‘जिंदगी’ ह्या एका शब्दाने सुरु होणारी, आणि त्या त्या मुडनुसार आयुष्याची व्याख्या करणारी अनेक गाणी बॉलीवुडमध्ये आहेत, जगण्याला हसत खेळत सामोरं जा, असा संदेश देणारं गाणं म्हणजे, सदाबहार देवानंदचं, सदाबहार गाणं, “मै जिंदगी का साथ निभाता चला गया!”……..खरचं, आयुष्य प्रत्यक्षात इतकं इतकं सोपं असतं का? कोणाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, कुणाची करीअरची गाडी धक्क्याला लागत नाहीये, कूणाला कसल्या ना कसल्या शारीरीक तक्रारी आहेत, कुणी भरघोस उत्पन्न देईल, अशा उत्पन्नाच्या शोधात आहे.
बॉलीवुडला जिंदगी ह्या शब्दाचं भलतंच अट्रॅक्शन आहे, ‘अंदाज’ चित्रपटामध्ये ड्रिमगर्ल हेमामालीनीला आपल्या अलिशान बुलेटवर बसवुन शहरातल्या रस्त्यावर फिरवणाऱ्या देखण्या राजेश खन्नाने, ‘जिंदगी इक सफर है सुहाना’ असं म्हणत लोकांना वेड लावलं होतं.
मात्र हाच बाबुमोशाय, राजेश खन्ना, ‘आनंद’ मध्ये मात्र, समुद्रकिनारी चालत, ‘जिंदगी कैसी है पहेली हाये?” असं विचारत, धीरगंभीर चेहऱ्याने, वावरतो, त्यात ‘कभी ये हसाये, कभी ये रुलाये’ हे आयुष्याचं सत्य ही वर्णन करतो.
‘जिंदगी’ ह्या एका शब्दाने सुरु होणारी, आणि त्या त्या मुडनुसार आयुष्याची व्याख्या करणारी अनेक गाणी बॉलीवुडमध्ये आहेत, जगण्याला हसत खेळत सामोरं जा, असा संदेश देणारं गाणं म्हणजे, सदाबहार देवानंदचं, सदाबहार गाणं, “मै जिंदगी का साथ निभाता चला गया!”
खरचं, आयुष्य प्रत्यक्षात इतकं इतकं सोपं असतं का? कोणाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, कुणाची करीअरची गाडी धक्क्याला लागत नाहीये, कूणाला कसल्या ना कसल्या शारीरीक तक्रारी आहेत, कुणी भरघोस उत्पन्न देईल, अशा उत्पन्नाच्या शोधात आहे.
कोणी आजुबाजुच्या जवळच्या भांडखोर लोकांपासुन त्रस्त आहे, कोणी कर्जाच्या डोंगराने परेशान आहे, कोणी किरायाच्या घरामुळे व्याकुळ आहे, तर कूणाला आपल्या मुलांमुलींच्या सुरक्षिततेच्या चिंता सतावत आहेत.
कुणाला आपल्या गमावलेल्या आप्तेष्टांच्या आठवणी सतावत आहेत, आणि कोणी भरल्या घरात, सर्व सुखसुविधा पायाशी असुनही, उत्साहाच्या अभावाने, एक प्रकारच्या रितेपणामुळे निराशेने ग्रस्त होवुन प्रेमासाठी भुकेला आहे.
हे कमी म्हणुन की काय, रोजच संघर्षाचे छोटेमोठे प्रसंग आमच्या आयुष्यात यायला आतुर असतातच, ‘जिंदगी हर कदम एक नयी जंग है’, ही आमची अवस्था, आणि स्वप्नं मात्र ‘जिंदगी प्यार का गीत है’, मग हा अवघड प्रवास करावा तरी कसा?
त्यासाठी आज मी तुम्हाला एक पंचसुत्री सांगणार आहे. ही पाच सुत्रे जर पाळली, तर आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व समस्या, सर्व प्रॉब्लेम्स, चुटकीसरशी ‘छुमंतर’ म्हंटल्या बरोबर पळुन जातील!
१) कितीही गंभीर समस्या असो, त्याकडे आश्चर्याने बघा
- आज दुकानात नौकर नाही आला, “अरे वा!, बघु आज, काय काय अडतयं त्याच्यावाचुन!”
- आज घरी कामवाली नाही आली, “असं का? मज्जा आहे मग आज!”
- पंचवीस तारीख आहे, पैसे संपत आलेत, “छान, मस्त काटकसर करु आता पाचसहा दिवस!”
- तो माझ्यावर निष्कारण चिडला, “अरे, तो असंपणं करतो का? असु दे! असु दे!”
- तिने माझ्याशी उगीचचं भांडण केले, “हो का? किती मज्जा, आता रुसवा काढायची संधी मिळणार!”
- बघा, कसलीही, कितीही भयानक समस्या आणा, ह्या फॉर्मॅटमध्ये ठेवुन बघा, आश्चर्य व्यक्त केल्यास, समस्येची तीव्रता अचानक नाहीशी होते.
