फलक के तीर का देख क्या निशाना था…
उधर थी बिजली, इधर मेरा आशियाना था…
पहुंच रही थी किनारे पे कश्ती ए उम्मीद…
उसी वक्त इस तुफान को भी आना था.
एक्झिट पोलच्या परिणामांतुन ‘लोक्स’ बाहेर पडतात न पडतात तोच श्री पटेल साहेबांचा ‘महाएक्झिट’. बाजारांत सक्रिय एका मित्राला नाही सहन झाला.. आणि त्याने पाठविलेल्या या दर्दभऱ्या पुरेपुर शायरीने आज माझ्या दिवसाची सुरवात झाली.
मुंबई विद्यापिठाच्या बीकॉमच्या परिक्षेत अर्थशास्त्र या विषयांत अनुत्तीर्ण झाल्यापासुन या विषयाकडे परत अर्थशास्त्राकडे फिरकायचे नाही असे ठरविले आहे.
पण असे ‘काहीतरी’ होते, आणि मित्रांचे दुःखनिवारणार्थ काहीबाही खरडावे लागते. म्हणुन हा लेखनप्रपंच.
श्री. उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बॅकेच्या गव्हर्नरपदाचा राजिनामा दिला. आणि माध्यमांत ‘हडकंप’ (वृत्तवाहिन्यांचा आवडता शब्द) झाला.. बाजारांत तो आज होईल अशी ‘आशंका’ होती. या पार्श्वभुमीवर एक सामान्य गुंतवणुकदार म्हणुन माझे आकलन मला सांगावयाचे आहे.
या विषयावरुन तुफान राजकीय धुळवड उडेल हे अपेक्षित आहेच मात्र सर्वप्रथम मी स्पष्ट करतो की हा मुद्दा राजकिय नसुन असलाच तर आर्थिक आहे. निदान मी तरी याचे विष्लेषण त्याच कोनांतुन करणार आहे.
- सरकार आणि देशाची मध्यवर्ती बॅक यांचे परस्परांतील संबंध हे बहुधा सासु-सुनेतील संबंधासारखेच असतात की काय कोणास ठाऊक.
- घराबाहेरील त्रयस्थ व्यक्तींनी सासु/सुन प्रकरणाचे विष्लेषण करणे जसे चुकीचे, तसेच आपण सामान्य वाचक, गुंतवणुकदारांनी ह्या दोन बडया संस्थांच्या क्लिष्ट मुद्द्यांवरुन होणाऱ्या मतभेदांवर वर्तमान पत्रांत आलेला एखादा दुसरा लेख वाचुन मते बनवु नयेत असे मला वाटते.
- बहुतेकदा या दोन संस्थातील वाद हे आर्थिक, धोरणात्मक मुद्द्यांवरून होतात ज्या वादांना अनेक खोल कंगोरे असतात.
- त्यातच या वादांतील दोन्ही बाजुंकडे त्या त्या विषयांतील नियम, कायदे आणि पुरेपुर ज्ञान असलेल्या निष्णात अधिकाऱ्यांच्या फौजाही असतात. तेंव्हा दोन्ही बाजुंकडील भुमिकेपाठीमागे काहीतरी सबळ तर्क नक्कीच असतो.
- सबब ‘असं आहे का.. मग ह्यांचे चुकलेच…. ते बरोबर’ एवढा साधा सोपा मामला नसतो, एवढी खात्री आपण मनाशी बाळगली पाहिजे..
- आजच्या श्री. उर्जित पटेल साहेबांच्या राजिनाम्यास कारणीभुत काही मुद्द्यांचा मी लावलेला अन्वयार्थ पुढीलप्रमाणे –
- स्वायत्तता: या वादाची ठिणगी पडावयास कारण ठरले ते केंद्र सरकारने बॅंकेला पाठविलेले एक पत्र, ज्यातुन RBI च्या गेल्या 08 दशकांहुन अधिकच्या काळांत पहिल्यांदाच, केंद्रसरकारकडुन भारतीय रिज़र्व बैंक अधिनियम, 1934 मधील कलम ०७ चा वापर करुन “हम करे सो..’ प्रकाराची जाणिव बॅंकेला करुन देण्यात आली.. RBI च्या संचालक बोर्डावर सरकारने काही नेमणुका केल्या ज्यांचे आधीच्या संचालकांबरोबर मतभेद होवु लागले
- आयएल अँड एफएसचे पतन: निरव मोदीसारखी प्रकरणे याबाबत रिझर्व्ह बॅंकेची भूमिका अशा बाबींतुन सरकार वि. RBI अशा संघर्ष ठळक होवु लागला.
