लॉकडाऊनमुळे कित्येक जणांना आपल्या नोकऱ्या सोडाव्या लागल्या,
कित्येकांचे व्यवसाय बंद पडले, कित्येकांवर उपासमारीची वेळ आली.
तरीही या परिस्थितीत तग धरून राहण्यासाठी कितीतरी जणांनी वेगळे पर्यायही शोधले.
शिक्षण आहे पण साजेशी नोकरी नाही तरी हार न मानता वेगळया वाटेने जाऊन यशस्वी होता येतं हे काहीजणांनी दाखवून दिलं.
शेती विषयात पदवीधर असलेल्यांनी नवनवीन प्रयोग करून चांगलं यश मिळवलं.
आपले छंदसुद्धा व्यवसाय म्हणून जोपासता येऊ शकतात.
सुरूवातीला कदाचित नफा तोटा सांभाळणं कठिण होईल पण जिद्दीने जम बसवता आला पाहिजे.
अशाच एका हरहुन्नरी माणसाचा नवा उद्योग कसा बहरला ते पाहू…
केरळ मधील एर्नाकुलम जिल्ह्यात राहणारा अय्यप्पा दास नावाचा एक तरूण.
सुतारकामात तरबेज आणि कायम व्यस्त असणारा हा माणूस.
कोविडचा भारतात प्रसार होण्यापूर्वी त्याचा व्यवसाय जोरदार सुरु होता.
पण एक दिवस कोविडने सबंध भारताला वेठीस धरलं आणि सरकारला लॉकडाऊन जाहीर करावं लागलं.
अनेकांना आपलं अर्थार्जन सोडून द्यावं लागलं.
हातावर पोट असलेल्यांची तर आणखीनच बिकट अवस्था.
काहीजण नाईलाजाने गावी परतले तर काहीजण जिथल्या तिथे नवे उद्योग सुरू करायला बघत होते.
अय्यप्पा दास त्यापैकी एक.
लॉकडाऊनमुळे सुतारकाम सोडावं लागलं म्हणून आधीपासूनच आवड असलेला मत्स्य व्यवसाय सुरू करण्याचं त्याने ठरवलं.
काही महिन्यातच त्याचा इतका जम बसला की चांगलं उत्पन्न मिळून तो त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ एकट्याने सहज चालवू शकतो.
नवीन उद्योग सुरू करण्यासाठी त्याने वेगवेगळ्या वेबसाइट बघितल्या.
कोणता उद्योग आपण घरबसल्या करू शकतो याचा शोध घेतला.
त्यात अगदी लोणची पापडापासून वेगवेगळ्या उद्योगांचा विचार केला.
मग त्याच्या लक्षात आलं की गप्पी मासे जमवण्याचा छंदच व्यवसाय म्हणून सुरू करता आला तर…
गप्पी माशांनाच मिलियन फिश, रेनबो फिश, पोसिलिया रेटेक्युलेटा अशी वेगवेगळी नावं आहेत.
गोड्या पाण्यात पाळता येणारे, समशीतोष्ण भागात आढळणारे हे मासे रंग, आकार, शेपूट यावरून विभागले जातात.
अय्यप्पाने या माशांच्या व्यवसायाची पुष्कळ माहिती मिळवली.
त्याच्याकडे असलेल्या माशांचे फोटो सोशल मीडियावर टाकून आपल्या नवीन व्यवसायाची त्याने सगळ्यांना ओळख करून द्यायला सुरूवात केली.
व्यवसाय वाढवण्यासाठी या माशांच्या दोन जोड्या खरेदी केल्या.
जेमतेम दोन महिन्यांचे हे मासे आणखी दोन महिन्यांसाठी वेगवेगळे ठेवले.
एकीकडे व्यवसायाची जाहिरात करणं सुरूच होतं.
लोकांचा चांगला प्रतिसाद पाहून त्याचे आणखी प्रयत्न सुरू झाले.
गप्पी मासे सर्वसाधारण चार महिन्यांचे झाल्यावर प्रजननक्षम होतात.
त्याप्रमाणे त्याने चार महिन्यांच्या माशांना प्रजननासाठी एकत्र ठेवलं.
पुढे तीन महिन्यात छोट्या माशांचा जन्म झाला.
गप्पी मासे किमान पाच वेळा लहान माशांना जन्म देऊ शकतात.
