भारतभर भ्रमंती करणारे नेहमीच ट्रेन ने प्रवास करतात.. भारतात ट्रेनचा प्रवास इतका सुखकर झाला आहे की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सुद्धा फिरायला काही अवघड वाटत नाही..
पण प्रवासाला जायचे म्हणजे एकाच गोष्टीची भीती वाटते.. दोन तीन सुटकेस, पिशव्या, बॉक्स, पोती असे बरेच सामान वाहून न्यावे लागते..
वाहून नेले की ते आपल्या बोगीत चढवावे लागते.. ह्या सगळ्या धावपळीत एवढे सामान उचलायचे कसे ही काळजी किंवा एखादी पिशवी पडून जाईल की काय ह्याची भीती असतेच..
मात्र रेल्वे स्थानकावर लाल कपड्यातील ते ‘कुली’ नामक सांता क्लॉज आपल्या मदतीला धावून येतात..
थोडी फार पैशांची बोलाचाली केली की ते झटक्यात आपले समान स्थानकाच्या गेट पासून आपल्या सीट पर्यंत नेऊन देतात..
प्रवास संपल्यावर आपल्या बोगी पासून पुन्हा टॅक्सी पर्यंत सामान पोचवून द्यायला हे हमाल बंधू तत्परतेने पुढे येतात..
एवढे जड सामान आपल्याला हव्या त्या जागे पर्यंत मिळाले की आपण खुश आणि प्रत्येक बॅग मागे ठरवून दिलेले पैसे दिले की ते कुली ही खुश..!!
खरंच किती कष्टाचे काम आहे नाहीं का हे..??
ह्या हमाल बांधवांचे शरीर सुद्धा अगदी पिळदार होत असेल इतके समान उचलून उचलून..
ह्या क्षेत्रात फक्त आणि फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असणार हे साहजिकच आहे..
पण मंजू नावाची ३३ – ३४ वर्षांची युवती देखील तितक्याच तत्परतेने मोठ्या मोठ्या बॅग्स उचलून प्रवाश्यांचे सामान गेट पर्यंत पोहचवून देते म्हटल्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही..
छे एक स्त्री ह्या क्षेत्रात असेलच कशी हो..?? इतके सामान उचलणे काय गंमत आहे..?? अशीच प्रतिक्रिया सगळ्यांची येणार.. येतही राहते..
मात्र मंजू आपले काम नेटाने करताना दिसते..
पुरुषांच्या अनेक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करतातच..
मात्र हमाली मध्ये आजवर स्त्रिया उतरल्या नव्हत्या.. कामाची लाज वगैरे वाटत नाही…
पण हे शक्तीचे, बल लावून करायचे काम आहे.. साहजिकच स्त्रियांच्या शरीर रचनेसाठी अवघड..!!
मग ह्यात स्त्रिया दिसत नसतील तर ह्यात आश्चर्यकारक काहीच नाही.. असे असताना देखील भारतातील पहिली महिला हमाल/ कुली बनलीये ही जयपूरची मंजू..
चला तर आज भेटूया ह्या कर्तबगार मंजू ला..
तीन लहान लेकरांची आई असलेली ही मंजू जयपूरच्या रेल्वे स्थानकावर महिला हमाल म्हणून इतर १७७ हमालांच्या बरोबरीने कामावर जाते.
तशी मंजुला आधी कधी काम कारायची वेळ नव्हती आली.. मात्र काळाने तिच्या सौभाग्यवर घाला घातला आणि मंजुवर तिच्या लहान मुलांसाठी हमालीचे काम करण्याची वेळ आली..
महादेव, मंजुचा नवरा हा हमालीचे काम करून कुटुंबापूरते पैसे कमवायचा..
परंतु लिव्हरच्या काही आजारामुळे त्याचे अचानक निधन झाले.. आता शिक्षण कमी आणि त्यात तीन मुलांची जबाबदारी असताना मंजुला काही काम करणे भाग होते..
तिच्या सासरच्यांनी नवऱ्याच्या निधनानंतर तिला काहीही मदत केली नाही..
मग मंजुने स्वतःचे आणि लेकरांचे समान भरले, जी जमा होती ती रक्कम घेतली आणि जयपूर रेल्वे स्थानकाजवळ राहायला आली..