- अतिरिक्त निधी हस्तांतरण: आधीचे गव्ह्र्नर श्री राजन यांनी NPA विषयक धोरण बदलण्याचा (स्तुत्य) निर्णय घेतल्याने अनेक राष्ट्रियीकृत बॅंकांची स्थिती सलाईनवरील रुग्णासारखी झाली. prompt corrective action (PCA) च्या दंडुक्याने त्यांच्या कर्जे देण्यासारख्या अत्यावशक कामांवरही निर्बंध आले. ह्या स्थितीत सुधारणा करण्याबाबत सरकार आग्रही आहे. दुसरीकडे वित्तीय तुटीचे लक्ष गाठावयाचे असल्याने बॅकांची भाडवली संरचना बळाकट करणेकरिता सरकारकडे आवश्यक निधीचा तुटवडा आहे.
- अतिरिक्त निधी: याच वेळी RBI कडे 2.9 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी ‘contingency fund’ या नावाखाली उपलब्ध आहे. RBI नेहमीच्या धोरणाप्रमाणे आणिबाणीच्या परिस्थितीत वापरण्याकरिता एक प्रचंड मोठा निधी बाळगुन असते, वर उल्लेख लेलेला निधी हा त्या व्यतिरिक्त आहे. ह्या निधीचे संवर्धन होण्यास चालु सरकारची धोरणे (पेट्रोलियम पदार्थांचे भाव कमी न करणे ई) कारणीभुत आहेत अशी सरकरची धारणा आहे उलट RBI आपले अधिकार वापरुन आपला ताळेबंद अधिक मजबुत करण्याच्या प्रयत्नात आहे व असे भाडवल हस्तांतरण करणेस अनुत्सुक आहे.
- व्याजदर विषयक धोरण: औद्योगिक विकासाचा दर समाधानकारक वाढ दाखवित नसल्याने गव्हर्नरांनी व्याजदरांत कपात करावी अशी सरकारची धारणा आहे. ताज्या आकडेवारीनुसार चलनवाढीचे संकटही दुर होताना दिसते आहे. मात्र तरीही RBIने वित्तीय तूटीबाबत शिस्तपालन होत नाही, तोवर व्याजदर कपात करता येणार नाही अशी भुमिका घेत, उलट एकदा व्याजादरांत थोडीशी वाढच केली गेली आहे. दोन संस्थांमधील हाही एक मतभेदाचा मुद्दा आहे ( अर्थात हल्ली व्याजदाराचा निर्णय एकटे गव्हर्नर घेत नसतात तर MPC नामक एक समिती घेते, हा भाग अलहिदा)
- नोटबंदी: समजा,मी तुम्हाला सांगितले की मला मिळणाऱ्या ज्ञान उत्पन्नाच्या 99% रक्कम मी बेंकेत शिल्लक टाकतो, उरलेला 01% मात्र दैनंदिन बाबींकरिता खर्च होतो. तर याचा अर्थ तुम्ही काय घ्याल?? … त्याच चालीवर 99% चलन परत येणे. ही बाब कोणाही व्यवहार्य माणसाला का पटावी??. अर्थव्यवस्थेंत किती नोटा अस्तित्वात आहेत याचा हिशेबच RBI कडे नाही,असे का मानु नये?? नोटबंदीच्या या महत्त्वाच्या प्रश्नावर RBI कडुन हवी तशी पारदर्शकता दाखवली जावु शकली नाही असे मला वाटते.. खुप जास्त वेळ घेतल्यानंतर RBI कडुन चलनांतील 99% नोटा परत आल्याच्या खुलाशाने सरकार अडचणींत आल्याचे व नोटबंदी अपयशी झाल्याचे चित्र उभे राहिले. सरकारला या बाबत आणखी काही खुलासे अपेक्षित असावेत .
