इंदिरा बॅनर्जी, गीता मित्तल, मंजुला चेल्लूर, निशिता निर्मल म्हात्रे या आपल्या देशात अलीकडेच मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम सांभाळलेल्या महिला. पण एक काळ होता जेव्हा भारतात महिलांसाठी वकिलीचे क्षेत्र खुले नव्हते.
महिला न्यायमूर्तीच काय पण वकील सुद्धा होऊ शकत नव्हत्या. अश्या या काळात महिलांसाठी वकिलीचं क्षेत्र खुलं करणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला वकील आहेत ‘कार्नेलिया सोराबजी’ अभिमानाची गोष्ट म्हणजे यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिक मधला.
अत्यंत बुद्धिमान, महत्त्वाकांक्षी, देखणी पण संवेदनशील अशी कार्नेलिया ही खरसेटजी व फ्रान्सिना सोराबजी या नाशिक जवळील देवळाली येथील पारशी दाम्पत्याच्या सात मुलींपकी पाचवी मुलगी.
तिला एक लहान भाऊही होता. खरसेटजींनी वयाच्या अठराव्या वर्षीच ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आई हिंदू होती, पण तीदेखील फोर्ड नावाच्या ब्रिटिश, कॅथलिक ख्रिश्चन दाम्पत्याने दत्तक घेतल्याने ख्रिश्चन झाली होती. त्यामुळे लहानपणापासूनच झोरास्ट्रीयन व ख्रिश्चन धर्माचे संस्कार तिच्या अंगवळणी पडले होते.
कार्नेलियाच्या आईने मुलींना मराठी, उर्दू माध्यमाच्या शाळातून शिकवण्याचे काम विनामूल्य केले. आसपासच्या स्त्रिया अडचणीच्या काळात सल्ला मागायला आईकडे येत असल्याचे कार्नेलियाने नेहमी पहिले होते.
या गोष्टीचा तिच्यावर खूप परिणाम झाला होता. आणि अशा अडचणीत असलेल्या स्त्रियांसाठी काहीतरी केले पाहिजे हे तिने लहानपणापासूनच ठरवले होते.
तो काळ होता १८७० ते ८० मधला. स्त्रियांना शिकण्याची बंदी होती. त्या काळात मुलींना शिक्षणाची परवानगी नसल्याने कार्नेलियाच्या मोठय़ा बहिणींना मॅट्रिक्युलेशनची परीक्षा देता आली नव्हती.
कार्नेलियाच्या वडिलांनी सतत खटपट करून, विद्यापीठाला नियम बदलण्यास भाग पाडले. त्यामुळे ती मात्र परीक्षा देऊ शकली. ‘बॉम्बे’ विद्यापीठातून मॅट्रिक झालेली ती पहिली मुलगी! तेव्हापासून तिला अनेक गोष्टींत पहिलेपणाचा मान मिळाला. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये तिनं प्रवेश घेतला तेव्हा ती एकटी मुलगी होती.
तिला वर्गात बसू न देण्याच्या इतर मुलांच्या प्रयत्नांना तिने धिटाईने आणि यशस्वीपणे तोंड दिलं. १८८७ मध्ये तिनं बी.ए. ची पदवी मिळवली. त्या वर्षी प्रथम वर्ग मिळवणाऱ्या केवळ चार विद्यार्थ्यांपकी ती एक होती. तिला विद्यापीठाचा हॅवलॉक पुरस्कार व हिग्लग शिष्यवृत्तीही मिळाली.
ऑक्स्फर्डला जाऊन, अनेक अडथळे पार करत ती १८९२ साली कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाली. ब्रिटिश विद्यापीठातून कायद्याची परीक्षा उत्तीर्ण होणारी ती पहिली भारतीय महिला होती.
इंग्लंडमध्ये नामांकित कायदेतज्ज्ञांकडे थोडासा अनुभव घेऊन १९२४ साली ती भारतात परतली. तत्कालीन कायद्यानुसार महिला वकील म्हणून काम करू शकत नव्हत्या.
