गर्भधारणा झालेली असताना प्रसूतीच्या आधीच गर्भ पडून जाण्याच्या प्रक्रियेला गर्भपात किंवा मिसकॅरेज असे म्हणतात. गर्भधारणेनंतर पहिल्या चार महिन्यात पोटातील गर्भाच्या मांसपेशी विकसित झालेल्या नसतात. त्यामुळे असा गर्भ पडून गेला तर मासिक पाळीत होणाऱ्या रक्तस्रावाप्रमाणेच रक्तस्त्राव होतो.
आयुर्वेदात सांगितल्यानुसार आपल्या शरीरातील त्रिदोषांपैकी वातदोषामुळे गर्भपात होऊ शकतो. ८० टक्के गर्भपात हे गर्भधारणेच्या ० ते १३ आठवड्यांमध्ये होतात. पहिल्या ० ते ६ या आठवड्यात गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो. काही वेळा सुरुवातीला गर्भधारणेची कल्पना नसते त्यामुळे गर्भपात झाला आहे का अनियमित पाळी आली आहे हे महिलेच्या लक्षात येत नाही.
गर्भपात होण्याची कारणे
गर्भपात होण्यामागे गर्भाशयाची गर्भ धारण करण्याची अक्षमता हे महत्त्वाचे कारण असते. एखाद्या स्त्रीचे गर्भाशय कमकुवत असल्यामुळे ते गर्भ धारण करण्यास सक्षम नसते. अशावेळी साधारण आठ आठवड्यांपर्यंत गर्भपात होऊ शकतो. त्याशिवाय खालील कारणांनी देखील गर्भपात होऊ शकतो.
१. इन्फेक्शन
२. हॉर्मोन्सचे संतुलन म्हणजेत प्रोजेस्टेरॉनची कमतरता किंवा इस्ट्रोजेन अधिक प्रमाणात असणे.
३. मधुमेह किंवा थायरॉईड यासारख्या समस्या
४. गर्भवती महिलेचे वाढते वय
५. गर्भपात होण्याची अनुवंशिकता
६. आईचा व बाळाचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह निगेटिव्ह असणे
७. होणारी आई अतिप्रमाणात धूम्रपान व मद्यपान करणारी असणे
८. अति प्रमाणात अँटिबायोटिक्स घेणे
९. कॅफिन युक्त पदार्थांचे अति प्रमाणात सेवन करणे
गर्भपात होत असल्याचे लक्षण
गर्भवती महिलेला अचानक पोटात अतिशय दाब जाणवून योनिमार्गावाटे पाणी अथवा रक्तस्त्राव होऊ लागतो. काही वेळा पोटात तीव्र वेदना होतात. तसेच काही वेळा काही वेदना न होता भ्रूण बाहेर पडतो. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात महिलांनी अतिशय काळजी घ्यावी तसेच थोडे जरी स्पॉटींग अथवा दुखणे वाटले तरी त्वरित डॉक्टरांना दाखवावे.
गर्भपात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
विटामिन सी युक्त फळे, पपई, लिंबाचा रस, पुदिना, अननस, ग्रीन टी, नूडल्स, जंक फूड आणि अति गोड पदार्थ गर्भवती महिलेने खाऊ नयेत. असे पदार्थ खाण्यामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो.
गर्भपात होऊ नये म्हणून प्रत्येक जोडप्याने गर्भधारणा होण्याआधी शरीराची व मनाची गर्भावस्थेसाठी योग्य ती तयारी करावी.
१. महिलेने गर्भधारणा होण्यापूर्वी पासूनच संतुलित आणि सुयोग्य आहार घ्यावा. तसेच वजन आटोक्यात ठेवावे.
२. स्त्रीच्या शारीरिक पोषणाची विशेष काळजी घ्यावी म्हणजे गर्भाचे नीट पोषण होऊन गर्भपात होणार नाही.
३. गर्भधारणा झाल्यानंतर सदर महिलेने जड सामान उचलू नये.
४. चिंता व ताणतणाव यांपासून स्वतःला दूर ठेवावे.
५. सतत आनंदी राहावे.
६. डॉक्टरांनी सुचवलेल्या गोळ्या आणि विटामिन सप्लीमेंट नियमितपणे घ्यावेत.
७. तज्ञ डॉक्टरांकडून नियमितपणे तपासणी करून घ्यावी.
८. आवश्यक प्रमाणात हलका व्यायाम आणि पुरेसा आराम करावा.
