वर्ल्ड पॉप्युलेशन क्लॉक सांगतं कि या पृथ्वीतलावर या घडीला साधारण ७.७ बिलियन लोक राहतात. यात सर्वांचाच रोजच्या जगण्यात आपापल्या पातळीवर संघर्ष चालू असतो. पाहायला गेलं तर पत्येक जण आयुष्यात एक युद्धच खेळत जातो. मात्र तो योद्धा जर सगळ्या परिस्थीला तोंड देऊन विजयी होऊन उभा राहिला तर सर्वांसमोर एक उदाहरण बनून जातो… असाच एक ‘फर्श से अर्श तक’ प्रवास आज आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत.
‘महाशय धर्मपाल गुलाटी’ MDH मसाल्याची जाहिरात आपण टीव्ही वर बघतो. त्यात दिसणारे आजोबा हे या मसाल्याचे मालक आहेत हे आता साधारण सर्वांच्याच परिचयाचे आहे. पण त्यांना हे यश सहजच मिळाले का? आजचे प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवी असलेले धर्मपाल गुलाटी देशातल्या अतिश्रीमंतांपैकी एक आहेत. पण त्यांचा प्रवास एका निर्वासितांच्या कॅम्प पासून सुरु झालेला आहे. आणि पुढे मोठ्या चिकाटीतून उभी राहिली ती हि जगापसिद्ध कम्पनी!!
महाशय धर्मपाल यांचा जन्म २७ जुलै १९२३ साली पाकिस्तानातील सियालकोट मध्ये झाला. त्यांचे वडील महाशय चुन्नीलाल आणि आई चनन देवी. त्या काळात पाचवी पर्यंत महाशय धर्मपाल यांचं शिक्षण झालं. त्यांचे वडील सियालकोटमध्ये मसाल्यांचं दुकान चालवत. वडलांनी धर्मपालांना साबणाची कम्पनी तर कधी कपड्यांचा व्यवसाय अशा छोट्या मोठ्या व्यवसायात गुंतवून बघितलं. पण धर्मपालांचं मन काही त्यात रमलं नाही. आणि शेवटी वडिलांनी त्यांना आपल्याच दुकानात कामाला लावून टाकलं.
१९४७ साली देशाची फाळणी झाली आणि स्थिरावलेलं कुटुंब पुन्हा एकदा डळमळलं. पाकिस्तानातच सारं काही सोडून दिल्लीतल्या केंट भागातल्या शरणार्थी कॅम्प मध्ये ते निर्वासित म्हणून राहू लागले. त्यावेळी त्यांच्याकडे १५०० रुपयांची जमापुंजी जवळ होती. आता पुन्हा सारं काही शून्यातून सुरु करायचं होतं. आणि वडिलांच्या छत्रछायेखाली राहण्याचं वय आता धर्मपालांचं राहील नव्हतं. कामाच्या शोधासाठी ते चांदणी चौक भागात फिरले. आणि ६५० रुपयांचा टांगा खरेदी केला. आणि दोन आणे स्वारी दराने काही दिवस टांगा चालवला. पण यात त्यांचं मन काही रमेना. आणि पुन्हा तो टांगा विकून मसाल्याच्या धंद्याची तजवीज करायला सुरुवात केली. आणि त्याचं नाव ठेवलं ‘सियालकोटवाले महाशियां दि हट्टी डेगी मिर्च वाले..’
पुढे मात्र दूरदृष्टी, मेहेनत, इमानदारी आणि गुणवत्ता यांच्या जोरावर हा धंदा चांगलाच फळाला आला. छोट्या दुकानाचं रूपांतर होता होता फॅक्ट्रीमध्ये झालं. आणि हे ‘महाशियां दि हट्टी’ बघता बघता एक ब्रँड बनलं. आणि MDH नावाने जगभरात नावारूपाला आलं. आजच्या घडीला या MDH चे आउटलेट भारतातले शहरं सोडले तर अमेरिका, इंग्लंड, कानडा, आफ्रिका, सिंगापूर अशा कित्येक ठिकाणी दिमाखात उभे आहेत.
वयाच्या ब्यांणवाव्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवेल असा जोश आजही धर्मपालजींमध्ये टिकून आहे. सकाळी साडेचार वाजता सुरु झालेली दिनचर्या रात्री आकरा वाजेपर्यंत ते आजही सुरु ठेवतात. आज समाजाला काही देण्याची स्थिती आहे तेव्हा त्यांच्या MDH ट्रस्ट मार्फत कित्येक शाळा, महाविद्यालयं, दवाखाने ते चालवतात. मित्रांनो, घरदार गेल्यानन्तर ते जर सारं काही संपलं असं समजून हातपाय गाळून बसले असते तर आज हे साम्राज्य उभं राहिलं असतं का? पाचवी शिकलेल्या माणसाला ‘फर्श से अर्श तक’ चा हा प्रवास करता आला. तर कोणालाही तो शक्य आहेच ना!! फक्त हवी ती जिद्द, चिकाटी.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.