राज्यपरिवाहन मंडळाला शिव्या देत रोहन मांडवे शिरपूर स्टँडला उतरला तेव्हा रात्रीचा दीड वाजून गेला होता. आता पुढे काय …..??? XXX…. संध्याकाळी आठ वाजता येणारी बस इतका वेळ लावेल याची त्याला कल्पनाच नव्हती. ठीक आहे दरवर्षी पावसाळ्यात रस्ते खराब होतच असतात पण आतापर्यंत फार त्रास झाला नव्हता.
शिरपूरमधील निलेवाडी हे साधारण चाळीस घरांचे त्याचे गाव. रात्री आठनंतर तिथे जाण्यासाठी काही वाहन नाही. सरकारी वाहन आणि मोबाइल रेंज अधूनमधून येते. त्याचेही गावात असे कोणीच नव्हते. स्वस्तात घर मिळाले म्हणून घेऊन ठेवले होते. सहा महिन्यातून एक फेरी मारायचा.
रात्रीचे दोन वाजले होते. तो खाली उतरताच भुंकणारी कुत्री अचानक शांत झाली होती. तो हसला. च्यायला…. ह्यांना बरोबर कळते कोण सज्जन आणि कोण वाईट आहे ते. पण ती कुत्री लांब उभी राहून परत भुंकू लागली. हे जरा जास्त धोकादायक आहे असे मनात म्हणत त्याने हातात काठी घेतली. आजूबाजूला भयाण काळोख पसरला होता. इथेच झोपायचे की चालत जायचे याचा विचार करू लागला. गाव म्हटले की भुते आलीच पण त्याला त्याची भीती वाटत नव्हती तर अचानक अंगावर येणाऱ्या जनावरांची किंवा पायाखाली येणाऱ्या साप विंचूची जास्त भीती वाटत होती. भुतं नाही तरी ते भेटतील याची खात्री होती त्याला. शेवटी इथे थांबण्यापेक्षा चालत जावे असे ठरविले. नाहीतरी चार किलोमीटर अंतर होते. असा विचार करून त्याने चालायला सुरुवात केली.
काही अंतरावर त्याला डाव्या बाजूला हालचाल जाणवली. कोणतरी माणूस होता हे नक्की…. त्याने मोठ्याने आवाज दिला “कोण आहे…..”?? दोन मिनिटांनी एक साधारण पन्नाशीचा गृहस्थ पँटीची चेन लावत बाहेर पडला. “कोण तुम्ही …..”?? त्या व्यक्तीने रोहनला विचारले.
“आठची गाडी आता आली शिरपूरला…. आता निलेवाडीला चाललो… तुम्ही …”?? रोहनने आपली ओळख करून दिली.
“मी वामन गीते….. बुलगावचा…. तुमच्या बाजूलाच. शिकारीला आलो होतो. दहा बारा जण होतो. डुकराच्या मागावर शिरलो आणि फाटाफूट झाली बघा. शेवटी एकटाच निघालो घरी” शेजारी ठेवलेला भाला हातात घेत त्याने उत्तर दिले.
“बरे झाले सोबत झाली… जाऊ एकत्र..” असे म्हणून रोहननं सिगारेट पेटवली दुसरी त्याला देऊ केली. त्याने नाकारली आणि खिश्यातून तंबाखूची पुडी बाहेर काढली. दोघेही चालू लागले.
“असे रात्रीचे फिरताना भीती वाटत नाही का हो .??? काहीतरी संभाषण असावे म्हणून रोहनने विचारले.
“कसली …?? जनावरांची काय भीती… ती असणारच… कधी कधी घराजवळून जातात” वामन सहज म्हणाला.
“मग भुतांची …”?? रोहन हसून म्हणाला.
“मुळात भुते असतात का….?? मोठा गहन आणि चर्चेचा विषय… कित्येक वर्षे मी असा शिकारीला जातोय पण भूत म्हणून कोणाला पाहिले नाही. माझा जन्म याच भागातला आणि आयुष्य ही याच भागात गेलेय…” वामन हसत म्हणाला.
