आपले शरीर सशक्त आणि निरोगी ठेवण्यासाठी त्याला पोषणाची गरज असते. हे पोषण अन्न आणि पाणी या रुपाने मिळते. शरीर जिवंत ठेवण्यासाठी अन्न आणि पाण्याची नितांत आवश्यकता असते.
परंतु हे अन्न अथवा पाणी दूषित अवस्थेत आपल्या शरीरात गेले तर त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात. अस्वच्छ आणि दूषित अन्न अथवा पाणी पोटात गेले असता वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्यातील एक महत्त्वाचा आजार म्हणजे फूड पॉयझनिंग.
फूड पॉयझनिंग म्हणजे नक्की काय?
दूषित अथवा निरनिराळ्या विषाणूंमुळे संक्रमित झालेले अन्न अथवा पाणी पोटात गेले असता होणारा त्रास म्हणजे फूड पॉयझनिंग. बहुतेक वेळा जरी असा त्रास झाला तरी तो काही दिवसात बरा होतो. परंतु लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि वृद्ध यांना रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे या आजाराचा जास्त त्रास होऊ शकतो. वारंवार फूड पॉयझनिंग झाले तर पोटावर त्याचा कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फूड पॉयझनिंग होणे टाळावे.
असंतुलित आहार आणि अनियमित जीवनशैली यामुळे फूड पॉयझनिंग होण्याचा धोका जास्त असतो. जेव्हा अन्न वायरस बॅक्टेरिया किंवा विषाणूमुळे दूषित होते तेव्हा त्याचा संसर्ग पोटात होतो.
फूड पॉयझनिंग होण्याची कारणे
असंतुलित आहार आणि अनियमित जीवनशैली हे फूड पॉयझनिंग होण्याचे प्रमुख कारण आहे. त्याशिवाय खालील कारणांमुळे देखील फूड पॉयझनिंग होऊ शकते.
१. शिळे अन्न खाणे.
२. अन्नपदार्थ तयार करताना वापरले गेलेले पाणी दूषित असणे.
३. अन्नपदार्थ झाकून न ठेवता ते उघडे ठेवल्यामुळे त्यावर माशा बसतात. अशा माशांमुळे ते पदार्थ दूषित होऊन त्यांचे सेवन केले असता फूड पॉयझनिंग होऊ शकते.
४. रस्त्यावर मिळणारे उघड्यावरील पदार्थ खाणे. असे पदार्थ तयार करताना कोणतीही स्वच्छता राखली जात नाही. तसेच रस्त्यावरील धूळ आणि खराब पाणी या पदार्थांमध्ये मिसळले जाऊ शकते. असे खाणे फूड पॉयझनिंगला निमंत्रण देऊ शकते.
५. घरी अथवा इमारतीमध्ये असलेल्या पाण्याच्या टाक्या जर वेळोवेळी स्वच्छ केल्या नाहीत तर त्यात साठवलेले पाणी दूषित होऊ लागते. असे पाणी प्यायल्यामुळे अथवा स्वयंपाकासाठी वापरल्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते.
६. खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले नाहीत तर अशा अस्वच्छ हातामुळे अन्न दूषित होऊन फूड पॉयझनिंग होऊ शकते.
फूड पॉयझनिंग झाले असण्याची लक्षणे
१. तीव्र स्वरुपाची पोटदुखी.
२. दर १० ते १५ मिनिटांनी उलटी होणे.
३. वारंवार जुलाब होणे.
४. काहीही खाल्ले असता ते ताबडतोब उलटून पडणे.
५. डोकेदुखी
६. अतिशय जास्त अशक्तपणा येणे. कमजोरी वाटणे. काहीवेळा भोवळ देखील येऊ शकते.
७. ताप येणे.
फूड पॉयझनिंग होऊ नये म्हणून काय करावे?
१. कोणताही पदार्थ बनवण्याआधी आपले हात साबण वापरून स्वच्छ धुवावेत.
२. पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाणारी भांडी, चॉपिंग बोर्ड आणि चमचे इत्यादी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत.
३. कच्चे मांसाहारी पदार्थ जसे की चिकन, मटण, मासे इतर पदार्थांपासून लांब ठेवावेत अन्यथा कच्चा पदार्थांमधील जिवाणूंचे संक्रमण होऊ शकते.
४. कच्चे मांसाहारी पदार्थ तयार करण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावे.
५. सर्व फळे व भाज्या विशेषतः पालेभाज्या वापरण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्याव्यात.
६. तयार पदार्थ स्वच्छ भांड्यांमध्ये काढावेत.
७. खूप वेळ उघडे राहिलेले किंवा शिळे झालेले पदार्थ खाऊ नयेत. तसेच एक्सपायरी डेट उलटून गेलेले पॅकबंद खाद्यपदार्थ खाऊ नयेत..