त्यानंतर जन्माला येणारे मासे मात्र निकृष्ट दर्जाचे असतात.
पहिल्या खेपेला १० ते २५ मासे जन्म घेतात.
तर दुसऱ्या खेपेला साधारण ८० मासे जन्म घेतात. त्याप्रमाणे दोन महिन्यांचे काही मासे त्याने विकले.
या व्यवसायात एक काळजी अशी घ्यावी लागते की छोट्या माशांच्या जन्मानंतर आई असलेल्या मासोळीला भरपूर खाद्य देऊन फिश टॅंकमध्ये काही हिडन स्पॉट तयार करावे लागतात.
नाहीतर मासोळी आपल्या पिलांना खाऊ शकते.
किंवा त्या मासोळीला वेगळ्या टॅंकमधे एकटं ठेवलं जातं.
माशांमधे विविधता हवी असल्यास एका टॅंकमधे एक पुरुष मासा आणि दोन ते तीन स्त्री मासे ठेवले जातात.
हे मासे साधारण दोन इंचाचे असतात.
असे तीन मासे पाच गॅलन पाण्यात ठेवणं योग्य असतं.
चांगल्या मत्स्य उत्पादनासाठी १० ते २० गॅलन पाण्यात यापेक्षा जास्त मासे ठेवता येतात.
सध्या अय्यप्पाच्या घरी १८ प्रकारचे १५०० मासे आहेत.
प्लॅटिनम रेड, चिली रेड, अल्बिनो रेड, रेड ड्रॅगन असे त्यांचे प्रकार आहेत.
आत्तापर्यंत त्याने जवळपास ५००० माशांची विक्री करून दरमहा २५००० रूपयांच उत्पन्न कमावलं आहे.
मिळणाऱ्या उत्पन्नातून स्वतःच्या ६ माणसांच्या कुटुंबाचा चरितार्थ, व्यवसायासाठी लागणारं साहित्य, माशांची योग्य निगा या गोष्टी तो सहजपणे करू शकतो.
या व्यवसायात अय्यप्पाच्या कुटुंबियांची मदतही तेवढीच चांगली आहे.
त्याच्या मते कोणीही पूर्णवेळ काम करणारा माणूस हा व्यवसाय सहज करू शकतो.
माशांना योग्य वेळी खाद्य पुरवणं, टॅंकमधील पाणी योग्य वेळी स्वच्छ करणं एवढीच या व्यवसायाची मूलभूत गरज असते.
तरीही घरगुती मत्स्य व्यवसाय नेमकी काय काळजी घ्यावी हे पुढीलप्रमाणे सांगता येईल…
१. टॅंकमधील गोड्या पाण्याचं प्रमाण ठरवणं :
टॅंक दर आठवड्याला नियमितपणे स्वच्छ करावा.
त्यात ताजं पाणी आणि जुनं पाणी यांचं प्रमाण ६०:४० इतकं असावं.
कारण १००% ताज्या पाण्यात मासे राहू शकत नाहीत.
२. माशांचं निरीक्षण करत राहणं :
टॅंकच्या तळाला मासे बराच वेळ राहिले असतील तर समजावं की पाणी खराब झालं आहे.
योग्य खबरदारी घेऊन ताबडतोब पाणी बदलावं.
३. ताजी हवा :
टॅंकमध्ये माशांना ताजी हवा मिळणं सुद्धा महत्वाचं आहे.
पाण्यातून माशांना ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होत नसेल तर चांगल्या प्रतीचा फिल्टर लावावा.
४. पुरेसा अन्न पुरवठा :
गप्पी मासे अन्नाशिवाय आठवडाभर राहू शकतात.
तरीही त्यांना योग्य अन्न पुरवठा होणं गरजेचं असतं.
दिवसातून दोन वेळा पुरेसं खाद्य माशांना देणं योग्य असतं.
५. मृत माशांची विल्हेवाट :
मासे मृत झाले असतील तर ते पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगायला लागतात.
ते वेळीच टॅंकमधून काढून टाकावेत.
नाहीतर त्याचं इन्फेक्शन इतर माशांना होण्याची शक्यता असते.
तुम्हालाही अशा वेगळ्या वाटेवरून व्यवसाय करण्याची आणि तो वाढवण्याची इच्छा असेल तर जरुर त्याचा शोध घ्या आणि सुरूवात करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.