एकाच वेळी अनेक गोष्टी करताय? थांबा मल्टिटास्किंग मधले तोटे जाणून घ्या

सध्याची जीवनशैली बघता अनेक काम एकाच वेळी करावी लागतात, किंवा केली जातात.

मात्र तुम्ही असं करत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण मल्टिटास्किंगचे फायदे फसवे आहेत

तुम्हाला कार्यक्षम बनायचं असेल तर एकाच वेळी सगळी कामं समोर घेऊन बसू नका…

एकाच वेळी अनेक गोष्टी करणं ही बाब आता कॉमन झाली आहे.

म्हणजे आपण चालताना चॅटिंग करत असतो. मीटिंग सुरू असताना ई-मेल्स पाठवत राहतो.

स्वयंपाक करताना फोन कॉल सुरू असतो.

अगदी जाहिरातींमध्ये सुद्धा आपण बघतो की प्रत्येक व्यक्ती एकाच वेळेला घरकाम आणि व्यावसायिक कामं एकत्र करताना दिसत असते.

एका वेळेला एकच काम तन्मयतेने एकाग्रतेने करणं हे थोडंसं आऊटडेटेड वाटतय का?

एका वेळेला बरीच कामं भराभरा आवरून ही तुम्ही तुमच्या बॉसच्या, नातेवाईकांच्या किंवा मित्रमंडळींच्या नजरेत भरीव कामगिरी करु शकत नाही.

आश्चर्य वाटलं हे वाचून?

पण हो खरंच आहे. मल्टिटास्किंग करणं, एकाच वेळेला अनेक कामांचा ढीग उपसणं हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हानिकारक ठरतं.

शिवाय जी कामं तुम्ही पटापट आवरता ती पूर्ण क्षमतेने व्यवस्थित अगदी परफेक्ट म्हणावी अशी झालेली नसतात.

म्हणजे मग त्या कामाचं समाधान ही तुम्हाला मिळणार नसतचं….

त्यामुळे खरंच थोडसं थांबा. जssरा विचार करा. आणि हे मल्टिटास्किंग खूळ डोक्यातून बाजूला काढा.

खरचं का थांबवलं पाहिजे हे मल्टिटास्किंग?

एकाच वेळी अनेक कामांचा फडशा पाडणं का बंद केलं पाहिजे हे जाणून घेऊया आजच्या लेखात.

1) प्रत्येक जण अष्टपैलू कलाकार नसतो.

अष्टपैलू कलाकार म्हणजे ती व्यक्ती जी एकाच वेळेला अनेक गोष्टी, अनेक कला लीलया हाताळत असते.

पण हा अष्टपैलू कलाकारसुध्दा एकावेळी एकच कला सादर करत बँलन्स साधत असतो.

आपल्यातलं सगळं कौशल्य एकावेळी वापरण्याचा अट्टाहास केला तर मराठीमध्ये एक म्हण आहे “एक ना धड भाराभर चिंध्या” तशी आपली अवस्था होऊन जाते.

एकीकडे भाजी चिरणं, दुसरीकडे कपड्यांचं मशीन तिसरीकडे इस्त्री सुरू करणं असे प्रकार तुम्ही करता का? आणि यात जर मोबाईलचा समावेश असेल तर बोलायलाच नको.

आपण एकापेक्षा जास्त गोष्टींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तर मेंदूच्या कामाला मर्यादा पडतात. कामाची क्वॉलिटी बिघडते.

एखादी गृहिणी किंवा केटरिंगची ऑर्डर घेणाऱ्या व्यक्ती पहा, पाक करणं किंवा एखादा अवघड पदार्थ करताना दुसरं कोणतंही काम ते करत नाही.

कारण नीट लक्ष दिलं नाही तर पदार्थ फसू शकतो. मग तो पदार्थ वायाच जाईल ना ?

पाय चार्ट तुम्ही बघितला असेल जो गोलाकार असतो. प्रत्येक गोष्टी साठी त्यात छोटे मोठे भाग पाडता येतात.