याविरोधात कार्नेलियाने संघर्ष केला. अनेक महिलांना त्यांनी कायद्याचा माेफत सल्ला देताना महिलांना वकिली पेशाला परवानगीची मागणी केली. त्यांच्या लढाईपुढे सरकार झुकले ब्रिटिश सरकारने १९२४ मध्ये महिलांना वकिलीची परवानगी दिली.
या काळात आपल्या समाजात वारसाहक्क, इस्टेटीच्या वाटण्या, गादीचा हक्क, दत्तक व सावत्र मुलं यांचे प्रश्न मोठय़ा प्रमाणावर असत. स्त्रियांना पडदा पाळावा लागत असे. त्या अशिक्षित असल्याने त्यांना बहुतेक वेळा फसवलं जाई.
शिवाय कटकारस्थानं मोठय़ा प्रमाणावर चालत. या साऱ्यात कार्नेलियाने कायदेशीर सल्लागार म्हणून काम करायचा निर्णय घेतला. शेवटपर्यंत ती या स्त्रियांसाठी व मुलांसाठीच संघर्ष करत राहिली.
एका बाजूने कायदेशीर मार्ग शोधत असतानाच कार्नेलियाने या स्त्रियांच्या समस्या मांडण्यासाठी लेखनाचा मार्गही अवलंबला होता. ‘लव्ह अँड लाइफ बिहाइंड द परदा’ हे तिचं पहिलं पुस्तक १९०१ मध्ये इंग्लंडमध्ये प्रकाशित झालं.
यात तिने पडदा पाळणाऱ्या स्त्रियांच्या व्यथा, त्यांची भावनिक आंदोलने तसेच त्यांच्यावर होणारे अन्याय मांडले.
स्त्रियांना कोणी वाली नाही अशी समाजाची स्थिती असताना या स्त्रियांसाठी ती देवदूतासारखी होती. एकदा तर घरातल्या नातेवाईकांनी एका विधवा राणीला कैद करून ठेवली, उपासमार केली व तिची इस्टेट गिळंकृत करण्याचा डाव रचला.
त्या राणीच्या आईने कार्नेलियाला ही माहिती दिली. तिने अक्षरश: जिवावर बेतले तरी त्या राणीची सुटका करून तिची इस्टेट तिला मिळवून दिली.
तिच्या सुटकेची चित्तथरारक कथा कार्नेलियाच्या शब्दात वाचताना आपल्याला रहस्यमय चित्रपट पाहिल्यासारखे वाटते, आणि दुसरीकडे तिची अवस्था पाहून अस्वस्थता येते. पालखी, धमणी, घोडा इत्यादी वाहनांचा उपयोग करताना केलेल्या प्रवासातल्या अडचणी, तिचे प्रसंगावधान, अनेक प्रकारे केलेल्या तडजोडी पाहून थक्क व्हायला होते. कार्नेलियाच्या आत्मचरित्रात हा उल्लेख आढळतो.
अविवाहित कार्नेलियाला मुलांविषयी लळा होता, त्यांच्या व स्त्रियांच्या प्रकृतीची होणारी हेळसांड यामुळे तिचे मन व्यथित होई. या मुलांच्या कथा तिने ‘सन बेबीज’ मध्ये एकत्र केल्या आहेत. कार्नेलिया वकील असल्या बरोबरच एक प्रतिभावान लेखिका आणि समाजसुधारक सुद्धा होती.
कार्नेलियाने १९०७ मध्ये सहायक वकिल म्हणून बंगाल, बिहार, ओडिसा, आसाम मधील कोर्टात काम पाहिलं. पुढे १९२९ मध्ये हायकोर्टातील वरिष्ठ वकील म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या. स्त्रियांसाठी विद्यापीठाची, कोर्टाची, शिक्षणाची, बंद दारं स्वत:च्या उदाहरणाद्वारा उघडणारी कार्नेलिया परदेशातही यासाठी कुतूहलाचा विषय ठरली. १९५४ साली वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेणारी कार्नेलिया महाराष्ट्राचं आणि त्याबरोबरच तीचं जन्मठिकाण असलेल्या नाशिक, देवळालीचंही नाव इतिहासात लिहून गेली.
(मिठा जमशेद लाम यांचाही उल्लेख काही ठिकाणी पहिल्या महिला वकील म्हणून आढळतो.)
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.