल्या प्रवासासाठी शुभेच्छा.
वाचण्यासारखे आणखी काही…
कल्पनांना वास्तवात बदलवणारा जादुगर – आर्किटेक्ट बी. व्ही. दोषी
भाग्यासी काय उणे रे… (Wright Brothers Story)
चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.