गर्भपात रोखण्याचे घरगुती उपाय
१. हिंग
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात महिलांनी आपल्या भोजनात हिंगाचे प्रमाण वाढवावे. त्यामुळे गर्भपात होण्याचे प्रमाण कमी होते.
२. डाळिंबाची कोवळी पाने
डाळिंबाची कोवळी पाने स्वच्छ धुऊन थोडे पाणी घालून वाटून घ्यावे. त्यात पाणी मिसळून ज्यूस तयार करून घ्यावा. गर्भवती महिलेला जरा थोडासा रक्तस्त्राव ( स्पॉटींग ) होत असेल तर असे ज्यूस पिणे उपयोगी ठरते.
३. विटामिन सी युक्त फळे
अतिप्रमाणात विटामिन सी युक्त फळांचे सेवन केल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते. परंतु योग्य त्या प्रमाणात अशा फळांचे सेवन करणे महिलेच्या शरीराच्या तसेच गर्भाच्या पोषणाच्या दृष्टीने आवश्यक असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून गर्भवती महिला आणि गर्भ सुरक्षित राहू शकतात.
४. दुधी भोपळा
ज्या महिलांना वारंवार गर्भपाताला सामोरे जावे लागले आहे त्यांनी नियमित स्वरूपात दुधी भोपळ्याची भाजी अथवा ज्यूस सेवन करावे. गर्भपात होण्याची शक्यता कमी होते.
५. तुरटी
ज्या महिलांना गर्भधारणा झाल्यानंतर स्पॉटींग होण्याचा त्रास होतो त्यांनी एक चमचा कुटलेली तुरटी कच्चे दूध आणि पाणी मिसळून सेवन करावी. स्पॉटींग कमी होण्यास मदत होते.
६. जवस
१२ ग्राम जवसाच्या पीठात १२ ग्राम काळे तीळ आणि १२ ग्राम पिठीसाखर घालून त्याचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण अर्धा चमचा घेऊन त्यात चमचाभर मध मिसळून चाटण तयार करावे. असे चाटण दररोज सेवन केल्यामुळे गर्भपात होण्याचा धोका कमी होतो.
७. गाजर
एक ग्लास दुधात एका गाजराचा रस काढून मिसळावा. नंतर ते मिश्रण अर्धा ग्लास होईपर्यंत उकळावे. असे मिश्रण दररोज प्यायल्याने गर्भपात होण्याचा धोका कमी होतो.
८. काळे चणे
काळ्या चण्याचा काढा बनवून प्यायल्यामुळे गर्भपाताचा धोका कमी होतो.
९. सुंठ
गर्भवती महिलेने सुरुवातीच्या काळात दररोज एक ग्लास दुधामध्ये एक चमचा सुंठ पावडर मिसळून असे दूध प्यावे. त्यामुळे गर्भपाताचा धोका उरत नाही.
१०. धोत्र्याची मुळे
गर्भवती स्त्रीने धोत्र्याच्या मुळ्यांची माळ बनवून पोटाला खालच्या बाजूने बांधावी. असे केल्यामुळे गर्भपात होण्याचा धोका कमी होतो.
११. पिंपळपान
गर्भावस्थेमध्ये पिंपळाचे पान हे एक वरदानच ठरते. गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यात एक पान, दुसऱ्या महिन्यात दोन पाने अशा रीतीने गर्भवती महिलेने पिंपळाच्या कोवळ्या पानाचे दुधाबरोबर सेवन केल्यास गर्भपाताचा धोका नाहीसा होतो.
तर हे आहेत आयुर्वेदात सांगितलेले गर्भपात होऊ न देण्यासाठी करण्याचे घरगुती उपाय. आवश्यकतेप्रमाणे त्यांचा वापर जरूर करावा.
गर्भवती स्त्रीने गर्भधारणेची शक्यता निर्माण होताच तशी तपासणी करून त्वरित स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांना भेटावे. त्यांच्याकडून प्रकृतीची नियमित तपासणी करून घ्यावी तसेच सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करून योग्य औषधे घ्यावीत. जास्तीत जास्त गर्भपात हे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात होत असल्यामुळे त्या काळात विशेष काळजी घ्यावी. गर्भपात होण्याची प्रवृत्ती असेल तर वर सांगितलेल्या उपायांचा अवश्य वापर करावा.
तर मैत्रिणींनो, हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून जरूर सांगा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.