८. वैयक्तिक स्वच्छता राखावी. तसेच पाळीव प्राणी असतील तर त्यांचीही काळजीपूर्वक स्वच्छता राखावी.
९. प्रवास करत असताना घरचे खाणे खावे. तसेच स्वच्छ पाणी प्यावे. बाहेरील खाद्यपदार्थ घेणे शक्यतो टाळावे.
१०. खाल्लेले अन्न नीट पचावे यासाठी नियमित प्रोबायोटिक्स घ्यावेत. अथवा आहारात दह्याचा समावेश असावा.
फूड पॉयझनिंग झाले असता कोणती पथ्ये पाळावीत?
फूड पॉयझनिंग हा आजार बरा होत असला तरी तो काही प्रमाणात गंभीर आजार आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांसाठी हा आजार अधिक त्रासदायक ठरू शकतो. लहान मुले, वृद्ध आणि गरोदर स्त्रिया यांनी फूड पॉयझनिंग होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी. तसेच फूड पॉयझनिंग झाले असता खालील पदार्थ खाऊ नयेत.
१. कच्चे, अर्धवट शिजवलेले मांस खाऊ नये.
२. अर्धवट शिजवलेले मासे खाऊ नयेत.
३. कच्ची अथवा अर्धवट शिजवलेली अंडी आणि त्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत.
४. मोड आलेली कडधान्य न शिजवता खाऊ नयेत.
५. न तापवलेले दूध अथवा अनपाश्चराईज्ड ज्यूस घेऊ नये.
फूड पॉयझनिंग वरील घरगुती उपाय
१. भरपूर प्रमाणात पाणी आणि अथवा द्रव पदार्थ पिणे
फूड पॉयझनिंग झाले असता उलट्या व जुलाब होतात. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन रुग्णाला डीहायड्रेशन होऊ शकते. असे होऊ नये म्हणून रुग्णाने भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. तसेच इतर द्रवपदार्थ जसे की नारळाचे पाणी, भाताची पेज, सूप, इलेक्ट्रॉल पावडर आणि पातळ खिचडी यांचे सेवन भरपूर करावे.
२. जिरे
फूड पॉयझनिंग झाल्यावर जिऱ्याचे सेवन उपयोगी पडते. फूड पॉयझनिंग मुळे होणारी पोटदुखी थांबण्यासाठी एक चमचा जीरे भाजून घेऊन त्याची पूड करून ती सूप अथवा पातळ खिचडी मध्ये मिसळून खावी.
३. तुळस
तुळशीच्या दहा-बारा पानांचा रस काढून त्यात मध मिसळून त्याचे सेवन करावे. असे दिवसातून दोन ते तीन वेळा करावे. बराच फरक पडतो.
४. केळे
केळ्यामध्ये पोट्याशियम भरपूर प्रमाणात असते. केळ आणि दही यांचे सेवन केल्यास फूड पॉयझनिंग पासून आराम मिळतो.
५. सफरचंद
फूड पॉयझनिंग मुळे होणारे इन्फेक्शन कमी करण्यास सफरचंदाचे सेवन उपयुक्त ठरते.
६. लिंबू
लिंबा मध्ये असणारे ऍसिड आणि विटामिन सी फूड पॉयझनिंग करणाऱ्या विषाणूंना नाहीसे करते. एक चमचा लिंबाच्या रसात साखर मिसळून पिण्यामुळे फूड पॉयझनिंगचा परिणाम खूप कमी होतो.
७. ॲपल साईडर विनेगर
ॲपल साईडर विनेगर मध्ये असणाऱ्या क्षारांमुळे फूड पॉयझनिंग करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात.
८. पुदिना
पुदिन्याची पाने वाटून त्यांचा रस पिण्यामुळे पोट दुखी कमी होते. चहात मिसळून देखील पुदिन्याचे सेवन करता येते.
तर हे आहेत फूड पॉयझनिंग वरील प्रभावी घरगुती उपाय. शक्यतो फूड पॉयझनिंग होणे टाळावे परंतु काही कारणामुळे ते झाल्यास वरील उपाय जरूर करावेत.
काहीवेळा घरगुती उपायांचा उपयोग होत नाही. अशावेळी डॉक्टरांना संपर्क करावा.
खालील लक्षणे दिसल्यास रुग्णाला त्वरित दवाखान्यात घेऊन जावे.
१. फूड पॉयझनिंग बरोबरच ताप देखील येत असेल.
२. जुलाबा वाटे रक्त पडत असेल.
३. उलटी होणे मुळीच थांबत नसेल.
४. तीन दिवसांपेक्षा जास्त काळ वरील सर्व त्रास होत असेल.
५. शरीरावर रॅश येत असतील.
६. अतिशय अशक्तपणा येऊन भोवळ येत असेल
७. श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असेल
८. हार्ट रेट वाढला असेल
अशी लक्षणे आढळल्यास दुखणे अंगावर न काढता त्वरित दवाखान्यात जावे.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.