तसा चार्ट आपल्या कामाचा करायचा ठरवला तर त्यातला सगळयात मोठा भाग व्यापला जाईल खर्डेघाशी मध्ये.

त्यात उत्स्फूर्त उत्तम कामांसाठी फारशी जागाच उरणार नाही.

कारण मल्टीटास्कींग करताना हातातली सगळी काम पुर्ण करणं इतकं गरजेचं होऊन जातं की त्यात तुमच्यामध्ये असलेलं कौशल्य पुर्णपणे वापरता येत नाही.

त्या कामांवर तुमची स्वतः ची अशी खास छाप सोडता येत नाही.

गाण्याचा रियाज करताना हिशोब करता येईल का हो ?

एकतर टोटल चुकेल किंवा तुम्ही तरी बेसुर व्हाल.

2) मल्टिटास्किंगमुळे कामाच्या गतीचा वेग मंदावतो

एकाच वेळेला दोन ते तीन काम केल्यामुळे आपला वेळ वाचतो ही अतिशय भ्रामक कल्पना आहे.

खरंतर दोन काम एका वेळेला करताना दोन्ही कामांचा वेग आपोआप कमी होतो.

अगदी साधं उदाहरण घ्या, ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलत असाल तर ड्रायव्हिंग स्पीड नकळत कमी होतो.

चहा किंवा कॉफी पिताना चँटिंग सुरु असेल तर चहा कॉफी थंड होऊन जाते आणि मग त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकत नाही.

खरचं तुम्हांला वेळेची कदर असेल तर एकाच वेळी एकच काम नीट करा!

ईमेल्सना उत्तरं द्यायची आहेत? एकाचवेळी सगळे मेल्स चेक करा आणि उत्तरं द्या!

स्वयंपाक करणार आहात? मोबाईल बाजूला ठेवा आणि पुर्ण लक्ष स्वयंपाकावर केंद्रित करा!

वॉकिंग करताना फोन कॉल्स टाळा!

अभ्यास करताना गाणी, टीव्ही टाळली तरच परीक्षा उत्तम देता येते.

दहावी बारावीच्या मुलांना मुव्ही, गेटटुगेदर किंवा कार्यक्रमापासून आपण दूर ठेवतो ते ही याचसाठी की अभ्यासावरचं त्यांचं लक्ष इतर गोष्टींमध्ये गुंतू नये.

प्रत्येक कामाला वेगवेगळ्या मानसिकतेची गरज असते. त्यामुळे कामांची सरमिसळ अजिबात करु नका.

कामांची भेळ केली तर मनावरचा अनावश्यक ताण वाढून ह्रदयाचे ठोके मात्र अनियमित होतील आणि आजारांना खुलं आमंत्रण मिळेल.

3) छोट्या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष.

एका वेळी अनेक आघाड्यांवर धावताना बेसिक गोष्टींकडे दुर्लक्ष होऊन वेळ आणि एनर्जी वाया जाते.

कॉम्प्युटरवर काम करत जेवत असाल तर पाण्याचा ग्लास नकळत अशा ठिकाणी ठेवला जातो की धक्का लागून ग्लास पडतो आणि वेळ न वाचता कामाची यादी वाढते.

चालताना फोनवर बोलत जाणाऱ्या व्यक्ती खड्डे, दगड आणि गाड्यांकडं दुर्लक्ष करतात आणि अपघात ओढवून घेतात.

4) स्मृतीवर परिणाम.

कामाच्या ठिकाणी काही सूचना केल्या जात असतील त्यावेळी जर तुम्ही सोशल मिडीयावर बिझी असाल तर एखादी चूक हमखास घडते.

बरं ही चूक होऊ नये म्हणून सूचना देण्यात आली होती हे आपल्या लक्षात येतच नाही.

मल्टीटास्कींग करत असताना डोळ्यासमोर घडणारी आणि कानावर पडणारी प्रत्येक गोष्ट मेंदूपर्यंत पोचली असेल याची खात्री देता येत नाही.

यामुळे काय तोटे होऊ शकतात, कोणती परिस्थिती ओढवू शकते ह्याची भलीमोठी लिस्ट होऊ शकेल.

