१२ एप्रिल १९६१ ला रशियाने आपल्या स्पुटनिक रॉकेट मधून ‘युरी गागारीन’ ला अवकाशात नेऊन अवकाशात जाणारा पहिला मानव असा मान दिला. तो काळ शीतयुद्धाचा होता. रशियाचा हा पुढाकार अमेरिकेच्या खूप जिव्हारी लागला. आपण जगात कुठेतरी मागे पडलो ही भावना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी ह्यांना पचवणं खूप कठीण जात होते. व्हाईस प्रेसिडेंट जॉनसन आणि नासा चे तत्कालीन अध्यक्ष जेम्स वेब ह्यांना त्यांनी लगेच बोलावून घेतलं. अनेक चर्चा झाल्यावर राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी ह्यांनी नासा ला टार्गेट दिलं. ते टार्गेट होतं हे दशक संपण्याच्या आधी अमेरिकन माणसाचे पाय चंद्राला लागायला हवेत. २५ मे १९६१ च्या त्या दिवशी अमेरिकन कॉंग्रेस च्या जॉईन्ट सेशन मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी ह्यांनी पूर्ण जगाला ह्याची कल्पना दिली. ह्यामागे राजकीय हेतू असला तरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका मागे राहणार नाही हा मुख्य हेतू होता. राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी ह्याचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी नासा ने कंबर कसली. २० जुलै १९६९ ला नील आर्मस्ट्रॉंग ने चंद्रावर पाहिलं मानवी पाउल ठेवलं. पूर्ण अमेरिकेसाठी आणि जगासाठी हा खूप महत्वाचा दिवस असला तरी त्या जिद्दीने बघितलेल्या स्वप्नाची मुहूर्तमेढ राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी ह्यांच्या भाषणात होती.
१९६१ ला भारत अजून स्वतःलाच शोधत होता. चंद्रावर मानवाने पाउल ठेवल्यावर १५ ऑगस्ट १९६९ ला इंडियन स्पेस रिसर्च अर्थात इस्रो ची स्थापना झाली. म्हणजे ज्यावेळेस अमेरिका चंद्रावर होती तेव्हा भारत अवकाशाकडे बघण्याचा स्वबळावर विचार करत होता. १९६९ ते २०१८ पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. एकावेळेस श्रीमंत राष्ट्रांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात भारताने झपाट्याने प्रगती केली. नक्कीच ह्या देशांमधील तंत्रज्ञान आणि भारतीय तंत्रज्ञान ह्यातलं अंतर अजून खूप असलं तरी ज्या वेगाने भारत अवकाशात मुसंडी मारत आहे. ते बघता आपण नक्कीच एक सशक्त पर्याय म्हणून पुढे येत आहोत. १५ ऑगस्ट २०१८ ला भारताच्या पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी प्रमाणेच भारत २०२२ म्हणजेच भारताच्या ७५ व्या स्वातंत्र दिवसाच्या आगोदर अवकाशात भारतीयांना स्वबळावर घेऊन जाईल असं जिद्दीचं एक स्वप्न भारतीयांना आणि जगाला दाखवलं आहे.
२०२२ पर्यंत इस्रो गगनयान मधून तीन भारतीयांना अवकाशात नेण्याच्या दृष्ट्रीने आता हालचालींना वेग आला आहे. हे तीन अंतराळवीर इंडियन एअर फोर्स चे पायलट असतील. इंडियन एअर फोर्स आणि इस्रो त्यांना ह्या मोहिमेसाठीचं पूर्ण ट्रेनिंग देणार असून ह्या पूर्ण मोहिमेचा खर्च साधारण १०,००० कोटी रुपये (१.४ बिलियन अमेरिकन डॉलर ) च्या आसपास जाईल असा अंदाज आहे. आता अनेकांच्या मनात प्रश्न येईल की इतके पैसे का द्यायचे? इतकी महाग का ही मोहीम? नक्की काय साधणार आहे भारत ह्यातून? असे प्रश्न मनात येतात तेव्हा आपण इतिहासात थोडं डोकावून बघायला हवं. राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी ह्यांच्या चंद्रावर जाण्याच्या घोषणेनंतर नासा ने अपोलो मिशन हाती घेतलं होतं. अपोलो मिशनचा त्या काळातला खर्च २५.४ बिलियन अमेरिकन डॉलर च्या घरात होता. १९६०-७० च्या दशकातली ही किंमत आहे. आजच्या मानाने हा आकडा प्रत्येकाने त्या काळातील आपले पगार आणि आजचा मिळणारा पगार ह्याच्याशी जुळवून बघावा. इस्रो च्या गगनयान मोहिमेचा प्रस्तावित खर्च १.४ बिलियन अमेरिकन डॉलर आहे (२०१८-२०२२). म्हणजे तब्बल २० पट कमी खर्चात ५० वर्षानंतर इस्रो भारतीयांना अवकाशात स्वबळावर नेत आहे. अपोलो मोहीम आणि गगनयान ह्या दोन्ही मोहिमा वेगळ्या आहेत. त्यामुळे तुलना करणं जरी योग्य नसलं तरी साधारण मानवाला अवकाशात नेण्याच्या खर्चाच्या अंदाजासाठी वरील आकडे आहेत.