- “ओह! हे असं आहे का?, अरे! हे असं पण असतं का? ओके!”
आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळुन जातात. समजा, एखाद्याचा दात तीव्रपणे ठणकतोय, आता इथे कसा काय मार्ग काढणार, एक उपाय आहे, डोळे बंद करुन, त्या दुखणाऱ्या दाताकडे संपुर्ण लक्ष द्या, त्या त्रासदायक संवेदना अनुभवा, त्या ठिकाणी शंभर टक्के मन एकाग्र करा, आणि वेदनांची तीव्रता कमी होईल.
गंमत अशी आहे, की प्रत्यक्ष वेदना तितकं दुःख देत नाहीत, जितकं वेदनांमुळे मनात येणारे विचार परेशान करतात, वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते!
२) भुतकाळात घुटमळणे बंद करा
बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते,
- “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मीही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.”
- “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.”
- “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!”
- “मी खुप कमी पगारावर काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.”
- “त्या कार्यक्रमाच्या दिवशी, ती मला अशी म्हणाली!”
- अरे! व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना, विसरुन गेलेलं, बरं!
३) इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे!
बहुतांश दुःखांच मुळ हे तुलनेत असतं.
- त्यांचं पॅकेज बारा लाखाचं आहे, मी कधी पोहचणार त्या ठिकाणी?
- त्यांच्याकडे इनोव्हा आहे, आपल्याकडे खटारा गाडी!
- ते मेट्रो सिटीत राहतात, किती ऐश करतात, नाहीतर आपण?
- ती किती सुंदर दिसते. स्लीमट्रीम! माझं वजन थोडं जास्तच आहे.
- हिला सासुचा ‘जाच’ नाही, किती ‘सुखी’ आहे ही!
- तीचा नवरा तिचा प्रत्येक शब्द झेलतो, माहीत्यीये!
इत्यादी इत्यादी..
ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवअद्वितीय आहे, गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगऱ्याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता येईल का? प्रत्येक फुल अद्वितीय आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक फळाचा स्वतःचा एक गोडवा आहे, एक चव आहे, आंबा रसाळ, चवदार म्हणुन चिक्कु, अननस खराब म्हणावेत का? संत्रा-मोसंबीने ईर्ष्या करावी का? केळीने माझे नशीबच फुटकं म्हणुन रडत बसावे का? सफरचंद-डाळींबाने आत्महत्या कराव्यात का?
कोणतं फळ चवदार आहे, कुणात औषधी गुणधर्म आहेत, कोणी पाणीदार आहेत, कोणी कोरडी. ज्याचं त्याचं एक वैशिष्ट्य आहे, जसं फळांचं, तसंच, माणसांचं!, कोणी शार्प बिजनेसमन आहे, कोणी प्रचंड मेहनती आहे, कोणी कलाकार आहे, कोणी बोलुन मनं जिंकण्यात तरबेज, कोणी प्रेमळ आहे, कोणी शिस्तप्रिय, कोणी यशासाठी भुकेला आहे, कोणी प्रेमासाठी आतुर!
आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी व्हायचं!
तुम्हाला माहीत्येय, ह्या जगात साडेसहा अब्ज लोक राहतात, आणि प्रत्येकाच्या हाताचे ठसे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचा चेहरा एक दुसऱ्यापासुन वेगळा आहे, म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय आहे, तुम्हीपण!..
४) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा.
आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे. आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहऱ्यावर हसु फुलवण्यासाठी आहे!
जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदाऱ्यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या, मोकळे आणि रिते व्हा, प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा!
माणसाला दोन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या दोनच गोष्टी सापडतील
- अपुर्ण स्वप्ने
- ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!
बघा! किती गंमतीशीर आहे हे
समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थाऱ्यावर राहत नाही, चिडचिड वाढते.
आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, (प्रत्येकाचे होतच असते) मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु, जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो.
आयुष्य कशासाठी? जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत! स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन!
५) सेवा करण्याऱ्याला आत्मिक समाधान मिळते.
बघा! किती मजेशीर आहे हे,
- अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,
- दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.
- झाड तप्त सुर्याचा उन्हाचा मारा सहन करतो, आणि वाटसरुला सावली देतो,
- ज्यात कसलंही पौष्टीक तत्व नाही असे गवत, गाय खाते, आणि सकस, चविष्ट दुध देते.
- सुर्य जिथं भरपुर पाणी आहे, त्याची वाफ करतो, ढग बनवुन, जिथं पुरेसं पाणी नाही, अशा दुष्काळी प्रदेशात पाऊस पाडतो.
आणि म्हणुनच की काय, ह्या सर्वांना आपल्या संस्कृतीत पुजनीय मानलं गेलयं.
काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे? इतरांसाठी निस्वार्थपणे काहीतरी करण्यामध्ये एक वेगळे समाधान आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
विचार करण्या सारखं नक्कीच कारण जिंदगी पहेली आहे माणूस विचार करून च जगतो
नक्की करायला पाहिजे पण आपण करीतच नाही या गोष्टी…..