परवा रात्री झोपताना मुलाने जोर देऊन सांगितले की सकाळी ५ वाजता उठव. वाटलं की अरे वा.. छानच आहे सकाळी उठून अभ्यास वगैरे करायचे ठरवले असेल ? दृष्ट लागायला नको म्हणून काहीही न बोलता किंवा न विचारता हो उठवेल असे सांगून मोकळी झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजण्याच्या आधी दहा मिनिटांपासून उठवायला सुरुवात केली पण रात्री केलेला निश्चय सगळा गाढ झोपेत कुठेतरी दडून गेला होता. थोडा वेळ प्रयत्न करून शेवटी मी पण सोडून दिले आणि आपल्या कामाला लागले.
सात वाजत आल्यावर त्याला आपणहूनच जाग आली आणि आभाळ कोसळल्यासारखे, ” मला उठवले का नाही; आज आम्हाला “बॅटल” ला जायचं होतं.” अशी ओरड चालू झाली; म्हणजे काय तर स्वारी युद्धावर जाणार होती आणि सेनापती झोपलेले ? आणि ये युद्ध होतं “क्लॅश ऑफ क्लॅन” चं (Clash of Clan)
असंच एकदा राघवचा म्हणजे त्याच्या मित्राचा व्हाट्स अँपवर एक मेसेज पहिला, “पेनने सांगितले की ६ लाखाचा टॅक्स भरायचा आहे”. अचानक हे असे काही बघून मला धडकीच भरली ? आणि मी विचारले अरे हा पेन कोण आणि टॅक्स कसला भरायला सांगतोय तोत्यावर चिरंजीवांचे उत्तर; अगं तो पोलंडचा आहे आणि सिटी गेम मधल्या टॅक्स बद्दल बोलतोय तो?? आणि तेव्हा वाटलं आपण आता आऊटडेटेड तर होत नाही ना चाललो.
सहजच फिरायला एकदा मॉल मध्ये गेलेले असताना एक साधारण साठीच्या काकूबाई आईस्क्रिम चाखत मजेत फिरत होत्या. आमची अशीच थोडीशी ओळख झाली आणि बोलता बोलता काकूबाईंनी विचारले तुझ्या मोबाईलमध्ये डेटा असेल तर शेअर करतेस का गं? मी केला… मला वाटले काही महत्वाचा मेल वगैरे करायचा असेल!!
पण नाही काकूंची चक्क त्यांच्या गुरांना चार घालायची वेळ झाली होती ? ? …….फार्म विले (Farm Ville )मधल्या ? ?
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.