लग्नकार्याची लगबग आपल्याला चांगलीच परिचित असते पण आमचा हरी धावून जायचा कोणत्याही अंत्ययात्रेला!! आणि घरच्यांना मोठा आधार व्हायचा कारण हा, सगळे सोपस्कार पूर्ण करूनच तिथून निरोप घ्यायचा….
आमच्या हरीला मी जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा मला पु. ल.च्या नारायणाची आठवण होते. फक्त नारायण लग्न कार्यासाठी पुढे असायचा तर हरी लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे असतो. काहींच्या अंगात एखादी गोष्ट भिनलेलीच असते तशी याला अंत्यसंस्काराला जायची हौस. अगदी रस्त्यातून जाताना कोणाचीही अंत्ययात्रा दिसली की हा पाच पावले तरी त्याच्याबरोबर जाणार आणि वेळ असेल तर सगळे सोपस्कार पूर्ण करून येणार. सर्व धर्माच्या अंत्ययात्राना त्याने उपस्थिती लावली असेल.
हरी उर्फ हरीचंद्र तसा साधारण माणूस. एक छोट्या फॅक्टरीत तिन्ही पाळ्यांत काम करणारा. पण कुठूनही त्याला कोणाच्या मृत्यूची खबर आली की हा फॅक्टरीतून निघालाच. हा सर्व रजा लोकांना पोचवण्यातच संपवतो की काय…?? असा विक्रम नेहमी विचारायचा. बरे मयत झाले तिथे हा वादळासारखा यायचा आणि सारी सूत्रे आपल्या ताब्यात घ्यायचा. मग सतत आजूबाजूच्यांना सूचना. एक मात्र खरे त्याला बघून सगळ्यांना हायसे वाटायचे. घरातल्यांना तर आता मयतावर सर्व विधी काळजीपूर्वक होतील याची खात्री व्हायची. तर आलेल्या सर्वांना मोठ्या जबाबदारीतून सुटलो याची खात्री व्हायची.
त्याचे सर्व पद्धतशीरपणे ठरले होते. बंड्या म्हणतो अंत्यसंस्काराची SOP बनवायची झाली तर हरिकडे जावे लागेल.
ह्याला कोणी गेल्याचा फोन केला की हा विचारणार “किती वाजता काढणार… ?? मग घरी जाऊन त्याप्रसंगी घालायचे कपडे बाहेर काढणार. नाही हो …….. ते पांढरे कपडे नाही. एक काखेखाली फाटलेला टी शर्ट . त्यावर कोणत्यातरी मंडळाचे नाव लिहिलेले होते. अर्थात ते मंडळ कुठे आहे हे अजूनपर्यंत आम्हाला कळले नाही. एक काळी थ्रीफोर्थ. हे कपडे घालून हरी निघाला की समजावे कोणतरी गेलाय.
हा माणूस सतत माणसांच्या अंतिमयात्रेचाच विचार करत असतो का …?? हा आम्हाला पडलेला अजून एक प्रश्न . एके दिवशी हा आमच्याबरोबर चहा प्यायला बसला होता तेव्हा समोरून चव्हाण मास्तर आले. मास्तर निवृत्त. वय साधारण सत्तर असेल पण अंगाने भारी. हा बराच वेळ त्यांच्याकडे निरखून पाहत बसलो होता. शेवटी ते गेल्यावर मी चिडून विचारले “काय पाहत होतास रे म्हाताऱ्यांकडे इतके.. ?? त्याने हळूच सांगितले “मास्तर शांतीसदनमध्ये चौथ्या मजल्यावर राहतात. बरे तिथपर्यंत गाडी जात नाही. खाली जागा ही कमी. उद्या म्हातारा मेला तर ह्याला चौथ्यां मजल्यावरून खाली आणताना किती हाल होतील रे आणि नंतर त्या गल्लीतून बाहेर काढताना तिरडीही थोडी तिरपी करावी लागेल. ह्यांच्यासाठी सामान आणताना साधारण यांचे वजन किती असेल ते मयताचे सामान आणाऱ्याला सांगायला विसरू नकोस”…झाले विक्रमने ताबडतोब हात जोडले. “हरी ..किती पुढचा विचार करतोस”.