5) नातेसंबंधावर गंभीर परिणाम

आपलं मूल शाळेतून घरी आल्यावर उत्साहानं त्याचा दिवस कसा आहे सांगत असतं.

पण आपण जर कामात किंवा फोनवर बुडालेलो असू तर मूल नाराज होतं.

जेष्ठ नागरिकांच्या तब्येतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होतं आणि इमर्जन्सी ओढवू शकते.

तर सोशल मिडीयाच्या अतिरेकामुळे पती पत्नी मधला संवाद कमी होऊन चिडचिड वाढू शकते.

मल्टीटास्कींगचे हे फार गंभीर दुष्परिणाम आहेत.

6) अनावश्यक आहार

दहा मिनिटं शांतपणे बसून जेवण करणं हल्ली दुर्मिळ होत चाललं आहे.

जेवताना कॉम्प्युटर हाताळणं किंवा टी.व्ही पहाणं किंवा इतर कुठलं काम करत असाल तर जेवणातलं लक्ष उडतं.

त्यामुळे काय आणि किती खाल्लं याचं भान उरत नाही.

वजन वाढणं, मधुमेह असे दुष्परिणाम जाणवू लागतात.

7) मल्टीटास्कींग खरं शक्यच नसतं

तुम्हांला अभिमान असेल की मी एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकतो, अनेक जबाबदा-या सहज पार पाडू शकतो तर स्वतःला नीट निरखून पहा.

अनेक गोष्टींचे घोळ एकाच वेळी निस्तरण्यापेक्षा जी व्यक्ती एकेक काम नियोजनबद्ध पद्धतीने हातावेगळं करते, तीच व्यक्ती उत्तम, अगदी परफेक्ट काम करू शकते.

8) सर्जनशीलतेचं नुकसान

एखादं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं “अरे! यापेक्षा वेगळं आणखी चांगलं हे काम झालं असतं!”

तर हा तोटा आहे मल्टीटास्कींगचा. फक्त काम पुर्ण करण्यामध्येच आपण गुंतुन जातो, आणि त्यातले चांगले पर्याय निवडायचे राहूनच जातात.

बिर्याणी मध्ये उत्तम मसाले घालायचे राहून गेले तर ती बिर्याणी कुणाला आवडेल?

तसंच नेमकं घडतं, मल्टीटास्कींगमध्ये बिर्याणी तर तयार होते, स्वाद मात्र दुरावतो.

9) एका वेळी एकच काम

हा नियम प्रत्येकानं स्वतः ला लावून घ्यायला हवा.

एखादा छानसा चित्रपट पहाण्यासाठी आपण मित्रमंडळींबऱोबर जातो, तिथं मात्र आपल्या बिझनेसविषयी किंवा प्रोजेक्टविषयी कॉलवर बोलत बसलो, तर ना चित्रपटाचा आनंद लुटता येईल ना बिझनेसचं यश चाखता येईल.

प्रत्येक गोष्टीची वेळ ठरवली आणि त्याच वेळात तीच गोष्ट केली तर मात्र आयुष्य एंजॉय करता. येईल.

10) धोकादायक गोष्टींची शक्यता.

निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर आपण गप्पा मारता मारता किंवा फोटो काढता काढता दरीजवळ पोचू शकतो. अपघात घडू शकतो.

आजकल हँन्डस फ्री डिवाइस वापरताना भर रस्त्यावर चूक घडू शकते.

त्यामुळे कार चालवता आहात ड्रायव्हिंगवर लक्ष द्या, जेवण करता आहात प्रत्येक घासाचा आस्वाद घ्या.

सुट्टी एंजॉय करता आहात फोन बाजूला ठेवा.

अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्ही एकाच वेळी करणं टाळलं पाहिजे.

आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल, आपलं काम सर्वोत्तम ठरावं असं वाटत असेल तर एकावेळी एका कामावर लक्ष ठेवा.

मल्टीटास्कींगचा हट्ट सोडा आणि अधिक कार्यक्षम व्हा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।