कोई माई का लाल किसींको दो वक्त की रोटी नही दिला सकता..🌹
क्यूंकि, रोटी दिलाने वाला तो वो मालिक है.. 🌹
जिसने हर इंसान को दो हाथ दिये है और कहा है की 🌹
चिर दे जमीन का सीना और निकाल ले अपने हिस्से की रोटी….🌹
कुली सिनेमातला हा अमिताभ बच्चनचा डायलॉग अगदी तिच्या लाईफ स्टोरीला साजेसा ठरलाय..
‘मंजुही अपने हिस्से की रोटी’ साठी काम करायला सज्ज झाली..
मंजू म्हणते, “माझ्या माहेरी बरीच माणसे आहेत मात्र ते स्वतःचीच गुजराण मोठ्या मुश्किलीने करत असताना मी माझ्या तीन मुलांसकट त्यांच्या वर आणखीन कुठे भार देणार होते..?? म्हणून मी देखील माझ्या नवऱ्याप्रमाणे हमालीचे काम करायचे ठरवले.. मुलांच्या भविष्यासाठी मला काम करायलाच हवे होते. कधी कधी वाटते मी सुशिक्षित असते तर एखादी चांगली नोकरी तरी केली असती. पण आता माझ्या नशिबी हमाली करण्यावाचून गत्यंतर नाही..”
तिच्या नवऱ्याच्या मित्रांमुळे आणि तिची परिस्थिती पाहता तिचीही हमाल म्हणून पटकन वर्णी लागली..
युनियनच्या अधिकाऱ्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता तिला मदत केली..
थोडे ट्रेनिंग घेतल्यावर ती बिल्ला नंबर १५ अशी ओळख घेऊन हमालीच्या कामावर रुजू झाली..
पोटापाण्यासाठी काम मिळणे खरे तर तिला काहीच अवघड झाले नाही..
अगदी पटकन तिला तिच्या कुटुंबासाठी कमाई करण्याची संधी मिळाली.. पण इथून पुढे मात्र तिचे काम अवघड होतं गेले..
अर्थातच कुठल्याही कामावर जिथे आपल्या सोबतीला स्त्रियाच नसतील आणि भवताली फक्त पुरुष को – वर्कर असतील तिथे कोणत्याही स्त्रीला काम करणे अवघडच असणार..
तिलाही सुरुवातीला फार अवघड वाटले.. जो पर्यंत तिचा नंबर येत नाही तो पर्यंत तिला पुरुष हमालांच्या घोळक्यात थांबून राहावे लागत असे.
आता बसून गप्पा तरी काय मारणार.. ती आपली अंग चोरून कामाची पाळी येई पर्यंत गपचूप बसून राहायची..
तिची पाळी आली की तिला सामान उचलायला जावे लागे.. मात्र तेही तिच्यासाठी एक मोठे आव्हान होते..
बारकुडया शरीरयष्टीच्या मंजुला समान उचलणे जमत नसे.. एखादी बॅग देखील डोक्यावर उचलून न्यायची म्हणजे डोंगर उचलल्यासारखे तिला भासत असे..
कित्येकदा ती अडखळली आणि पडली देखील..
त्यातून पहिली महिला कुली म्हटल्यावर लोक तिच्याकडे पाहत बसायचे..काही कुतूहलाने तर काही कुत्सितपणे..!!
एवढेच काय तर गावातले लोक खास महिला हमालाला काम करताना बघायलाही उगीच स्टेशनवर गर्दी करायचे..
मंजुला अशा नजरांना तोंड देत काम करणे खूपच अवघड झाले होते.. तिला खूप लाज ही वाटत असे..
एकांतात तिला रडू फुटायचे.. कधी वाटायचे हे काम सोडून दुसरे एखादे सोप्पे काम करावे का..??
कुठे ह्या पुरुषांच्यात मिसळून काम करायचे..?? कश्या एवढाल्या बॅगा उचलायच्या..??
आणि आता तिला काही झाले तर मुलांना कोण बघणार..?? ह्या विचारांमुळे ती खूप बेचैन व्हायची..
शेवटी तिने स्वतःचे मन घट्ट केले.. सहजतेने मिळालेली नोकरी घालवायची नाही.. हे तिने मनाशी पक्के केले..
तिने पुरुष हमाल बांधवांबरोबर काम करायला वाटणारी लाज बाजूला ठेवली.. कामावर लक्ष केंद्रित केले.
कितीही जड सामान असो, ते ती स्वतःच्या जिद्दीने उचलायला शिकली..
आता तिथे सगळे हमाल बांधव आणि ती खेळीमेळीने एकत्र काम करतात.. तिला कोणाची मदतही भासत नाही सामान उचलायला..