“अरे तुमचे काय जाते ….मलाच सगळे पाहावे लागणार. माझा त्रास कमी व्हावा म्हणून बघावे लागते सर्व. आम्ही आदराने मान डोलावल्या.
ज्या ठिकाणी मयत होते तेव्हा घरच्यांना काही सुचत नसते पण हा हजर झाला की सगळ्यांना कामाला लावतो. “ए तुम्ही दोघे सामान आणायला जा आणि हो हार फुले मिळतील तिथूनच आणा उगाच दहा ठिकाणी फिरू नका. प्रेताची नीट माहिती घेऊन जा तिथे काही उलट सुलट सांगू नका. मागच्यावेळी नारूआप्पा गेले तेव्हा टोपीच आणायची विसरलात. बरे ती गावावरून माणसे आली होती त्यांच्या डोक्यावर टोपी होती. त्यातली एक कामाला आली नाहीतर रात्री कोण धावेल त्या टोपीसाठी ??? मग घरात घुसून मोठ्याने विचारेल सर्टिफिकेट कोणाकडे आहे. त्याला तिथे रडत असणारी माणसे बाया कोणीच दिसत नाही फक्त कर्तव्य दिसते. कोणतरी सर्टिफिकेट त्याच्या हातात देतो. ह्याची सुरनळी करून कोणाच्यात घालायला ठेवलीस. स्मशानात कोण गेलाय? समोरून उत्तर येते कोणी नाही. तसा हा बाहेर जातो आणि समोर येईल त्याच्या हातात ती देऊन ऑर्डर सोडतो जरा स्मशानात देऊन ये ?? वय मृत्यूची वेळ, नाव नीट चेक कर आणि हो ती पाच नंबरची चिता माग. तिथे वारा छान लागतो एकदा आग पेटली की बघायला नको. सामान येईपर्यंत तो मयताच्या सर्व चांगल्या वाईट आठवणी काढत बसतो. घरातलेही मयताचे एव्हडे पराक्रम ऐकून अचंबित होतात.
सामान आल्यावर याचा हात वेगात चालू लागतो. तिरडी बांधून झाली की ह्याची ऑर्डर सुटते बॉडी आणा बाहेर. एकदा बॉडी बाहेर आली की त्यावेळच्या परिस्थितीनुसार ह्याचे मयतावर क्रियाकर्म चालू होतात. कोणी म्हणते आंघोळ घालूया तर हा खेकसतो सकाळी आंघोळ करूनच गेला ना मग आता परत काय गरज..?? पाय धुवा फक्त. सगळे चूप. कारण परिस्थिती आता फक्त हरीच्या हातात असते. खांदेकरी ही तोच ठरवितो. स्मशानात गेल्यावर जणू आपणच इथले राजे अशी त्याची वागणूक असते. प्रेताला पाणी पाजायला समुद्रवरच घेऊन गेले पाहिजे असा त्याचा हट्ट असतो. मला आठवते एकदा तरुण मुलाच्या प्रेताला आम्ही गेलो तेव्हा अजून याचे लग्न झाले नाही तेव्हा आधी लग्न लावले पाहिजे असे बोलून रुईचे झाड शोधायला गेला तो अर्ध्यातासाने परतला. आमच्या विभागातील नगरसेवक तिथे हजर होता त्याला रागाने इथे रुईचे झाड लावा नाहीतर अविवाहितांच्या प्रेताला अग्नी नाही देणार असे ठणकावून सांगितले. चितेला अग्नी दिला की ताबडतोब नातेवाईकांशी बोलून दहावे बारावे तेरावे फिक्स करून तारीख जाहीर करतो. आणि सर्वाना घरी जाण्याची परवानगी ही देतो. बाहेर निघताना आम्हाला खुणा करतो आम्ही समजून मान डोलावतो शेवटी उरलेले सर्व सोपस्कार करून अग्नी देणाऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून स्मशानाबाहेर पडतो. बाहेर येताच विक्रम त्याच्या हातात काळी पिशवी देतो आणि बरोबरीच्या माणसाला आपल्या सोबत घेऊन जातो.
वाचण्यासारखे आणखी काही..
तिची ही होळी
सिझरिंग
डिएसके, तुमचं चुकलंच…
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.