उत्साह कमी पडतोय? कंटाळा आलाय? नवीन सुरुवात करायची भीती वाटते? मग या ‘फुलों की रानी’ची गोष्ट वाचा आणि उत्साहाने फुलून जा!
मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा लेख शेवट्पर्यंत वाचा, मला खात्री आहे, हे वाचून कधीही कोणती अडचण तुम्हाला मोडू शकणार नाही.
८० च्या वयात नवीन बिझिनेसची सुरुवात? खोटं वाटतं ना?
आजकाल जिथे अगदी तरुण लोकं सुद्धा कधीकधी एखादी वाईट परिस्थिती आली की हताश, निराश होऊन जातात. नोकरी नाही, म्हणून हातपाय गाळून बसतात.
तिथे एक ८० वर्षांची बाई, ती सुद्धा चालू-फिरू न शकणारी, व्हीलचेअर वर असलेली, चक्क एका बिझिनेसची उत्साहाने सुरुवात करते!
अशा प्रेरणादायी कथा वाचल्या की आपल्याला नवीन हुरूप येतो, मनावरची मरगळ निघून जाते.
आत्ताच्या या काळात तर अशा प्रेरणादायी कथांची आपल्या सगळ्यांना खूपच गरज आहे आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी ‘स्वदेश चड्ढा’ या ८० वर्षांच्या बाईंची गोष्ट घेऊन आलोय.
स्वदेश यांनी वयाच्या ८० व्या वर्षी वेगवेगळी, दुर्मिळ फुलं सजवून (अरेंज करून) विकायचा नवीन बिझिनेस, स्वतःच्या जोरावर सुरु केला.
त्यांचं या बिझिनेस मागचं प्रयोजन काय होतं? फुलंच का? त्यांनी कशी आणि कुठून सुरुवात केली आणि लॉकडाऊन झाल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांचा हा बिझिनेस कसा चालू ठेवला हे आपण आज बघणार आहोत.
स्वदेश चड्ढा, म्हणजेच त्यांच्या अगदी जवळच्या लोकांसाठी राणी! यांनी ‘फुलों की रानी’ या नावाने फुलांचा व्यवसाय सुरु केला.
स्वदेश या खरंतर रावळपिंडी, पाकिस्तान इथल्या रेफ्युजी.
फाळणीच्या वेळेस त्यांचा परिवार उत्तर प्रदेश येथील झांशीला स्थलांतरित झाला आणि तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या.
वयाच्या पंचविसाव्या वर्षीच त्यांचे एका आर्मी ऑफिसरशी लग्न झाले.
आर्मी ऑफिसर असल्याने साहजिकच त्यांची बदली भारतभर होत होती आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर राणी यादेखील भारतभर फिरल्या.
असं फिरत असतानाच त्यांना वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या फुलांची आवड निर्माण झाली.
राणी सांगतात की त्यांची जेव्हा देहरादूनला पोस्टिंग होती तेव्हा त्यांनी इतकी सुंदर बाग फुलवली होती की ती बाग म्हणजे त्यांची ओळखच होऊन गेली होती.
लोकं येता-जाता आवर्जून त्यांच्या बागेतली फुलं बघायला त्यांच्या घरी डोकावून जायची.
आपल्या आईबद्दल कौतुकाने बोलताना पुनीता, (राणी यांची मुलगी) सांगतात की,
त्यांच्या आईच्या हातातच जादू आहे. त्यांनी लावलेलं कुठलंही झाड बहरतंच.
आपल्या आईच्या फुलांच्या आवडीबद्दल बोलताना पुनीता आणखी एक किस्सा सांगतात.
ते सगळे एकदा फिरायला काश्मीरला गेले होते, तिथे दाल लेकमध्ये बोटीतून फिरताना, राणी यांचं लक्ष तिथल्या एका सुंदर जांभळ्या रंगाच्या कमळाकडे गेलं आणि त्याक्षणी त्यांना वाटलं की ते कमळ त्यांच्या घरी फुललं पाहिजेच आणि उत्साहाच्या भरात त्यांनी चक्क तलावात उतरून त्या कमळाचं रोप मुळासकट घेतलं आणि खरोखरच देहरादूनला ते लावलं. नंतर बरीच वर्ष ते कमळ त्यांच्या दारात होतं.