भारताने इतका खर्च करावा का? उपासमारी, गरिबी हटाव वगरे वर हे पैसे का खर्च केले जाऊ नयेत असा प्रश्न सामान्य माणसांना पडणं सहाजिक आहे. पण जिकडे १२,००० कोटी पेक्षा जास्त रक्कम एका घोट्याळ्यात काही जणांच्या खिशात जाते. असे अनेक घोटाळे कित्येक हजारो कोटी रुपये गमावून त्यातून काही निष्पन्न न होता काळाच्या गर्तेत अदृश्य होतात किंवा केले जातात तेव्हा त्याच्या पेक्षा कमी खर्च अवकाशातील एक तंत्रज्ञान शिकण्यात दिले तर देशाचं नुकसान कसं?
भारतीयांची अवकाशातील भरारी स्वबळावर ह्या अवकाशाची अनेक दार उघडणारी आहे. अमेरिका, रशिया, चीन सोबत एलोन मस्क आणि जेफ बेझोस सारखे उद्योजग जेव्हा दुसऱ्या ग्रहावर राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तेव्हा जगातील एक सशक्त देश म्हणून ह्या संशोधनात भारताने का मागे रहावं? मंगळयान, चंद्रयान मोहिमांनी काय साधलं असे विचारणारे आता गप्प बसले असतील कारण जेव्हा ह्या मोहिमा हाती घेतल्या तेव्हा भारतातून आणि परकीय जगतातून हाच आक्रोश केला गेला की भारताला गरज काय? पण आज ह्या मोहिमांनी जगभरात भारताचं नाव तर नेलंच आहे पण त्याशिवाय आपल्या मोहिमांनी जे बाकीच्या देशांना जमलं नाही ते करून दाखवलं आहे. भले ते चंद्रावर पाणी सापडणं असो वा पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान स्थापन करण असो. ह्या सगळ्याच मोहिमा कमीत कमी पैश्यात आखल्या आणि पूर्णत्वाला नेल्या आहेत.
२०२२ पर्यंत इस्रो आपल्या जी.एस.एल.व्ही. मार्क ३ मधून तीन भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवेल. हे यान पृथ्वीपासून साधारण ३००-४०० किमी च्या पट्यात पृथ्वीभोवती ५-७ दिवस प्रदक्षिणा घालेल. ह्या कालावधीत पृथ्वीच्या त्या वातावरणात अनेक प्रयोग केले जातील. नंतर ऑर्बीटल मोड्युल पुन्हा एकदा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल. गुजरात जवळ अरबी समुद्रात त्या तीन अंतराळ वीरांना घेऊन उतरेल. ह्या आधी दोन वेळा मानवरहित ऑर्बीटल मोड्युल च्या चाचण्या केल्या जातील तसेच माणसाला अंतराळात राहण्यासाठी लागणाऱ्या अनेक तंत्रज्ञानाच संशोधन तसेच विकास केला जाईल. ह्यासाठी गरज लागल्यास मित्र राष्ट्रांची मदत ही घेतली जाणार आहे.
१९६१ ला राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी आणि नासा ह्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं. जगासमोर आणताना आपण त्यात कसंही करून यशस्वी होऊ हा आत्मविश्वास दोघांकडे ही होता. राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी ह्यांनी ह्याचा फायदा राजकारणासाठी केला अथवा नाही केला हा भाग बाजूला ठेवला तरी अमेरिकेने तंत्रज्ञानाच्या बाबतीत असं एक पाउल टाकलं जे आजही अबाधित आहे. ती जिद्दीची स्वप्ने होती जी अमेरिकेने १९६०-७० च्या दशकात बघितली होती. आज २०१८ ला भारत तीच जिद्दीची स्वप्न इस्रो च्या रुपात बघत आहे. आपण ह्यात कितपत यशस्वी होऊ हे येणारा काळच ठरवेल. पण एक मात्र नक्की हीच जिद्दीची स्वप्न उद्याचं भारताचं तंत्रज्ञानातील एक ऐतिहासिक पाउल असणार आहे.
तळटीप :- ही पोस्ट राजकीय नसून भारताच्या अंतराळ कार्यक्रमाशी निगडीत आहे. कोणीही ह्याचा वापर राजकीय पोळी शेकण्यासाठी करू नये.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.