दोघेही भराभर पाय उचलत निघाले.
“तुम्हाला एक जाणवले का ..??? दोघे आहोत म्हणून आपल्याला भीती वाटत नाही. वातावरण ही शांत आहे. जनावरांचा आवाजही ऐकू येत नाही” रोहन सहज म्हणाला. तसा वामन चरकला.
“अरे हो….माझ्या लक्षात आले नाही हे. घाबरलेत की काय आपल्याला….?? असे म्हणून जोरात हसला. थोड्या वेळाने रोहनचे घर आले तसे वामन उद्या भेटायचे आश्वासन देऊन पुढे गेला.
रोहन कुलूप उघडून आत शिरला आणि दमल्यामुळे तसाच झोपून गेला. सकाळी बाहेरच्या गोंगाटामुळे त्याला जाग आली. बाहेर आला तेव्हा ओसरीवर काही माणसे जमली होती.
“चला निघायचे ना ….??? एकाने आवाज दिला. तो काही बोलायच्या आत दुसऱ्याने आवाज दिला हो….. आले सर्व” असे बोलून सर्व निघाले . रोहन ही त्यांच्यात सामील झाला. कितीही झाले तरी गावकरी होता तो.
त्यांच्यासोबत तो गावाच्या स्मशानात आला. तसा तो फार कोणाच्या ओळखीचा नव्हता त्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही तरी त्याला फरक पडला नाही. पण त्याच्याकडे इतके दुर्लक्ष होत असलेले पाहून त्याला जरा खटकलेच. शेजाऱ्याला काही विचारायला जाणार इतक्यात वामन दिसला. हायसे वाटून त्याने हाक दिली. वामन त्याच्याकडे पाहून हसला.
“इथे कुठे ..? त्याने वामनला विचारले.
“प्रेताला आलोय …..” असे बोलून त्याने चितेवर ठेवलेल्या प्रेताकडे बोट दाखविले.
जवळ जाऊन त्याने पाहिले आणि तो हादरला….. चितेवर वामन शांतपणे आडवा झाला होता.
“वामन तुम्ही इथे….? मग काल….. ??? त्याने हादरून वामनला विचारले.
“हो….मीच होतो… परवा शिकारीला गेलो तेव्हा डुक्कर चालून आला डायरेक्ट अंगावर. फाडुनच गेला मला. जाग्यावरच गेलो….. मग पोलीस केस. रात्रीच बॉडी घरी आणली. म्हणून फिरत होतो मी. तू भेटलास म्हणून वेळ गेला…”असे म्हणून हसला.
“अरे पण इथे बिनधास्त कसा फिरतोयस तू …?? माझ्याशिवाय कोणालाच दिसत नाहीस का तू ..? रोहन भीतीने बोलला.
“नाहीच दिसणार कोणाला मी… फक्त तुलाच दिसतोय कारण आपण एकाच जातीचे आहोत…तू ही आमच्यातलाच झालाय आता….” वामन छद्मीपणे म्हणाला.
“म्हणजे….” रोहनने ओरडूनच विचारले.
काही न बोलता वामनने जवळ येणाऱ्या अँबुलन्सकडे बोट दाखविले. त्या अँबुलन्समध्ये रोहन अंगावर पांढरे वस्त्र पांघरून पडला होता. त्याच्या अंगाखाली अजूनही रक्त दिसत होते.
“हे कसे शक्य आहे….?? मला काय झाले….”?? धक्का बसून रोहन ओरडला.
“कालच परिवहन मंडळाच्या गाडीला अपघात झाला त्यात तुझ्याबरोबर अजून तीन जण गेले. आताच तुला इथे आणले आणि इथून मुंबईला घेऊन जातील… असे बोलून वामन चालू लागला.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.