फुलांची एवढी प्रचंड आवड असणाऱ्या रानी जेव्हा दिल्ली सोडून गुरुग्रामला त्यांच्या लेकीकडे राहायला आल्या, तेव्हा त्यांना नेहमी वाटायचं की इथे दिल्ली सारखी सुंदर फुलं नाहीत.
आणि यातूनच त्यांना या नवख्या बिझिनेसची कल्पना आली. दर शनिवार-रविवार त्या पुनिता यांच्याबरोबर Artisanal Market मध्ये जायच्या.
त्यामुळे तिथेच स्टॉल लावावा या त्यांच्या कल्पनेला पुनितानी पाठिंबा दिला आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांचा पहिला स्टॉल लागला सुद्धा!
पुनिता सांगतात की या नव्या बिझिनेसची सुरुवात केल्यावर राणी खूपच उत्साहात असायच्या, त्यांच्या जगण्याला जणू नवीन कारणच त्यांना मिळालं होतं.
ऑक्टोबर ते मार्च त्यांचं काम फारच जोरात चालू होतं. काही दिवस तर दिवसाला सहा हजार इतकं जास्त त्याचं उत्पन्न असायचं.
अर्थातच बिझिनेस म्हटलं की सगळे दिवस काही सारखे नसतात त्यामुळे कधी कधी त्यांना म्हणावा असा रिस्पॉन्स ही नाही मिळायचा पण एकंदरीत त्यांच्या या बिझिनेसचा आलेख चढताच होता.
लॉकडाऊन सुरु झाल्यावर मात्र जवळजवळ महिनाभर राणी यांना काम थांबवावं लागलं पण या महिनाभरातच त्यांना त्यांच्याकडून नियमितपणे फुलं घेणाऱ्यांचे फोन यायला लागले, ते फुलांची मागणी करत असत.
या अवघड दिवसात त्यांना ही या फुलांचा आधार वाटतो, घरात फ्रेश वाटतं असं ते सांगायचे.
मग काय राणींनी नवीन जोमाने घरूनच काम सुरु केलं. त्यांनी फोन/मेसेजवरून ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आणि फुलांची डिलिव्हरी सुरु केली.
हे सगळं त्या नेमकं कसं जमवून आणतात?
राणी कधी थेट शेतकऱ्यांकडून तर कधी होलसेलवाल्यांकडून फुलं विकत घेतात आणि त्यांची अरेंजमेंट करून आपल्या क्लायंट्सना पाठवतात.
कधीकधी त्यांना अगदी हवी तशी, त्यांच्या मनासारखी फुलं मिळतात तर कधीकधी ही फुल राणींकडे पोहोचतानाच पार मरगळलेली असतात.
अशी फुलं आली की मग त्या आठवड्यात मात्र त्यांना विश्रांती घ्यावी लागते.
बिझिनेस झाला नाही तरी त्यांना चालतं पण त्यांना कमी दर्जाची फुलं डिलिव्हरीसाठी पाठवणं पटत नाही. बिझिनेस म्हटलं की काही एथिक्स पाळल्या पाहिजेतच, नाही का?
त्यांच्याबद्दल अजून एक कौतुकाची गोष्ट म्हणजे फुलं डिलिव्हरीसाठी पाठवली की त्या आपल्या क्लायंटला त्या फुलांची काळजी कशी घ्यायची, आठवडाभर त्यांना ताजतवानं ठेवण्यासाठी काय करायचं याचा मेसेज करतात.
खरंतर त्यांनी हे सांगितलं नाही तर क्लायंटकडची फुलं कदाचित लवकर सुकून जातील आणि पर्यायाने राणी यांच्याकडे येणाऱ्या ऑर्डर वाढतील पण राणी एथिक्सच्या पक्क्या आहेत हे यावरून लक्षात येतं.
आपल्याकडून लोकांना उत्तम दर्जाचीच फुलं गेली पाहिजेत आणि ती जास्तीतजास्त दिवस ताजी राहिली पाहिजेत याबद्दल त्या आग्रही असतात.
त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे जी फुलं मिळतात ती एरवी बाजारात मिळणाऱ्या फुलांपेक्षा दुर्मिळ असतात..