हे अनुभव सांगताना मंजू म्हणते, “आता मला पुरुष हमाल बंधूंबरोबर काम करायला अवघडल्यासारखे वाटत नाही.. आणि हो माझी शारीरिक बळकटी वाढल्याने आता मी सामानही आरामात वाहून नेऊ शकतेय. मात्र तरीही मी म्हणेन की हा अवघड जॉब आहे.. कारण ट्रेन आल्यावर प्लॅटफॉर्म वर भरपूर गर्दी असते आणि त्या गर्दीतून जड सामान घेऊन वाट काढत झपाझप जाणे हे कौशल्य असते.. हे कळले आणि जमले की तुमचा रस्ता सोपा होतो..”
मात्र काम चांगले जमले तरी राजस्थानच्या गर्मीत काम करणे हे देखील एक दिव्यच आहे..
गर्मीत जास्ती काम झेपत नसल्याने ती हिवाळ्यात तीन शिफ्टस मध्ये कामं करते.. इतर हमालांप्रमाणे, ग्राहकांशी सामान आणि पैशाचा भाव करण्यात तीही अगदी चलाख झाली आहे..
इतके कष्ट घेतल्याने ती कित्येकदा थकूनही जाते.. परत थोडी विश्रांती घेऊन कामाला लागते. तरी कधी कधी एखादा दिवस असा जातोच ज्या दिवशी तिला एकही रुपया कमावता येत नाही..
त्यातून स्टेशनवर लागलेले एस्केलेटर्स आणि चाकाच्या बॅग्स मुळे हमालीच्या कामावर बराच परिणाम झाला आहे..
कितीदा माणसे हमाल न करता आपापले सामान स्वतःच घेऊन जातात.. किंवा कमी पैशात हमालाला ठरवतात..
ह्यामुळे हमलांची कधी कधी काहीही कमाई होत नाही.. त्यातून स्त्री हमाल म्हणून तिला कमी लेखले जाते..
काही ग्राहक तिला तुच्छ लेखून तिला कमी पैसे घ्यायला भाग पडतात..
मात्र अशा सगळ्या आयुष्याच्या सर्कशीत मंजुने कधीही हार नाही मानली..
तिच्या हमाल युनियन चे चेअरमन कौतुकाने म्हणतात की, “मंजू फक्त राजस्थानचीच पहिली महिला पोर्टर (कुली) नाही तर आख्या उत्तर पश्चिमी प्रदेशात कोणी महिला पोर्टरच नाही.. तिच्या कष्टाला आणि हिमतीला आम्ही सगळेच मानतो..”
तीन लेकरांची आई असलेली ही हिम्मतवान माता आपल्या मुलांना शिकवून खूप मोठे करू इच्छिते..
कामाच्या मधूनअधून कित्येकदा मंजू स्टेशन जवळच असलेल्या आपल्या झोपडी वजा छोट्याश्या घराकडे एक चक्कर मारते..
तिथे तिची मुलं तिची वाट पहात असतात.. तिची मोठी मुलगी आठवीत, दुसरी पाचवीत आणि लहान मुलगा दुसरीत शिकत आहेत.. त्यांच्या शिक्षणाचा खर्च एक दानवीर कुटुंब करत आहे..
मंजू आपल्या लेकरांसाठी खूप कष्ट घेते आणि अजूनही आनंदाने घ्यायला तयार आहे..
परिस्थितीला चांगलीच टक्कर देत आहे.. इतके अवघड आयुष्य असूनही मंजू म्हणते, “मला कशाची कमी नाही. कष्ट करायची लाज नाही.. माझ्यासारख्या अजून स्त्रियांनाही मला माझ्या सोबत पुढे न्यायचे आहे. आयुष्य सुंदर आहे.. ते आनंदाने जगायचे आहे..”
चैतन्य जिच्या नसानसात सळसळते अशा ह्या मंजूला पाहून कित्येक हतबल स्त्रियांना मनाची उभारी मिळत असेल.. तिच्या ह्या कष्टाला आणि हिमतीला आमचाही सलाम..
तुम्हाला मंजूची कहाणी कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा.. आणि आपल्याही अवतीभवती मंजूसारखे असे सन्मानाने आपली रोजी रोटी मिळवण्यासाठी धडपडणारे कष्टकरी असतील तर त्यांचीही माहिती कमेंट्स मध्ये सांगायाला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.