- मतभेद: कदाचित हे एक मतभेदांचे कारण असु शकेल आणि अर्थातच ईगो.. ह्या सर्वोच्च पातळीवरील ह्या संस्थांमधील संघर्षाला मोठे कोण?? ही सुप्त किनार अर्थातच आहेच. ती भारतातच नव्हे तर अनेक अन्य ठिकाणीही असते. या उपलक्षाने मोंटॅग्यु नॉर्मन या बॅंक ऑफ ईंग्लंड्च्या अतिशय लोकप्रिय (आणि तितकाच खमक्या म्हणुन प्रसिद्ध) असलेल्या गव्हर्नरना शासन व मध्यवर्ती बॅक यांच्यातील परस्पर संबंध कसे असावे ?? असा प्रश्न एकदा विचारला गेला… तेंव्हा त्यांनी अतिशय मार्मिक, गव्हर्नर यांची दुय्यम स्थिती दर्शविणारे उत्तर दिले होते..
“Like a Hindoo wife….” ते म्हणाले. “Advise strongly…. but quietly.”
- पण एवढे दुर कशाला? आधी ‘बहु’ च्या भुमिकेत असलेले पण नंतर ‘सांस’ ची भुमिकाही केलेले भारतांतील एकमेव .डॉ. मनमोहन सिंग यांनीही या विषयावर मोकळेपणाने भाष्य केले आहे. ‘Strictly Personal: Manmohan and Gursharan’ या पुस्तकांत ते लिहितात….“The governor of the Reserve Bank is not superior to the finance minister. And if the finance minister insists, I don’t see that the governor can refuse…..”
- आपल्याकडील सरकार वि. RBI गव्हर्नर यांच्यातील शीतयुद्धांचे दाखले द्यायचे तर पंडित नेहरुंचे वजनदार अर्थमंत्री TTK यांनी तत्कालीन गव्हर्नरांचा जाहिर पाणऊतारा केल्याने त्यांनी राजिनामा दिला होता.
- डॉ..मनमोहन सिंग गव्हर्नर असताना अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांच्याबरोबर त्यांचे तीव्र स्वरुपाचे मतभेद होते ज्यामुळे स्व. श्रीमती ईंदिराजींना मधे पडावे लागत असे..
- श्री. यशवंत सिन्हा यांच्याबरोबर न पटल्याने 1990 साली गव्हर्नर श्री आर.एन मल्होत्रा यांना पायऊतार व्हावे लागले..
थोडक्यांत काय..
- RBI गव्हर्नर यांचा सरकारबरोबरील मतभेदांमुळे राजिनामा ही काही न भुतो.. प्रकारची गोष्ट नव्हे.. अर्थात ‘जब एक बड़ा पेड़ गिरता है तो धरती हिलती है ही.. या उक्ती प्रमाणे या बातमीने रुपया लगोलग गडगडला आणि बाजाराचे पानिपत होणार असे संकेत SGX Nifty ने दिले होते..
- लोभ आणि भीती… ह्या ज्या दोन प्रमुख भावनांवर बाजार चालतात, त्यातील भीती ह्या भावनेची तीव्रता अधिक असल्याचे मानसशास्त्र सांगते. सबब अशी तीव्र नकारामत्क प्रतिक्रिया उमटणे सहाजिकच असते मात्र ती तात्कालिक असते..
दरम्यान लेख पुर्ण करण्यास थोडा विलंब झाल्याने व दरम्यानच्या काळांत बाजाराने ‘…झेपावे उत्तरेकडे’ या स्तोत्राचा जप केल्याने सर्वसामान्य “गुंतवणूकदारांनी कसे धिरोदत्तपणे वागावे” या विषयावरील उपदेशाचे डोस आणि सोबत मी मेहनतीने शोधुन काढलेली ‘Value Investing’ विषयावरील सुवचने आत्तापुरती टाळतो.
लेखन : प्रसाद भागवत
सौजन्य : www.arthasakshar.com
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.