या सगळ्या नियमांचं त्या काटेकोर पालन करतात. असं असताना त्यांचे क्लायंट्स खुश नसतील तरच नवल आहे.
त्यांच्याकडून नेहमी फुलं घेणाऱ्या लोकांकडून त्यांच्याबद्दल फक्त कौतुकाचेच शब्द बाहेर पडतात.
या वयात फुलं मागवणे, त्यांचा दर्जा तपासणे, त्यांची योग्य ती काळजी घेऊन डिलिव्हरीला पाठवणे आणि यानंतर त्यांची काळजी कशी घ्यायची याचा मेसेज करून पाठवणे हे कौतुकास्पद आहेच.
आश्चर्याची आणि कौतुकास पात्र असलेली अजून एक गोष्ट म्हणजे वयाच्या फक्त ३४ व्या वर्षीच राणी यांना arthitis झाला होता.
आणि ९०च्या दशकात त्यांचं हिप रिप्लेसमेंटचं ऑपेरेशन झालं होतं. आत्ता त्या चालू शकत नाहीत, व्हीलचेअरवर असतात पण त्यांच्या चेहऱ्यावर कायम प्रसन्नता असते. त्या कायमच उत्साहाने सळसळत असतात.
कदाचित याच उत्साहामुळे या वयात, इतक्या प्रॉब्लेम्सना तोंड देत, परिस्थितीची तक्रार न करता, रडत कुढत न बसता त्यांनी त्यांच्या आवडीचं रूपांतर बिझिनेसमध्ये केलं.
राणी यांचा स्वभाव लक्षात घेता एव्हाना आपल्याला याचा अंदाज आलाच असेल की लॉकडाऊनच्या काळात त्या आपल्या क्लायंट्सना प्रत्यक्ष भेटणे, त्यांच्याशी गप्पा मारणे या गोष्टी त्या फार मिस करतात पण ही कसर त्यांनी क्लायंट्सशी ऑनलाईन संवाद साधून भरून काढली आहे.
क्लायंट्सना केवळ सूचनाच देत नाहीत तर त्यांच्या शंकांचं निरसन सुद्धा करतात.
यासाठी त्या WhatsApp आणि Facebook चा वापर करतात. दर आठवड्याला दिल्लीमध्ये जवळजवळ शंभर कुटुंबांना ‘फुलों की रानी’कडून फुलांची डिलिव्हरी होते, आणि दिवसेंदिवस हा अकडा वाढतच आहे.
आयुष्यात अनेक चढऊतार बघून सुद्धा राणी नेहमी प्रसन्न असतात आणि आयुष्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन प्रचंड सकारात्मक आहे असं पुनिता सांगतात. त्या म्हणतात की, ‘त्यांना व त्यांच्या मुलांना हे बाळकडू राणींकडूनच मिळालं आहे.’
‘फुलों की रानी’ मधून येणाऱ्या नफ्याचं काय करतात असा प्रश्न पडणं साहजिक आहे. त्याबद्दल माहिती देताना राणी सांगतात की हे सगळे पैसे त्या त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करतात, का?
तर भविष्यात त्यांच्या नातवंडांना उपयोगी पडतील म्हणून!
या हसऱ्या, उत्साही ‘८० वर्षांच्या तरुणीकडून‘ शिकण्यासारखं खरंच आहे ना? आम्हाला खात्री आहे की इथून पुढे तुम्हाला एवढ्या तेवढ्या कारणावरून मरगळ वाटली की तुम्हाला या फुलों की रानीची नक्की आठवण येईल.
यातून काय शिकाल?
- वयाच्या कुठल्याही टप्प्यावर हार मानू नका.
- नोकरी गेली, व्यवसाय बुडाला (जे या कोरोना काळात नॉर्मल झालं आहे) तरी आजूबाजूला बघून, शांतपणे विचार करा, नक्की काहीतरी व्यवसायाची संधी सापडेल.
- आरोग्य साथ देत नसेल, तर हा राणी चड्ढा यांचा, अरुणिमा सिन्हा चा खडतर प्रवास आठवून बघा.
https://manachetalks.com/8930/mhatarpan-ha-aayushyacha-shevt-nsto-he-dakhvun-denarya-pendse-aajimanachetalks/
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.